Home Blog Page 30

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? मुंडेंनी घेतली अमित शहांची भेट

0

बीड — राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवल्याने त्यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचेच माजी मंत्री आणि आ.धनंजय मुंडे यांनी तात्काळ दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.ही भेट आणि भेटीचं टायमिंगबाबत सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कोकाटे यांनी मंत्रिपद गमावल्यास त्याजागी आपली वर्णी लागावी यासाठी धनंजय मुंडेंनी अमित शाहांची भेट तर घेतली नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्ये प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचा तडकाफडकी राजीनामा घेण्यात आला होता. सध्या धनंजय मुंडेंकडे कोणतंही मंत्रिपद नाही.आता अचानक कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात आलेलं असताना त्या जागी धनंजय मुंडेंची वर्णी लागणार का? अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे वरिष्ठ नेते असून, सध्या महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे कृषी खातं होतं. मात्र, विधानसभेत मोबाइलवर रमी खेळत असल्याच्या वादातून त्यांना कृषी खातं गमवावं लागलं होतं. त्यानंतर त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं होतं. दुसरीकडे त्यांच्यावर नाशिक जिल्ह्यातील सदनिका फसवणूक प्रकरणी कोर्टाने शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अटकेचा निर्णय कायम ठेवला, ज्यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. राज्यघटनेनुसार, एखाद्या मंत्र्याला गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यास त्याचे मंत्रिपद रद्द होतं. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना कारवाई करावी लागते.
कोकाटे यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची तयारी सुरू केली असली तरी सध्या त्यांच्यावर दबाव वाढला आहे. पक्षांतर्गत सूत्रांनी सांगितले की, कोकाटे हे अजित पवार गटातील महत्त्वाचे नेते असून, त्यांच्या मंत्रिपदावरून पक्षाला धक्का बसू शकतो, अशी चर्चा आहे.
कोकाटेंची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवलेली असताना त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट कोकाटे प्रकरणाच्या नंतर लगेच झाल्याने कोकाटे यांचे मंत्रिपद गेले तर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांनी साधलेल्या टायमिंगवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार;बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

0

बीड — महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या एकतर्फी , अन्यायकारक निलंबन कारवाई , विभागातील प्रलंबित आर्थिक व सेवाविषयक मागण्या , तसेच नैसर्गिक आपत्ती व निवडणूक काळातील अतिरक्त कामकाज असूनही संरक्षण न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर
महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघ , जिल्हा शाखा बीड यांच्या वतीने शुक्रवार 19 डिसेंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे . जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना आज निवेदन देण्यात आले .
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शासनाकडे आपली भूमिका ठामपणे मांडली . महसूल विभाग हा राज्य प्रशासनाचा कणा असून सामान्य जनतेशी थेट संपर्क असलेला विभाग आहे . मात्र अलिकडच्या काळात केवळ महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना च जबाबदार धरून निलंबन , फौजदारी कारवाई व चौकशीचे सत्र सुरू असल्याने विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे , अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन , वाहतूक व चोरी रोखण्याची जबाबदारी केवळ महसूल विभागाची नसून पोलीस व परिवहन विभागाचीही संयुक्त जबाबदारी आहे . मात्र प्रत्यक्षात कारवाई होताना सर्व दोष महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टाकले जात आहेत . परिणामी न्यायालयीन निर्देश , नैसर्गिक न्यायाची तत्त्वे व प्रशासकीय नियम डावलून एकतर्फी निलंबने केली जात असल्याचा आरोप महासंघाने केला आहे. महासंघाने शासना समोर प्रमुख मागण्या मांडल्या आहेत . त्यामध्ये 12 व 13 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निलंबन आदेशांचा पुनर्विचार व रद्दबातल निर्णय , चौकशी पूर्ण होईपर्यंत पूर्ववत पदस्थापना , महसूल विभागातील नायब तहसीलदार , मंडळ अधिकारी , तलाठी , महसूल सहाय्यक यांच्या वेतनश्रेणी व ग्रेड पे सुधारणे , राज्यातील महसूल सेवक संवर्गाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांना तातडीने मंजुरी देणे , तसेच निवडणूक व आपत्ती काळातील कामकाजासाठी संरक्षणात्मक धोरण राबविणे यांचा समावेश आहे

.कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता

महासंघाने स्पष्ट केले आहे की , मागण्या मान्य न झाल्यास 19 डिसेंबर 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रात महसूल विभागाचा बेमुदत कामबंद आंदोलनात सहभाग राहील . त्यामुळे जमीन नोंदणी , फेरफार , सातबारा , दाखले , आपत्ती मदत , पिक पाहणी आदी कामकाज ठप्प होण्याची शक्यता असून त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील , असा इशारा देण्यात आला आहे. महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी संघर्ष नको तर संवाद हवा अशी भूमिका घेत शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने तोडगा काढावा , अन्यथा आंदोलन अपरिहार्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे . शासनाने वेळीच सकारात्मक निर्णय घेतल्यास जनतेचे हित आणि प्रशासनाची विश्वासार्हता अबाधित राहील , अशी अपेक्षाही महासंघाने व्यक्त केली आहे . निवेदन देताना अप्पर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक , उपजिल्हाधिकारी मनोज घोडे , कविता जाधव , शिवकुमार स्वामी , प्रभोदय मुळे , शैलेश सूर्यवंशी , तहसीलदार चंद्रकांत शेळके , डी सी मेंडके , नरेंद्र कुलकर्णी , विनोद रणनवरे , विलास तरंगे , राकेश गिड्डे नायब तहसीलदार प्रशांत जाधवर व विविध संघटनेचे पदाधिकारी यात महादेव चौरे , पुरुषोत्तम आंधळे , अरविंद राऊत आदी उपस्थित होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन फेटाळला

0

छ.संभाजीनगर — संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या संतोष देशमुख खून खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मोठा धक्का देत जामीन अर्ज फेटाळून लावला, त्याला तुर्त दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. न्यायमूर्ती सुशील घोडेस्वार यांनी बुधवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
या प्रकरणातील सुनावणी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. शुक्रवारी ज्येष्ठ विधिज्ञ शिरीष गुप्ते यांनी कराडच्या वतीने तब्बल सहा तास प्रदीर्घ युक्तिवाद केला होता. त्यांनी पोलिसांच्या तपासावर आणि अटकेच्या कायदेशीर प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, मंगळवारी मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे आणि फिर्यादीचे वकील ॲड. नितीन गवारे यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. त्यांनी पुराव्यांच्या आधारे आरोपीचे सर्व दावे खोडून काढले आणि ‘मकोका’ अंतर्गत झालेली कारवाई योग्य असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. बुधवारी झालेल्या सुनावणीत कराडच्या वकिलांनी 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या दोष निश्चितीला स्थगिती देण्याची विनंती बीडच्या विशेष न्यायालयाला करावी, अशी मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हे प्रकरण जामीन देण्या योग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने कराडच्या वकिलांना विचारले की, “तुम्ही जामीन अर्ज मागे घेता की आम्ही आदेश पारित करू?” वकिलांनी आदेश देण्याची विनंती केल्यानंतर, न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. या निकालानंतर आता बीडच्या विशेष न्यायालयात 19 डिसेंबर रोजी या प्रकरणातील दोष निश्चितीची प्रक्रिया पार पडणार असून, वाल्मीक कराडचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

गादीचा वाद पेटला! सासुरा मठात दोन महाराजांची एकमेकांना रट्टारट्टी; पोलिसांत तक्रारी

0

केज — तालुक्यातील प्रसिद्ध श्रीसंत एकनाथ महाराज संस्थान, सासुरा येथे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद आता वाढला आहे. मठाधिपती आणि त्यांच्याच माजी उत्तराधिकारी यांच्यातील संबंध इतके बिघडले आहेत की, दोघांनीही एकमेकांना रट्टे तर दिलेच पण पोलीसात धाव घेत परस्परांवर गंभीर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणात दोन्ही महाराजांनी एकमेकांविरुद्ध परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, ‘मठाची गादी’ आणि ‘उत्तराधिकार’ यावरून हा वाद टोकाला पोहोचल्याची माहिती मिळत आहे.

केशव महाराजांचा आरोप : ‘गाडी फोडली, मारहाण केली!’

ह.भ.प. केशव महाराज गित्ते रा. नंदागौळ, परळी यांनी 15 डिसेंबर रोजी पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी त्यांना मठाधिपती ह.भ.प. रतन महाराज यांनी स्वतः उत्तराधिकारी म्हणून सासुरा येथे आणले होते. मात्र, नंतर त्यांना अचानक मठातून हाकलून देण्यात आले.केशव महाराज यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आपल्याला का हाकलून दिले? याचा जाब विचारण्यासाठी केशव महाराज 14 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता आपल्या गाडी क्र. एम एच- 44/एस- 4528 सासुरा येथे गेले होते. यावेळी त्यांना लक्ष्मण उगले आणि त्यांच्या साथीदारांनी अडवले. केशव महाराज यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, शिवीगाळ झाली आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. लक्ष्मण उगले याने त्यांच्या गाडीच्या पुढील काचेवर दगड मारून ती फोडली. ह.भ.प. रतन महाराज, सुशन रामराव भोसले आणि लक्ष्मण उगले यांच्यापासून आपल्या जीविताला धोका असल्याचं तक्रार एक म्हटलं आहे

अंमली पदार्थांचे सेवन करून अपहरणाचा प्रयत्न मठाधिपती रतन महाराज

संत एकनाथ महाराज संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. रतन महाराज यांनीही पलटवार करत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, केशव महाराज गित्ते यांना उत्तराधिकारी म्हणून आणले होते, पण ते अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याने त्यांना मठातून हाकलून देण्यात आले.मठाधिपती रतन महाराजांनी तक्रारीत म्हटले आहे की, 14 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजता केशव महाराज गित्ते आणि त्यांचा चुलत भाऊ कृष्णा गित्ते हे दोघे अंमली पदार्थांचे सेवन करून आश्रमात आले. त्यांनी रतन महाराज यांना ‘का हाकलून लावले?’ असे विचारून शिवीगाळ केली, मारहाण केली आणि ओढत आणले, तसेच गाडीत नेऊन अपहरण करण्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रतन महाराज यांना मारहाण होत असताना किसनाबाई डोईफोडे यांनी आरडाओरडा केल्यामुळे बाळासाहेब उगले, बप्पा पाळवदे, दिगंबर उगले आणि सुहास उगले यांच्यासह इतर लोक जमा झाले. लोक जमा होताच केशव महाराज गित्ते पळून गेले. केशव महाराज गित्ते आणि कृष्णा गित्ते यांच्यापासून त्यांच्यासह इतर भक्तांच्या जीविताला धोका असल्याचं म्हटलं आहे
दरम्यान केज पोलीस ठाण्यात दोन्ही महाराजांनी दाखल केलेल्या तक्रारींवरून परस्परविरोधी अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक सोनवणे करत आहेत.

महावितरणने एका झटक्यात फेडले 12 हजार 800 कोटींचे कर्ज

0

मुंबई —  देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेल्या महावितरणने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या १२,८०० कोटी रुपयांच्या कर्जाची मुदतीपूर्वी एकाच हफ्त्यात नुकतीच परतफेड केली. अन्य वित्तीय संस्थेकडून कमी व्याज दराचे कर्ज उभारून तसेच स्वनिधीतून ही परतफेड केली असून त्यामुळे व्याजाच्या रकमेत मोठी बचत होईल, अशी माहिती अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याची सूचना केली असून त्यादृष्टीने कंपनीवरील कर्जाचा बोजा हलका करण्यासाठी यशस्वी पावले टाकण्यात आली.

महावितरणने विविध टप्प्यांवर स्टेट बँकेकडून एकूण १२,८०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी ८.६५ टक्के ते ९.२५ टक्के दराने व्याज द्यावे लागत होते. त्याऐवजी अन्य वित्तीय संस्थेकडून ७,१०० कोटी रुपये कर्ज ८.२५ टक्के इतक्या कमी व्याजदराने उभारून महावितरणने स्टेट बँकेचे ७,१०० कोटी रुपयांचे कर्ज फेडले. त्या खेरीज महावितरणने स्वनिधीतून ५,६३४ कोटी रुपयांचे स्टेट बँकेचे कर्ज फेडले.

महावितरणने स्टेट बँकेचे कर्ज घेताना आपल्या दहा सर्कलमधील महसूल तारण म्हणून ठेवला होता. या सर्कलमध्ये वार्षिक तीस हजार कोटी रुपयांचा महसूल आहे. स्टेट बँकेचे सर्व कर्ज फेडल्यामुळे हा महसूल तारणमुक्त होईल. त्या आधारे कंपनीला ५०,००० कोटी रुपयांपर्यंतचा निधी माफक व्याजदरात कर्जरुपाने उभा करता येईल.

महावितरणची पत वाढविणारे पाऊल – महावितरणने एकाच हफ्त्यात स्टेट बँकेच्या १२,८०० कोटी रुपयांच्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड करण्यामुळे कंपनीची वित्तीय बाजारातील पत वाढली आहे. ही घडामोड गुंतवणूकदारांचा विश्वास वाढविणारी आहे. कंपनीसाठी भविष्यात खासगी किंवा सार्वजनिक बाँड उभारायचे झाल्यास त्यासाठीही इतक्या मोठ्या कर्जाची परतफेड करणे उपयुक्त ठरणारे आहे. आगामी काळात महावितरणला शेअर बाजारात सूचिबद्ध करण्याच्या दृष्टीनेही ही कर्जाची परतफेड महत्त्वाची आहे.

10 लाख घेत लग्न केले दागिने घेऊन नवरी पळाली मध्यस्थासह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

बीड — दहा लाख रुपये घेऊन लग्न केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत नवरी मुलगी पसार झाली. माहेरी गेलेल्या मुलीला परत आणण्याचे प्रयत्न केले, मात्र तिने नकार दिला. पोलिसांत प्रकरण गेले, तक्रार निवारण केंद्रात समुपदेशन झाले तरीही मुलगी नांदायला आली नाही.अखेर या प्रकरणात 3 वर्षांनंतर नवरी मुलगी, तिचे आई-वडिल व लग्नात मध्यस्थी करणाऱ्यासह सात जनाविरोधात बीड शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अभय अरुणराव खोडसकर वय 39, रा. सारडा संकुल, बीड यांनी तक्रार दिली आहे. लग्न जमत नसल्यामुळे ते मानसिक तणावात होते. याच परिस्थितीचा फायदा घेत, रामकृष्ण उपाध्ये, रजनी उपाध्ये, उदय उपाध्ये, पल्लवी उपाध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यातील उंदरी येथील प्रकाश व संगीता मैदाने यांनी अभय यांना त्यांच्या गावातील मुलगी कोमल हिच्याशी लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवले. लग्नासाठी आरोपींनी एकूण 15 लाख रुपये घेण्याचे निश्चित केले होते. यापैकी लग्नापूर्वी आणि लग्नानंतर फिर्यादीकडून एकूण 10 लाख रुपये स्वीकारण्यात आले.या व्यवहारा अंती, 5 जुलै 2022 रोजी बीड येथे हा विवाह संपन्न झाला. मात्र, लग्नानंतर नवरी मुलगी कोमलने 2 महिन्यांनी घरातील काही दागीने घेऊन पसार झाली. सुरुवातीला ती मोहरी नसल्याचे सांगितले गेले. त्यामुळे बीड शहर पोलिसांत मिसींगची नोंद केली गेली.काही दिवसांनी ती मोहरी असल्याची माहिती मिळाल्याने शहर पोलिस व मुलाचे कुटुंबिय बुलढाणा जिल्ह्यात मुलीच्या गावी गेले. तिथे मुलीने नांदायला यायला नकार दिला. यानंतर पोलिसांनी मिसिंग अर्ज निकाली काढला. मुलाने बीडच्या तक्रार निवारण केंद्रात अर्ज केला. तिथेही मुलीने नांदायला यायला नकार दिला. दरम्यानच्या काळात मुलाकडे लग्नातील राहिलेले 5 लाख रुपये देण्याची मागणी झाली. 5 लाख दिल्यास मुलगी नांदायला येईल असे सांगितले. मात्र मुलाने मुलगी नांदत नसल्याने 10 लाख परत द्या अशी मागणी केली.या फसवणूक, धमकी आणि अपहार प्रकरणी वधू कोमलसह सात जणांविरुद्ध आता बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

शिरूरच्या फुलसांगवीत बिबट्याने पाडला घोडा अन् मेंढीचा फडशा

0

शिरुर — पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मेंढपाळाच्या जागलीवर बिबट्याने हल्ला करून मेंढी सह घोड्याची शिकार केल्याची घटना फुलसांगवी शिवारात घडल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
फुलसांगवी शिवारामध्ये सुभाष भुजंगराव ढाकणे या फुलसांगवी मार्कडवाडी रस्त्या लगतच्या शेतकऱ्याच्या 163 मधील शेतामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील बिगवण येथील मेंढपाळांनी मेंढ्यांचा कळप बसवलेला होता. याच ठिकाणी त्यांनी आपली जागलही ठेवली होती. रात्री एक ते दीड च्या दरम्यान या मेंढपाळाच्या जागली वरती बिबट्याने हल्ला चढवून येथील या मेंढपाळाच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या घोड्याची व एका मेंढीची शिकार केली आहे. घोड्याच्या नरड्याचा चावा घेऊन त्याला गतप्राण केले व त्याचे पोटाजवळील मांस भक्षण करून त्या ठिकाणाहून बिबट्या पसार झाला असल्याचे सांगितले आहे.सदरील घटनेची माहिती पाटोदा वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन या घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेमध्ये सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा घोडा व पंधरा ते वीस हजार रुपये किमतीची मेंढी असा सुमारे एक लाख रुपये किमतीचं पशुधन बिबट्याच्या भक्षस्थानी ठरले आहेत. सदरील घटना फुलसांगवी परिसरामध्ये पहिल्यांदाच घडत असल्याने बिबट्याच्या दहशतीने परिसरातील शेतकरी वर्ग पुरताच हादरून गेला आहे. खरीप हंगामातील शेती कामालाही मोठी खिळ बसली आहे. या बिबट्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्याला वन विभागाने भयमुक्त करावे अशी शेतकऱ्यातून मागणी जोर धरत आहे.

फायनान्सच्या गाड्या सांगून चोरीच्या विकायचा; चोर पकडला

0

बीड — फायनान्स कंपनीत काम करताना शिकलेल्या वाहन उचलण्याच्या कौशल्याचा वापर करून दुचाकींची चोरी करायची आणि बँकेने जप्त केलेल्या या गाड्या आहेत’ असे सांगून त्यांची विक्री करायची‌.या सराईत चोराचा पर्दाफाश करण्यात बीड शहर पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी आठ मोटरसायकल देखील जप्त केल्या आहेत.
या कारवाईत कृष्णा उमेश अंतरकर वय 25 वर्ष, रा. शिवशक्ती नगर, पाथर्डी, जि. अहिल्यानगर याला अटक केली आहे.पोलिसांनी पकडलेला आरोपी यापूर्वी फायनान्स कंपनीत कार्यरत होता. कामाच्या काळात हप्ते थकवलेल्या दुचाकी गाड्या ओढून आणण्याचे (रीपोझेशन) काम तो करीत होता. याच कामातून त्याला वाहन उचलण्याचे कौशल्य व सवय लागली.याच कौशल्याचा गैरवापर करून आरोपीने पुढे मोटरसायकल चोरी करण्यास सुरुवात केली. चोरी केलेल्या मोटरसायकली तो पाथर्डी परिसरात विक्रीस काढत असे.“मी फायनान्स/बँकेत काम करतो”, “या गाड्या हप्ते थकित असल्याने ओढून आणलेल्या आहेत” अशी खात्री देऊन आरोपी नागरिकांचा विश्वास संपादन करीत होता. फायनान्समध्ये काम करतो अशी ओळख असल्यामुळे नागरिकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून सदर मोटरसायकली खरेदी केल्या.

गाड्या आणि पैसे दोन्ही गमावले – नागरिकांचे दुहेरी नुकसान

बीड शहर पोलिसांच्या तपासात सदर मोटरसायकली चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या सर्व मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
या कारवाईमुळे संबंधित खरेदीदारांना खरेदी केलेल्या मोटरसायकली गमवाव्या लागल्या तसेच त्या बदल्यात दिलेली रक्कमही गमवावी लागली अशा प्रकारे नागरिकांचे दुहेरी आर्थिक नुकसान झाले आहे. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास करून आरोपीस अटक केली असून, त्याच्याकडून विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या आठ मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर वउपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या देखरेखी खाली करण्यात आली.या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव,्पोलीस अंमलदार गहिनीनाथ बावनकर,
पोलीस अंमलदार राम पवार,पोलीस अंमलदार इलियास शेख , मंगेश शिंदे,पोलीस अंमलदार शौकत शेख तसेच बीड शहर पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच पथकातील इतर अधिकारी व अंमलदारांचा विशेष सहभाग होता. यातून शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील मोटर सायकलचे गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्ह्यातील सहभाग् सिद्ध आणि निश्चित होणार आहे.

पाकिस्तानातही मिळणार संस्कृतचे धडे; भगवद्गीता ही शिकवणार

0

इस्लामाबाद — पाकिस्तान फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात संस्कृतचे धडे विद्यार्थ्यांना शिकवले जात आहेत. संस्कृत भाषेतील महाभारत व भगवद्गीतादेखील विद्यार्थ्यांना शिकवली जाणार असल्याचे विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी सांगितले आहे. पाकिस्तानात पुढील दहा ते पंधरा वर्षांत संस्कृत भाषेतील विद्वान तयार होतील, असा विश्वास लाहोर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अली उस्मान कासमी यांनी व्यक्त केला आहे.
पाकिस्तानातील लाहोर विद्यापीठात संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात प्राध्यापक डॉ. शाहिद राशिद यांचा मोलाचा वाटा आहे. अरबी व फारसी भाषा आत्मसात केल्यानंतर राशिद यांनी संस्कृत भाषेचे अध्ययन सुरू केले. संस्कृत भाषा ही पाकिस्तानशीही संबंधित असून ती फक्त एका धर्माशी संबंधित नसल्याचे राशिद म्हणाले. लाहोर विद्यापीठात संस्कृत भाषेचा तीन महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे राशिद यांनी सांगितले.
संस्कृतचा पाकिस्तानशी संबंध
हिंदू धर्माशी संबंधित असलेली संस्कृत भाषा अभ्यासासाठी का निवडली? असा प्रश्न राशिद यांना वारंवार विचारला जातो. त्यावर राशिद म्हणाले, “मला असा प्रश्न विचारल्यानंतर मी त्यांना विचारतो की संस्कृत भाषा का शिकू नये? संस्कृत भाषेत मोठ्या प्रमाणात लेखन हे सिंधू संस्कृतीच्या वेळी पाकिस्तानात झाले. संस्कृतचे व्याकरणकार पाणिनी यांचा जन्म देखील पाकिस्तानमध्ये झाला. संस्कृत भाषा आमची देखील आहे. ती फक्त एका विशिष्ट धर्माशी संबंधित नाही.” दरम्यान, पाकिस्तानात सुरू झालेला संस्कृत भाषेचा अभ्यासक्रम भारत – पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यास देखील मदत करेल, असा विश्वास राशिद यांनी व्यक्त केला आहे.
पाकिस्तानात संस्कृत भाषेतील प्राचीन दस्तावेज
पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात संस्कृतमधील प्राचीन दस्तावेज असल्याचे लाहोर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अली उस्मान कासमी यांनी म्हटले आहे. कासमी म्हणाले, “पाकिस्तानमधील पंजाब विद्यापीठात पाम वृक्षाच्या पानावर लिहिलेले संस्कृत भाषेतील दस्तावेज आहेत. १९३० मध्ये संस्कृत अभ्यासक जेसीआर वुलनर यांनी हे दस्तावेज जमा केले होते. त्या दस्तावेजांचा अभ्यास करण्यासाठी विदेशातून अभ्यासक येतात. येथील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे धडे दिल्यास हे चित्र बदलेल. पाकिस्तानात पुढील दहा ते पंधरा वर्षांत संस्कृत भाषेतील विद्वान तयार होतील.”

बंजारा आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या – आ. विजयसिंह पंडित

0

बंजारा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची विधानभवनात केली मागणी

गेवराई — मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाला हैद्राबाद स्टेट गॅझेटनुसार अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात तसेच धनगर समाजालाही एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी आज विधानभवनात केली. अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना आ. विजयसिंह पंडित यांनी बंजारा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवला. गेल्या अनेक दिवसांपासून बंजारा आणि धगनर समाज एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी संघर्ष करत असून सरकारने त्यांच्या आरक्षणाचा तिढा सोडवून बंजारा (लमाण) समाजाला आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची आग्रही मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी विधानभवनात केली.

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात गेवराई विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित यांनी बंजारा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवला. विधानभवनात अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, मराठवाडा हा प्रदेश सन १९४८ पर्यंत निजामशासीत हैद्राबाद राज्याचा भाग होता. हैद्राबाद गॅझेटियर सन १९२० मध्ये लांबडा/बंजारा (सुगळी) समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केलेला आहे. बंजारा (लमाण) समाज मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे, हैद्राबाद गॅझेटियरच्या पुराव्यानुसार बंजारा समाज हा ऐतिहासिकदृष्ट्या प्रशासकीय नोंदीनुसार आदिवासी समाजात आहे. तथापि मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर सन १९५६ नंतर या समाजाला ओबीसी/एनटीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले. परंतु तेलंगणा व आंध्र प्रदेशात याच गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे. संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासनाने मराठा समाज बांधवांना हैद्राबाद गैझेटियर लागू केले त्यानुसार त्याचा आधार घेऊन मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात सामिल करून त्यांना या प्रवर्गातील आरक्षणाची लाभ देण्याची मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी केली.

आ. विजयसिंह पंडित यांनी धनगर समाजाचाही आरक्षणाचा मुद्या विधानभवनात लावून धरला. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गात आरक्षणाची मागणी होत आहे. धनगर समाजाचे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक मागासलेपण लक्षात घेता धनगर समाजाची मागणी योग्य आहे. धनगर समाजाचा इतिहास, लोकजीवन आणि परंपरा याचा विचार केल्यास धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. समाजाच्या जीवनमानानुसार धनगड हा समुदाय यावर्षीपासून अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे. महाराष्ट्र सरकारने मराठवाड्यातील त्याच बरोबर बीड जिल्ह्यातील आणि माझ्या गेवराई विधानसभा मतदार संघातील धनगर समाजाची आग्रही मागणी लक्षात घेता धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण द्यावे. त्यामुळे धनगर समाजाला शिक्षण, नोकरी यांसह इतर आरक्षणाचे लाभ मिळतील आणि त्यांच्या विकासाचा मार्ग सुकर होणार आहे असेही आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी सांगितले.

आ. विजयसिंह पंडित यांनी विधानभवनात बंजारा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवल्यामुळे बंजारा आणि धनगर समाजामधून आ. विजयसिंह पंडित यांचे आभार मानले जात आहेत.