Home Blog Page 42

बीडमध्ये उपवर्गीकरणाविरोधात  59 जाती उतरल्या रस्त्यावर!

0

भाजप सरकार समाजात विष पेरत आहे; ४१ अंश तापमानात हजारोंचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक महामोर्चा

बीड — अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून बीडमध्ये सोमवारी (ता.11) आंबेडकरी समाजाचा संताप अक्षरशः रस्त्यावर उतरला. भाजप सरकार जाती-जातीत भिंती उभ्या करून सामाजिक ऐक्य उद्ध्वस्त करत आहे, असा थेट आरोप करत 10 हजार आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. तब्बल ४१ अंश सेल्सिअस तापमानाची पर्वा न करता जिल्हाभरातील अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, महिला आणि युवक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
     बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या महामोर्चाने शहर दणाणून सोडले. उपवर्गीकरण रद्द करा, संविधान वाचवा, समाजात फूट पाडणारे निर्णय बंद करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आंदोलकांच्या हातात हा लढा कोणत्याही जातीविरोधात नसून सरकारच्या विभाजनकारी भूमिकेविरोधात आहे असे ठळक फलक झळकत होते.
मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी मार्फत शासनाला दिलेल्या निवेदनात उपवर्गीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या बदर समितीचा संपूर्ण अहवाल तात्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी केली. अहवाल लपवून सरकार जनतेवर निर्णय लादू पाहत आहे. आधी अहवाल सार्वजनिक करा, मगच जनतेची मते घ्या, अशी संतप्त भूमिका आंदोलकांनी मांडली.
एप्रिल महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम सुरू असल्याने नागरिकांना अभ्यासपूर्ण भूमिका मांडण्यासाठी वेळ मिळावा म्हणून सूचना व हरकती सादर करण्याची मुदत ३० ऑगस्टपर्यंत वाढवावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी आंदोलकांनी सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला उपवर्गीकरण करणे बंधनकारक केलेले नाही. तरीदेखील सरकार हेतुपुरस्सर समाजात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातींची भूमिका जाणून घेण्यासाठी लेखक, साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजनेते यांची संयुक्त समिती स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली.
     मोर्चामध्ये केवळ उपवर्गीकरणाचाच मुद्दा नव्हता, तर कंत्राटी नोकरभरती, शिक्षणाचे खासगीकरण आणि जातनिहाय जनगणनेच्या प्रश्नांवरही सरकारला धारेवर धरले गेले. सरकारी नोकरभरतीतील कंत्राटी पद्धत बंद करा, अनुसूचित जाती-जमातींचा अनुशेष भरा, शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण करून समान आणि मोफत शिक्षण लागू करा, अशा मागण्यांनी मोर्चेकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार आक्रमक भूमिका घेतली.
भाजप सरकारने विष कालविले
अनुसूचित जातींमध्ये जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा डाव हा सामाजिक सलोख्यावर थेट हल्ला आहे. भाजप सरकार समाजात विष कालवण्याचे काम करत असून संविधानिक ऐक्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारने समाज पेटविण्याचे राजकारण तात्काळ थांबवावे, अन्यथा रस्त्यावरचा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.
आंबेडकरी समाजाचे पदाधिकारी

वेळ पडली तर न्यायालयवरही मोर्चा काढू

उपवर्गीकरणाचा निर्णय भविष्यात मोठ्या सामाजिक संघर्षाला कारणीभूत ठरू शकतो. शासनाने जनतेच्या भावना डावलून घाईघाईने निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलन उभे राहील. वेळ पडली तर न्यायालयावरही विराट मोर्चा काढून सरकारला जाब विचारला जाईल, असा सज्जड इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला.
– सामाजिक कार्यकर्ते
संरक्षणासाठी उभारलेला एल्गार
हा महामोर्चा कोणत्याही जातीविरोधात नसून संविधान, सामाजिक ऐक्य आणि आंबेडकरी विचारांच्या संरक्षणासाठी उभारलेला एल्गार आहे. ‘समाज फोडणाऱ्यांना गादीवरून खाली खेचा, संविधान वाचवा अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
– महामोर्चा संयोजन समिती

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका : सर्वोच्च न्यायालयात २१-२२ जुलैला सुनावणी, बीड-जालना प्रकरण चर्चेत

0

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील ५० टक्के आरक्षण मर्यादा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २१ आणि २२ जुलैला महत्त्वाची सुनावणी होणार. बीड आणि जालना निवडणुकांबाबतही मोठी चर्चा.

नवी दिल्ली —  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचा प्रश्न अद्यापही कायम असून, यासंदर्भातील महत्त्वपूर्ण सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयात २१ आणि २२ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रलंबित महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या भवितव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी ओबीसी आरक्षण आणि एकूण आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे निवडणुका रखडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बीड आणि जालना जिल्ह्यांमध्ये निवडणुका घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अंतरिम अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता.

अर्जदारांच्या वतीने न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला की, बीड आणि जालना जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडलेली नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने जाहीर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला द्यावेत.

मात्र सोमवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हा अंतरिम अर्ज आगामी मुख्य सुनावणीदरम्यानच विचारात घेतला जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता २१ आणि २२ जुलै रोजी होणारी सुनावणी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, यापूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील, असे न्यायालयाने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे अंतिम निकालानंतर निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यातील अनेक ठिकाणी निवडणुका रखडल्याने प्रशासनावर प्रशासकांची मुदत वाढवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे न्यायालयाचा पुढील निर्णय राज्यातील राजकीय समीकरणांवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासंघर्षावर थेट परिणाम करणारा ठरू शकतो.

आष्टी तालुक्यात भीषण आग : शिरापूर व केरूळमधील दोन किराणा दुकाने जळून खाक

0

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात शिरापूर आणि केरूळ येथे लागलेल्या भीषण आगीत दोन किराणा दुकाने जळून खाक झाली. ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले.

आष्टी (बीड). — तालुक्यात सलग दोन ठिकाणी लागलेल्या भीषण आगीत किराणा दुकाने जळून खाक झाल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरापूर आणि केरूळ गावांमध्ये घडलेल्या या घटनांमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शिरापूरमध्ये पहाटे भीषण आग

शिरापूर येथे सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश हरिश्चंद्र जगताप यांच्या ‘स्वामी समर्थ किराणा अँड जनरल स्टोअर्स’ या दुकानाला अचानक आग लागली. पहाटे मोठा आवाज आल्याने ऋषिकेश जगताप बाहेर आले असता दुकानाला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. संतोष तागड, सागर जगताप, हनुमंत देवकर यांच्यासह अनेक युवकांनी विद्युत मोटारी सुरू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.
सुमारे दोन तास ग्रामस्थांनी अथक प्रयत्न केले, परंतु आग नियंत्रणात येईपर्यंत मोठे आर्थिक नुकसान झाले होते.

केरूळमध्येही किराणा दुकान जळाले

दरम्यान, रविवारी रात्री केरूळ येथेही अशीच घटना घडली. दिलीप भंडारी यांच्या किराणा दुकानाला अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले. ग्रामस्थांसह अग्निशमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दुकानातील मोठ्या प्रमाणावर साहित्य जळाले होते.

व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

सलग दोन दिवसांत किराणा दुकानांना आग लागल्याच्या घटनांमुळे आष्टी तालुक्यातील व्यापारी वर्गात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, विद्युत शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

“शितल”तेच्या कौतुकाची वरात अन् हागायला परात! पिडीत दारात अन गुन्हेगार जोरात!!

0

सीओंच्या पत्राची दखल कधी घेणार? छाया पांचाळला न्याय कधी देणार?

बीड — कर्तव्यदक्ष, सिंघम, प्रामाणिक अधिकारी म्हणून कौतुकाची “वरात” काढून कितीही गाजावाजा केला जात असला तरी मुळता:च कर्म दरिद्री पणा असल्याने गुन्हेगारासमोर “शितल” होणाऱ्या “कुमारा” कडून न्यायाची अपेक्षा कशी करणार? न. प.चे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना केबिनमध्ये जाऊन दोघांनी जिवे मारण्याची धमकी दिली. शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आणला या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे पत्र शहर पोलीस ठाण्याला दिले. पण मिरवल्या जात असलेल्या बिरूदावलींशी सुतराम संबंध नसलेल्याने पुन्हा आरोपींची “ब”ळेच “लाळ” चाटल्याचं पाहायला मिळालं. तीच स्थिती डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान मृत्यू झालेल्या छाया पांचाळ प्रकरणातही पाहिला मिळाली. ठाणेदाराच्या केबिनमध्ये ठिय्या देखील मांडला पण कारवाई करण्याची उपरती आलीच नाही. मोठमोठ्या प्रकरणांची ही स्थिती तर चिल्लर प्रकरणात काय? अन् एस पीं चा कारभार झालाय गोगलगाय असं म्हणण्याची वेळ आली आहे.

जीएसटी अधिकारी सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या पीडित कुटुंबाचा सावलीसाठी उभारलेला मंडप काढणारा डोक्याने “शितल” असलेल्या कुमाराच्या  कर्तव्यदक्षतेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश पालन करणारा म्हणून नेहमीच तोरा मिरवणारा ठाणेदार आहे. पण किती जरी तोरा मिरवला असला तरी कर्तव्यदक्षतेच वास्तव मात्र भयानक आहे.

खाकी वर्दी फक्त रुबाब दाखवायलाच असते एवढाच काय तो तिचा उपयोग बाकी अवैध धंद्यांना दिलेला आश्रय हा भाग वेगळा असला तरी सर्वसामान्यांना न्याय मिळणं अवघड झाला आहे. नुसतीच पोलीस दलात आधुनिकता आणून कर्तव्यदक्षतेचा अभाव असला तर त्याचा फायदा काय? असा प्रश्न मात्र आता निर्माण झाला आहे सामान्यांचा द्या सोडून इथे मुख्याधिकारी पदावर बसलेल्या अधिकाऱ्याला देखील न्याय मिळण अवघड होऊन बसला आहे. बीड न.प‌.चे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या केबिनमध्ये घुसून शेख निजाम अमीन रा. मसरत नगर व शेख इम्रान निजाम रा. मसरत नगर या दोघांनी त्यांना शिवीगाळ केली. मारण्यासाठी अंगावर धावून गेले. जीवे मारण्याची धमकी दिली शासकीय कामात अडथळा आणला. एवढी मोठी गंभीर घटना घडली. या संदर्भात सात मे रोजी शहर पोलीस ठाण्याला मुख्याधिकारी फडसे यांनी गुन्हा नोंद करण्याबाबत अधिकृत पत्र दिले. या घटनेला तीन दिवसाचा कालावधी उलटला असला तरी अद्याप गुन्हा नोंद करताना कर्तव्यदक्ष ठाणेदाराच्या हाताला लकवा मारला गेला. गुन्हा नोंद करण्याची हिम्मत झाली नाही. तीच स्थिती वर्षभरापूर्वी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे छाया गणेश पांचाळ हिचा प्रसूती दरम्यान अति रक्तस्त्रावाने मृत्यू झाला. यासाठी वारंवार आंदोलन केली गेली. जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीवर शोले स्टाईल आंदोलन केले. या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार सोळंके आणि शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी अहवाल मागवून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या या मधाळ, शितल आश्वासनाने न्याय मिळण्याची आशा पल्लवीत झाली. पण वैद्यकीय अहवाल हाती पडल्यानंतर देखील पुन्हा गुन्हेगारांच्या बाबतीत नेहमीप्रमाणेच ““ळेच “लाळ“चाटण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटी कंटाळून शहर पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या केबिन मध्येच सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मोरे व पीडीत कुटुंबातील महिलेने ठिय्या आंदोलन सुरू केले. पण जिथे “शितल”डोक्याने मधाळ वाणीपुढे पोलीस अधीक्षकासारखा आयपीएस अधिकारी पघळतो. मग नागवं नाचलं तरी सूट देतो. तर मग खेडवळ पीडित कुटुंब का पघळणार नाही. न्याय मिळेल अशी अपेक्षा का ठेवणार नाही ? शेवटी सत्ते पुढे शहाणपण देखील चालत नाही. जिथे पोलीस अधीक्षकांचा वरदहस्त आहे. तिथे न्याय काय मिळणार? मग ते मुख्याधिकारी असो किंवा गाजलेलं छाया पांचाळ मृत्यू प्रकरण असो असं म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. या सारख्या अनेक घटनांमुळे कर्तव्यदक्षतेचा ढोल बडवणारा प्रत्यक्षात मात्र कर्तव्यदक्षतेची “वानवा” असलेल्या व्यक्तींनाच “कौतुकाची वरात अन् हागायला परात” पीडित दारात अन् आरोपी जोरात” अशी म्हण जनतेत गमतीने वापरली जाऊ लागली आहे.

CM बनताच सी. जोसेफ विजय अॅक्शन मोडमध्ये;तामिळनाडूत 200 युनिट मोफत वीज

0

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी शपथ घेताच 200 युनिट मोफत वीज, महिला सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी विशेष पथकाच्या निर्णयांवर स्वाक्षरी केली. DMK सरकारवर 10 लाख कोटींच्या कर्जाचा आरोप करत श्वेतपत्रिका जाहीर करण्याची घोषणा.

तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल घडवत तमिळगा वेत्री कळघम (TVK) चे प्रमुख सी.जोसेफ विजय  (C. Joseph Vijay) यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी मोठे निर्णय घेत राज्याच्या प्रशासनाला वेग दिला आहे. सुपरस्टार ते मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या विजय यांनी शपथविधीनंतर थेट सचिवालय गाठत जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली.
200 युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय
मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर विजय यांनी घरगुती ग्राहकांना 200 युनिट मोफत वीज देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या प्रमुख आश्वासनांपैकी हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष सुरक्षा पथके स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले.

राज्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र विशेष पथक उभारण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. पहिल्याच दिवशी घेतलेल्या या निर्णयांमुळे विजय सरकार जनहिताच्या मुद्द्यांवर आक्रमकपणे काम करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

डीएमके (DMK) सरकारवर 10 लाख कोटींच्या कर्जाचा आरोप

मुख्यमंत्री विजय यांनी शपथविधीनंतर लगेचच माजी सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) सरकारवर गंभीर आर्थिक आरोप केले. 2021 ते 2026 या कालावधीतील राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर लवकरच श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
“मागील सरकारने राज्यावर तब्बल 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज टाकले आहे. राज्याची खरी आर्थिक स्थिती जनतेसमोर आणली जाईल,” असे विजय यांनी स्पष्ट केले. पारदर्शक प्रशासन देण्याचा पुनरुच्चार करत त्यांनी निवडणूक जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

सत्तेचे एकच केंद्र असेल’

राज्यातील राजकीय समीकरणे आणि अल्पमताच्या चर्चांदरम्यान विजय यांनी प्रशासनात कोणतेही दुहेरी सत्ताकेंद्र नसल्याचे स्पष्ट केले. “सरकारमध्ये निर्णय घेणारे एकच नेतृत्व असेल आणि त्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारेल,” असे ते म्हणाले.
विधानसभेत अनेक छोट्या पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन झाल्याने राज्याच्या स्थिरतेबाबत प्रश्न उपस्थित होत होते. मात्र शिक्षण, आरोग्य, अन्नपुरवठा आणि महिला सुरक्षा या चार क्षेत्रांना सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे विजय यांनी सांगितले.

विरोधकांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री म्हणून केलेल्या पहिल्याच भाषणात विजय यांनी संयमी आणि समन्वयाची भूमिका घेतली. “ज्यांनी माझ्यावर टीका केली, अपमान केला तेही माझेच लोक आहेत,” असे भावनिक वक्तव्य करत त्यांनी विरोधकांनाही विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन केले.
त्यांच्या या भूमिकेमुळे तामिळनाडूच्या राजकारणातील कटुता कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जनतेने दिलेल्या संधीचा पूर्ण उपयोग करून सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकार काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शैक्षणिक कर्ज मंजूर करूनही वितरण टाळले; महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ग्राहक आयोगाचा दणका

0

बीड —  शैक्षणिक कर्ज मंजूर करूनही विद्यार्थ्याला वेळेत कर्ज वितरण न करता मानसिक व शैक्षणिक अडचणीत टाकल्याप्रकरणी बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेला दणका दिला आहे. वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील बी.टेक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला मंजूर झालेले २ लाख ७८ हजार ३८० रुपयांचे शैक्षणिक कर्ज ३० दिवसांत वितरित करण्याचे तसेच मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

पिंपरखेड येथील सशांत संजय निपटे हा पुणे येथे बी.टेकच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असून शिक्षणासाठी त्याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वडवणी शाखेकडे शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये बँकेकडून आवश्यक कागदपत्रांची माहिती घेऊन त्याने कॉलेज फी कोटेशन, ७/१२ उतारा, आधार कार्ड आदी सर्व कागदपत्रे जमा केली होती. त्यानंतर बँकेने कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुरू केली. जानेवारी २०२५ मध्ये बँकेने कर्ज मंजूर झाल्याचे सांगत प्रक्रिया शुल्क व कागदपत्र हाताळणी शुल्क म्हणून ६५६ रुपये ९८ पैसे खात्यातून वसूल केले. विद्यार्थ्याने चार लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली असताना बँकेने २ लाख ७८ हजार ३८० रुपयांचे शैक्षणिक कर्ज मंजूर केले. मात्र मंजुरीनंतरही रक्कम वितरित करण्यात आली नाही. विद्यार्थ्याने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर बँकेने २८ फेब्रुवारी २०२५ रोजी लेखी पत्र देत जामीनदार रामप्रताप शिवाजी निपटे यांच्या नावावर थकबाकी असल्याने कर्ज वितरित करता येणार नसल्याचे सांगितले. यावर विद्यार्थ्याने ग्राहक आयोगात धाव घेतली.

सुनावणीदरम्यान तक्रारदाराच्या वतीने रिझर्व्ह बँकेच्या ‘मॉडेल एज्युकेशन लोन स्कीम’चा दाखला देण्यात आला. त्यानुसार चार लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी कोणतीही तारण मालमत्ता किंवा अतिरिक्त जामीनदार घेण्याची आवश्यकता नसल्याचे आयोगासमोर मांडण्यात आले. आयोगानेही ही बाब ग्राह्य धरत बँकेने जामीनदाराची अट घालणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्याने एसईबीसी प्रवर्गाची माहिती लपविल्याचा बँकेचा दावा आयोगाने फेटाळून लावला. कर्ज मंजुरी आदेशातच विद्यार्थी एसईबीसी प्रवर्गातील असल्याचा उल्लेख असल्याने बँकेचा आक्षेप पुराव्याअभावी ग्राह्य धरता येत नसल्याचे आयोगाने नमूद केले. या सर्व बाबी लक्षात घेऊन बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष हरीश अडके, सदस्या सतिका शिरदे आणि संगिनी राहुल पोळ यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. तक्रारदाराच्यावतीने ॲड.एस. आर. कुंभार, ॲड. नारायण सिरसट, ॲड.विकास मिसाळ, ॲड.बालाजी घुमरे, ॲड.दीपक कुलकर्णी, ॲड.उदय दराडे, अक्षय सिरसट यांनी काम पाहिले. दरम्यान, आयोगाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेस ३० दिवसांत मंजूर कर्जाची रक्कम वितरित करण्याचे आदेश दिले असून अन्यथा त्या रकमेवर ९ टक्के व्याज आकारण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये ४५ दिवसांत देण्याचेही आदेश आयोगाने दिले आहेत.

विद्यार्थ्याच्या शिक्षणावर परिणाम

आयोगाने आदेशात म्हटले आहे की, बँकेने कर्ज प्रक्रिया शुल्क स्वीकारून कर्ज मंजुरी आदेश दिल्यानंतरही कर्ज वितरित न करणे ही सेवेतील कसूर ठरते. या विलंबामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणावर परिणाम झाला असून मानसिक त्रासही सहन करावा लागला.

धारूर : तेलगाव कारखाना परिसरात वेश्याव्यवसायावर पोलिसांची धाड; 2 आरोपी अटकेत

0

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात तेलगाव साखर कारखाना परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर दिंद्रुड पोलीस व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची संयुक्त कारवाई. तीन महिलांची सुटका तर दोन आरोपींना अटक.

धारूर (बीड) —  तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तेलगाव साखर कारखाना परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर दिंद्रुड पोलीस आणि बीड येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संयुक्तरीत्या मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


पोलिसांना तेलगाव कारखाना परिसरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान संबंधित ठिकाणाहून तीन महिलांची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी मिना सुर्यवंशी आणि अनंत कोथिंबीरे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करणे तसेच भाग पाडल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संयुक्त कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश भोसले, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव आणि पवनसिंग जंघाले यांच्या पथकाने केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना धारूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

बेनामी मालमत्ता जप्त होणार, काळा पैसा लपवणाऱ्यांना “सर्वोच्च” धक्का 

0
  • सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत २०१६ पूर्वीच्या बेनामी व्यवहारांतील मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार सरकारला दिला आहे. ड्रायव्हर, नोकर, नातेवाईकांच्या नावावर घेतलेल्या संपत्तीवर आता कारवाई शक्य.

बेनामी मालमत्तां जप्तीचा सरकारला अधिकार

नवी दिल्ली —  देशातील काळ्या पैशाविरोधातील लढ्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला ऐतिहासिक निकाल महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, नोव्हेंबर २०१६ पूर्वी झालेल्या बेनामी व्यवहारांतील मालमत्ता केंद्र सरकार आणि आयकर विभाग जप्त करू शकतात. त्यामुळे अनेक वर्षांपासून इतरांच्या नावावर संपत्ती लपवून ठेवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ड्रायव्हर, घरगुती नोकर, स्वयंपाकी, दूरचे नातेवाईक किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींच्या नावावर मालमत्ता खरेदी करून काळा पैसा लपवणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तपास यंत्रणांना आता जुन्या संशयास्पद व्यवहारांच्या फाईल्स पुन्हा उघडून चौकशी करण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे.

न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, सुधारित बेनामी व्यवहार कायद्याअंतर्गत २०१६ पूर्वीच्या प्रकरणांमध्ये सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद लागू होणार नाही. मात्र अशा प्रकरणांतील मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार सरकारकडे राहील. जुन्या प्रकरणांमध्ये कमाल तीन वर्षांची शिक्षा कायम ठेवण्यात आली असून आर्थिक दंड आणि मालमत्ता जप्तीची कारवाई होऊ शकते.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बेनामी मालमत्तांना कायदेशीर स्वरूप देण्यासाठी मृत्युपत्र आणि वारसा हक्काच्या कागदपत्रांचा गैरवापर होत असल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. जर मूळ व्यवहार बेनामी असल्याचे सिद्ध झाले, तर मृत्युपत्राद्वारे मालकी हस्तांतरण देखील बेकायदेशीर मानले जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

हा महत्त्वपूर्ण निर्णय “मंजुळा आणि इतर विरुद्ध डी. ए. श्रीनिवास” या प्रकरणात देण्यात आला. या प्रकरणात मृत्युपत्राच्या आधारे मालकी हक्काचा दावा करण्यात आला होता. मात्र तपासात जमीन सुधारणा कायद्यांपासून बचाव करण्यासाठी हा संपूर्ण व्यवहार रचल्याचे उघड झाले.

सर्वोच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना आठ आठवड्यांच्या आत अशा संशयित मालमत्तांची कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता सरकार २०१६ पूर्वीच्या बेनामी व्यवहारांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

🕳️. २०१६ पूर्वीच्या बेनामी मालमत्तांवर सरकारची कारवाई शक्य

🕳️.  ड्रायव्हर-नोकरांच्या नावावर घेतलेल्या संपत्तीवर टार्गेट

🕳️. सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

🕳️  आयकर विभागाला जुन्या फाईल्स उघडण्याचा अधिकार

🕳️  मृत्युपत्राद्वारे मालमत्ता वाचवणेही कठीण

बीडमध्ये उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाचा 11 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

0

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात बीडमध्ये आंबेडकरी समाजाचा 11 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. बदर समिती अहवाल जाहीर करण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या.

बीडमध्ये आंबेडकरी समाज आक्रमक!

बीड — अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून बीड जिल्ह्यात आंबेडकरी समाज आक्रमक झाला असून, महाराष्ट्र शासनाच्या धोरणाविरोधात सोमवार दि. 11 मे रोजी सकाळी 11 वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. “समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न थांबवा” अशी भूमिका घेत आंबेडकरी समाजाच्या विविध संघटनांनी पत्रकार परिषदेत सरकारवर गंभीर आरोप केले.
बीड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत समाजातील पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हा मोर्चा कोणत्याही जातीविरोधात नसून सरकारच्या उपवर्गीकरण धोरणाविरोधात आहे. अनुसूचित जातींमध्ये भेद निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या बदर समितीचा संपूर्ण अहवाल तात्काळ सार्वजनिक करण्यात यावा. अहवाल जाहीर झाल्यानंतरच नागरिकांना सूचना, हरकती आणि मते नोंदविणे शक्य होईल. तसेच हरकती सादर करण्याची मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अनुसूचित जातीतील सर्व 59 घटकांची मते जाणून घेण्यासाठी लेखक, साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजनेते यांचा समावेश असलेली संयुक्त समिती स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरण बंधनकारक केलेले नसल्याने राज्य सरकारने ही प्रक्रिया तात्काळ थांबवावी, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
पत्रकार परिषदेत राज्यात जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात आली. तसेच कंत्राटी व गुत्तेदार पद्धतीची नोकरभरती बंद करून नियमित भरतीद्वारे अनुसूचित जाती-जमातींचा अनुशेष भरून काढावा, अशी मागणीही करण्यात आली. शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण करून सर्वांसाठी समान, मोफत आणि सक्तीचे शिक्षण लागू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
पत्रकार परिषदेला राजू जोगदंड, ॲड. भगवान कांडेकर, अजय सरवदे, सिद्धार्थ शिनगारे, आशिषकुमार चव्हाण, नितीन सोनवणे, पुरुषोत्तम वीर, ॲड. राजेश शिंदे, प्रेम कांबळे, रजनिकांत वाघमारे, सूर्यकांत ठोकळ, लखन जोगदंड, मिलिंद सरपते, श्यामसुंदर जाधव आणि प्रविण टाकणखार उपस्थित होते.

प्रतिक्रिया

अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सामाजिक सलोखा बिघडवणारा आहे. सरकारने सर्व समाजघटकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत.”
— आंबेडकरी समाजाचे पदाधिकारी
हा मोर्चा कोणत्याही समाजविरोधात नसून संविधान आणि सामाजिक ऐक्य वाचविण्यासाठी आहे.”
— महामोर्चा संयोजन समिती
उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे भविष्यात गंभीर सामाजिक परिणाम होऊ शकतात. शासनाने घाईघाईने निर्णय घेऊ नये.”
— सामाजिक कार्यकर्ते

सोशल मीडियावर खोट्या बदनामीला आळा; महाराष्ट्र सरकार आणणार नवा कायदा?

0
  • महाराष्ट्र सरकार सोशल मीडियावर खोट्या पोस्ट, निराधार आरोप आणि बदनामी करणाऱ्यांविरोधात नवीन कायदा आणण्याच्या तयारीत आहे. डीजीपींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन.

सोशल मीडियावर विनापुरावा बदनामी केल्यास कारवाई; महाराष्ट्र सरकारची मोठी तयारी

मुंबई —  सोशल मीडियाचा वाढता प्रभाव पाहता, त्याचा गैरवापर रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्स (ट्विटर) यांसारख्या माध्यमांवर कोणताही ठोस पुरावा नसताना व्यक्ती किंवा संस्थांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार नवीन कायदा आणण्याच्या विचारात आहे.
राज्यात सोशल मीडियावरून खोट्या पोस्ट, दिशाभूल करणारी माहिती, निराधार आरोप आणि वैयक्तिक प्रतिमा मलीन करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. यामुळे अनेकांना मानसिक, सामाजिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सोशल मीडियावरील बदनामी आणि खोट्या माहितीवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा अथवा नवीन कायदेशीर तरतुदी करण्याची शक्यता तपासण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.
सरकारी आदेशानुसार, महाराष्ट्र पोलीस महासंचालक (DGP) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहणार आहे. समिती विद्यमान कायद्यांचा आढावा घेऊन सोशल मीडियाच्या गैरवापरावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक बदल सुचवणार आहे.
तसेच, राज्य स्तरावर स्वतंत्र कायदा लागू करण्याची आवश्यकता आहे का, याचीही कायदेशीर आणि तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. सोशल मीडियावरून होणाऱ्या बदनामीच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकार अधिक सक्षम कायदेशीर चौकट उभी करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी तसेच सामान्य नागरिक यांच्याविरोधात विनापुरावा पोस्ट व्हायरल करून वातावरण बिघडवण्याच्या प्रकारांवर आता लगाम बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.