Home Blog Page 58

चमत्काराच्या नावाखाली सोन्याची अंगठी चोरणारा नाशिकचा भोंदू बीडमध्ये जेरबंद

0

बीड — चमत्कार दाखवतो असे सांगून एका वृद्ध व्यक्तीची सोन्याची अंगठी हातचलाखीने चोरी करणाऱ्या भोंदूला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भीमा सोनाजी जाधवर (वय ५८, रा. काशीदवाडी ता. केज) यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ते पुणे येथे उपचारासाठी जाण्यासाठी केज बसस्थानकात बसची वाट पाहत होते. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधत चमत्कार पाहायचा आहे का? असे विचारले. त्यांनी फिर्यादींची सुमारे ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून पांढऱ्या रुमालात ठेवत असल्याचा बनाव केला व १० मिनिटे डोळे बंद करा, चमत्कार दिसेल असे सांगून हातचलाखीने अंगठी चोरून पसार झाला. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, या गुन्ह्याचा समांतर तपास
स्थानिक गुन्हे शाखा करत होती. पोउपनि महेश विघ्ने यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोन संशयित इसमांचे फुटेज मिळाले. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हे येवला (जि. नाशिक) येथील असून मदारी खेळ व हातचलाखी करणारे असल्याचे निष्पन्न झाले. यानुसार पथक येवला येथे रवाना झाले व फुटेज मधील आरोपी अमजद नबाब मदारी (रा.
सावरगाव, ता. येवला, जि. नाशिक) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदार अशफाक राजू मदारी याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली.पोलिसांनी
आरोपीकडून चोरीस गेलेली ६ ग्रॅम सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे २४ हजार रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे. आरोपीस पुढील कारवाईसाठी केज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून फरार साथीदाराचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश विघ्ने, पोहेकॉ महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गीते, गणेश मराडे यांनी केली.

घरामागे खेळणाऱ्या अडीच वर्षीय मुलीवर 13 वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार

0

अंबाजोगाई — तालुक्यातील डोंगर पिंपळा येथे 15 वर्षीय मुलाने दोन वर्ष पाच महिन्याच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजीच आहे या घटनेला पाच दिवसही उलटत नाहीत तोच आणखी एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर गावातीलच 13 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 31 मार्च रोजी घडली. या घटनेने खळबळ माजली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 31 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पीडित चिमुरडी तिच्या घरामागील मोकळ्या मैदानात खेळत होती. यावेळी गावातीलच 13 वर्षीय मुलाने तिला गाठून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे चिमुरडीला गंभीर दुखापत झाली आहे .तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित चिमुरडीच्या आईने 1 एप्रिल रोजी बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. याप्रकरणी मुलाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएन एस) कलम 64(1), 65(2) तसेच पाॅक्सो कायद्याच्या कलम 4,8 आणि 13 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पाच दिवसापूर्वीच 15 वर्षाच्या मुलाने मोबाईलवर अश्लील चित्रफीत पाहून दोन वर्ष पाच महिने वयाच्या मुलीवर असाच लैंगिक अत्याचार केला. या घटनांमुळे खळबळ माजली असून लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल देणं किती घातक ठरू शकतं व मुले कशी गुन्हेगारीच्या विळख्यात सापडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणी नरहरी झिरवाळ वर कारवाई होणार – फडणवीस

0

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथीयासोबतचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.

या प्रकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  म्हणाले की, सोशल मीडियावर समोर आलेले हे व्हिडीओ अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. जर हे व्हिडीओ खरे असल्याचे तपासात निष्पन्न झाले, तर संबंधित व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितपणे केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले की, कायद्यासमोर कोणीही मोठा नसून सत्यता पडताळणे ही प्राथमिक गरज आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून आपली बाजू मांडली. झिरवाळ यांच्या मते, हा व्हिडीओ पूर्णतः बनावट असून तीन-चार वेगवेगळ्या क्लिप्स एकत्र करून (मॉर्फ) तो तयार करण्यात आला आहे.

आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी हा कट रचल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ सायबर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून तांत्रिक तपासातून दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल.

काही दिवसांपूर्वीच झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लर्क लाचखोरीच्या प्रकरणात अडकला होता. त्यातून सावरत असतानाच आता या वैयक्तिक स्वरूपाच्या कथित व्हिडीओमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री, सुनेत्रा पवार आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते मिळून झिरवाळ यांच्या राजकीय भविष्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असेही फडणवीस यांनी नमूद केले. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, हा व्हिडीओ हनी ट्रॅपचा भाग आहे की राजकीय षडयंत्र, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

रूपाली चाकणकरचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

0

मुंबई — भोंदू अशोक खरात प्रकरणी रोज नव नवीन खुलासे होत आहेत. खरातसोबतचे व्हिडीओ फोटो व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकरला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आता राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा दिला आहे. तिने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकरला प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी होत होती. अखेरीस रुपाली चाकणकरने आता राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे.
“खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य आणि कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत. ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे” अशी माहिती रुपाली चाकणकरने ट्वीट करून दिली आहे.

15 वर्षाच्या मुलाचा 2 वर्षीय चिमुरडीवर अश्लील चित्रफीत पाहून अत्याचार

0

अंबाजोगाई — अल्पवयीन मुली सुरक्षित नसल्याचे चित्र बीड जिल्ह्यात निर्माण झाला आहे. अवघ्या दोन वर्ष पाच महिने वयाच्या चिमुरडीवर १५ वर्षीय नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष बाब म्हणजे मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहून आरोपीने हे कृत्य केले असून, पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार उघड झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील एका गावातील ही चिमुरडी १७ मार्च २०२६ रोजी घरासमोरील पाण्याच्या हौदात पडून मयत झाली होती. सुरुवातीला हा केवळ अपघात वाटत असल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन करताना मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक
मुरलीधर खोकले यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले आणि त्यांच्या पथकाने अत्यंत गोपनीय माहिती गोळा केली. पीडितेच्या मृत्यूनंतर संशयित आरोपी असलेला तिच्या आत्याचा मुलगा (वय १५ वर्षे ५ महिने) हा तीन दिवस जेवला नव्हता आणि सतत रडत होता, अशी माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली. या संशयावरून पोलिसांनी त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पीडितेच्या मृत्यूपूर्वी आठ दिवस अगोदर आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या दुचाकीवर बसवून नेले आणि घरात कोणी नसताना मोबाईलवरील अश्लील चित्रफीत पाहून तिच्यावर अत्याचार केले. त्यापूर्वी देखील त्याने तिच्यावर एक वेळेस लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(१) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियम २०१२ च्या कलम ४, ६, ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी स्वतः सरकारतर्फे फिर्यादी होऊन एका गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पिंक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधवर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेबद्दल संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलीस निरिक्षक खोकले कोणतेही धागेदोरे हाती नसताना कसून तपास करत अत्यंत कमी कालावधीत आरोपी निष्पन्न केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

टिप्परची कारला धडक; कारने पेट घेतल्याने माय लेकाचा जळून मृत्यू

0

आष्टी — खडी घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने कारला जोराची धडक दिली. धडक बसताच कारने पेट घेतला. आग एवढी भयानक होती की, गाडीत असलेल्या दोघांना गाडीबाहेर पडता आले नाही. या दुर्घटनेत माय लेकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी साडे दहाच्या वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर घडली.

अपघातातील मयतात ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांच्या पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी आणि मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी यांचा समावेश आहे.
शुक्रवार दि. 27 मार्च रोजी सकाळी आष्टी तालुक्यातील बीड — अहिल्यानगर महामार्गावर कापशी गावाजवळ भीषण दुर्घटना घडली. ऋषिकेश श्रीहरी पुरी व पुष्पा श्रीहरी पुरी हे माय- लेक दोघेजण कार मधून बीडच्या दिशेने निघाले होते. याचवेळी बीडकडून डोईठाणकडे खडी घेऊन जाणाऱ्या एका भरधाव हायवा क्र.16सी.डी 7305 ने कापशी गावाजवळ कारला समोरून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारच्या इंजिनने तात्काळ पेट घेतला. कारने पेट घेतल्याने आत असलेल्या आई आणी मुलाला गाडीतून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत माय लेकरांचा जळून मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह कारमध्ये अडकलेले असल्याने ते बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला तब्बल दीड ते दोन तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. वडील ह भ प श्रीहरी महाराज पुरी कीर्तनात असतानाच काळाने घाला घातला. श्रीहरी पुरी हे आष्टी पंचायत समितीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून ते एक उत्तम कीर्तनकार देखील आहेत. ज्यावेळी ही हृदयद्रावक घटना घडली, त्यावेळी पुरी महाराज एका कीर्तनाच्या कार्यक्रमात व्यस्त होते, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण आष्टी तालुक्यासह बीड जिल्ह्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बामुक्टा संघटनेच्या उपाध्यक्षपदी डॉ. विलास भिलारे यांची बिनविरोध निवड

0

चौसाळा — डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ टीचर्स असोसिएशन( बामुक्टा) संघटनेच्या बीड, जिल्हा कार्यकारिणीची निवड बीड येथील बलभीम महाविद्यालयात दिनांक 25 .3. 2026 रोजी दुपारी पाच वाजता विभागीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली असून यामध्ये सर्वानुमते बीड जिल्ह्याची कार्यकारणी निवड करण्यात आली., यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून चौसाळा येथील कला व विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. विलास भिलारे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

केंद्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. बाबासाहेब कोकाटे आणि विभागीय उपाध्यक्ष डॉ. रमेश लक्ष्मणराव वारे यांच्या नियोजनात आणि ज्येष्ठ मार्गदर्शक खालील मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राजेश करपे, डॉ. अंकुश कदम व्यवस्थापन परिषद सदस्य छत्रपती संभाजी नगर, डॉ. विलास खंदारे, प्राचार्य डॉ. संतोश उंदरे, डॉ. मुंजा भाऊ धोंडगे, डॉ. आप्पासाहेब हुंबे, डॉ. सुनील कुमार वनंजे, डॉ. गफाट, डॉ. सरकटे, माजी प्राचार्य डॉ. हनीफ, प्राचार्य तथा सिनेट सदस्य डॉ विश्वास कंधारे, प्राचार्य डॉ. तात्याराम सोंडगे, प्राचार्य प्रसाद मदन, डॉ. संजय कदम प्रा. समाधान माने सिनेट सदस्य बंडू सोमवंशी इत्यादी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नेते डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी खालील प्रमाणे जिला कार्यकारिणीची निवड जाहीर केली
अध्यक्ष डॉ. प्राचार्य अर्जुन मोरे वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर अंबाजोगाई, उपाध्यक्ष डॉ. विलास भिलारे चौसाळा डॉ. राजकुमार थोरवे आष्टी डॉ. ज्ञानेश्वर शिंदे माजलगाव, कोषाध्यक्ष डॉ. संजय सुरवसे बीड, सचिव डॉ. शंकरराव वाघमारे नेकनूर, सहसचिव सुनील जाधव, डॉ. हरिभाऊ कदम शिरसाळा, डॉ. सतीश कदम, महिला प्रतिनिधी डॉ. सुचिता खामकर, डॉ. रफिक शेख, डॉ. राजकुमार चाटे, डॉ. सखाराम पांढरे, डॉ. रमेश माने, डॉ. गजानन दराडे डॉ. ज्ञानेश्वर येवले, डॉ. इंगोले, डॉक्टर अशोक होके, डॉ. सचिन खिस्ते, डॉ. पठाण गेवराई इत्यादी मान्यवरांचा जिल्हा कार्यकारणी समावेश झाला असून नवीन कार्यकारिणीच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी गेवराई, माजलगाव, परळी, केज धारूर बीड, पाटोदा, शिरूर, केज, येथील अनेक प्राध्यापक व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

मावलाई श्री राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्कार डॉ. गणेश ढवळेंना जाहीर

0

बीड —  गेवराई तालुक्यातील मावलाई युवक क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा ब-हाणपुर यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १७ वर्षांपासून मावलाई देवी यात्रेनिमित्त पत्रकारिता, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना “मावलाई श्री राज्यस्तरीय पुरस्कार” प्रदान करण्यात येतो.

यावर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांना “मावलाई श्री समाजसेवा पुरस्कार २०२६” जाहीर करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत सुविधा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न, वृक्षारोपण व संवर्धन तसेच पर्यावरण संरक्षण यांसारख्या विविध सामाजिक विषयांवर सातत्याने अनोख्या आंदोलनांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा ब-हाणपुर येथे दि. ०३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शशिकांत शिंगारे यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास प्रमोद कुलकर्णी, दिनेश लिंबेकर, सुशील देशमुख, अविनाश वाघिरकर, धनंजय बजगुडे तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बीड आर. एम. मोटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच पाडळशिंगी रितेश साबळे, मंडळ अध्यक्ष विष्णू यादव, सचिव भागवत वराट, पांडुरंग पवार, संतोष वराट यांनी केले आहे.

दरम्यान, हा राज्यस्तरीय सन्मान जाहीर झाल्याबद्दल डॉ. गणेश ढवळे यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

तीन अल्पवयीन मुलींची घर वापसी करण्यात पोलिसांना यश

0

बीड — मागील दोन महिन्यांच्या कालावधीत घरातून निघून गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करून सुरक्षितपणे घरी परत पाठवण्यात बीड शहर पोलिसांना यश आले आहे.

यातील तिसऱ्या मुलीचा शोथ नांदेड शहरातून घेण्यात आला. विशेष बाब म्हणजे संबंधित मुलगी स्वतः मोबाईल वापरत नव्हती, त्यामुळे तिचा मागोवा घेणे अत्यंत आव्हानात्मक ठरले. मात्र, एका अनोळखी व्यक्तीचा मोबाईल वापरून तिने इंस्टाग्रामवरून एका मित्राला संदेश पाठवला होता. त्या मित्रालाही तिची ओळख नव्हती, त्यामुळे तपास अधिक गुंतागुंतीचा झाला.

सदर संदेशात तिने नांदेड येथे असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार नांदेड पोलिसांची मदत घेऊन शोधमोहीम राबविण्यात आली. स्थानिक माहितीदारांच्या मदतीने ती एका विद्यार्थिनीच्या रूमवर राहत असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करून मुलीला ताब्यात घेतले.

मुलगी शोधल्यानंतर तिचे कुटुंबाशी पुनर्मिलन करून घरी परत पाठवणे हे आणखी मोठे आव्हान असते. अनेक वेळा मुली घरच्यांविरुद्ध बंड करून शासकीय वसतिगृहात राहण्याचा पर्याय निवडतात. अशा वेळी पोलिस आणि बालकल्याण विभाग यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.

बीड शहर पोलिसांनी प्रभावी समुपदेशन व समन्वय साधून तीनही मुलींची यशस्वी घरवापसी केली आहे.

तपासादरम्यान असे निदर्शनास आले की, किशोरवयीन मुलींसोबत पालकांनी संवाद साथताना समजून घेण्याऐवजी कठोर भूमिका घेतली जाते. योग्य संवादाचा अभाव, तसेच सोशल मीडियाचा प्रभाव यामुळे मुली घरापासून दूर जाण्याची शक्यता वाढते. याबाबत पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक  सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी. वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पोलीस अंमलदार गहिनीनाथ बावनकर, मंगेश शिंदे, राम पवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

अशोक खरातने लैंगिक शोषणच नाही तर पाच नरबळी दिल्याचा पोलिसांना संशय

0

नाशिक — महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक असलेल्या भोंदू अशोक खरातला न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळी झालेल्या संक्षिप्त सुनावणीत पोलिसांनी खरातवर नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला आहे.यामुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढले आहे. दरम्यान, कोर्ट परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी भोंदू खरातच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

अशोक भोंदू खरातला कोर्टाने 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज संपली. त्यामुळे पोलिसांनी आज त्याला पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर केले. त्यात त्यांनी पुन्हा त्याच्या 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. पण बचाव पक्षाने त्याला विरोध केला. अखेर कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे अशोक खरात 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडीतच राहणार आहे. तत्पूर्वी, झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने भोंदू खरातवर एक-दोन नव्हे तर तब्बल 5 नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला.

यासंबंधीच्या माहितीनुसार, एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाचे अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यानी न्यायालयात प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती सांगताना अशोक खरात विषयी अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, आरोपी अशोक खरात महिलांना खडे, पेढे देत होता. त्यांना पाण्यात काही पदार्थ मिसळून ते पिण्यास देत होता. यामुळे महिलांना अस्वस्थ वाटत असे. त्यानंतर तो त्यांचे लैंगिक शोषण करत असे. पोलिसांनी आरोपीच्या फार्म हाऊसमधून पिस्तूल, काडतुसे, रोकड व काही इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त केले आहे.
आरोपीकडे असणाऱ्या एकूण काडतुसांपैकी काही काडतुसे गहाळ आहेत. त्यामुळे त्यांचा कुठे काही वापर झाला का? याचा तपास केला जात आहे. आरोपीने काही विधींमध्ये नरबळी दिल्याचा संशयही आम्हाला आहे.

अशोक खरात आपण सिद्ध पुरुष असल्याचे सांगत लोकांची फसवणूक करत होता. तो नकली साप व वाघ यांचा वापर करून भीती निर्माण करत होता. तो कस्तुरीसारख्या वस्तूंचा वापर करत होता. त्यामुळे त्याने वन्यजीव कायद्याचेही उल्लंघन केल्याचा संशय आहे. परिणामी, या प्रकरणाच्या तपासासाठी आम्हाला त्याच्या आणखी 7 दिवसांच्या कोठडी हवी आहे, अशी मागणी पोलिसांतर्फे सरकारी वकिलांनी केली. पण बचाव पक्षाने त्यावर जोरदार हरकत घेतली. या प्रकरणी आणखी पोलिस कोठडीची गरज नाही. पोलिसांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असून, पुढील तपास आरोपी न्यायालयीन कोठडीत असतानाही होऊ शकतो, असे ते म्हणाले.

त्यावर सरकारी वकिलांनी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे नमूद करत पुढील तपासासाठी आरोपीची कोठडी आवश्यक असल्याचा पुनरुच्चार केला. ईशान्येश्वर मंदिरातील विधी, आर्थिक व्यवहार व इतर बाबींचा तपास अद्याप बाकी आहे, असे ते म्हणाले. अखेर न्यायालयाने आरोपीवर असणारे गंभीर आरोप व तपासातील नव्या गोष्टी लक्षात घेऊन भोंदू खरातला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

अशोक खरात न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना मान खाली घालून उभा होता. तो स्वतःचेच बोट पाहत होता. न्यायालयाने एसआयटी अधिकारी सूर्यवंशी, सरकारी वकील व आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर कोठडी सुनावण्यापूर्वी खरातला ‘तुम्हाला काही बोलायचे आहे का?’, असा प्रश्न केला. त्यावर खरात मोजून 5 वाक्य बोलला. तो म्हणाला, मला साप, वाघ याविषयी काही माहिती नाही. मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. मंदिरात कधीतरी जायचो. त्यावेळी 100 च्या आसपास लोक असायचे. शिवरात्री, श्रावणी सोमवारी आशा वेळी जात होतो. 5 दिवसांच्या कोठडीत जे प्रश्न विचारले त्याची सगळी उत्तरे दिली.

दुसरीकडे, न्यायालयीन सुनावणीनंतर पोलिस अशोक खरातला कडेकोट बंदोबस्तात घेऊन जात होते. यावेळी न्यायालय परिसरात उभ्या असलेल्या जमावाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत खरातला तेथून घेऊन निघून गेले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी न्यायालय परिसरात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. मला संधी मिळाली तर मी खरातच्या कानाखाली वाजवेल, असे देसाई यावेळी म्हणाल्या