Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवल्याने त्यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे सगळं सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचेच माजी मंत्री आणि आ.धनंजय मुंडे यांनी तात्काळ दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.ही भेट आणि भेटीचं टायमिंगबाबत सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कोकाटे यांनी मंत्रिपद गमावल्यास त्याजागी आपली वर्णी लागावी यासाठी धनंजय मुंडेंनी अमित शाहांची भेट तर घेतली नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्ये प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचा तडकाफडकी राजीनामा घेण्यात आला होता. सध्या धनंजय मुंडेंकडे कोणतंही मंत्रिपद नाही.आता अचानक कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात आलेलं असताना त्या जागी धनंजय मुंडेंची वर्णी लागणार का? अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे वरिष्ठ नेते असून, सध्या महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. सुरुवातीला त्यांच्याकडे कृषी खातं होतं. मात्र, विधानसभेत मोबाइलवर रमी खेळत असल्याच्या वादातून त्यांना कृषी खातं गमवावं लागलं होतं. त्यानंतर त्यांना क्रीडा खातं देण्यात आलं होतं. दुसरीकडे त्यांच्यावर नाशिक जिल्ह्यातील सदनिका फसवणूक प्रकरणी कोर्टाने शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अटकेचा निर्णय कायम ठेवला, ज्यामुळे कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. राज्यघटनेनुसार, एखाद्या मंत्र्याला गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यास त्याचे मंत्रिपद रद्द होतं. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना कारवाई करावी लागते.
कोकाटे यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची तयारी सुरू केली असली तरी सध्या त्यांच्यावर दबाव वाढला आहे. पक्षांतर्गत सूत्रांनी सांगितले की, कोकाटे हे अजित पवार गटातील महत्त्वाचे नेते असून, त्यांच्या मंत्रिपदावरून पक्षाला धक्का बसू शकतो, अशी चर्चा आहे.
कोकाटेंची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवलेली असताना त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट कोकाटे प्रकरणाच्या नंतर लगेच झाल्याने कोकाटे यांचे मंत्रिपद गेले तर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे यांनी साधलेल्या टायमिंगवर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.