Home Blog Page 39

धर्मापुरी मध्ये दुकानात बोलावून घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

0

परळी — तालुक्यातील धारावती तांडा येथे अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तोंडात गोळा कोंबून अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच धर्मापुरी येथे देखील दहा वर्षीय शाळकरी मुलीवर दोन वेळेला अत्याचार झाल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

परळी तालुक्यातील धर्मापुरी  येथे १८ मार्च  रोजी दुपारी १२  वाजण्याच्या सुमारास अत्याचार केल्याची  घटना घडली. बालाजी पांचाळ वय ५० वर्षे याने दळण आणण्यासाठी गेलेल्या१० वर्षीय एका अल्पवयीन मुलीला दुकानात बोलावून घेतले. तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.याबाबत कुणाला सांगितल्यास तिच्या आणि तिच्या आई-वडिलांच्या जीवाला धोका पोहोचवण्याची धमकी दिली.पीडित मुलीची मानसिक स्थिती बिघडल्याचे पाहून घरी आलेल्या मुलीला आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. दरम्यान मुलीने बालाजी पांचाळ या नराधमाने असेच कृत्य दोन महिन्यापूर्वी देखील केले होते. आजही त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याची माहिती आईला दिली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून २२ मार्च २०२६ रोजी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६४(१), ६४(२), ६५(२), ७४, ७५(२) आणि पोक्सो कायद्याच्या ४, ६, ८, १२ कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केल्याचे सांगण्यात येते.

या गंभीर प्रकरणाचा तपास अंबाजोगाईच्या पिंक पथकातील ए.पी.आय. जाधवर करत आहेत. आठ दिवसापूर्वी धारावती तांडा येथे देखील अल्पवयीन मुलीला घरात बोलावून घेत हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबत नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली होती. लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

रूपाली चाकणकरांची गच्छंती; भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले

0

मुंबई — अशोक खरात प्रकरणी आता मोठी कारवाई होत असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर रुपाली चाकणकरांनी तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांचा राजीनामा झाला आहे.

शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात सोबत रुपाली चाकणकरांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर चाकणकरांवर टीकेचा भडीमार झाला होता. विविध स्तरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी रुपाली चाकणकरांना तात्काळ राजीनामा द्यावा असा आदेश दिला. त्यामुळे अशोक खरात प्रकरणात आता रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा होता. आता रुपाली चाकणकरांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांचा राजीनामा मागितला होता. रुपाली चाकणकरांनी आधी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत चर्चा केली. दरम्यान रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्यात येत असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो. राज्यातल्या महिला नेतृत्व म्हणून सुनेत्रा पवारांनी हा निर्णय घेणं अपेक्षित होतं, पण त्यांच्याकडून हा निर्णय झाला नाही याची खंत वाटते अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.

रुपाली चाकणकरांची प्रथमदर्शनी या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचा संशय असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.

कनकालेश्वर महोत्सव ही बीडची खरी ओळख– डॉ.योगेश क्षीरसागर 

0

संस्कार भारतीच्या तिसाव्या कंकालेश्वर महोत्सवाने नववर्षाचे स्वागत

बीड — गेली तीन दशके बीड जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख सर्वदूर करणारा कनकालेश्वर महोत्सव ही बीडची खरी ओळख असून मोठे कलावंत देखील आम्ही या महोत्सवात कला सादर केल्याचे अभिमानाने सांगतात, आता हा महोत्सव अधिक व्यापक व्हावा असे प्रतिपादन युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.

तिसावा कनकालेश्वर महोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे कनकालेश्वर मंदिराच्या परिसरात आणि जलाशयातील तरंगत्या रंगमंचावर संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, भाजप युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर, संस्कार भारती देवगिरी प्रांताचे उपाध्यक्ष देवेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते

राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळया रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

दिपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर सौ वासवदत्ता हसेगावकर आणि प्रमोद वझे यांनी संस्कार भारती गीत सादर केले.तबल्यावर सार्थक वझे तर संवादीनी वर महेश वाघमारे यांनी साथ दिली कार्यक्रमास यावेळी ज्येष्ठ नेते नवनाथ शिराळे संरक्षक भरत लोळगे, रंगकर्मी कुलदीप धुमाळे प्रसिद्धी प्रमुख महेश वाघमारे, गटनेत्या डॉ. सारिका क्षीरसागर नगरसेवक आदित्य माने नगरसेवक शुभम धूत, नगरसेवक गोविंद शिराळे शांतिनाथ डोरले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

बीड जिल्हा हा कलाकारांचा जिल्हा आहे संस्कार भारती ने कंकालेश्वर महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती जोपासण्याचे काम केले आहे आम्ही संस्कार भारतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे मत यावेळी शंकर देशमुख यांनी व्यक्त केले तर डॉ. योगेश क्षीरसागर यांनी बोलताना हा कनकालेश्वर महोत्सव जागतिक पातळीवर पोहोचावा अशी अपेक्षा व्यक्त करत पक्षीय मतभेद बाजूला ठेवून क्षीरसागर परिवाराने या महोत्सवाला सदैव पाठबळ दिल्याचे सांगितले. गुढीपाडवा म्हणजे प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून आयोध्येत आगमन केल्याच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक असून याच मुहूर्तावर असलेल्या संस्कार भारती बीड शाखा सातत्याने तीस वर्षे कंनकालेश्वर महोत्सव आयोजित करते हे कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार देवेंद्र कुलकर्णी यांनी काढले.

उद्घाटन समारंभानंतर तरंगत्या रंगमंचावर साई नृत्यलयाच्या वतीने अनुराधा चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती गणेशतालम, अष्टलक्ष्मी स्तोत्रम, शिव तांडव आणि राजराजेश्वरी अष्टकम सादर करण्यात आले तर याच मंचावर विनायक वझे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्या मुला मुलींनी मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली या सादरीकरणाने प्रेक्षकांचा श्वास रोखायला लावला.

रंगकर्मी कुलदीप धुमाळे लिखित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहा सरसंघचालक यांच्या चरीत्रावर आधारित ‘अवतरले पंचसंन्यासी योद्धे’ ही नाटिका यावेळी सादर करण्यात आली, संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, रज्जू भैया, सुदर्शन आणि मोहन भागवत यांचे हुबेहूब दर्शन यावेळी ज्येष्ठ रंगकर्मींनी सादर केले.

निखिल देडे आणि त्यांच्या सहकलाकारांनी ‘शिवपिंगळा’ हा हा लोप पावत चाललेला प्रकार सादर केला . ब्रम्हमुहूर्तावर दारोदारी येऊन जनजागृती करणारा पिंगळा हा लोकलेतील प्रकार असून पहाटे याच समयी पिंगळा हा पक्षी सुध्दा उठून साद घालतो आणि याच वेळी लोककलावंत पहाटे हातात कंदील आणि टाळ घेऊन भक्तीगीते,लोकगीते गायची म्हणून यास ‘पिंगळा ‘म्हणतात असे सांगून देठे यांनी पोवाडा,गोंधळ आदी प्रकार सादर केले.छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ते शिवराज्याभिषेक हा संपूर्ण प्रसंग देखील निखिल देडे आणि सहकाऱ्यांनी रसिकांसमोर आणला .शिवपिंगळा म्हणजे काय आणि ही लोप पावत चाललेली संस्कृती जतन करण्यासाठी हे कलाकार घेत असलेली मेहनत या माध्यमातून दिसून आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश तालखेडकर यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार प्रांतमंत्री प्रमोद वझे मानले.हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत सौन्दतिकर, संतोष पारगावकर, डॉ.रवि शिवणीकर, अशोक कुलकर्णी, अनंत सुतनासे, अनिल कुलकर्णी, सुरेश साळुंके गुरु कुलकर्णी, रुक्मिणीकांत पांडव, लक्ष्मीकांत रुईकर, महेश देशमुख, लक्ष्मीकांत खडकीकर, सुजित देशमुख, गणेश स्वामी, श्रीपाद देशमुख सुरभी खोपटीकर, स्नेहा पारगावकर, प्रज्ञा वझे, आशा भारती, सोनल पाटील यांनी परिश्रम घेतले.

आ.संदीप क्षीरसागर अवकाळीने झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी थेट बांधावर

0

शेतकऱ्यांना आधार देत भरपाई मिळवून देण्याचे दिले आश्वासन

बीड — जिल्ह्यात अनेक ठिकाणी मागील दोन दिवसांपासून गारांसह अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे काढणीला आलेल्या गहू, ज्वारी सह इतर पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आ. संदीप क्षीरसागर यांनी शुक्रवारी (दि.२०) रोजी प्रशासनाला घेऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि प्रशासनाला पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वस्त केले.
                   वेधशाळेने मागील काही दिवसांपूर्वीच अवकाळी पाऊस व गारपीटीचा अंदाज वर्तवला होता. त्या अंदाजानुसार मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे.  यानंतर गुरुवारी (दि. १९) दुपारी बीड तालुक्यातील लिंबागणेश, पिंपळनेर परिसरासह बीड मतदारसंघातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस झाला.  या पाऊस आणि गारपीटीने हाताशी आलेले गहू, ज्वारी, हरभरा यासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अंबा, टरबूज, खरबूज, चिकू आदी फळबांगाचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने लिंबागणेश (ता. बीड) येथील शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांचा टरबूजाचा पूर्ण प्लॉटचे नुकसान झाले आहे. गारपीटीने मार लागून काही फळे फुटली तर अनेक फळे मार लागून खराब झाली आहेत. असेच नुकसान अनेक ठिकाणी टरबूज आणि खरबूज लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती मिळताच आ. संदीप क्षीरसागर यांनी आज शुक्रवारी (दि.२०) सकाळीच धाव घेत चक्क बांधावर जाऊन आ. संदीप क्षीरसागर यांनी लिंबागणेश, पोखरी, पिंपरनई येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला तसेच या नुकसानीचे पंचनामे करुन घेऊन शासनाकडून भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.  यावेळी राजेंद्र मस्के, तहसीलदार चंद्रकांत शेळके व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

कर्जनीत तलावासाठी गावाचं पुनर्वसन; 50 वर्षानंतर वनविभाग घर पाडणार ? ग्रामस्थ आक्रमक

0
बीड — शासनाने तलाव बांधकामासाठी जागा संपादित केल्या  गावकऱ्यांचे स्थलांतर करण्यात आले. कर्जनी गावाच्या पुनर्वसनासाठी त्यावेळी ग्रामस्थांना गायरान जमिनीवर घरे बांधण्यास सांगण्यात आले होते. या घटनेला अर्ध शतकाचा काळ उलटून गेल्यानंतर वन विभागाला आता जाग आली आहे. घर बांधलेली जमीन वनविभागाची असून घर इतरत्र हलवा अन्यथा कारवाई करण्यात येईल असं ग्रामस्थांना सांगितलं जात आहे. ग्रामस्थ ही आता आक्रमक झाले असून तलाव फोडून पूर्वीच्या जागी आम्ही घर बांधणार असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
तलावाला गावकऱ्यांची जागा संपादित केल्यानंतर शासनाने पुनर्वसनासाठी नवी जागा उपलब्ध करून दिली. गावकऱ्यांनी आपली जुनी घरे सोडून डोंगराचा भाग समतल करून स्वतःच्या मेहनतीने घरे उभारली. या प्रक्रियेला सुमारे ५० ते ५५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी येऊन ग्रामस्थांना घरे पाडण्याच्या सूचना देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. “ही जमीन वन विभागाची असून येथे केलेले बांधकाम काढून टाका, अन्यथा कारवाई केली जाईल,” असा इशारा अधिकाऱ्यांकडून दिला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना व गुजर समाज आक्रमक झाला असून, घरांवर कारवाई केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. “जर आमची घरे पाडण्याची वेळ आली, तर आम्ही तलावाचा सांडवा फोडल्याशिवाय राहणार नाही,” असा गंभीर इशारा शिवसेना जिल्हा संघटक तथा गुजर समाज जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
यावेळी गुजर समाज जिल्हा उपाध्यक्ष अशोक घुशीर, जिल्हा संघटक अरुण नाना खटाने, जिल्हा उपाध्यक्ष सुनील बहिरवाळ, जिल्हा कोषाध्यक्ष गजानन बहिरवाळ, जिल्हा सचिव राजाभाऊ गुजर, तालुका अध्यक्ष शहादेव डोंगर तसेच समाज बांधव व शिवसैनिक उपस्थित होते.
प्रशासनाने तातडीने लक्ष घालून ग्रामस्थांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली मान्सूनवर मोठं संकट,स्कायमेटचा अंदाज

0

मुंबई — महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या काळजीत भर घालणारी बाब समोर आली आहे ‘ला निना’चा प्रभाव ओसरू लागला असून आता पुन्हा एकदा ‘एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ च्या ताज्या अंदाजानुसार, २०२६ मध्ये एल निनो पुन्हा डोकं वर काढणार असून, याचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात पाण्याची पातळी तापू लागली असून एल निनोची लक्षणे दिसू लागली आहेत. तज्ज्ञांच्या मते

सक्रियता — २०२६ च्या उत्तरार्धात हा प्रभाव अधिक तीव्र होईल.

कालावधी — जून ते सप्टेंबर दरम्यान, जेव्हा भारताला पावसाची सर्वाधिक गरज असते, तेव्हाच एल निनो शिखरावर असेल.

परिणाम —  यामुळे केवळ भारतच नाही, तर ऑस्ट्रेलिया आणि आग्नेय आशियातही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.भारतातील शेती प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून आहे. स्कायमेटच्या मते, एल निनो सक्रिय झाल्यामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते. यापूर्वी २०१४ आणि २०१८ मध्येही एल निनोमुळे पावसाने ओढ दिली होती, ज्याचा मोठा फटका खरिपाच्या पिकांना बसला होता.सध्या ‘ला निना’मुळे हवामान काहीसे अनुकूल असले तरी, वसंत ऋतूच्या सुरुवातीला हे चित्र बदलणार आहे. उन्हाळ्यात हवामान ‘तटस्थ’ स्थितीत जाईल आणि त्यानंतर होणाऱ्या ‘पॅसिफिक फ्लिप’ मुळे एल निनोची एन्ट्री होईल. हा बदल जागतिक हवामान पद्धतीत मोठी उलथापालथ घडवून आणू शकतो.२०२३-२४ मध्ये एल निनोचा प्रभाव ११ महिने टिकला होता, ज्यामुळे ते वर्ष विक्रमी उष्ण ठरले. त्याचा थेट परिणाम तांदूळ, डाळी आणि साखरेच्या उत्पादनावर झाला होता. जर २०२६ मध्येही हीच परिस्थिती राहिली, तर शेती उत्पादनात घट होऊन पुन्हा एकदा अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बीडच्या बोगस मयत बांधकाम कामगारांच्या चौकशीचे आदेश

0

प्रधान सचिव (कामगार )यांना  कठोर कारवाई करण्याचे सक्त आदेश

बीड —  जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालय व तालुका कामगार अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून शेकडो मयत व्यक्तींना जिवंत दाखवून कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. बीड जिल्ह्यात होत असलेल्या  बोगस मयत बांधकाम कामगार घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी निवेदनाद्वारे शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत शिंदे यांनी तातडीने चौकशीचे आदेश प्रधान सचिव कामगार यांना दिले आहेत.
मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आधीच मृत झालेल्या शेकडो व्यक्तींना कामगार म्हणून नोंदवण्यात आले. त्यांना ९० दिवस काम केल्याचे खोटे प्रमाणपत्र देण्यात आले. काही प्रकरणांमध्ये शेकडो मृत व्यक्तींना पुन्हा जिवंत दाखवून त्यानंतर दुसऱ्यांदा मृत घोषित करत नगर पालिकेकडून खोटी मृत्यू प्रमाणपत्रे तयार करण्यात आली.  शासनाच्या कल्याणकारी योजनांतील निधी बोगस कामगारांच्या नावावर काढून मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आ‌ सुरेश धस यांनी विधानसभेत देखील प्रश्न उपस्थित करत बोगस बांधकाम कामगारांच्या नोंदी कशा बोगस आहेत. खरे लाभार्थी कसे वंचित आहेत याचा भांडाफोड करून घोटाळा उघडकीस आणला होता. बांधकाम कामगार म्हणून नोंद झालेल्या अनेकांनी बुर्ज खलिफा, व्हाईट हाऊस या ठिकाणी काम केल्याचे कागदपत्र देखील जोडल्याचं त्यांनी सांगितलं होतं.याप्रकरणी कामगार मंत्र्यांनी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा आश्वासन सभागृहात दिलं होतं.
या  प्रकरणी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी, तालुका सरकारी अधिकारी तसेच बोगस मयतांच्या वारसांवर गुन्हे दाखल करावेत व शासनाचा अपहार केलेल्या पैशाची सबंधितांकडून सक्तीची वसुली करण्यात यावी अशी मागणी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी निवेदनाद्वारे राज्याचे संवेदनशिल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.  या गंभीर बाबीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिव स्तरावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

5 लाखासाठी पत्नीचा छळ करून दागिने लुटले; गर्भपात करुन तलाक दिला

0

आष्टी — माहेरहून पाच लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ करून तिचा गर्भपात केला. दागिने लुटून तलाख देत घराबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार कडा येथे घडला आहे. याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठ वर्षांपूर्वी तब्बोसूम गुलामरसूल शेख (वय २६) यांचा विवाह गेवराई येथील गुलामरसूल इब्राहीम शेख याच्याशी मुस्लीम रीती रिवाजा प्रमाणे झाला होता.लग्नात ऐपतीप्रमाणे दागिने आणि संसारोपयोगी वस्तू माहेरच्या मंडळींनी दिल्या. लग्नानंतर सहा महिने चांगले वागवले. त्यानंतर मात्र सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली. “तू वांझोटी आहेस, पांढऱ्या पायाची आहेस,” असे टोमणे मारत तिला उपाशीपोटी ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. पीडितेने तक्रारीत सांगितलेला प्रकार अंगावर शहारे आणणारा आहे. तिला यापूर्वी गर्भ राहिला असता पतीने जबरदस्तीने गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केला. आता पुन्हा दीड महिन्यांची गर्भवती असताना, पतीने तिला “तुला मूलबाळ होऊ देणार नाही, तुला फक्त कामासाठी आणले आहे,” असे म्हणत पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “गाडी घेण्यासाठी तुझ्या बापाकडून ५ लाख रुपये घेऊन ये,” असा तगादा सासरच्यांनी लावला होता.१५ मार्च रोजी पीडितेच्या आईने सासरी येऊन याबाबत विचारणा केली की, “मुलगी गरोदर आहे, तिला दवाखान्यात का नेत नाही?” याचा राग येऊन पती गुलामरसूल, सासू अहेमदबी आणि नणंद आयेशा यांनी पीडितेचे हात दाबून धरले, तर पतीने तिचा गळा दाबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सासरे आणि नंदावा यांनी घराचा दरवाजा लावून घेत माय-लेकीला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याबरोबरच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत पतीने पीडितेला बेकायदेशीर रीत्या तलाक दिला. तसेच घराच्या बाहेर हाकलून दिले. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुलामरसूल इब्राहीम शेख (पती), अहेमदबी इब्राहीम शेख (सासू), इब्राहीम मोहम्मद शेख (सासरा), आशिया मौजम सय्यद (नणंद), मौजम सय्यद (नंदावा) यांच्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत

शेतात गांजाची लागवड; साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

0

बीड — शेतात वैयक्तिक फायद्यासाठी गांजाची लागवड केल्याची माहिती वडवणी पोलीस ठाण्याच्या सपोनि वर्षा व्हगाडे यांना मिळाल्यावरून मारलेल्या छाप्यात साडेपाच लाखाच्या गांजाची झाड जप्त करण्यात आली.

वडवणी पोलीस ठाणे हद्दीतील लोणावळ शिवारात गांजाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती वडवणी पोलीस ठाण्याच्या सपोनी वर्षा व्हगाडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे लोणावळा शिवारातील गट नंबर 15 मधील आशाबाई औदुंबर शिनगारे यांच्या शेतात पोलिसांनी छापा मारला. यावेळी शेतामध्ये गांजा पिकाची लागवड करण्यात आल्याच निदर्शनास आलं. पोलिसांनी या छाप्यादरम्यान 21 किलो 960 ग्रॅम गांजाची झाड जप्त केली. याची बाजारी किंमत पाच लाख 49 हजार इतकी आहे. याप्रकरणी महिला शेतकऱ्यास पोलिसांनी अटक केली असून कलम 8 सी,20(बी)(2)(सी) एन डी पी एस अॅक्ट 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, ऋषिकेश शिंदे उप विभाग माजलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वर्षा व्हेगाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम गायकवाड, अशोक क्षीरसागर, विलास खरात, बिभीषण गुंजाळ, आशुतोष नाईकवाडे, हनुमंत कप्पे विश्वजीत मुंडे, सय्यद अमीर, वसंत करे, रामनाथ शिनगारे यांच्या पथकाने केली.

एसटी महामंडळाच्या एनसीएमसी कार्ड प्रकल्पाला ब्रेक; 60 पैकी 57 एजंट्सचे आयडी प्रलंबित

0

लाखोंची गुंतवणूक अडकली, सवलतीपासून नागरिकही वंचित

बीड — महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) आणि एबीक्स कॅश प्रा.लि. यांच्यातील करारानुसार महामंडळाच्या बसमधून सवलतीत प्रवास करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या नॅशनल कॉमन मोबिलिटी (एनसीएमसी) कार्ड वितरण प्रकल्पाला बीड जिल्ह्यात अक्षरशः ब्रेक लागल्याचे चित्र समोर आले आहे.
जिल्ह्यातील एजंट्सनी मोठ्या अपेक्षेने व आर्थिक गुंतवणुकीसह या योजनेत सहभाग घेतला असतानाही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प रखडल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात एकूण 60 एजंट्सनी  कार्ड सुविधेसाठी नोंदणी केली आहे. या सर्व एजंट्सनी आवश्‍यक असलेले मशीन व आयडी शुल्क ‘एचजेआर प्रा. लि.` मार्फत संबंधित विभागाकडे नियमानुसार सुमारे 30 हजार जमा केले आहेत. जे ना परतावा आहेत. अनेक एजंट्सनी या प्रक्रियेसाठी कर्ज काढून किंवा वैयक्तिक बचत वापरून गुंतवणूक केली असल्याचेही समजते. मात्र, रक्कम भरून बराच कालावधी उलटूनही केवळ 7 एजंट्सचे आयडी कार्यान्वित झाले असून, उर्वरित तब्बल 57 आयडी अजूनही पेंडींग अवस्थेत आहेत. त्यामुळे एजंट्समध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विलंबामुळे एजंट्सना अपेक्षित व्यवसाय सुरू करता आलेला नाही. मशीन निष्क्रिय अवस्थेत पडून असून गुंतवलेली रक्कम अडकली आहे. परिणामी अनेक एजंट्स आर्थिक अडचणीत सापडले असून, काहींवर कर्जाचा ताणही वाढत आहे. यासोबतच, प्रवाशांनाही या प्रकल्पाचा फटका बसत आहे. एनएमसी कार्डच्या माध्यमातून कॅशलेस आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार होती, मात्र प्रकल्पच रखडल्यामुळे प्रवाशांना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. एजंट्सच्या मते, एबीक्स कॅश प्रा.लि.तसेच संबंधित तांत्रिक विभागाकडून कामाला अपेक्षित गती मिळत नाही. वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, संतप्त एजंट्सनी एस.टी. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदन सादर करून या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. उर्वरित 57 एजंट्सचे आयडी व मशीन लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देत प्रलंबित कामे पूर्ण केली नाहीत, तर एजंट्सकडून आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे. त्यामुळे आता एस.टी. महामंडळ आणि संबंधित कंपनी या प्रश्‍नावर कितपत गांभीर्याने पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उशिरा नोंदणी करून जास्तीचे पैसे देवून आयडी घेतले
काही एजंटानी नंतरच्या काळात नोंदणी केली आणि जास्तीचे पैसे दिल्याने अशा एजंटांना तात्काळ आयडी सुरू करून देण्यात आले आहेत, असे सांगितले जात आहे. आयडी मिळविण्यासाठी नियमानुसार 30 हजार फी आकारण्यात आलेली आहे मात्र काह एजंटांनी 40 ते 45 हजार रूपये देत आयडी मिळविले आहेत. याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.