Home Blog Page 42

सरकारने कर्जमुक्ती न केल्यास रस्त्यावर उतरून शेतकर्‍यांचा आक्रोश मांडू – उद्धव ठाकरे

0

बीड — राज्य सरकारने कर्जमुक्त केले नाही तर रस्त्यावर उतरून शेतकर्‍यांचा आक्रोश मांडू असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची संवाद साधताना म्हटले.उद्धव ठाकरे यांनी पाली (जि. बीड) येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री कर्जमाफीचा मुहूर्त जूनमध्ये काढला आहे. लाडकी बहीण निवडणूक पर्यंत घरातील सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत होता आता अनेक अटी लावून लाभार्थी कमी केले जात आहे. शेतकर्‍यांना हमी भाव मिळत आहे का याचे उत्तर मोदी यांनी द्यावे. कर्जमाफी नंतर शेतकरी मतदान करतील अशी भूमिका ठेवावी. कर्जमुक्ती केली तरच येणार्‍या निवडणुकीत मतदान करू असे ठाम पणे सांगा. संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. जगातली सर्वात मोठे नुकसान भरपाई कुठे आहे असा प्रश्न विचाराला.

देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराज यांच्या नावाने सुरू केलेली कर्जमुक्ती शेतकर्‍यांना मिळालीच नाही. शेतकरी फुकट नव्हे तर हक्काची कर्जमुक्ती मागत आहे. सरकारच मत चोरी करून आले आहे तर त्यांना जाब विचारला गेलाच पाहिजे. विरोधी पक्षनेते नसताना अंबादास दानवे शेतकर्‍यांसाठी फिरत आहे. मी तुमच्यात असताना राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये आहे. बिहारवर अधिक प्रेम असताना महाराष्ट्र सावत्र आहे का? असा प्रश्न उपस्थित केला..

शेतकर्‍यां सोबत शिवसेना उभी आहे. शेतकरी म्हणुन एकत्र आलो तर कोणतेही सरकार झुकू शकते तर राज्य सरकार का झुकणार नाही. शेतकरी बांधव यांनी धीर सोडू नये.

अतिवृष्टी नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पाहणी

0

बीड — अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून आलेल्या केंद्रीय अंतर-मंत्रालयीन पथकाने आज बीड जिल्ह्यातील विविध भागांचा सखोल दौरा केला . यात बीड तालुक्यातील लिंबा रुई , शिरूर तालुक्यातील येवलवाडी , कारेगाव तसेच आष्टी तालुक्यातील गावांचा समावेश आहे .
राज्यातील खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टी, पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यमापन करण्यासाठी हे पथक केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत पाठवण्यात आले आहे . पथकाचे नेतृत्व श्री. के. आर. के. पांडे, सहसचिव , केंद्रीय गृहमंत्रालय करत असून , त्यांच्यासोबत डॉ. एस. व्ही. एस. पी. शर्मा आणि श्री. विशाल पांडे हे अधिकारी सहभागी झाले आहेत . पथकाने बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली .
जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे चित्र भयावह आहे . अनेक ठिकाणी शेतजमीन वाहून गेली, धरणांचे पाणी ओसंडून वाहू लागले , जनावरांचा बळी गेला , घरं व रस्ते उद्ध्वस्त झाले . या सर्व परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे . उपविभागीय अधिकारी कविता जाधव , तहसीलदार चंद्रकांत शेळके , गटविकास अधिकारी अशोक राठोड , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे , उपविभागीय कृषी अधिकारी उद्धव गर्जे , तालुका कृषी अधिकारी अशोक साळी , मंडळ अधिकारी प्रभू येवले , तसेच ग्राम महसूल अधिकारी नवनाथ तांदळे , संजय पाखरे, प्रवीण सानप , उत्तरेश्वर खांडे , मंडळ कृषी अधिकारी डी. एस. माळी , सहाय्यक कृषी अधिकारी एस. एस. तळेकर , एस. बी. गावडे या सर्वांनी समन्वय साधून क्षेत्रीय पाहणी सुलभ केली .
या पथकाने आज बीड , आष्टी आणि शिरूर कासार तालुक्यांतील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट दिली . काही गावांमध्ये शेतजमिनीवरील गाळ , रस्त्यांवरील भगदाडे, नाले-ओढ्यांचे तुटलेले बांध , तसेच घरांचे पडझडीचे प्रकार पाहिले , अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची व्यथा ऐकली , नुकसानाची कल्पना घेतली .
अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ८ लाख ६ हजार शेतकऱ्यांचे सुमारे ७ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले असून , आतापर्यंत ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे तर ४४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे .
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात १ ,००० पेक्षा अधिक जनावरांचे प्राण गेले, १,३१३ घरांचे संपूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले आणि ७,४७२ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याचे जिल्हा अहवालात नमूद करण्यात आले आहे . सार्वजनिक मालमत्ताना देखील मोठी झळ बसली आहे . बांधकाम विभागाचे रस्ते आणि पुलांचे , महावितरणचे खांब व वीजवाहिन्यांचे तर महामार्ग, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, अंगणवाडी व ग्रामपातळीवरील पायाभूत सुविधा या सर्वांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
केंद्रीय पथकाने या सर्व अहवालांचा सविस्तर अभ्यास करून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामपंचायतींशी चर्चा केली . सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी , जिल्हा अधीक्षक सुभाष साळवे यांनी केंद्रीय पथकास सविस्तर माहिती दिली .
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की, “केंद्रीय पथकाला जिल्ह्यातील प्रत्येक विभागाची तपशीलवार माहिती सादर करण्यात आली आहे . सर्व अधिकारी समन्वयाने काम करत आहेत . शेतकऱ्यांना मदत आणि पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल . प्रशासन प्रत्येक गावापर्यंत पोहोचले आहे .”
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केले : “ ही वेळ कठीण आहे , पण आपण एकत्र राहिलो तर संकट नक्कीच संपेल . पूरग्रस्त भागातील नागरिकांनी शांतता आणि संयम राखावा . प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे . मदतीची यंत्रणा गावोगावी कार्यरत आहे . कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ महसूल विभागाशी संपर्क साधावा .”
केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर तयार होणारा सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडे पाठवला जाणार  असल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आला आहे

डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरण: पीएसआय गोपाळ बदने पोलीस दलातून बडतर्फ

0

सातारा — फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला निलंबित उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आलं आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी हा आदेश काढला आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टर तरुणीने 23 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. या तरुणीने आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहिली होती. उपनिरीक्षक गोपाल बदने याने चार वेळा अत्याचार केला आणि प्रशांत बनकर याने माझा शारीरिक व मानसिक छळ केला, असं तरुणीने नमूद केलं होतं. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती.

मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींना ‘फिट-अनफिट’ दाखवण्यासाठी आणि मृतांचे शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी डॉक्टर तरुणीवर दबाव टाकला जात होता. या प्रकरणी मुख्य संशयित उपनिरीक्षक गोपाल बदने याला आधी निलंबित करण्यात आले होते. आता त्याला पोलीस सेवेतून कायमचं काढून टाकण्यात आलं आहे.

सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या संदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु. र.नं. ३४५/२०२५ या गुन्ह्यातील आरोपी गोपाळ बाळासाहेब बदने याने पोलीस दलाचे ज्ञान असूनही बेफिकिरीने, नैतिक अधःपतन, दुर्वर्तन आणि पदाचा गैरवापर केला. तसंच समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूक केली. त्याचे कृत्य पोलीस उपनिरीक्षक पदाला अशोभनीय होते. त्याने कर्तव्य पालनात आणि दैनंदिन जीवनात संशयास्पद वर्तन केलं. त्याचे कृत्य अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे. त्यामुळे गोपाळ बाळासाहेब बदने याला शासकीय सेवेत ठेवणे योग्य नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने (ज्याची नेमणूक फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात होती) याला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी भारतीय राज्यघटना १९५० मधील अनुच्छेद ३११ (२) (ब) नुसार ४ नोव्हेंबर २०२५ पासून ‘शासकीय सेवेतून बडतर्फ’ केलं आहे.

बीड न.प. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून घ्यावेत — आ.संदीप क्षीरसागर

0

६ तारखेस फॉर्म भरणे, ७ आणि ८ तारखेला मुलाखती

बीड — नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याअनुषंगाने बीड नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दि.६ नोव्हेंबर रोजी, इच्छुक उमेदवारी अर्ज भरून घ्यावेत असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडून करण्यात आले आहे. दरम्यान नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती ७ नोव्हेंबर आणि ८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी भवन, बीड यथे होणार आहेत.
२०२२ मध्ये कार्यकाळ संपुष्टात आलेल्या बीड नगरपरिषदेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि.१० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असून २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. आणि लगेचच ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे‌. निवडणूक आयोगाकडून हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बीड शहरातील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज आणि मुलाखतीचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. त्यामुळे बीड शहरातील उमेदवारांनी पक्षाकडून विहित केलेले शुल्क भरून अर्ज घेण्याचे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे. दरम्यान विहित मुदतीच्या नंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचेही पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

असे आहे इच्छुक उमेदवारांसाठी पक्षाकडील वेळापत्रक

दि. ६ नोव्हेंबर २०२५ – राष्ट्रवादी भवन, बीड येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत आपला इच्छूक उमेदवारी अर्ज भरून जमा करणे.

दि. ७ नोव्हेंबर – प्रभाग क्रमांक. २,३,४,५,६,७,१९,२०,२१,२२,२३,२४,२६ या प्रभागांतून नगरसेवक उमेदवारांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

दि. ८ नोव्हेंबर – प्रभाग क्रमांक. १,८,९,१०,११,१२,१३,१४,१५,१६,१७,१८,२५ या प्रभागांतून नगरसेवक उमेदवारांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

– ७ नोव्हेंबर व ८ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती होतील.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी

0

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना परळी तहसिलदार  मुंडे यांच्या माध्यमातून निवेदन सादर

बीड  — उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे कार्यरत असलेल्या आरोग्य अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या झालेल्या दुर्दैवी व संशयास्पद मृत्यू प्रकरणी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ही मागणी परळी तहसिल कार्यालयाचे मा. तहसिलदार व्यंकटेश मुंडे  यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, डॉ. संपदा मुंडे या एक जबाबदार, कर्तव्यनिष्ठ आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या आरोग्य अधिकारी होत्या. त्यांच्या मृत्यूमागील कारणांचा सखोल व निष्पक्ष तपास होऊन सत्यसमोर यावे आणि या प्रकरणात संबंधित दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देण्याच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.  सूर्यकांत मुंडे, प्रशासकीय अधिकारी  शेख  नर्सिंग सल्लागार  ताई परळीकर, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य साद कामिल  प्राध्यापक  राम होळंबे  तसेच संस्थेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केले की, “आरोग्य क्षेत्रात कार्यरत डॉक्टरांवर वाढता ताण, प्रशासकीय दबाव आणि सुरक्षा अभाव ही चिंताजनक बाब आहे. डॉ. मुंडे यांच्या मृत्यूच्या प्रकरणातून शासनाने गांभीर्याने धडा घेत डॉक्टरांसाठी सुरक्षित कार्य वातावरणाची हमी द्यावी.”

तहसिलदार  व्यंकटेश मुंडे यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आली असून, या प्रकरणात त्वरित चौकशी सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे

वाळूच्या दोन हायवा पोलिसांनी पकडल्या; 50 लाखाचा मुद्देमाल जप्त

0

बीड — पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीड जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने गेवराई आणि तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत वाळू वाहतूक करणाऱ्या दोन हायवा पकडल्या. या कारवाई पोलिसांनी 50 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गेवराई परिसरातील गोदावरी नदीपात्रातुन अवैध वाळु वाहतुक होणार आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या आदेशाने पोउपनि श्रीराम खटावकर, पोह. वरपे, पोह. राठोड व पोह. राहुल शिंदे असे पथकाने दिनांक ४ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारास गेवराई येथील, तलवाडा फाटा व नागझरी गावचे परिसरात जावुन थांबुन माहिती केली असता त्यांना विनापरवाना
बेकायदेशिररित्या दोन हायवा, वर नमुद ठिकाणी गोदावरी नदीच्या पात्रातुन वाळु भरून कोठेतरी घेवुन जात असतांना दिसल्या. त्यांचा अवैध वाळु वाहतुक करीत असल्याचा संशय आल्याने त्यांना पथकाने थांबण्याचा इशारा केला असता चालकाने हायवा रोडच्या बाजुला उभा करून हायवा चालक पथकाला पाहुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. सदर हायवाचा क्रमांक MH.23 AU.2757 d MH.25AJ. 3555 असा होता. थांबलेल्या हायवामध्ये काय आहे? याची पाहणी केली असता दोन्ही हायवा मध्ये अंदाजे प्रत्येकी पाच-पाच ब्रास वाळु भरलेली दिसुन आली.सदर दोन्ही हायवा मधील दहा ब्रास वाळु किमंती अंदाजे साठ हजार रूपये व दोन्ही हायवा किमंती अंदाजे 50 लाख रुपये असा एकुन 50 लाख 60 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशिर कारवाई कामी पोस्टे गेवराई येथे घेवुन येवुन हायवा चालक व मालकाविरूध्द पोलीस ठाणे गेवराई येथे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस सचिन पांडकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि श्रीराम खटावकर, पोह. वरपे, पोह.राठोड व पोह. राहुल शिंदे यांनी केली आहे.

ठाणे प्रमुखांच्या बदल्यांचा घोळ; एस पीं च झालयं पाचात पडून गवतात लोळ ?

0

एसपींची अपरिहार्यता की पुढाऱ्यांकडून मुस्कटदाबी

बीड –पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत म्हणजे एक शिस्तप्रिय, लाच न घेणारे अधिकारी अशी त्यांची थेट ओळख.जिल्ह्यात अलीकडच्या काळात जे घटकप्रमुख आले ते व्यवस्थेला मानणारे कमी आणि पुढऱ्यांपुढे ‘जी हुजर’ करणारे अधिक होते. कॉवत यांच्याकडून जिल्हावासियांचा आतापर्यंत भ्रमनिरास झाला नाही. पण आजच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या पाहता पोलीस अधिक्षक यांची अपरिहार्यता झाली की राजकीय पुढाऱ्यांकडून मुस्कटदाबी यावर एक नजर टाकणे महत्वाचे ठरणार आहे.
गेवराईचे प्रभारी असलेले प्रवीणकुमार बांगर यांची बीडच्या शिवाजीनगरला बदली झाली. तर शिवाजीनगरचे प्रमुख किशोर पवार गेवराईचे प्रभारी. बरं यासोबतच ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांना उचलून त्या ठिकाणी पेठ बीडचे अशोक मुदिराज यांना संधी देण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर कोणतेही मोठे कारण नसताना थेट चार अधिकारी बदलले यामुळे सर्वांना धक्का बसला. विशेष म्हणजे किशोर पवार बीड जिल्ह्यात येऊन जेमतेम झाले असतील चार ते पाच महिने. या कालावधीत त्यांनी केलेले काम सर्वश्रुत आहे. कायदा आणि सुव्यवस्था यावर तर बोलायचेच नको. कारण यश ढाका हत्या झाली ते यांच्या ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर.नंतर प्रकरण शेकते की काय म्हणून ते थेट रजेवर गेल्याच्या चर्चा होत्या. आता अश्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांना थेट गेवराई सारखे ठाणे एसपी साहेबांनी दिले.आता त्यांच्या पुढे असणारे आव्हान किती मोठे आहे हे येणाऱ्या कळात कळेलच. बरं याशिवाय आणखी एक बदली चर्चेस पात्र आहे, ती म्हणजे मारुती खेडकर यांची. ज्या पोलीस अधिक्षक यांना मारुती खेडकर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख व्हावे असे वाटतं होते, (मात्र जात तिथे त्यांना कदाचित आडवी आली असावी) त्यांना शिवाजीनगरवरून ग्रामीण पोलीस ठाणे देण्यात आले. खेडकर यांच्या कामावर आनंदी असल्याने त्यांना ग्रामीण पोलीस ठाणे मिळाले होते. मात्र पाच महिन्याच्या आतच आता कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नसताना त्यांना पेठ बीडला हलविण्यात आले. (सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना घटक प्रमुखांनी अर्ज घेतलेच असतील, ज्यामुळे उद्या काही झालेच तर आपली यात कोणतीही भूमिका नाही हे दाखवायला ते मोकळे झाले.) दरम्यान एकीकडे पोलिसांच्या छातीवरून नेमप्लेटच्या माध्यमातून जात काढायची. नेमप्लेटमध्ये स्वतःचे कौतुक करून घ्यायचे. पण अधिकाऱ्यांना नियुक्ती देताना पुन्हा डोक्यात जात ठेवूनच नियुक्त्या द्यायच्या असला फंडा तर पोलीस अधिक्षक यांच्या डोक्यात नाही ना असा प्रश्न कोणालाही पडावा असा आहे.मुंबई वरून आलेल्या अधिकाऱ्याला वरिष्ठांचे फोन आले की एलसीबीत थेट संधी मिळते.पण एसपींचे उंबरे झीजविणाऱ्या, १०० हून अधिक कारवाया करणाऱ्या अधिकाऱ्याला इथे संधी मिळत नाही कारण तिथे ही जात आडवी येतं असावी. ज्या ग्रामीण पोलीस ठाण्याला क्रमांक १ वर आणले त्या ठाण्याचे सपोनि यांना संधी द्या म्हणून वारंवार आपली योग्यता दाखवावी लागते तिथे मात्र इतरांना विना योग्यता संधी देण्याचे धारिष्टय एसपी दाखवत असतील तर हे उदाहरणं आणि आताचे म्हणजे गेवराई आणि ग्रामीण पोलीस ठाणे प्रमुखाच्या पाच महिन्यात झालेल्या बदल्यांचे उदाहरणं एसपींची झालेली अपरिहार्यता आहे की पुढाऱ्यांकडून झालेली मुस्कटदाबी यावर मात्र उत्तर मिळायला मात्र मार्ग नाही.

तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणा लागू;राज्यातील 2 कोटी कुटुंबांच्या जमिनी होणार अधिकृत

0

मुंबई — जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण करण्या बाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्याचा अध्यादेश आजपासून राज्यात लागू करण्यात आल्याने, अकृषिक वापरासाठी परवानगी असलेल्या क्षेत्रातील जमिनींसाठी आता तुकडे बंदी कायदा लागू राहणार नाही, अशी क्रांतिकारी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला असून, यामुळे आजवर तुकडेबंदी कायद्याविरुद्ध जमिनीचे झालेले व्यवहार नियमित केले जातील.

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्यातील सुमारे ४९ लाख कुटुंब धारकांची जमीन ( म्हणजे सुमारे दोन कोटी कुटुंब सदस्य असलेली) नियमित होईल. या सर्वांच्या सात बारावर नाव लागेल आणि नोंदणी होईल. या अध्यादेशामुळे १५ नोव्हेंबर १९६५ पासून १५ ऑक्टोंबर २०२४ पर्यंतच्या तुकड्यांचे झालेले हस्तांतरण हे कोणतेही शुल्क न भरता नियमित करता येईल.

कार्यप्रणाली सात दिवसांत

अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सविस्तर कार्यप्रणाली पुढील सात दिवसांत महसूल विभागाकडून जारी केला जाईल. या निर्णयामुळे ले-आऊटमधील प्लॉटधारकांचे नाव मालकासह सातबारा उताऱ्यावर येणार आहे, ज्यामुळे मोठा गोंधळ दूर होईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

राज्यात अंमलात असलेला तुकडेबंदी कायदा हा मूळात शेती क्षेत्रासाठी लागू होता. किफायतशीर शेती करण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार (बागायत / जिरायत) आवश्यक असलेले प्रमाणभूत क्षेत्र या कायद्याने ठरवले होते. ​हा कायदा शहरी भागासाठी लागू नव्हता.

मात्र वाढत्या नागरीकरणामुळे लोकांनी शहराच्या किंवा गावांच्या सभोवताली असलेल्या क्षेत्रांमध्ये त्यांच्या गरजेपोटी, या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रांचे खरेदी-विक्री व्यवहार केले. राज्यात अशा तुकड्यांची संख्या सुमारे ४९ लाख इतकी आहे. तुकडेबंदी कायद्याविरुद्ध झालेले हे अनियमित व्यवहार नियमित करण्यासाठी शासनाने दिनांक ३ नोव्हेंबर, २०२५ रोजी अध्यादेश प्रसिद्ध केला असून, तो ३ नोव्हेंबर, २०२५ पासून अंमलात आलेला आहे.”

नियमितीकरण कसे होणार?

​या अध्यादेशाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, दि. १५ नोव्हेंबर, १९६५ पासून ते दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ पर्यंतच्या तुकड्यांचे झालेले हस्तांतरण (व्यवहार) आता कोणतेही शुल्क न आकारता विनामूल्य ‘मानीव नियमित’ करण्यात येणार आहेत.

​ज्या तुकड्यांची खरेदी-विक्री नोंदणीकृत (Registered) केलेली आहे, मात्र त्या खरेदीदारांची नावे ७/१२ उताऱ्यावर आलेली नाहीत, त्यांची नावे आता ७/१२ उताऱ्यामध्ये मालकी हक्कामध्ये घेण्यात येतील. तर, ज्या लोकांनी असे व्यवहार अनोंदणीकृत दस्तऐवजांद्वारे केलेले आहेत, त्यांनी आता सब-रजिस्ट्रारकडे रीतसर नोंदणी करून, त्यांची नावे ७/१२ उताऱ्यामध्ये मालकी हक्क सदरी घेता येतील.

कुठे लागू होणार हा निर्णय?

​हा नवीन महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन (एमआरटीपी) कायदा किंवा महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कायद्यातील तरतुदीनुसार अकृषिक वापर अनुज्ञेय ठरतो, त्या सर्व ठिकाणी लागू होईल.
महानगरपालिका, नगरपरिषदा व नगर पंचायतींच्या हद्दीतील क्षेत्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
​(MMRDA), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,
(NMRDA)सारख्या प्राधिकरणातील क्षेत्र
​विकास केंद्रांमध्ये क्षेत्र विशेष नियोजन प्राधिकरणामधील क्षेत्र ​(UDCPR) मधील तरतुदीनुसार शहरांच्या / गावांचे परिघीय क्षेत्रात लागू होईल.
क्लिष्ट कायदे बदलत आहोत

सरकार व महसूल विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, क्लिष्ट कायदे बदलण्याचे काम करत आहोत. नियम सुटसुटीत व्हावेत आणि लोकांना अडचणी होऊ नयेत, हे आमचे नियोजन होते. प्रशासनाभिमुख काम करणे हेच या सरकारचे उद्दिष्ट आहे. जनतेला एकही दिवस कार्यालयात येण्याची गरज भासू नये, असे महसूल खाते आम्ही निर्माण करणार आहोत, असे बावनकुळे म्हणाले

राज्यात 288 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक जाहीर;2 डिसेंबरला मतदान, 3 रोजी निकाल

0

दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास ‘टूल’

मुंबई — गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी अर्थात निकाल जाहीर होईल. राज्य निवडणूक आयोगाने आज (दि.४) दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.राज्य निवडणूक आयोगामार्फत राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यामधून ६८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष यांची निवड होईल. राज्यातील २३६ नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपली आहे. याशिवाय, १० नवनिर्मित नगरपरिषदांसाठीही निवडणूक होणार आहे. तर, एकूण १४७ नगरपंचायतीपैकी ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. ३१ ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार मतदान होणार असून यावेळी एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार असतील. यामध्ये ५३ लाख २२ हजार ८७० महिला मतदार असतील. मतदान केंद्रनिहाय याद्या ७ नोव्हेंबरला प्रकाशित होतील.

दुबार मतदार रोखण्यासाठी EC ने आणलं खास टूल

दुबार नोंद असलेल्या मतदारांच्या यादीवरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर लक्ष्य केलेले असताना ही अडचण दूर करण्यासाठी एक विशेष टूल विकसित केल्याचे यावेळी सांगण्यात आले. या टूलच्या मदतीने, ज्या मतदारांची नावे दोन ठिकाणी नोंदवली गेली आहेत, त्यांच्या नावासमोर दोन तारे (**) दाखवले जातील. अशा मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यांना कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे हे विचारले जाईल. मतदाराने निवडलेले केंद्र त्याच्या मतदानासाठी निश्चित केले जाईल. परंतु, संबंधित मतदाराने प्रतिसाद दिला नाही, तर त्या मतदाराचे नाव सर्व संबंधित मतदान केंद्रांवर “डबल स्टार मतदार” म्हणून राहील. असा मतदार मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदानासाठी आल्यानंतर, त्याच्याकडून “मी इतर कोणत्याही केंद्रावर मतदान केलेले नाही आणि करणार नाही” असे प्रतिज्ञापत्र घेतले जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

आगामी निवडणुकांसाठी अर्ज दाखल प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे.

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे.

अर्जांची छाननी १८ नोव्हेंबरला होईल.

अर्ज माघारी घेण्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली असून, आक्षेप असलेल्या ठिकाणी ही मुदत २५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

२६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी आणि निवडणूक चिन्ह जाहीर केले जाणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश यापूर्वीच दिले होते. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज अखेर २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

महावितरण: गरिबांना 25 वर्ष मोफत वीज मिळणार

0

मुंबई — दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना २५ वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरावा लागणार आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने स्मार्ट योजना सुरू केली आहे.

दारिद्र्य रेषेखालील १.५४ लाख तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ३.४५ लाख अशा महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापणाऱ्या पाच लाख घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी ६५५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर राबविण्यात येणार आहे. महावितरणच्या नुकत्याच झालेल्या संचालक व मुख्य अभियंत्याच्या राज्यस्तरीय बैठकीत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. त्यामध्ये ग्राहकांना एक किलोवॅटचा छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी ३० हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून मिळते. स्मार्ट योजनेत या अनुदानाखेरीज राज्य सरकारकडूनही अनुदान मिळणार असल्याने वीज ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरून प्रकल्प बसविता येईल.

स्मार्ट योजनेनुसार दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांना एक किलोवॅटचा सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ३० हजार रुपये तर राज्य सरकारकडून १७ हजार ५०० रुपये अनुदान मिळेल. सौर ऊर्जा प्रकल्पाची ऊर्वरित रक्कम भरून ग्राहक २५ वर्षे मोफत विजेचा लाभ घेऊ शकतो.

शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांनाही केंद्र सरकारच्या ३० हजार रुपये अनुदानाखेरीज राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे. या गटातील सर्वसाधारण ग्राहकांना दहा हजार रुपये राज्य सरकारकडून मिळतील. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना राज्य सरकार १५ हजार रुपये अनुदान देणार आहे.

एक किलोवॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीजनिर्मिती होते. त्यामुळे शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना स्वतःची गरज भागवून अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते. या प्रकल्पातून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ लाभ होतो.