बीड — बालाघाटावरील प्रसिद्ध उद्योजक तथा “राधिका हॉटेल”चे मालक सुग्रीव अण्णा रसाळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
बालाघाटावरील मांजरसुंबा या ठिकाणी “राधिका हॉटेल”स्थापन करून हॉटेल व्यवसायात सुग्रीव रसाळ यांनी चांगला जम बसवला होता. सावकार या नावाने देखील ते बालाघाटावर प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून “सह्याद्री माझा” रसाळ कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.
“राधिका” हॉटेलचे मालक सुग्रीव रसाळ यांच निधन
बुधवारी मुसळधार पावसाचा इशारा;29 जिल्ह्याला जिल्ह्याला यलो ऑरेंज अलर्ट
मुंबई: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने 29 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाचे आणि उकाड्याचे संमिश्र वातावरण दिसत असताना, 29 ऑक्टोबर रोजी हवामानात मोठा बदल होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. विजांचा कडकडाट आणि गडगडाट यासह या सर्व भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, तर घाटमाथा परिसरात अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस होऊ शकतो.
छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे हलका ते मध्यम पाऊस, तर जालना, परभणी आणि हिंगोली येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस, तर नाशिक व घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सर्व ठिकाणी यलो अलर्ट लागू आहे.
अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि भंडारा येथे मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत वादळी वाऱ्यासह अती मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करा; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
गेवराई — बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत गळफास घेऊन केकत पांगरी च्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
प्रविण बाबुराव जाधव (वय ३५) रा. केकत पांगरी, ता. गेवराई,जि.बीड असे मृताचे नाव आहे. प्रविण जाधव यांनी आत्महत्येपूर्वी सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्यांनी “बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश होत नसल्याने मी आत्महत्या करत आहे.
प्रविण बाबुराव जाधव वय ३५ वर्ष रा. केकत पांगरी, ता. गेवराई,जि.बीड असे मृताचे नाव आहे. प्रविण जाधव यांनी आत्महत्येपूर्वी सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात त्यांनी “बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश होत नसल्याने मी आत्महत्या करत आहे.
माझ्या मृत्यूला सरकार जबाबदार राहील,” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी गावाच्या शिवारात रोहिदास चव्हाण यांच्या शेतात ट्रॅक्टरच्या टोचन ब्लेडला गळफास घेऊन जीवन संपविले.
घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. प्रविण जाधव यांच्या मागे आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुलांचा परिवार आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ गेवराई-बीड रस्त्यावर संतप्त नागरिकांनी व समाजबांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान महसूल विभाग , पोलिस प्रशासन यांनी निवेदन स्वीकारले असून संबंधितांनी यावेळी समाजाचा अंत न पाहता आरक्षण देण्यात यावे तसेच कुटुंबायांना आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी वडवणी बंद;बीड – परळी राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या
बीड — डॉ.दिवंगत संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी वडवणी शहर आणि तालुक्यात बंद पाळण्यात आला. सोमवारी रात्री बीडमध्ये डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. दिवंगत डॉक्टरचे मूळ गाव हे वडवणी तालुक्यातील कवडगाव असल्याने फलटपण प्रकरणाचे पडसाद बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत.हा बंद सर्वपक्षीय नेत्यांनी पाळला असून वडवणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे बीड – परळी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
राज्यभरात गाजत असलेल्या फलटण येथील डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आणि या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मंगळवारी वडवणीतील बाजारपेठा बंद ठेवून व्यापारी आणि सर्वपक्षीय संघटनांकडून बंद पुकारण्यात आला.या घटनेतील सर्व आरोपींवर तसेच दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल चौकशी व्हावी आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता काही आंदोलकांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत
चपटी, कोंबडी, बकरे आणि लक्ष्मी दर्शन करावं लागतं म्हणत प्रकाश सोळंकेंनी लोकशाहीची उडवली टर
बीड — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चे बांधणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीत खर्च करण्याची तयारी ठेवा ‘नुसती निवडणूक लढवायची इच्छा असून उपयोग नाही. तुमच्याकडे किती ‘दारू’गोळा आहे, याची माहिती आम्हाला द्या’
चपटी, कोंबडी, बकरे आणि लक्ष्मी दर्शन महत्त्वाचे असल्याचे म्हणत निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाहीची टर उडवण्यास तयार रहा असा अप्रत्यक्ष सल्ला दिल्यामुळे खळबळ माजली आहे.
लोकशाहीची पायमल्ली करणारे आणि जनतेचा अपमान करणारे विधान आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या बैठकीत केले आहे. माझ्या सगळ्या निवडणुका तुम्हीच लढवल्या आहेत निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवसात काय दारूगोळा लागतो हे तुम्हाला चांगलं माहिती आहे असे ते म्हणाले.
एवढ्यावरच ते थांबले नाहीत. चपटी, कोंबडी, बकरे आणि लक्ष्मी दर्शन देऊन तुम्ही माझ्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत. तुम्ही लोक आता एक्सपर्ट झाला आहात त्यामुळे येणारी निवडणुकीत आपल्याला याचा वापर करावा लागेल. असं विधान सोळंके यांनी केल्याने संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे निवडणूक आयोगावर बोगस मतदार व ईव्हीएम मशीन वरून देशभर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने निवडणूक आयोगाच्या डोळ्यात कशी धूळफेक करून निवडून आलो. याची जाहीर कबुली दिल्यामुळे विधानसभा निवडणूक काळात एवढे मोठे गैरप्रकार सुरू असताना निवडणूक आयोग काय करत होते असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. गैरमार्गाने निवडून आलो आहोत ही आमदार प्रकाश सोळंके यांची कबुली निवडणूक आयोगाला मोठी चपराक देणारी आहे.
प्रकाश सोळंके यांनी यापूर्वी देखील अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. मराठा समाजाचे असल्याने त्यांना महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपद नाकारण्यात आले. ओबीसी असते तर ते मंत्री झालो असते असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. दरम्यान प्रकाश सोळंके यांनी पैशाचा माज दाखवत लोकशाहीची थट्टा मांडली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
मोठी बातमी : आठव्या वेतन आयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
नवी दिल्ली — वेतन आयोगाच्या ‘टर्म्स ऑफ रेफरन्स’ला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार , २८ ऑक्टोबरला केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अटी ऑफ रेफरन्सला मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचना व सेवा शर्तींचा आढावा, सुधारणा करण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. विशेष म्हणजे, अधिकृत अंदाजानुसार, या निर्णयाचा फायदा देशभरातील सुमारे ५० लाख सेवारत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि ६९ लाख निवृत्ती वेतनधारकांना होईल
एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, आठवा केंद्रीय वेतन आयोग एक अध्यक्ष, एक अर्धवेळ सदस्य व एक सदस्य-सचिव यांचा समावेश असलेली तात्पुरती संस्था म्हणून काम करणार आहे. आयोगाला त्याच्या स्थापनेच्या तारखेपासून १८ महिन्यांच्या आत त्याच्या शिफारसी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, आवश्यक असल्यास, अंतिम स्वरूप दिल्यास विशिष्ट बाबींवर अंतरिम अहवाल सादर करू शकतात.
आपल्या शिफारसी तयार करताना, आयोग देशातील प्रचलित आर्थिक परिस्थिती व वित्तीय सावधगिरीची आवश्यकता विचारात घेईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, आठव्या वेतन आयोगसंदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. जानेवारीमध्येच, आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला तत्वतः मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर आता अल्पकाळात आठव्या केंद्रीय वेतन आयोगाचीही स्थापना करण्यात आली आहे, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
पुण्यात एटीएस ची मोठी कारवाई; संशयित दहशतवादी पकडला
पुणे — महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने अल-कायदा संघटनेशी संबंध असलेल्या झुबेरला अटक केली आहे. एटीएसने पुण्यात १० ठिकाणी छापेमारी करतानाच डझनभर संशयित रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.
https://x.com/ANI/status/1982813759837000161
दरम्यान, महाराष्ट्र एटीएसने संशयित दहशतवादी झुबेर हंगारकरला पुण्यातून अटक केली आहे. एटीएसने बेकायदेशीर कारवाया(प्रतिबंध) कायद्या(यूएपीए)अंतर्गत जुबेरला अटक केली आहे. झुबेरचे अल-कायदाशी संबंध असल्याचेही उघड झाले आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार, ९ ऑक्टोबर २०२५ पासून, महाराष्ट्र एटीएस दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणासंदर्भात पुण्यातील विविध ठिकाणी छापे टाकत आहे. या संदर्भात, सोमवार, २७ ऑक्टोबर २०२५ ला एटीएसने झुबेर हंगारकरला अटक केली. या छाप्यांमध्ये असंख्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे व इतर साहित्य देखील जप्त करण्यात आले.
तपासा दरम्यान सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. एटीएस पुणे म्हटले की, दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात महाराष्ट्र एटीएसने ९ ऑक्टोबर २०२५ ला पुण्यातील विविध ठिकाणी छापे टाकले. एटीएसच्या कारवाई दरम्यान, अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू, कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले. तपासादरम्यान सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, १९६७ (२००८ मध्ये सुधारित) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर, २७ ऑक्टोबर २०२५ ला एटीएसने पुण्यातील एका व्यक्तीला अटक केली असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
माजलगाव टाईम्सचे निवासी संपादक कमलाकर कुलथे यांचे निधन
बीड — माजलगाव टाईम्सचे निवासी संपादक कमलाकर कुलथे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ५८ वर्षे होते.
कमलाकर कुलथे हे हसतमुख असणार पत्रकारिता क्षेत्रातलं व्यक्तिमत्व होतं. विनोदी स्वभाव व आजातशत्रू असल्यामुळे त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. ते सर्वत्र परिचित असणारे पत्रकार होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. कमलाकर कुलथे यांच्यावर बीडच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कुलथे कुटूंबियांच्या दुःखात “सह्याद्री माझा ” परिवार सहभागी आहे.
काॅपर वायरची जबरी चोरी करणारे मुद्देमालासह गजाआड
बीड — परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील सोहेल ऑइल मिल मधील वॉचमन लक्ष्मण चाटे यांचे हातपाय बांधून विद्युत डीपीतील तांब्याची तार, ऑइल स्टील प्लेट चोरून नेल्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
जिल्ह्यातील चोरी घरफोडी जबरी चोरी दरोडा उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. या अनुषंगाने 17 ऑक्टोबर रोजी रोजी लक्ष्मण बापुराव चाटे रा. खापरटोन ता. अंबाजोगाई जि.बीड यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.ते वाँचमन म्हणुन कामास असलेल्या धर्मापुरी येथील सोहेल आँईल मिलमध्ये डिट्युवर असतांना दि. 17 ऑक्टोबर रोजी रात्री 1 ते पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अनोळखी चोरट्याने त्यांचे हात, पाय बांधुन, चाकु व लाकडी काठ्या दाखवुन, धमकी देवुन, मिल मधील लाईटच्या डिपीतील तांब्याची तार, आईल व स्टील प्लेट असा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेल्याची तक्रार दिली होती. त्यावरून परळी ग्रामिण पोलीस ठाण्यातय कलम 309(4),324(2)351(2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यातील अनोळखी गुन्हेगाराचा स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सुशांत सुतळे, रामचंद्र केकान, विष्णु सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे असे शोध घेत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वरील गुन्ह्यातील तांब्याची तार बाळु उर्फ संतोष सोपान कांबळे रा. मिलींदनगर परळी नजमोद्दीन बशीर शेख रा.बरकत नगर परळी यांनी व त्यांच्या साथीदाराने चोरून त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे लपवून ठेवली आहे. मिळालेली माहिती पो नि शिवाजी बंटेवाड यांना देवुन आरोपीस ताब्यात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील तांब्याची तार, त्यांचे इतर साथीदार सतिष रघुनाथ मुंडे रा. नागदरा ता. परळी,सलीम शेख रा. केज या चौघांनी मिळुन चोरी केल्याची कबुली देवुन चोरीतील मुद्देमाल काढुन दिल्याने त्यांच्याकडुन चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 140 किलो तांब्याची अंदाजे 1लाख 26 हजार रुपये किमतीची तार जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके व स्थागुशा चे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुशांत सुतळे, रामचंद्र केकान, विष्णु सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे यांनी केली आहे.
ऊसतोड मजुराच्या अडीच वर्षीय लेकीचा ट्रॅक्टर खाली चिरडून मृत्यू
धारूर — तालुक्यातील देवदहिफळ येथील अडीच वर्षीय आरोही विशाल बडे या चिमुकलीचा कर्नाटक राज्यातील कोल्हार जवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घटना रविवारी साडेदहा वाजता घडली. एकुलती एक लेक अपघातात गमावल्याने बडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवदहिफळ येथील महादेव बडे हे ऊसतोड मुकादम आहेत. त्यांचा मुलगा विशाल बडे हा कर्नाटक राज्यातील बैलहोंगल तालुक्यात सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतुकीचं काम पाहतो. शुक्रवारी रात्री विशाल बडे हा पत्नी आरती, मुलगा अविराज आणि मुलगी आरोहीसह ट्रॅक्टरने कर्नाटकला कामासाठी संपूर्ण कुटुंबासोबत निघाले होते. यावेळी मोठा अनर्थ घडला आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
रविवार सकाळी कोल्हारजवळ नाश्ता, चहापाणी करुन हे कुटुंब पुन्हा साखर कारखान्याच्या दिशेने निघालं होतं. यावेळी आरोही तिच्या आईकडे समोरील ट्रॉलीत आपल्या आईच्या कुशीत बसली होती. मात्र, काही कळायच्या आत अचानक ती आईच्या हातातून निसटली. हातातून निसटून ती पाठीमागील ट्रॉलीच्या चाकाखाली आली.ट्रॉलीच्या चाकाखाली आल्यामुळे आरोहीचा तिथेच जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आई-वडिलांनी केलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. आपल्या डोळ्यांसमोर त्यांच्या लेकीचा जीव गेला. एका क्षणात, डोळ्यांदेखत त्यांचा छोटासा संसार उधळला गेला. चिमुकलीला नंतर कोल्हार येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन झाल्यानंतर रविवारी मध्यरात्री शोकाकुल वातावरणात देवदहिफळ येथे आरोहीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे बडे कुटुंबावर तसंच देवदहिफळ गावावर शोककळा पसरली आहे. ऊसतोड कामगारांच्या स्थलांतराचा धोका आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे











