Home Blog Page 41

अमूल दूध महागले! 14 मेपासून देशभरात नवे दर लागू

0

आणंद (गुजरात) —  इराण आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने भारतात महागाईचा दबाव वाढत असून पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. देशातील सर्वात मोठी दुग्धसंस्था असलेल्या अमूल ( Amul) ने दूधाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रति लिटर 2 रुपयांची वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, अमूल दूधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ 14 मे 2026 पासून संपूर्ण देशभर लागू होणार आहे. वाढलेल्या खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
पशुखाद्य, वाहतूक, पॅकेजिंग आणि दूध संकलनाचा खर्च वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि दूध उत्पादकांना योग्य मोबदला मिळावा यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

अमूल दूधाचे नवे दर

अमूल गोल्ड (फुल क्रीम)
500 मिली : 35 रुपये
1 लिटर : 67 रुपये
अमूल ताजा (टोन्ड दूध)
500 मिली : 30 रुपये
1 लिटर : 58 रुपये
अमूल गाईचे दूध
500 मिली : 31 रुपये
अमूल म्हशीचे दूध
500 मिली : 38 रुपये

2.5 ते 3.5 टक्क्यांपर्यंत वाढ

GCMMF च्या माहितीनुसार, ही दरवाढ प्रमुख दूध पॅकेट्सवर लागू करण्यात आली असून वाढीचे प्रमाण साधारण 2.5 ते 3.5 टक्क्यांदरम्यान आहे.

महागाईचा सर्वसामान्यांवर वाढता ताण

देशात आधीच इंधन, खाद्यपदार्थ आणि सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील उत्पादन खर्च वाढल्याने अनेक वस्तू महाग होत आहेत. अशा परिस्थितीत दूधाच्या दरवाढीमुळे घरगुती बजेटवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता आहे.

२०२६-२७ खरीप हंगामासाठी एमएसपी (MSP) वाढ जाहीर; सूर्यफूल, कापूस, तूरीला फायदा

0

केंद्र सरकारने २०२६-२७ खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या MSP मध्ये वाढ जाहीर केली. सूर्यफूल बिया, कापूस, तूर, सोयाबीन, तीळ यांना मोठा फायदा. जाणून घ्या नवीन MSP दर आणि शेतकऱ्यांवरील परिणाम.

खरीप पिकांच्या एम एस पी (MSP) मध्ये मोठी वाढ, तूर-कापूस-सूर्यफूल दर वाढले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत २०२६-२७ च्या खरीप विपणन हंगामासाठी १४ प्रमुख खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये (MSP) वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक हमीभाव मिळणार आहे.


केंद्र सरकारच्या निर्णयानुसार यंदा सूर्यफूल बियांच्या MSP मध्ये सर्वाधिक ₹६२२ प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस ₹५५७, कारळे (नायजरसीड) ₹५१५, तीळ ₹५०० आणि तूर ₹४५० प्रति क्विंटलने वाढविण्यात आले आहेत.
सरकारने स्पष्ट केले की, २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे MSP हा अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट पातळीवर निश्चित करण्यात आला आहे.

२०२६-२७ खरीप पिकांचे नवीन MSP दर. पिक

२०२६-२७ MSP    २०२५-२६ MSP.    ‌   वाढ

तांदूळ (सर्वसाधारण)

₹२,४४१.                  ₹२,३६९.               ₹७२

तांदूळ (ग्रेड A).         

₹२,४६१.                  ₹२,३८९.               ₹७२
ज्वारी (हायब्रीड)
₹४,०२३.                  ₹३,६९९.             ₹३२४
ज्वारी (मालदांडी)
₹४,०७३.                   ₹३,७४९.             ₹३२४
बाजरी
₹२,९००.                   ₹२,७७५.            ₹१२५
नाचणी
₹५,२०५.                  ₹४,८८६.            ₹३१९
मका
₹२,४१०.                   ₹२,४००.            ₹१०
तूर
₹८,४५०.                 ₹८,०००.             ₹४५०
मूग
₹८,७८०.                  ₹८,७६८.             ₹१२
उडीद

₹८,२००.                ₹७,८००.           ₹४००
शेंगदाणा
₹७,५१७.             .     ₹७,२६३.        ₹२५४
सूर्यफूल बिया
₹८,३४३.                   ₹७,७२१.        ₹६२२
सोयाबीन (पिवळा)
₹५,७०८.                   ₹५,३२८.          ₹३८०
तीळ
₹१०,३४६.                ₹९,८४६.          ₹५००
कारळे (नायजरसीड)
₹१०,०५२.               ₹९,५३७.            ₹५१५
कापूस (मध्यम धागा)
₹८,२६७.                 ₹७,७१०.          ₹५५७
कापूस (लांब धागा)
₹८,६६७.                  ₹८,११०.            ₹५५७

कोणत्या पिकांना सर्वाधिक फायदा?

यंदाच्या एम एस पी ( MSP) वाढीत तेलबिया आणि कडधान्यांना मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. विशेषतः सूर्यफूल, कापूस, तूर, उडीद आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
सरकारच्या माहितीनुसार मूग पिकावर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर तब्बल ६१ टक्के अपेक्षित नफा मिळणार आहे. त्यानंतर बाजरी आणि मका प्रत्येकी ५६ टक्के, तर तूर पिकावर ५४ टक्के नफा अपेक्षित आहे.
सरकारचा भर कडधान्ये आणि श्री अन्नावर
केंद्र सरकारने मागील काही वर्षांपासून कडधान्ये, तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्ये अर्थात “श्री अन्न” यांच्या उत्पादनाला चालना देण्यावर भर दिला आहे. MSP वाढीद्वारे शेतकऱ्यांना या पिकांकडे वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचे मानले जात आहे.

एम एस पी (MSP) अंतर्गत खरेदीत मोठी वाढ

सरकारच्या आकडेवारीनुसार २०१४-१५ ते २०२५-२६ या कालावधीत धान खरेदी ८,४१८ एलएमटीपर्यंत पोहोचली असून, २००४-०५ ते २०१३-१४ या कालावधीत ती ४,५९० एलएमटी होती.
तसेच १४ खरीप पिकांच्या शेतकऱ्यांना एम एस पी ( MSP) अंतर्गत २०१४-१५ ते २०२५-२६ या काळात तब्बल १८.९९ लाख कोटी रुपयांचे भुगतान करण्यात आले आहे. मागील कालावधीत ही रक्कम ४.७५ लाख कोटी रुपये होती.

65 वर्षीय वृद्धाकडून साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न

0

केज  (बीड ) — तालुक्यातील काळेगाव घाट येथे मंगळवारी सायंकाळी माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या 65 वर्षीय वृद्धाने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. 12 मे रोजी सायंकाळी 5:00 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित बालिकेची आई कामावर गेली होती, तर वडील घरी आजारी होते. त्यावेळी चिमुकली आणि तिचा पाच वर्षांचा भाऊ घराबाहेर खेळत होते.

आरोपीने संधी साधून चिमुकलीच्या भावाला खाऊ आणण्याच्या बहाण्याने दुकानावर पाठवले. त्यानंतर त्याने बालिकेला स्वतःच्या घरात बोलावून दरवाजाची कडी आतून लावून घेतली. मुलगा परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने वडिलांना सांगितले. वडिलांनी शोध घेतला असता आरोपीचे घर आतून बंद दिसले. संशय आल्याने त्यांनी दरवाजा उघडायला लावला असता पीडित मुलगी आणि आरोपी घरात आढळून आले.

प्राथमिक तपासात मुलीचे अंतर्वस्त्र फाटलेल्या अवस्थेत आढळले. नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.घटनेमुळे काळेगाव परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. केज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नसरापूर अत्याचार प्रकरण : प्रत्यक्षदर्शी मुलांच्या साक्षीमुळे तपासाला वेग

0

पुणे —  भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी धक्कादायक नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी असलेल्या काही लहान मुलांनी आरोपीला चिमुकलीवर अत्याचार करताना पाहिल्याची माहिती तपासातून पुढे आली असून त्यामुळे तपासाला आणखी वेग मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


काही दिवसांपूर्वी नसरापूर परिसरात एका ६५ वर्षीय व्यक्तीने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. आरोपीने मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले होते. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका गोठ्यात चिमुकलीवर अत्याचार केला. यावेळी ५ ते १० वर्षे वयोगटातील चार ते पाच मुलांनी हा प्रकार पाहिला होता. या मुलांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्या दिशेने दगड फेकून त्यांना पळवून लावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा म्हणून प्रत्यक्षदर्शी मुलांची ई-साक्ष नोंदवली असून मुलांवर दगड फेकल्याचे पुरावेही जप्त करण्यात आले आहेत. आरोपीने मुलांना पळवून लावल्यानंतर त्यांनी तातडीने चिमुकलीच्या घरी धाव घेत तिच्या आजीला घडलेला प्रकार सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला आज (१२ मे) शिवाजीनगर न्यायालय (Shivajinagar Sessions Court ) येथे ऑनलाईन पद्धतीने हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का, असा प्रश्न विचारला असता आरोपीने नकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला १४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या संवेदनशील प्रकरणाची सुनावणी प्रभावी आणि जलदगतीने पार पडावी यासाठी राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसाळ ( Ajay Misar ) यांची नियुक्ती केली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामीण पोलिसांकडून संपूर्ण माहिती घेतल्याचे समोर आले आहे. तसेच या प्रकरणासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबतही सरकार स्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधान परिषद रणधुमाळी; महाराष्ट्रातील १७ रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक शक्य

0

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. कोणत्या जिल्ह्यांत होणार मतदान? वाचा सविस्तर अपडेट….!

मुंबई — महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


गेल्या अडीच वर्षांपासून या जागा रिक्त होत्या. कारण राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. आता निवडणुका पार पडल्याने संबंधित मतदारसंघात आवश्यक असलेली ७५ टक्के मतदारांची अट पूर्ण झाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.

या जिल्ह्यांतील विधान परिषद जागांवर होणार निवडणूक

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील खालील १७ जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे :
अहिल्यानगर
सोलापूर
ठाणे
जळगाव
सांगली-सातारा
नांदेड
यवतमाळ
पुणे
भंडारा-गोंदिया
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग
नाशिक
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली
परभणी-हिंगोली
अमरावती
धाराशिव-लातूर-बीड
संभाजीनगर-जालना
नागपूर

विधान परिषदेत बदलणार राजकीय समीकरण?

महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या ७८ आहे. यापैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडले जातात. सध्या त्यातील तब्बल १७ जागा रिक्त असल्याने या निवडणुकीकडे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तासमीकरणाचा थेट परिणाम या निवडणुकांवर दिसण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय ताकद या निवडणुकांमधून स्पष्ट होऊ शकते. पावसाळी अधिवेशनापूर्वी निवडणुका पार पडल्यास विधान परिषदेतील राजकीय चित्रात मोठे बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

कोणत्या पक्षाला फायदा?

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या पक्षांचे संख्याबळ अधिक आहे, त्यांना विधान परिषद निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समित्यांमधील सत्तासमीकरण आता निर्णायक ठरणार आहे.
राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीत भूकंप! प्रफुल पटेल, भुजबळांना डच्चू; सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष, सत्तेची सर्व सूत्रे एकाच कुटुंबात?

0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांसारख्या दिग्गजांना वगळलं. सुनेत्रा पवारांकडे अध्यक्षपद, तर पार्थ आणि जय पवारांचीही वर्णी.

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Ajit Pawar Group) नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला (ECI) सादर करण्यात आलेल्या यादीत पक्षाचे अत्यंत ज्येष्ठ आणि अनुभवी नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची नावे नसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, पक्षाची सर्व महत्त्वाची पदे आता ‘पवार’ कुटुंबाभोवतीच केंद्रित झाल्याचे चित्र या यादीतून स्पष्ट होत आहे.


दिग्गजांना डच्चू, राजकीय विश्लेषकही चक्रावले
या नव्या कार्यकारिणीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रफुल पटेल यांना वगळणे. गेल्या २५ वर्षांपासून राष्ट्रवादीचा राष्ट्रीय चेहरा राहिलेले आणि अजित पवारांच्या बंडाच्या वेळी खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेले पटेल यांना डच्चू मिळाल्याने पक्षात ‘सर्व काही आलबेल नाही’ अशी चर्चा सुरू झाली आहे. केवळ पटेलच नव्हे, तर पक्षाचे एकमेव लोकसभा खासदार सुनील तटकरे यांनाही सरचिटणीस पदावरून हटवण्यात आले आहे.
याशिवाय, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावेही गायब असल्याने जुनी फळी बाजूला सारली गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सत्तेचे केंद्र ‘पवार’ कुटुंबच

नवीन रचनेनुसार, राष्ट्रवादीच्या सत्तेची सूत्रे आता पूर्णपणे अजित पवार यांच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आली आहेत.

सुनेत्रा अजित पवार: राष्ट्रीय अध्यक्ष
पार्थ पवार: राष्ट्रीय सरचिटणीस
जय पवार: राष्ट्रीय सचिव
एकाच वेळी कुटुंबातील तीन सदस्यांकडे सर्वोच्च पदे गेल्यामुळे पक्षात ‘घराणेशाही’ वरचढ ठरत असल्याचा आरोप आता विरोधकांकडून आणि अंतर्गत गोटातूनही होऊ लागला आहे.

नवीन चेहऱ्यांची वर्णी

जुन्या नेत्यांना बाजूला करतानाच, काही नवीन नावांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये धनंजय शर्मा, राणा रणवीर सिंग, डॉ. रमण प्रीत सिंग आणि डॉ. अभिषेक बोके यांची वर्णी राष्ट्रीय कार्यकारिणीत लावण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांमध्ये असंतोष?

२९ एप्रिल २०२६ रोजीच्या पत्राद्वारे निवडणूक आयोगाला ही यादी सादर करण्यात आली आहे. मात्र, अनुभवी नेत्यांना डावलून केवळ कुटुंबातील सदस्यांना महत्त्व दिल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या बदलांमुळे आगामी निवडणुकीत पक्षाच्या रणनीतीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नीट परीक्षा रद्द! पेपर लीक प्रकरणानंतर एनटीए (NTA) चा मोठा निर्णय, फेरपरीक्षा लवकरच

0

नवी दिल्ली — देशातील वैद्यकीय प्रवेशाची सर्वात महत्त्वाची परीक्षा NEET-UG 2026 रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने मंगळवारी (१२ मे २०२६) ही अधिकृत घोषणा केली. ३ मे २०२६ रोजी झालेल्या परीक्षेत ‘गेस पेपर’ लीक आणि अनियमिततेच्या गंभीर तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या मंजुरीने आणि सीबीआय तपासाच्या पार्श्वभूमीवर NTA ने परीक्षा पूर्णपणे अवैध ठरवली आहे. नवीन फेरपरीक्षा लवकरच घेण्यात येणार असून, त्याची तारीख अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली जाईल.

नीट युजी (NEET UG 2026 )रद्द का झाली?

राजस्थान पोलिसांच्या SOG तपासात ‘गेस पेपर’ (४१० प्रश्नांचा) आढळला, ज्यातील अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आले.देशभरातून गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या तक्रारी आल्या.परीक्षेची पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

NTA ची प्रमुख अपडेट्स:

🎈३ मे ची परीक्षा रद्द; निकाल जाहीर केले जाणार नाहीत.
🎈पूर्वीची नोंदणी, उमेदवारी आणि परीक्षा केंद्रे वैध राहतील.
🎈कोणतीही नवीन नोंदणी किंवा अतिरिक्त शुल्क लागणार नाही.
🎈पूर्वी भरलेले शुल्क परत केले जाईल.

🎈CBI कडून पूर्ण तपास सुरू.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती —

लाखो विद्यार्थ्यांना (सुमारे २२.७९ लाख) पुन्हा तयारी करावी लागणार आहे. मात्र, NTA ने स्पष्ट केले की विद्यार्थ्यांचे भविष्य आणि परीक्षेची निष्पक्षता प्राधान्य आहे. नवीन परीक्षेचे वेळापत्रक आणि नियम लवकरच जाहीर होतील. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता फक्त neet.nta.nic.in वरून माहिती घ्यावी.

विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

काही विद्यार्थ्यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे कारण गैरप्रकार रोखणे आवश्यक होते. मात्र, महिन्यांच्या तयारीनंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याने अनेक जण चिंतित आहेत. वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया यामुळे काही काळ लांबणार आहे.

बीडमध्ये गोळीबार;फरार मकोका आरोपी अशीष आठवले फिल्मी स्टाईलने पकडला

0

बिअर शॉपीवर गोळीबार करणारा फरार मकोका आरोपी अशीष आठवले याला कबाड गल्लीत फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक. गावठी पिस्तूल जप्त.

बीड —  शहरात दहशत निर्माण करुन गेल्या दीड दोन वर्षापासून फरार असलेला  मकोका आरोपी अशीष श्यामराव आठवले याला बीड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. बिअर न दिल्याच्या कारणावरून बिअर शॉपी चालकावर गावठी पिस्तुलाने गोळीबार करून फरार झालेल्या आरोपीचा पोलिसांनी पाठलाग करून कबाड गल्लीत  मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि रिकामी पुंगळी जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अशीष आठवले याच्यावर पोलीस ठाणे पेठ बीड येथे गुरनं 383/2024 कलम 109, 115(2), 190, 191(2), 191(3) व इतर कलमान्वये मकोका अंतर्गत गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील इतर सर्व आरोपींना अटक झाली होती, मात्र अशीष आठवले गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना तो सापडत नव्हता.

दरम्यान, रात्री 11 वाजता बीड शहरातील समर्थ बिअर शॉपी येथे त्याने उधारीने बिअर मागितली. चालकाने नकार दिल्याने त्याने जवळील गावठी पिस्तुलातून गोळीबार करून फिर्यादीस जखमी केले. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुरनं 92/2026 कलम 109, 352, 351(2) बी.एन.एस. सह कलम 3/25 शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड आणि बीड शहर पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या टीमने आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी कबाड गल्ली येथून मोटारसायकलवर जात असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याचा पाठलाग केला. पोलीस अंमलदार अश्फाक सय्यद यांनी आरोपीस मिठी मारून पकडले.

या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोहवा सोमनाथ गायकवाड, अशोक दुबाले, राहुल शिंदे, मनोज परजणे, चालक नितीन वडमारे, पोह शहेंशाह सय्यद, राम पवार, संतोष शिंदे, इलियास शेख, चालक फिरोज पठाण यांचा समावेश होता.

बीडकरांना वेठीस धरणारा मुजोर अभियंता राजेंद्र भोपळे हटाव, बीड जिल्हा बचाव – जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

0

बीड —  बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या निकृष्ट दर्जाच्या व संथगतीने सुरू असलेल्या कामांविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.११ सोमवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

मुजोर अभियंता राजेंद्र भोपळे हटाव आणि बीड जिल्हा बचाव” ” निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत मध्ये टाका “अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग बीडचे उपविभागीय अभियंता राजेंद्र भोपळे हे निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांची पाठराखण करत असल्याचा आरोप करत त्यांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई व छत्रपती संभाजीनगर यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात रामनाथ खोड,शेख युनुस, सादेक सय्यद, रामधन जमाले, प्रा . तांदळे डी.जी., डॉ.संजय तांदळे, बाजीराव ढाकणे, हनुमान घोडके आदी सहभागी झाले होते.

बीड शहरातील महामार्ग कामांमुळे नागरिक त्रस्त

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची गती अत्यंत संथ असल्याने शहरात वाहतूक कोंडी, धुळीचे साम्राज्य आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली.

महिनाभरात स्लॅब कोसळल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

अहमदनगर ते परळी राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान बार्शी रोडवरील सोमेश्वरनगर समोरील नालीवर टाकण्यात आलेला सिमेंट स्लॅब अवघ्या महिनाभरात कोसळल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे संबंधित कामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

“याबाबत वारंवार तक्रारी करूनही उपविभागीय अभियंता राजेंद्र भोपळे हे कंत्राटदारांचीच बाजू घेत असल्याचे दिसून येत आहे,” असा आरोप डॉ. ढवळे यांनी केला.

भेगाळलेल्या महामार्गांमुळे अपघातांचे सत्र

खामगाव–पंढरपूर, अहमदपूर–अहिल्यानगर आणि पैठण–पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गांवर मोठमोठ्या भेगा पडल्या असून अनेक ठिकाणी दुचाकीस्वारांचे चाक अडकून अपघात घडले आहेत. काही नागरिकांना जीवही गमवावा लागल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

सध्या कंत्राटदारांकडून केवळ डांबर टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जात असून सिमेंट ब्लॉक कट करून दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, तसेच निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नाचक्की नंतर आंदोलनाची धास्ती शेवटी मुख्याधिकारी धमकी प्रकरणात गुन्हा दाखल

0

बीड — नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना दोघांनी केबिनमध्ये घुसून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणला याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पत्र देऊनही गुन्हा दाखल झाला नाही. शेवटी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी शितल कुमार बल्लाळ यांची नाचक्की झाल्यानंतर न प कर्मचाऱ्यांनी देखील आंदोलनास सुरुवात केली. शेवटी चार दिवसानंतर अखेर गुन्हा दाखल झाला.


मुख्याधिकारी सारख्या महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला कॅबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी दिली जाते. शिवीगाळ केली जाते. एवढं होऊनही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्षतेची बिरूदावली मिरवणाऱ्या ठाणेदारांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे टाळाटाळ केली. मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी सात मे रोजी शेख निजाम अमीन रा. मसरत नगर व शेख इम्रान निजाम या दोघांनी माझ्या केबिनमध्ये घुसून मला शिवीगाळ केली, अंगावर धावून आले, जीवे मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात शहर पोलीस ठाण्याला पत्र दिले.मात्र दोन दिवसाचा कालावधी उलटूनही मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रा नुसार कारवाई करावी अशी इच्छा पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांना झाली नाही. आरोपींना वाचवण्याच्या नादात पोलीस प्रशासनाची नाचक्की होणार आहे. पोलीस अधीक्षकांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहेत याचा भान देखील त्यांना राहिलं नाही.शेवटीं या प्रकरणाला वाचा फुटली गेली. यातून संपूर्ण पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. मुख्याधिकारी सारख्या महत्त्वाच्या पदावरच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांचे जीवन किती नरकासारखं केलं असेल असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. खाकी वर्दी भूशारकीचा टेंभा मिरवण्यासाठीच आहे का? अवैध धंद्यांना आश्रय देण्यासाठीच आहे काय? यासारखे अनेक प्रश्न जनतेतून विचारले गेले. इतकं होऊनही स्वतःच्या धुंदीत असलेल्या ठाणेदारांनी याकडे दुर्लक्ष केले. शेवटी आज नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले त्यामुळे दुपारपर्यंत नगरपालिकेचे कामकाज ठप्प झाले गेले. शहराची स्वच्छता देखील आंदोलनाच्या पवित्र्यामुळे अर्धवटच राहिली. नगरपालिकेचे कामकाज ठप्प झाल्यामुळे नागरिक वेठीस धरले गेले.
शेवटी ठाणेदाराने पोलीस प्रशासनाची नाचक्की होईपर्यंत हे प्रकरण ताणून धरले आंदोलन करायला भाग पाडले त्यानंतर घटनेच्या चार दिवसानंतर आज दि.11 मे रोजी दुपारी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी गुन्हा दाखल झाला आहे आता आंदोलन मागे घ्या असं सांगून न प कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित करण्यास सांगितल्यानंतर न.प.चे कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झाले.
याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गु.र.न. 91/2026 कलम 132, 221, 115 (2), 351 (2),3(5) बीएनएस प्रमाणे शेख निजाम व त्याच्या मुला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फडसें चा केला खडसे!

आनंदीबाई ने “ध”चा “मा” केल्यामुळे पेशवाई चा इतिहास बदलला होता. तसाच प्रकार इथे देखील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. एफ आय आर मध्ये शैलेश दिगंबरराव फडसे ऐवजी त्यांचे आडनावच बदलले.
एफ आय आर मध्ये शैलेश दिगंबरराव खडसे असा उल्लेख करण्यात आला आहे.

एस पी साहेब, प्रत्येक वेळी आंदोलनच करायचे का?

काही महिन्यापूर्वी एका वकिलाला न्यायालयाच्या आवारातच मारहाण केली गेली होती. यावेळी देखील पोलिसांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करून घेतला नाही. शेवटी बार कौन्सिलने न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. न्यायालयाच्या दारातच ठिय्या दिला त्यावेळी कसातरी गुन्हा दाखल झाला गेला. तीच स्थिती जीएसटी अधिकारी सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणात पाहायला मिळाली. गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित कुटुंबाला ग्रामीण पोलीस ठाण्यात आंदोलन करावे लागले. आरोपीला अटक करावी यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे द्यावे लागले. त्यावेळी कुठेतरी पोलीस यंत्रणेला पाझर फुटला. असे एक ना अनेक प्रकरण बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेले आहेत. प्रत्येक वेळी प्रत्येक घटनेत आंदोलनाच्या पावित्र्यात जनतेने राहायचं काय? ज्यांना कुठलाच आधार नाही अशा लोकांनी अन्याय सहन करायचा काय? तुमच्याकडून न्याय मिळणारच नाही का? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारले जात आहेत.