Home Blog Page 6

अवैध वाळू वाहतुक करणारा हायवा पकडला; साडे अठरा लाखाचा मुद्देमाल जप्त

0

गेवराई — अवैध वाळू वाहतूक करणाऱा हायवा पोलिसांनी पकडला असून साडेअठरा लाख रुपयांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी पहाटे करण्यात आली.


पोलीस ठाणे गेवराई येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक हिमांशु नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पोलिस पथकाने बुधवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास संभाजी चौकाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील झमझम पेट्रोल पंप परिसरात नाकाबंदी केली होती.यावेळी बीडकडे वाळू भरून जाणारा एक हायवा येताना दिसल्याने पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली. चालकाने आपले नाव साहिल शांताराम कापसे वय २० वर्ष, रा. अचानक नगर, गेवराई असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे वाळू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळून आले.पोलिसांनी एमएच-१२-क्यूडब्ल्यू-४२२२ क्रमांकाचे हायवा वाहन (अंदाजे किंमत १८ लाख रुपये) तसेच सुमारे ३० हजार रुपये किमतीची पाच ब्रास वाळू असा एकूण १८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चालक साहिल कापसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

लाडकी बहिण’ योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक, आरोपी अटक

0

बीड — ‘लाडकी बहिण’ योजनेच्या नावाखाली समाज कल्याण विभागातील कर्मचारी असल्याचे भासवून महिलांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन व भांड्यांचे किट देण्याचे आमिष दाखवत ऑनलाईन पैसे उकळणाऱ्या आरोपीला अंमळनेर पोलिसांनी जालन्यातून अटक केली आहे.
गोरक्षनाथ नवनाथ पन्हाळकर रा. नाळवंडी, ता. पाटोदा, ह.मु. तळेगाव, जि. बीड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलांना फोन करून आपण समाजकल्याण विभागातून बोलत असल्याचे सांगितले. “तुमची शासनाच्या ‘लाडक्या बहिणी’ योजनेत विशेष निवड झाली असून तुम्हाला पिठाची गिरणी, शिलाई मशीन व भांड्यांचे किट देण्यात येणार आहे,” असे सांगून विश्वास संपादन केला. मात्र या वस्तू पाठविण्यासाठी वाहतूक खर्च म्हणून आधी ऑनलाईन पैसे पाठवावे लागतील, असे सांगत फोन-पेवर रक्कम पाठवण्यास सांगितले.या आमिषाला बळी पडत पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील पाच महिलांनी मिळून सुमारे ९ हजार रुपये आरोपीला पाठवले. मात्र पैसे पाठवूनही कोणतीही वस्तू न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने १५ फेब्रुवारी २०२६ रोजी अंमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आला. तपासादरम्यान सुमारे २५ ते ३० मोबाईल क्रमांकांचे सीडीआर काढून हजारो मोबाईल क्रमांकांची पडताळणी करण्यात आली. आरोपी वारंवार सिम कार्ड बदलत तसेच मोबाईल सुरू-बंद करत असल्याने तपासात अडचणी येत होत्या. मात्र तांत्रिक मदतीच्या साहाय्याने आणि बारकाईने तपास करत पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अखेर ९ मार्च २०२६ रोजी जालना येथील रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल योगेश बहिरवाळ, दिलीप घोशीर, पूजा तिपटे व शितल पवळ यांनी केली. पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बबन शिंदे, विलास माळी, भरत राठोड, शाम खाडे, संतोष कसाब, गणेश गोसावी, मारुती म्हेत्रे, शत्रुघ्न दिंडे व चालक ईसूफ शेख हे करीत आहेत.

घरगुती गॅसचा वापर पुरवठा विभागाची 3 हॉटेलवर कारवाई

0

बीड — इराण इजराइल अमेरिका युद्धामुळे स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून व्यावसायिक नफा कमवणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तीन हॉटेलवर पुरवठा विभागाने कारवाई केली आहे. या छाप्यामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.

युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे इंधन टंचाईचं संकट उभा राहिला आहे. घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना उपलब्ध व्हावं. यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पावलं उचलत एस्मा कायदा लागू करत व्यावसायिक गॅस सिलेंडर चा पुरवठावर बंधन आणले आहे. यामुळे मोठमोठ्या शहरांमधील हॉटेलिंग व्यवसाय धोक्यात आला आहे. मात्र बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक वापरासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. जिल्ह्याचा पुरवठा विभाग ही याकडे आज पर्यंत कानाडोळा करत आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र बीडमध्ये सिलेंडरची उपलब्धता सर्वसामान्य जनतेला व्हावी या उद्देशाने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाने मोठी कारवाई पहिल्यांदाच केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील “श्री” हॉटेल, समाधान हॉटेल आणि रायगड हॉटेल वर छापा मारला. या हॉटेलमधून अवैध पद्धतीने नफाखोरीसाठी घरगुती गॅस वापर होत असल्याचे छाप्यात उघड झाले. या तीनही हॉटेलमधून घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर, मंडळ अधिकारी अनील तांदळे, तलाठी शब्बीर पठाण, तालुका पुरवठा विभागातील अवल कारकून श्रीराम वैभव आणि संतोष मुळीक यांनी केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या कारवाईमुळे हॉटेल, खानावळ, धाबे चालकांच्या धंद्याला लगाम लागणार असून गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर अशा कारवाया वाढवण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले.

पहिल्यांदाच ! कोमात असलेल्या हरीश राणाला इच्छामरणाची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

0

नवी दिल्ली —13 वर्षांपासून कोमात असलेल्या गाझियाबादच्या 31 वर्षीय हरीश राणा यांना इच्छामरणाची परवानगी देत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना मानली जात आहे.
न्यायालयाने हरीश राणा यांना जीवनरक्षक यंत्रणांवरून टप्प्याटप्प्याने हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले असून ती प्रक्रिया रुग्णाच्या सन्मानाचे भान ठेवून पार पाडली जावी, असे स्पष्ट केले आहे.

न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) हरीश राणा यांना उपशामक उपचार विभागात दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली जीवनरक्षक उपचार हळूहळू काढून टाकण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. न्यायालयाने यावेळी रुग्णाची प्रतिष्ठा आणि मानवी मूल्ये जपणे अत्यंत आवश्यक असल्याचेही नमूद केले.

हरीश राणा प्रकरण अत्यंत वेदनादायक आहे. दिल्लीमध्ये जन्मलेले हरीश राणा चंदीगडमधील पंजाब विद्यापीठातून बीटेकचे शिक्षण घेत होते. 2013 मध्ये ते वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली आणि ते कोमात गेले. त्यानंतर ते कधीच शुद्धीवर आले नाहीत. डॉक्टरांच्या मते त्यांच्या मेंदूतील नसांवर गंभीर परिणाम झाला असून त्या पूर्णपणे सुकल्या आहेत. त्यामुळे ते बोलू शकत नाहीत, कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत आणि पूर्णपणे लाइफ सपोर्ट सिस्टमवर अवलंबून आहेत.

अपघातानंतर गेल्या 13 वर्षांपासून हरीश राणा अंथरुणावरच आहेत. डॉक्टरांनी त्यांना ‘क्वाड्रिप्लेजिया’ या गंभीर अवस्थेत असल्याचे घोषित केले आहे. या स्थितीत रुग्णाच्या शरीराच्या चारही अवयवांवर नियंत्रण राहत नाही आणि तो पूर्णपणे फीडिंग ट्यूब व व्हेंटिलेटरवर अवलंबून राहतो. डॉक्टरांच्या मते अशा स्थितीत बरे होण्याची कोणतीही शक्यता नसते.

हरीश यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाने प्रचंड संघर्ष केला आहे. उपचारासाठी कुटुंबाला दिल्लीतील द्वारका येथील स्वतःचे घर विकावे लागले. सध्या ते गाझियाबादमधील दोन खोल्यांच्या छोट्या फ्लॅटमध्ये राहतात. हरीश यांचे वडील अशोक राणा पूर्वी ताज केटरिंगमध्ये नोकरी करत होते. निवृत्तीनंतर त्यांना दरमहा फक्त 3600 रुपयांची पेन्शन मिळते. घरखर्च भागवण्यासाठी ते शनिवार आणि रविवारी गाझियाबादमधील एका क्रिकेट मैदानावर सँडविच आणि बर्गर विकतात.

हरीशच्या उपचारावर दरमहा किमान 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च येतो. गेल्या अनेक वर्षांत औषधे, व्हेंटिलेटर, नर्सिंग आणि देखभाल यावर मोठा खर्च झाल्याने कुटुंब आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचले आहे. त्यातच दीर्घकाळ अंथरुणावर असल्यामुळे हरीश यांच्या शरीरावर गंभीर बेडसोर्स म्हणजे खोल जखमा निर्माण झाल्या आहेत आणि त्यांची प्रकृती सतत खालावत चालली आहे.

हरीश यांची आई निर्मला राणा यांनीच सर्वोच्च न्यायालयात इच्छामरणाची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी मुलाच्या बरे होण्याची आशा गमावली आहे. त्यांच्या पश्चात मुलाची काळजी घेणारे कोणीही नसल्याची भीती त्यांना सतावत आहे. मुलाला अशा अवस्थेत पाहणे त्यांच्या कुटुंबासाठी मानसिकदृष्ट्या अत्यंत वेदनादायक ठरत असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.

दरम्यान, भारतात इच्छामरणाच्या अधिकाराबाबत 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली होती. त्यानुसार अत्यंत गंभीर आणि असाध्य अवस्थेत असलेल्या रुग्णांसाठी काही अटींसह जीवनरक्षक उपचार मागे घेण्याची परवानगी देण्यात आली होती.

हरीश राणा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय मानवी प्रतिष्ठा, करुणा आणि वैद्यकीय नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर; बीड मधील काळाबाजारी कधी बंद होणार ?

0

बीड — सर्वसामान्य जनतेचे गॅस टंचाईमुळे हाल होऊ नयेत यासाठी केंद्र सरकारने एस्मा कायदा लागू केलेला आहे मात्र बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी सर्रास केला जात असल्याने होणारी काळाबाजारी कधी रोखली जाणार असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

जग एकीकडे इंधन टंचाईमुळे त्रस्त आहे. अशावेळी जनतेला घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने कडक पावलं उचलली आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर बंधन आणल्यामुळे सध्या तरी जनतेला घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होऊ लागला आहे. इराण युद्धामुळे आणखी किती दिवस इंधन टंचाई जाणवेल याचा अंदाज बांधणं अवघड झालेलं आहे अशावेळी
पेट्रोकेमिकल विभागातून गॅस वळवल्यामुळे दैनंदिन वापराच्या गॅस उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकीकडे केंद्र सरकार राज्य सरकार कडक पावलं उचलत असताना दुसरीकडे मात्र बीड शहरासह जिल्ह्यात
हॉटेल खानावळ, चहाची टपरी, चाट भांडार,धाबे आशा व्यावसायिक ठिकाणी गेल्या सर्रास घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जात आहे. त्यामुळे मोठमोठ्या शहरांमध्ये हॉटेलिंग व्यवसाय धोक्यात आलेला असताना बीडमध्ये मात्र अशा व्यवसायांना कुठलाच फरक पडला नाही.गॅस टंचाई जाणवली नाही. मात्र राजरोस होणाऱ्या या काळाबाजारी मुळे सर्वसामान्य जनतेला गॅस टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी जिल्हा पुरवठा विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत काळाबाजारीला खतपाणी घालत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवला तर याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.व्यावसायिक प्रतिष्ठानासह काळाबाजार करणाऱ्या लोकाविरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होऊ लागली आहे.

महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल; राजभवनात पार पडला शपथविधी

0

मुंबई — जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिष्णू देव वर्मा यांना प्रशासन आणि राजकारणाचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी तेलंगणा राज्याचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच ते त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून ऊर्जा आणि ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. जिष्णू देव वर्मा हे मूळचे त्रिपुराचे असून त्यांचा संबंध त्रिपुराच्या राजघराण्याशी असल्याचेही सांगितले जाते. त्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची अधिकृत जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. दरम्यान, त्यांच्या कार्यकाळात राज्यातील विविध प्रशासकीय आणि विकासात्मक कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गॅसचा तुटवडा अन् भारतात ‘एस्मा’ कायदा लागू

0

नवी दिल्ली — इराण युद्धाचे परिणाम जगभर जाणू लागले आहेत.महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्र सरकारने देशभरात एस्मा अर्थात ‘आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम कायद्या’ची अंमलबजावणी केली आहे. आखात देशांमध्ये सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

        भारतात केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा कायद्याचं अधिकृत नाव ‘इसेन्शीअल सर्व्हिसेस मेंटेनन्स अॅक्ट (एस्मा) 1971’ असे आहे. हा कायदा अत्यावश्यक सेवांचा अविरत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या सेवा सुरळीत असाव्यात या हेतूने हा कायदा तयार करण्यात आला आहे.

भारतीय संसदेने 1968 साली ESMA (आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम) हा कायदा मंजूर केला होता. आपातकालीन काळात आवश्यक सेवा आणि सुविधांचा विनाखंड पुरवठा सुरु राहावा, यादृष्टीने हा कायदा तयार करण्यात आला होता.

दैनंदिन वापरात लागणाऱ्या गोष्टी आणि सेवांचा एस्मा कायद्याच्या कार्यकक्षेत समावेश होतो. संपाच्या काळात कामगारांना पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. एस्मा ऍक्ट द्वारे घरगुती एलपीजी अर्थात गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होईल.

या सेवांमध्ये संप, कामबंद किंवा साठेबाजी झाली तर सामान्य जनजीवन विस्कळीत होऊ नये, याकरिता सरकारला विशेष अधिकार दिले जातात. या कायद्यामुळे देशभरात आवश्यक वस्तूंची साठवणूक आणि काळा बाजार करण्यावर प्रतिबंध लागतो.

राज्य सरकार स्वतंत्रपणे किंवा अन्य राज्यांच्या मदतीने आपापल्या प्रदेशात या कायद्याची अंमलबजावणी करु शकते.

रुग्णालये, सार्वजनिक संरक्षण, स्वच्छता, जल पुरवठा, बँकिग सेवा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधित सेवा, पेट्रोलियम, कोळसा, वीज, पोलाद आणि खनिज उत्पादन आणि वितरणाशी निगडीत असलेल्या संस्था आणि कंपन्या एस्मा कायद्याच्या कक्षेत येतात.

सार्वजनिक वाहतूक, दळणवळण आणि खाद्यपुरवठा खरेदी आणि वितरण संबंधित सरकारी संस्थांना एस्मा कायद्याचे पालन करणे अनिवार्य असते. एस्माच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात खंड पडणार नाही याची काळजी सरकार घेते.

दरम्यान, संपामुळे होणारी गैरसोय, आर्थिक नुकसान, आरोग्य धोका टाळण्यासाठीच हा कायदा लागू केला जातो. सध्याच्या स्थितीमध्ये गॅस पुरवठा सुरळीत राहण्यासाठी लागू करण्यात आलेला एस्मा कायदा लागू करण्यात आला आहे.

दंड काय आकारला जातो?

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांनी संप पुकारला किंवा काम बंदचा इशारा दिला तर हा कायदा लागू होतो. कायदा लागू केल्यानंतर 6 महिने किंवा 6 वर्ष जाहीर कालावधीपर्यंत हा कायदा प्रभावी असतो. संप केल्यास, सेवा खंडित केल्यास संबंधित कर्मचारी, युनियन नेते आणि मुख्य अधिकारी यांना अटक करता येते.

पूर्वी एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जायचा आता हा दंड 3 लाखांपर्यंत करण्यात आला आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास कारावासाचीही तरतूद कायद्यात आहे.

तसेच साठेबाजी विरोधात आणि अत्यावश्यक सेवेत अडथळा आणणाऱ्यां विरोधात कायद्याने कठोर कारवाई करण्यात येते. याशिवाय कर्मचाऱ्यांना अटक आणि दंडाची तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रात ‘मेस्मा’ कायदा

यावर आधारित महाराष्ट्रात असलेल्या कायद्याचं नाव महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम 2011 (मेस्मा) लागू झाला. 2023 मध्ये यात सुधारणा करून ‘महाराष्ट्र इसेन्शीअल सर्व्हिसेस मेंटेनन्स अॅक्ट 2023′( महाराष्ट्र इसेन्शियल सर्व्हिसेस मेन्टेनन्स ऍक्ट, 2023) (मेस्मा) म्हणून लागू करण्यात आला.

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील रुग्णालये, दवाखाने, औषधी दुकाने, अत्यावश्यक सेवा जसे की एसटी, वीज, शिक्षण, अत्यावश्यक सेवा देणा-या अस्थापना यामध्ये सामान्य नागरिकांच्या रोजची कामे असतात, या कामात खंड पडू नये, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी हा कायदा अंमलात आणल्या जातो. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना संपा पासून परावृत्त करण्यासाठी सरकार या कायद्याचा वापर करते

गुटखा गोदामावर एलसीबीचा छापा पावणे दोन लाखाचा माल जप्त

0

बीड — पत्र्याच्या शेडमध्ये अवैध पद्धतीने साठवलेल्या बशीरगंज परिसरातील गुटखा गोदामावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून दीड लाखाचा मुद्देमालासह व आरोपीस अटक केली आहे.

शहरातील बशीरगंजमध्ये शेख इरफान जब्बार रा. जुनी भाजी मंडई बुंदेलपुरा, बीड याने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी सलमान रफिक बागवान रा. बशीरगंज, बीड याच्या सांगण्यावरून स्वतःच्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच सोमवारी दुपारी या ठिकाणी छापा मारला. या छाप्यामध्ये एक लाख साठ हजार 240 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला. यावेळी शेख इरफान या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले. तर सलमान रफिक बागवान हा फरार झाला आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. युनूस बागवान, गोविंद राख, अंकुश वरपे, स्वाती मुंडे, अशपाक सय्यद, मनोज परजणे, बबन सलगर, चालक नितीन वडमारे यांनी केली.

वय उलटले, लग्न नाही,मुलगी द्यायला कोणी तयार नाही फसवणुकीच्या चक्रव्यूहात तरुणाई ; विधानसभेत आ.सोळंकेची लक्षवेधी

0

मुंबई — माजलगावचे आ. प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका अत्यंत ज्वलंत आणि गंभीर सामाजिक समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले.ग्रामीण भागातील शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या असून, लग्नासाठी मुलांनाच हुंडा द्यावा लागत आहे,’ अशा शब्दांत सोळंके यांनी ग्रामीण तरुणांची व्यथा मांडली. या परिस्थितीमुळे फसवणुकीचे मोठे रॅकेट सक्रिय झाले असून, सरकार यावर काय उपाययोजना करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी ग्रामीण समाजात निर्माण होत असलेल्या या गंभीर सामाजिक प्रश्नावर सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
लक्षवेधी सूचनेदरम्यान बोलताना प्रकाश सोळंके म्हणाले की, ‘मी ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतो आणि तिथली परिस्थिती अत्यंत भयावह आहे. आज प्रत्येक लहान-मोठ्या खेडेगावात २५ ते ३० वयोगटातील किमान ५० ते १०० तरुण असे आहेत, ज्यांचे वय उलटून गेले तरी लग्न झालेले नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे हे तरुण शेतीचा व्यवसाय करतात. आज ग्रामीण भागात शेती करणाऱ्या मुलाला मुलगी द्यायला कुणीही तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे.’

लग्नाच्या या टंचाईमुळे ग्रामीण भागात एक नवी आणि घातक प्रथा रूढ होत असल्याचे सोळंके यांनी निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले, ‘पूर्वी मुलींकडून हुंडा घेतला जात असे, पण आता परिस्थिती उलटी झाली आहे. मुलाला लग्न करण्यासाठी मुलीच्या कुटुंबाला हुंडा द्यावा लागत आहे. या हतबलतेचा फायदा घेऊन फसवणुकीचे मोठे जाळे विणले जात आहे. ‘बोगस मुली’ आणून त्यांचे विवाह लावून दिले जातात. अडीच-तीन लाख रुपये लुटले. धक्कादायक म्हणजे, एकाच मुलीचे चार-चार विवाह लावून तरुणांना लुटण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.’
लग्नासाठी होणारी वणवण आणि समाजात मिळणारी वागणूक यामुळे ग्रामीण भागातील अविवाहित तरुण मोठ्या प्रमाणावर नैराश्यात जात आहेत. ‘लग्न होत नसल्याने अनेक तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत. हे केवळ एका कुटुंबाचे नुकसान नसून सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न आहे. अशा तरुणांचे विवाह लागावेत यासाठी सरकार काही विशेष योजना किंवा मदत करणार का?’ अशी विचारणा सोळंके यांनी केली आहे.

आमदार सोळंके यांनी मांडलेली ही वस्तुस्थिती राज्य सरकारने गांभीर्याने घेतली आहे. यावर उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, ‘आमदार प्रकाश सोळंके यांनी मांडलेली माहिती ही वर्तमान परिस्थितीचे वास्तव चित्र आहे. शासन या बाबीची गंभीर दखल घेणार असून संबंधित सूचनांचा अभ्यास करून आवश्यक त्या उपाययोजना आणि योजना तयार करण्याबाबत विचार केला जाईल,’ असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.

आरटीई प्रवेशाची एक किलोमीटरची अट रद्द — उच्च न्यायालय

0

नागपूर — राज्य सरकारच्या आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या घरापासून फक्त एक किलोमीटरच्या परिसरातील शाळाच निवडता येईल अशी घातलेली अट उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगित केली आहे. या निर्णयाचा पालकांना आरटीई अंतर्गत शाळा निवडण्यासाठी अधिक स्वातंत्र्य मिळाले आहे.

आरटीई म्हणजेच शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. या कायद्याचा मुख्य उद्देश आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास कुटुंबांतील मुलांनाही दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी हा आहे. मात्र, या प्रवेश प्रक्रियेबाबत राज्य सरकारने अलीकडेच एक नवीन नियम लागू केला होता. या नियमानुसार आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून फक्त १ किलोमीटरच्या परिसरात असलेली शाळाच निवडता येणार होती. या अटीमुळे अनेक पालक आणि सामाजिक संस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली.

ॲड. बोधी रामटेके आणि ॲड. दीपक चटप यांनी राज्य सरकारच्या या नियमाला आव्हान दिले. तसेच सामाजिक कार्यकर्ते आशिष फुलझेले आणि अनिकेत कुत्तरमारे यांनीही या विषयावर स्वतंत्र याचिका दाखल केली होती. या सर्व याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या १ किलोमीटरच्या अटीवर स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने स्पष्ट केले की, शिक्षण हक्क कायद्यात कुठेही विद्यार्थ्यांनी केवळ १ किलोमीटरच्या परिसरातील शाळाच निवडावी अशी अट नमूद केलेली नाही. हा कायदा केंद्र सरकारचा असल्यामुळे राज्य सरकारने त्यामध्ये अशा प्रकारची अट घालणे योग्य नाही. तसेच अशी अट लादणे म्हणजे एका हाताने विद्यार्थ्यांना अधिकार देणे आणि दुसऱ्या हाताने तो अधिकार काढून घेण्यासारखे असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मांडलेल्या मुद्द्यांनुसार, शिक्षण हक्क कायद्याचा उद्देश समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांतील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देणे हा आहे. मात्र, १ किलोमीटरची अट लागू केल्यास अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मर्यादित होते. त्यामुळे ही अट मनमानी, अवैध आणि संविधानाच्या भावनेला विरोध करणारी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. दरम्यान, न्यायालयाने राज्य सरकारच्या या अटीवर स्थगिती दिल्यामुळे आता पालकांना आपल्या मुलांसाठी आरटीई अंतर्गत अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या राहत्या घरापासून फक्त १ किलोमीटरपर्यंत मर्यादित न राहता इतर शाळांमध्येही प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे अनेक पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. तसेच या निर्णयामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेत पुन्हा एकदा पालकांना अधिक स्वातंत्र्य मिळाल्याचेही मानले जात आहे