Home Blog Page 59

संतोष देशमुख हत्या प्रकरण: फरार कृष्णा आंधळे ला पकडण्यासाठी मदत करणारास लाखाचे बक्षीस

0

बीड —  जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला  तब्बल 14 महिने उलटूनही मुख्य संशयित आरोपी अजूनही फरार असल्याने तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते दरम्यान राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने  आक्रमक भूमिका  घेत फरार आरोपी कृष्णा आंधळेचा शोध लावण्यासाठी मोठे पाऊल उचलत बक्षिसाची घोषणा केली आहे

संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यभर खळबळ उडाली होती. या प्रकरणातील अनेक आरोपींना अटक झाली असली तरी, प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा कृष्णा आंधळे गेल्या 14 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत आहे. या दिरंगाईवर न्यायालयानेही तीव्र नाराजी व्यक्त करत सीआयडीला जाब विचारल्यानंतर तपासाला नवे गतीमान मिळाले आहे.

या पार्श्वभूमीवर सीआयडीने कृष्णा आंधळेबाबत खात्रीशीर माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भीती न बाळगता नागरिकांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तपास यंत्रणांनी आता पारंपरिक पद्धतींसोबत तांत्रिक तपास अधिक तीव्र केला आहे. मोबाईल ट्रॅकिंग, आर्थिक व्यवहार आणि संपर्क साखळी तपासण्यासोबतच खबऱ्यांचे जाळेही अधिक मजबूत करण्यात आले आहे. फरार आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुका तोंडावर आल्याने या प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमीही लाभली आहे. 28 एप्रिल रोजी मतदान आणि 29 एप्रिलला निकाल जाहीर होणार असल्याने, या आधी आरोपीला अटक होणे महत्त्वाचे मानले जात आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी कृष्णा आंधळेची अटक निर्णायक ठरणार आहे.

आता सीआयडीने जाहीर केलेल्या बक्षिसानंतर नागरिकांकडून माहिती मिळते का आणि फरार आरोपी कधी पोलिसांच्या जाळ्यात अडकतो, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा आणि आरक्षणाचे लाभ होणार रद्द -सर्वोच्च न्यायालय

0

नवी दिल्ली —  “हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतर करणारी व्यक्ती अनुसूचित जाती  दर्जासाठी पात्र ठरू शकत नाही”, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. तसेच, ‘धर्मांतर केलेली व्यक्ती अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत संरक्षणाचा दावा करू शकत नाही. केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तींनाच अनुसूचित जाती  दर्जाचा दावा करण्याचा अधिकार आहे’, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


न्यायमूर्ती पी.के. मिश्रा आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने याबाबत निर्णय दिला आहे. भारतीय राज्यघटनेच्या (अनुसूचित जाती) आदेश, १९५० नुसार, केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तींनाच अनुसूचित जातीचे सदस्य मानले जाऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ‘लाइव्ह लॉ’ने दिलेल्या वृत्तानुसार, चिंथडा आनंद नावाच्या एका पाद्रीने याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. आनंद यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मे २०२५ च्या निकालाला आव्हान दिले होते. जातीय भेदभाव आणि छळाचा सामना करावा लागल्याचा आरोप आनंद यांनी याचिकेत केला होता.
“धर्मांतरित ख्रिश्चन व्यक्ती आता ‘अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९’ अंतर्गत तक्रार दाखल करू शकत नाही. एकद्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला की, ती तांत्रिकदृष्ट्या अनुसूचित जातीची राहत नाही, त्यामुळे या विशेष कायद्याचे संरक्षण तिला मिळत नाही”, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. धर्मांतर केल्यामुळे त्या व्यक्तीची मूळ सामाजिक ओळख (जातीचा दर्जा) कायदेशीररित्या संपुष्टात येते, कारण संबंधित धर्मांमध्ये (उदा. ख्रिश्चन धर्म) अधिकृतपणे जातिव्यवस्था मान्य नाही, असे कोर्टाने नमूद केले.आनंद यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप केला होता. आनंद आणि त्यांच्या कुटुंबियांना जातीच्या नावाखाली मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे त्यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्या अंतर्गत दाद मागितल्याचे स्पष्टीकरण दिले. आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर न्यायालयाने आनंद यांच्या ख्रिश्चन धर्मात धर्मांतराचे कारण देत त्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अंतर्गत संरक्षण मागण्याचा अधिकार गमावला असल्याचे एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले होते. यानंतर आनंद यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

मानमोडी येथे धाडसी दरोडा; आठ ते दहा लाखाचा ऐवज लंपास

0

गेवराई — दोन बंगल्यांमध्ये घुसून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा आठ ते दहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्री मानमोडी येथे घडली.

मानमोडी गावापासून हाकेच्या अंतरावर मादळमोही रस्त्यावर मधुकर यमाजी येवले व बापूसाहेब यमाजी येवले या सख्ख्या भावांचे शेतात शेजारी-शेजारी दोन बंगले आहेत. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन्ही घरांचे दरवाजे उचकटून आत प्रवेश केला. घरातील कपाटांची तोडफोड करून नगदी सुमारे तीन लाख रुपये तसेच सोन्याचे दागिने असा मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ गेवराई पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान श्वान पथक व फिंगरप्रिंट पथकही घटनास्थळी दाखल झाले असून संशयितांचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेकनूर: मार्केटिंगच्या साडेपाच लाखावर कार चालकाचा डल्ला

0

नेकनूर —  आहिल्यानगर येथून मार्केटींग करण्यासाठी आलेल्या सुनिल कुलकर्णी यांची ५ लाख ५३ हजार ९०० रूपये असलेली बॅग त्यांच्याच कार चालकाने लंपास केल्याचा प्रकार रविवार (दि.२२) रोजी नेकनूर येथे घडला. या प्रकरणी कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या गाडीचा चालक अमोल चंद्रकांत बरफे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगर येथील सुनिल भास्कर कुलकर्णी (वय ५९) या मार्केटींग व्यवसायिकाने नेकनूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मार्केटींगचे कामकाज करत असतांना माझ्या गाडीचा चालक अमोल चंद्रकांत बरफे रा. मिरी अडगाव ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर याने गाडीतील मार्केटींगचे जमा केलेले ५ लाख ५३ हजार ९०० रूपये चोरून नेले. सदरील रक्कम एका बॅगमध्ये ठेवण्यात आली होती. ती बॅग गाडीमध्येच ठेऊन कुलकर्णी हे नेकनूर येथील अमोल मशिनरी या दुकानात गेले असता त्यांच्या गाडीच्या चालकाने ते येईपर्यंत पैशांची बॅग लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अशोक बरफे याच्याविरूध्द नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोउपनि धायगुडे करीत आहेत.

कणगी गेली तळा अन बारीक दळा; गॅस सिलेंडर वजनात कपात

0

नवी दिल्ली — इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या वजनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.


आतापर्यंत ग्राहकांना मिळणारा १४.२ किलोचा सिलिंडर यापुढे केवळ ८ ते १० किलो गॅससह उपलब्ध होणार आहे. सिलिंडरचा आकार तोच असला तरी, त्यातील गॅसचे प्रमाण कमी करण्याचे आदेश पेट्रोलियम कंपन्यांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, सध्याचा १४.२ किलोचा साठा संपल्यानंतर ही नवीन व्यवस्था तातडीने लागू केली जाणार आहे.
या निर्णयामागे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि युद्धाची स्थिती कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलने इराणमधील गॅस आणि तेल साठ्यांवर केलेले हल्ले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारमधील नैसर्गिक वायू प्रकल्पांना लक्ष्य केल्यामुळे पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
या सुविधा पूर्ववत होण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने, आगामी काळात गॅसची तीव्र टंचाई भासू शकते. हीच संभाव्य अडचण लक्षात घेऊन उपलब्ध साठा सर्वांना मिळावा यासाठी सरकारने वजनात घट करण्याचा पर्याय निवडला आहे. यामुळे गॅस सिलिंडर पूर्वीपेक्षा कमी दिवस पुरणार असून गृहिणींचे बजेट विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
एकीकडे घरगुती वापरासाठी कपात केली जात असताना, दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक क्षेत्रासाठी दिलासादायक पाऊल उचलले आहे. राज्यातील हॉटेल व्यावसायिक आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना होणाऱ्या गॅस पुरवठ्यात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे ढाबे आणि हॉटेल्सवर ओढवलेले संकट काही प्रमाणात दूर होणार आहे. दरम्यान, घरगुती सिलिंडरचे वजन कमी झाल्यामुळे त्याच्या किमतीत नेमकी किती घट होणार, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. कमी वजनाच्या सिलिंडरचे दर नेमके किती ठरवले जातात, याकडे आता सर्व सामान्य नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना ’चंपावतीरत्न’ पुरस्कार प्रदान; जनतेला केला समर्पित

0

बीड —  माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना नुकताच प्रतिष्ठित ’चंपावतीरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात बोलताना त्यांनी आपल्या कार्याचे श्रेय जनतेला देत, जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि विकासावर भाष्य केले.

रविवार दि.22 रोजी हॉटेल नीलकमल येथे रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीनेमाजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना ’चंपावतीरत्न’ पुरस्कार रो.सुधीर लातुरे, मयंक गांधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रा.ओम मोतिपवळे, रो.हरीष मोटवाणी, ह.भ.प.विनय महाराज पाटांगणकर, सुभाषचंद्र सारडा, नितीनचंद्र कोटेचा, समीर काझी, अजित वरपे, दिलीप खिस्ती, सुनिल क्षीरसागर, महेश वाघमारे, अ‍ॅड.कालिदास थिगळे, सत्यनारायण लाहोटी, विलास बडगे, दिनकर कदम, गंगाधर घुमरे, प्रा.जगदिश काळे, अरूण डाके,नानासाहेब काकडे,अरुण बोगाने रो.विकास उमापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्काराला उत्तर देताना माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले की, वादापेक्षा विकासावर विश्वास ठेवणार्‍या जनतेने मला जी साथ दिली, त्यामुळेच हे शक्य झाले. हा पुरस्कार मी बीड जिल्ह्यातील तमाम जनतेला समर्पित करतो. 50 वर्षांपूर्वीचा जिल्हा आणि आजचा जिल्हा यातला फरक सर्वांच्या समोर आहे. आम्ही सर्वच काही केले असा आमचा दावा नाही, मात्र जे-जे शक्य होते ते करून दाखवले. असे सांगून त्यांनी पाणी प्रश्नावर विशेष भर दिला. ते म्हणाले, मराठवाड्याच्या हक्काचे 28 टीएमसी पाणी लवकरात लवकर मिळावे, हीच आमची मुख्य इच्छा आहे. बीड जिल्ह्यातील मजुरांच्या हाताचा कोयता कायमचा बंद होऊन आपली जमीन पाणीदार व्हावी, हेच आमचे स्वप्न आहे. पुरस्कारामुळे आपली जबाबदारी अधिक वाढल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. विकासासाठी जात, धर्म आणि पंथ बाजूला सारून सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अजूनही अनेक कामे होणे बाकी आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तुमच्या प्रेमाची जी शिदोरी माझ्याकडे आहे, त्या जोरावर मी या जबाबदार्‍या समर्थपणे पेलण्यास तयार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त करून यावेळी त्यांनी नाव न घेता विरोधकांवरही टीका केली. काही लोक केवळ वरवरचे मुखवटे धारण करून भ्रम निर्माण करत आहेत, मात्र जनतेने चांगल्या-वाईटाची पारख केली पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले. याशिवाय रो.हरीष मोटवानी, रो.मोतिपवळे, रो.मयंक गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी बाबुशेठ लोढा, सुधाकर मिसाळ, भास्कर जाधव, सखाराम मस्के, अशोक शेटे, प्रकाश कानगांवकर, अर्जुन बहिरवाळ, राणा चौव्हान, विजय सरवदे, सुर्यकांत महाजन, विशाल क्षीरसागर, प्रमोद करमाळकर, विष्णुदास बियाणी, रामेश्‍वर कासट, अमोल लहाने, डॉ.महेंद्र गौशाल, डॉ.अरूण भस्मे, किशोर पगारिया, लक्ष्मीकांत सोनी, सुरेंद्र कासट, मनमोहन कलंत्री, जवाहर कांकरिया, राहूल बोरा, रो.सुमित जयस्वाल, रो.सुरेश लड्डा, रो.वाय जनार्दनराव, रो.संतोष पवार, रो.मुकुंद कदम, रो.मेघराज पिंगळे, सुहास बेदरे, गणेश मुळे, संदिप खोड, ओमप्रकाश लोहिया, राम मोटवानी, सुरज लाहोटी, विवेक बडगे, प्रमोद धारवाडकर, कल्याण कुलकर्णी, सुनिल खंडागळे, अशोक राऊत यांच्यासह महिला, पुरूषांची उपस्थिती होती,

माजी खा.स्व.काकूंना मिळाला होता चंपावतीरत्न पुरस्कार
जिल्ह्याच्या माजी खासदार स्व.केशरबाई क्षीरसागर उर्फ काकू यांना सन 2002-03 मध्ये रोटरी क्लब ऑफ बीडच्या वतीने चंपावतीरत्न पुरस्कार मिळाला होता आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना पण सन 2025-26 मध्ये चंपावतीरत्न पुरस्कार मिळालेला आहे.

स्थानिक दैनिकांची आर्थिक कोंडी; कारवाईचा उगारा सोट्या, अधिकारी खेळत आहेत गोट्या

0

बीड — एकीकडे शासन पारदर्शकतेचे दावे करत असताना, बीड जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणानी स्थानिक वृत्तपत्रांच्या जाहिरातींची बिले अडवून त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वृत्तपत्रांची गळचेपी केली जात आहे .जिल्ह्यातील विविध भूसंपादन कार्यालयांमार्फत देण्यात आलेल्या जाहिरातींची सुमारे ५० लाख रुपयांची देयके तब्बल १० वर्षांपासून प्रलंबित असल्याने संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.२३, सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे ‘गोट्या खेळत’ लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. “जिल्हा प्रशासन गोट्या खेळतंय काय?” असा सवाल करत प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. दफ्तर दिरंगाई करणा-या आधिका-यांवर प्रशासकीय व दंडात्मक कारवाईचा सोट्या उगारा अशी मागणी करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यां मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन सादर करण्यात आले.

“मोदी टेक्नॉलॉजी वापरा, गॅस टंचाई दूर करा” : नाल्याच्या गॅसवर ‘चाय पे चर्चा

प्रकरण नेमके काय?

बीड जिल्ह्यातील विविध शासकीय प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रियेदरम्यान कायदेशीर जाहिराती स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध केल्या जातात. मात्र या जाहिरातींचे पैसे वेळेत न दिल्याने मोठा निधी अडकून पडला आहे.

विशेष म्हणजे, सन २०२१ ते २०२४ दरम्यान भूसंपादन कार्यालयाकडून मंत्रालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावांमध्ये तांत्रिक त्रुटी निदर्शनास आणून ते प्रस्ताव परत पाठवण्यात आले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी त्या त्रुटी दूर करून प्रस्ताव पुन्हा सादर करण्याबाबत उदासीनता दाखवली. परिणामी गेल्या ३-४ वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित आहेत.

वृत्तपत्रांची आर्थिक कोंडी

प्रलंबित देयकांमुळे स्थानिक वृत्तपत्रांची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. वारंवार निवेदने, पाठपुरावा आणि आंदोलने करूनही केवळ आश्वासने मिळाली; प्रत्यक्ष निधी मात्र मिळालेला नाही. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्रावरच आर्थिक संकट ओढवल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

आंदोलनात सहभागी

या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस चऱ्हाटकर, सुदाम तांदळे, मुबीन शेख, पांडुरंग हराळेतसेच बाळासाहेब मोरे पाटील (प्रदेशाध्यक्ष, शिवशक्ती-भिमशक्ती विचारमंच), सादेक सय्यद (शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी – बीड), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक) , सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, किष्किंधा पांचाळ ( अध्यक्ष विश्वकल्याण सेवा भावी संस्था बीड)आदी सहभागी झाले होते.

प्रमुख मागण्या

⭐ प्रलंबित ५० लाख रुपयांची देयके तातडीने मंजूर करावीत

⭐ मंत्रालयाने दाखवलेल्या तांत्रिक त्रुटी त्वरित दूर करून प्रस्ताव पुन्हा सादर करावेत

⭐ संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

⭐ स्थानिक वृत्तपत्रांची आर्थिक पिळवणूक थांबवावी

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी नाहीच – अर्थमंत्री

0

नवी दिल्ली — देशातील शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी देण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याची महत्त्वाची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिली.

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देतानाच, कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार कर्जमाफीऐवजी इतर आर्थिक उपाययोजनांवर भर देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना ‘किसान क्रेडिट कार्ड‘च्या माध्यमातून वेळेवर आणि पुरेसा कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला जात असून, सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज सवलतीच्या दरात दिले जात आहे. याशिवाय शेतीशी संबंधित इतर कामांसाठी विनातारण मिळणाऱ्या अल्पमुदतीच्या कर्जाची मर्यादा १.६० लाखांवरून २ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

याच सत्रात सशस्त्र दलांच्या जवानांसाठी एक दिलासादायक घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी ‘अपंगत्व निवृत्तीवेतना’वरील  कर सवलत कायम राहणार असल्याचे सांगितले.

१९२२ पासून सुरू असलेली ही सवलत नव्या आयकर कायदा २०२५ च्या अंमलबजावणीनंतरही तशीच सुरू राहील, यासाठी ‘वित्त विधेयक २०२६’ मध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे.

देशातील सुमारे ८९ हजार ५९८ जवान सध्या हे निवृत्तीवेतन घेत असून, लष्करी कर्तव्य बजावताना अपात्र ठरलेल्या जवानांच्या वैद्यकीय श्रेणीचे वर्गीकरण कडक निकषांनुसार केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. जवानांच्या हिताचे रक्षण करणे हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे अर्थमंत्र्यांनी सभागृहात ठामपणे सांगितले.

मुलगी पाहण्यास नकार देताच तरुणासह पती-पत्नीस मारहाण

0

नेकनूर — मुलगी पाहण्यासाठी सोबत येण्यास नकार दिल्याच्या कारणावरून 21 वर्षीय तरुणावर तिन जणांनी हल्ला केला, तर त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या पती-पत्नीलाही मारहाण करण्यात आल्याची घटना लिंबागणेश येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा रामदास थोरात हा 18 मार्च रोजी रात्री बाजारतळ परिसरातून आपल्या शेताकडे जात होता. त्यावेळी औदुंबर थोरात, विशाल थोरात आणि बाळू थोरात यांनी त्याला रस्त्यात अडवून एका मुलीला पाहण्यासाठी सोबत येण्याची विनंती केली. मात्र घरी कोणी नसल्यामुळे कृष्णाने जाण्यास नकार दिला. या साध्या कारणावरून आरोपी संतापले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला.

आरोपींनी कृष्णाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच लोखंडी गजाने त्याच्या चेहऱ्यावर प्रहार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेदरम्यान आरडाओरडा ऐकून महादेव थोरात आणि त्यांची पत्नी दिपाली थोरात हे भांडण सोडवण्यासाठी धावून आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही लक्ष्य करत मारहाण केली. दिपाली यांच्या हातावर काठीने मारण्यात आले, तर दोघांनाही धमक्या देण्यात आल्या.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ कारणावरून इतक्या गंभीर स्वरूपाचा हल्ला झाल्याने स्थानिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जखमी कृष्णा थोरात यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, औदुंबर, विशाल आणि बाळू थोरात यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

मस्साजोग मध्ये सरपंच पदासाठी होणार पोटनिवडणूक

0

बीड — केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून २९ एप्रिल रोजी निकाल जाहीर केला जाईल. मस्साजोगच्या नवीन कारभार्याच्या निवडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

“मोदी टेक्नॉलॉजी वापरा, गॅस टंचाई दूर करा” : नाल्याच्या गॅसवर ‘चाय पे चर्चा

संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सरपंचपदासाठी सक्रियतेने तयारी सुरू केली आहे. दरम्यान संतोष देशमुख  यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख सक्रिय असून सरपंच पदासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

मात्र मस्साजोग ग्रामस्थ ही निवडणूक बिनविरोध करून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहणार की विरोधात उमेदवार उभा राहणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

7 ते 13 एप्रिल

अर्जाची छाननी – 15 एप्रिल

अर्ज मागे घेण्याची तारीख – 17 एप्रिल

मतदान – 28 एप्रिल

निकाल – 29 एप्रिल