Home Blog Page 33

200 वर्षांनंतर दंडकर्म पारायण पूर्ण करणारा 19 वर्षांचा अहिल्यानगरचा देवव्रत महेश रेखे कोण? ही परीक्षा कठीण का मानली जाते?

0

अहिल्यानगर — काशीच्या पवित्र मातीत गेल्या दोन महिन्यांपासून एक ऐतिहासिक आध्यात्मिक साधना सुरू होती. शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिनी शाखेतील सुमारे 2000 मंत्रांचे अत्यंत कठीण ‘दंडक्रम पारायण’ 19 वर्षांच्या वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे याने पूर्ण केले आहे.जवळपास 200 वर्षांनंतर दंडक्रम पारायण पुन्हा भारतात पार पडले असून या यशामुळे तरुण देवव्रत देशभरात चर्चेत आला आहे.
पारायण पूर्ण होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवव्रतचे अभिनंदन करत म्हटले “देवव्रत रेखेंनी केलेली ही साधना पुढील पिढ्या लक्षात ठेवतील. 2000 मंत्रांचा दंडक्रम इतक्या अचूकतेने 50 दिवसांत संपवणे हा असाधारण पराक्रम आहे.” काशीमध्ये हा अनोखा उपक्रम झाला याचा विशेष उल्लेख पीएम मोदींनी केला आहे.

देवव्रत रेखे कोण आहे?

मूळ गाव : अहिल्यानगर

वडील : वेदब्रह्मश्री महेश चंद्रकांत रेखे

वैदिक शिक्षण : सांगवेद विद्यालय, वाराणसी

रोजची साधना : 4 तास दंडक्रमाचा अभ्यास

मित्र आणि गुरूजनांच्या मते देवव्रतची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि शिस्त विलक्षण आहे.

दंडक्रम पारायण म्हणजे काय?

दंडक्रम हा वैदिक पाठाचा सर्वात अवघड प्रकार मानला जातो.

मंत्र उलट-सुलट दोन्ही प्रकारे म्हणावे लागतात

स्वर, लय, उच्चार यांची अत्यंत बारकाईने जुळवाजुळव करावी लागते

पूर्ण पारायणात एक कोटीपेक्षा जास्त शब्दांचा उच्चार करावा लागतो

यासाठी स्मरणशक्ती, शारीरिक-मानसिक नियंत्रण आवश्यक आहे

विद्वानांच्या मते, वेदपठणाच्या एकूण 8 पद्धतींपैकी हा सर्वात कठीण प्रकार आहे.

इतिहासात फक्त दोन वेळा हा पराक्रम झाला आहे

पहिल्यांदा – 200 वर्षांपूर्वी नाशिकमध्ये, वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी

दुसऱ्यांदा – आता काशीमध्ये, देवव्रत रेखे यांनी (2 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025)

त्यांना ₹1,01,116 देऊन सन्मानित करण्यात आले.

दंडक्रमला ‘कठीण परीक्षा’ का म्हणतात?

दीर्घ साधना आवश्यक

मंत्र पाठात एकही चुक चालत नाही

उलट-सरळ पाठांतर

श्वसन, स्वर आणि स्मरणशक्तीचा ताळमेळ

रोजच्या साधनेत शिस्त

यामुळेच दंडक्रमाला वैदिक परंपरेचा ‘मुकुटमणी’ असेही संबोधले जाते.

माजी आमदार अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट;पंडितांचे पीए अमृत डावकरांच्या आरोपाने खळबळ

0

बीड — राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट होता. आपण उभे असताना अचानक येत टोळक्याने आपल्याला गंभीर मारहाण केली. आपलाही खून झाला असता मात्र चालक मध्ये आल्याने आपण बचावलो असल्याचा आरोप अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांनी केल्याने खळबळ माजली आहे.

गेवराईत नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान मंगळवारी पवार व पंडित गटांत वाद अचानक उफाळला.यानंतर एका टोळक्याने पंडितांच्या कृष्णाई बंगल्यावर चालून येत या ठिकाणी असलेल्या अमृत डावकर यांना बेल्ट, लाथा आणि दांडक्याने मारहाण केली. यामध्ये डावकर यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली असून त्यांच्या हातावर आणि पाठीवर मारहाणीच्या जखमांचे व्रण आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सध्या उपचार सुरु आहेत.आपल्याला मारहाण करणारे माजी आमदारांचे भाऊ इतर पाच सहा जणांसह पोचले. आलेले सर्वजण अमरसिंह पंडित यांच्या खुनाचा कट रचूनच आले होते. माजी आमदारांचे बंधू खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबतचे लोकही गुंड प्रवृत्तीचे होते.त्यांनी आपले वाहन बाहेर उभा असलेल्या वाहनावर आदळले. हा आवाज ऐकून मी कार्यालया बाहेर आल्यानंतर अमरसिंह पंडित यांना संपवून टाकायचं असे घोळक्यातील लोक म्हणत होते. अमरसिंह पंडित येथे नाहीत नेमकं काय घडलं असं शांततेत त्यांना विचारलं मात्र अमरसिंह पंडित इथे नाहीत म्हणून मला संपवून टाकू, असेही हल्लेखोर म्हणत होते असा आरोप अमृत डावकर यांनी केला.
तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुखाच्या खुन प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला व्यक्ती आणि शिक्षा भोगलेला व्यक्ती कारागृहाच्या बाहेर आला तरी त्याचे वर्तन कसे असेल? असे डावकर म्हणाले. आपल्याला बचाव करण्याची संधीही दिली नाही. आपलाही खून झाला असता मात्र, मला मारहाण होत असताना चालक मध्ये आल्याने आपण सुदैवाने बचावलो असल्याचं अमृत डावकर यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितलं. या आरोपानंतर बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

खगोल प्रेमींसाठी खास पर्वणी; चार डिसेंबरला दिसणार “सुपरमून”

0

मुंबई — आकाशात एक दुर्मिळ आणि मोहक खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच दत्तजयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी म्हणजेच गुरुवार, ४ डिसेंबर रोजी ‘सुपरमून’ दिसणार आहे. इतकेच नाही तर चंद्र नेहमीपेक्षा जास्त मोठा, तेजस्वी रूपात आकाशात चमकणार आहे.पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी याबाबत माहिती दिली.

चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. मात्र या मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्राची पृथ्वीपासूनची जवळीक कमी होऊन ते अंतर केवळ ३ लाख ५६ हजार ९६२ किलोमीटर राहणार आहे. चंद्र पृथ्वीच्या एवढा जवळ आल्यानं तो आकाशात नेहमीपेक्षा तब्बल १४ टक्के मोठा दिसणार आहे. एवढंच नाही तर या जवळकीचा परिणाम त्याच्या चमकदारपणावरही होणार असून चंद्राचा प्रकाश जवळपास ३० टक्क्यांनी वाढून तो जास्त तेजस्वी आणि मनमोहक दिसण्याची शक्यता आहे.या विलक्षण दृश्याचा आनंद संपूर्ण भारतभरातील नागरिकांना घेता येणार आहे. चंद्र सायंकाळी ५.१८ वाजता पूर्व दिशेला उगवेल आणि त्यानंतर रात्रभर आकाशात त्याचे दिमाखदार रूप पाहायला मिळणार आहे. पुढच्या दिवशी सकाळी ७.१४ वाजता पश्चिमेकडे मावळेपर्यंत त्याचे दर्शन घेता येईल. जवळपास १४ तासांहून अधिक काळ आकाशात हा चमकदार पूर्ण चंद्र झळाळत राहणार आहे.

असा तेजस्वी आणि मोठा चंद्र दिसण्याचा हा योग दुर्मिळ असतो. पुढील सुपरमून भारतातून २४ डिसेंबर २०२६ रोजी पाहायला मिळेल, असेही सोमण यांनी सांगितले. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी आणि आकाशनिरिक्षणाची आवड असणाऱ्यांसाठी उद्याची रात्र अतिशय खास पर्वणी ठरणार आहे.

कर्म दरिद्री सरकारचा कारनामा; अतिवृष्टी मदतीसाठी प्रस्तावच केंद्राला पाठवला नाही — कृषिमंत्री

0

नवी दिल्ली — मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन, मका, द्राक्ष, कांदा, ऊस यासारख्या शेतपिकांचं मोठं नुकसान झालं होतं. तसेच अनेक गावं पाण्याखाली गेली होती.केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी संसदेत लेखी उत्तर देत यासंदर्भात माहिती दिली आहे.
अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला नाही, असं त्यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. याशिवाय केंद्र सरकारला अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची माहिती देण्यातही राज्य सरकारची गंभीर चूक झाल्याचं दिसून येत आहे.

शिवराजसिंग चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने केंद्राला केवळ एक लाख 10 हजार 309 हेक्टर शेती नष्ट झाल्याचे सांगितलं आहे. मात्र, राज्याच्या कृषीमंत्र्यांनी सांगितलेला आकडा 14 लाख हेक्टर आहे. म्हणजे राज्यात 14 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं असताना राज्य सरकारने केवळ 10 हजार 309 हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती दिल्याचं स्पष्ट होतं आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. लोकसभेत जी प्रश्न उत्तरं येतात ती 35 दिवस आधी आलेली असताना. मदतीसाठीचा आपला जो अहवाल आहे, तो केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे. त्यांची टीमदेखील राज्यात येऊन गेली आहे. हा अहवाल आता अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय पायायभूत सुविधांचं जे नुकसान झालं आहे. त्याची जी मदत केंद्र सरकारकडून घ्यायची आहे. त्यासाठी केंद्राची टीम अद्याप आलेली नाही. पुढच्या आठवड्यात ती येण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचाही अहवाल पाठवला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी संसदेत लेखी उत्तर देत यासंदर्भात माहिती दिली आहे. अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला नाही, असं त्यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. याशिवाय केंद्र सरकारला अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची माहिती देण्यातही राज्य सरकारची गंभीर चूक झाल्याचं दिसून येत आहे.

प्लॉटच्या वादातून सख्ख्या भावाला संपवलं

0

बीड — वडिलांच्या नावे असलेला प्लॉट मला दे, असे म्हणत मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या लहान भावाच्या डोक्यात काठी मारली. हा प्रकार शनिवारी रात्री १०  सुमारास शहरातील इमामपूर रोडला घडला. सकाळी उठल्यावर जखमीला रक्ताच्या उलट्या झाल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मोठ्या भावाला विचारल्यावर आपण काही केलेच नाही, असा आव त्याने आणला. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत पेठ बीड पोलिस ठाण्यात नोंद नव्हती, परंतु मोठ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

सविस्तर माहिती अशी कि, सचिन शहाजी फरताडे (वय ३५) असे मयताचे नाव आहे. तर शशिकांत फरताडे (वय ४४) असे आरोपीचे नाव आहे. शहाजी फरताडे यांना चार मुले आहेत. ते आचारी असून बीड शहरातील इमामपूर रोडला वास्तव्यास आहेत. शशिकांत हा दुसरा, तर सचिन सर्वात लहान मुलगा होता. तो अविवाहित होता. शनिवारी रात्री १० च्या सुमारास शशिकांत हा गांजा व दारूची नशा करून घरी आला. कोणालाही काही न बोलता त्याने आई दत्ताबाई यांचा गळा धरत हातावर काठी मारली. मोठा भाऊ अशोक सोडविण्यासाठी गेल्यावर त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. वडील शहाजी मदतीला धावले, तर त्यांच्याही मनगटावर काठीने मारहाण केली. एवढ्यात सचिन तेथे आला. शशिकांतने नशेत त्याच्यावरही हल्ला चढवला. एक काठी त्याच्या डोक्यात बसली. यात तो जखमी झाला होता. रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पेठबीड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदन करून तो नातेवाइकांच्या ताब्यात दिला. उशिरापर्यंत ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेमंत क्षीरसागर यांचा संदीप क्षीरसागर यांना पाठिंबा

0

बीड — आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांनी मोठा निर्णय घेतल्यानं नगरपालिका निवडणुकीत नवे राजकीय समीकरण तयार झालं आहे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज हेमंत क्षीरसागर यांनी त्यांचे भाऊ संदीप क्षीरसागर यांना पाठिंबा दिला आहे.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुतणे योगेश क्षीरसागर यांना नगरपालिका निवडणुकीत पाठिंबा दिल्यानंतर निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागरांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका एबीपी माझाशी बोलताना जाहीर केली.

मागील बीड नगरपालिका निवडणुकीत हेमंत क्षीरसागर यांनी महत्त्वाची भूमिका बजावून उपनगराध्यक्ष पद मिळवले होते. मात्र, काका जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेनंतर शेवटच्या दिवशी त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांनी निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभे केलेल्या उमेदवार स्मिता वाघमारे यांना पाठिंबा देऊन नवे राजकीय समीकरण निर्माण केले आहे.

हेमंत क्षीरसागर काय म्हणाले?

आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यावर्षी बीडची नगरपालिका निवडणूक पाहिली तर सर्वसमावेशक चेहरा हा स्मिता वाघमारे म्हणून बीड शहरात समोर येत आहे. स्मिता वाघमारे यांचे आणि आमचे अनेक वर्षांपासूनचे कौटुंबिक संबंध आहेत. विष्णू वाघमारे आणि माझे गेल्या 15 वर्षांपासून वैयक्तिक संबंध आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे. सर्व मित्र परिवार, प्रत्येक मित्र परिवारातील सहकारी आपण काय करायचं असं म्हणत होते. विष्णू वाघमारे 25 वर्षांपासून बीड शहरात काम करत आहेत. सर्व सामान्यांच्या मुलभूत गरजांसाठी ते कामी येऊ शकतात, त्यामुळं त्यांना मदत करायचं ठरवलं आहे. आम्ही आता स्मिता वाघमारे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीत अनेक पक्ष, अनेक उमेदवार रिंगणात आहेत, अशावेळी मतदार काम करणारे चेहरा पाहून मतदान करतील, असं हेमंत क्षीरसागर म्हणाले.

गेवराई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी घड्याळाला मतदान करा – अमरसिंह पंडित

0

गेवराई — गेवराई नगर परिषदेची निवडणुक आपण विकासाच्या मुद्यावर लढवत आहोत. नगर पालिकेची सत्ता आम्हाला स्वतःचा विकास नाही तर शहराचा कायापालट करण्यासाठी पाहिजे आहे. विकास कामांचा आराखडा आमच्याकडे तयार आहे, 35 कोटी रुपयांची विकास कामे मंजुरही झाली आहेत, त्यापैकी दहा कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण देखील झालेली आहेत. उर्वरित विकास कामे गतीने करण्यासाठी आणि गेवराई शहराची नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केले. गेवराई शहरात विविध ठिकाणी कॉर्नर बैठका, प्रचार रॅली, मतदारांच्या गाठीभेटी आणि संवाद साधताना ते बोलत होते.

गेवराई नगर परिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित यांनी गेवराई शहर पिंजून काढले. यावेळी अमरसिंह पंडित यांनी विविध प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन विकास कामांच्या मुद्यावर घड्याळ चिन्हाची निवड करून गेवराई नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्याचे आवाहन कले. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विकासाचा मुद्या सोडून विरोधक मतदारांची दिशाभूल करत आहेत, मतदारांनी मात्र धमक्या, अफवा आणि भुलथापांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले.

गेवराई नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितलताई महेश दाभाडे यांच्यासह प्रभाग 1 मधील सौ. गंगासागर विठ्ठल पवार व भास्कर भिकाजी काकडे, प्रभाग 2 चे विश्वजित प्रल्हाद शिंदे व सौ. संध्या राधेशाम येवले, प्रभाग 3 चे विलास दौलत गुंजाळ व श्रीमती नजमा बेगम निजाम शेख, प्रभाग 4 चे सौ. संगीता दादासाहेब घोडके व शाहरूख खाँ पठाण, प्रभाग 5 चे अशोक छगनराव गायकवाड व सौ.अंजुश्री महेश मोटे, प्रभाग 6 चे सौ. वैशाली किशोर कांडेकर व श्रीमती जाकेरा बेगम इस्माईल शरीफ, प्रभाग 7 चे सौ. पुजा रजनीकांत सुतार व मनोज प्रभाकर धापसे, प्रभाग 8 चे सौ. अंजु संतोष सुतार व विनोद उर्फ तुळशीराम निकम, प्रभाग 9 चे सौ.मंगल आत्माराम हजारे व श्रीकृष्ण विश्वनाथ मुळे, प्रभाग 10 चे सौ. रेणुका शिवलिंग संभाहारे व शेख खाजा कटूमियाँ या सर्व उमेदवारांच्या नावासमोरचे घड्याळाचे चिन्ह दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन माजी आ. अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

शेत तलावात बुडून सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

0

आष्टी — खेळत खेळत शेत तलावाजवळ गेलेल्या सख्ख्या बहीण-भावाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना  टाकळसिंग येथे शनिवारी सकाळी सव्वाआठ वाजता घडली. श्रावण रोहिदास चव्हाण (वय ८) व श्रावणी रोहिदास चव्हाण (वय १०) (मूळ रा.कुसवडगाव, ता. जामखेड, जि. नगर) अशी मयत भावंडांची नावे आहेत.

जामखेड तालुक्यातील कुसवडगाव येथील मजूर रोहिदास चव्हाण (वय ३५) हे सध्या मजुरी करण्यासाठी आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथे कुटुंबासह आलेले असून, याच ठिकाणी राहात आहेत. त्यांचा मुलगा श्रावण रोहिदास चव्हाण व मुलगी श्रावणी रोहिदास चव्हाण हे दोघे बहीण-भाऊ २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:१५ वाजता खेळत खेळत शेतकरी शिवाजी दौंडे यांच्या शेतात गेले. यावेळी शेत तलावात पाय घसरून पडल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हिंगे हे करत आहेत.

मतदानाला काही तास शिल्लक असताना पोलिसांना सापडलं पैशाचं मोठ घबाड

0

हिंगोली — राज्यात नगरपालिका निवडणुकीचे वातावरण असताना हिंगोलीतून मोठी बातमी समोर आली. राज्यात प्रचाराचा जोरदार धडाका सुरू असून उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त हिंगोली पोलिसांनी जप्त केली आहे.

हिंगोली शहरातील मंगळवारा भागातील शेतकरी भवन परिसरातून ही रोकड एका चारचाकी गाडीत सापडल्याचं समोर आलंय. पैशांची इतकी मोठी बॅग कारमधून सापडताच परिसरात चांगलाच खळबळ उडाला. ही रक्कम कोणाची? कुठून आली? आणि कुठे जाणार होती? याबद्दल अजूनही काहीही स्पष्ट झालेलं नाही.

पोलिसांनी रोकड आढळताच तात्काळ निवडणूक विभागाला कळवलं आणि त्यानंतर भरारी पथकानं ही रक्कम आपल्या ताब्यात घेतली. आता संपूर्ण पैशांसंबंधी कागदपत्रांची आणि व्यवहाराची कसून पडताळणी सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडावर एवढी मोठी रोकड सापडल्यामुळे चर्चांना उधाण आलं असून प्रशासनाची धावपळही वाढली आहे.

फाटलेली झाकायला मूख्यमंत्र्यांना याव लागतंय तर योगेश ब्रँड काय कामाचा?; दीपाताई क्षीरसागरांची अनुपस्थिती खटकली

0

दीपाताई क्षीरसागरांची अनुपस्थिती खटकली

बीड — जनता दूध खुळी म्हणून नगरपालिका आपलीच जहागिरी असं समजून योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला हेकडी दाखवत स्व. काकूंचे विचार मातीत घालताना धर्मांध पक्षाचं बोट धरलं.शेवटी प्रचारात सोबत केलेल्या जयदत्त क्षीरसागरांनी आजच्या सभेला गैरहजर राहत मास्टर स्ट्रोक मारत डाव खेळला.जनतेला योग्य तो संदेश दिला. दीपाताई क्षीरसागरांची अनुपस्थिती अनेकांना खटकून गेली. आमच्या बातमीने सुरू झालेल्या चर्चेवर शिक्का मोर्तब झालं.जनतेत मिसळून काम केलं असतं तर मुख्यमंत्र्यांना बोलवायची वेळ आली नसती.प्रचारात फाटलेली झाकायसाठी मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागलं नसतं असा सूर जनतेतून उमटू लागला आहे.
नगरपालिकेची 35 वर्ष हातात राहिलेली सत्ता त्यामुळे जहागिरी समजणं साहजिक गोष्ट पण गृहीतच धरून चालायचं अन हेका कायम ठेवायचा हे जनतेला पटणार नसतं. राज्य राजे महाराजांचा नसून लोकशाहीचा आहे इथे जनताच माय बाप आहे याचा विचार करून जनतेत फिरावं लागतं. याचा विसर पडलेले योगेश क्षीरसागर यांनी विधानसभेत साम दाम दंड भेदाचा वापर केला तरी जनतेने पदरात अपयश टाकलं. यातूनही शिकण्यासारखं खूप होतं पण पालथ्या घड्यावर पाणी पडलं. शेतकरी बीडची जनता अतिवृष्टीत संकटात सापडली होती त्यावेळी त्यांच्यात मिसळून काम करायला पाहिजे होतं जनतेला धीर द्यायला पाहिजे होता. योगेश क्षीरसागर त्यावेळेला आपल्याच तालात होते. संकट संपल्यानंतर मात्र अधिकाऱ्यांना घरी बोलावत आपण कसे आदेश देतो. हे माध्यमामधून दाखवत गेले. हे देखील जनतेला रुचलं नव्हतं.न.प. निवडणुक येताच बीडच्या राष्ट्रवादीचे उमेदवार मीच उभे करणार मीच इथला शहेनशहा असं म्हणत हेकडे दाखवली. राष्ट्रवादीच्या पक्ष श्रेष्ठींनी ही हेकडी चालू दिली नाही. शेवटी धर्मांध पक्षाचं बोट धरत घराण्याच्या विचारधारेला देखील लाथाडलं. दोन दिवस योगेश क्षीरसागर पक्षात आले म्हणून भाजप कार्यकर्ते उर फुटेपर्यंत नाचले. जसजसे अर्ज भरण्याचे दिवस जवळ येऊ लागले त्यावेळी आपला जन्म फक्त सतरंज्या उचलण्यासाठीच आहे हे वास्तव भाजप कार्यकर्ते समजून चुकले. भाजप कार्यकर्त्यांमधली नाराजी व धर्मनिरपेक्ष विचारधारेला मानणारे कार्यकर्ते या घटनेतून मानसिक दृष्ट्या दुरावले. याचा फटका निवडणुकीत बसल्याचं चित्र पाहायला मिळालं. वरवरच्या प्रचारातच “फील गुड” च वातावरण तयार झालं. काकांनी (जयदत्त क्षीरसागर) यांनी प्रचार यंत्रणेत बळ आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह वातावरण आहे असा भ्रम निर्माण व्हायला काहीशी मदत झाली. पण प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सभेतील गैरहजेरीने पाहिजे तो संदेश जनतेला दिला. शेवटी शरद पवारांच्या तालमीत वाढलेले ते कसलेले मुरब्बी राजकारणी आहेत. याचा प्रत्यय बीडच्या जनतेला आला नव्या चर्चेला पुन्हा उधाण आलं.
सामाजिक, नाट्य, शैक्षणिक चळवळीत मोठा चेहरा राहिलेल्या व बुद्धिवादी वर्गासह तळागाळातील जनतेसोबत दांडगा जनसंपर्क असलेल्या दीपाताई क्षीरसागर यांची प्रचारातली अनुपस्थिती अनेकांच्या हृदयाचा ठाव घेऊन योगेश क्षीरसागर यांचा साळसूदपणाचा पणाचा नकली चेहरा उघड करणारी ठरली. या संदर्भात “सह्याद्री माझा” ने जनतेचे डोळे उघडावेत यासाठी बातमीतून प्रकाश टाकला होता. याचा फटका देखील मोठ्या प्रमाणावर योगेश क्षीरसागर यांना बसणार असल्याचे चित्र पूर्वीपासूनच दिसलं. परिणामी मुख्यमंत्र्यांच्या सभेत तरी त्याच्या नावाचा वापर योगेश क्षीरसागर यांना करावा लागला. पण त्यांची ही मुख्यमंत्र्यांच्या सभेतली अनुपस्थिती जनतेला खूप काही सांगून गेली. इतकं सगळं फाटलेलं असताना विगरलेल्या कापडाला ठिगळ लावण्याचा असफल प्रयत्न योगेश क्षीरसागर यांनी केला. गेलेली इज्जत वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना मुख्यमंत्र्यांना सभेसाठी बोलवावं लागलं.
उद्या गल्लीतल्या नाल्या तुंबल्या, अस्वच्छता निर्माण झाली, पथदिवे बंद पडले, गल्लीत पाणी आले नाही तर जनतेने मुख्यमंत्र्यांच्या दारात जायचे काय? शेवटी त्यांना नगरसेवकालाच गाठावे लागणार आपली कैफियत मांडावी लागणार याचा सारासार विचार करणारी बीडची जनता असल्यामुळे योग्य तो निर्णय ते घेणारच आहेत. गृहीतकाच्या राजकारणाला व बीड न.प.ला जहागिरी समजणाऱ्या, धर्मनिरपेक्ष विचारधारा पायदळी तुडवणाऱ्या, धर्मांध पक्षाचा बोट धरणाऱ्या योगेश क्षीरसागरांना धडा शिकवायचाच असा उघड उघड जनता बोलून दाखवू लागली आहे.
मग राष्ट्रवादीला हेकडी दाखवण्या इतका, काकूंच्या विचाराला मूठ माती देण्या इतका योगेश क्षीरसागर मोठा ब्रँड आहे का? याचा विचार जनतेसह योगेश क्षीरसागरांनी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.