Home Blog Page 3

मारू नका ना वंऽऽ पत्नीची विनवणी तरीही ऊसतोड मजुराला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

0

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मारहाणीच्या घटना बीड जिल्ह्यात नेहमीच घडत असल्याचं व त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. असाच एक ऊसतोड कामगाराला बागायतदाराकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना धारूर तालुक्यातील खारेवाडी भागात घडली. ऊसतोड कामगाराला बेदम मारहाण करत असताना मारू नका ना वं असं म्हणत आक्रोश करताना दिसून येत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

गणेश बाळासाहेब वाघ असं ऊसतोड कामगाराचं नाव आहे. धारूर तालुक्यातील खरेवाडी येथे उसाच्या वाड्याला कांडी का ठेवली असं म्हणत चार ते पाच जणांनी गणेश वाघ याला काठी लाठ्यासह बेदम मारहाण केली. या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हायरल व्हिडिओत आरोपींनी गणेश वाघच्या नरड्यावर पाय दिल्याचं दिसत आहे. मारहाण होत असताना त्याची पत्नी मारू नका ना वं असं म्हणून ओरडताना देखील ऐकू येत आहे. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गब्बू खाडे, श्रीकांत खाडे, अजय वसंत खाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ऊसतोड कामगाराच्या भावाला व पत्नीला देखील मारहाण झाल्याचं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.खारेवाडी भागात घडलेल्या मारहाणीच्या घटनेत ऊसतोड कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.या घटनेमुळे ऊसतोड कामगाराचं संपूर्ण कुटुंब प्रचंड घाबरलेलं आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा बीड चर्चेत आले असून पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं बोललं जात आहे.

वन्यजीव धोक्यात : वनविभागातील कृत्रिम पाणवठे कोरडे ; वन्यप्राण्यांची वस्तीकडे धाव

0

बीड – सध्या उन्हाचा पारा वाढत असल्याने बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नैसर्गिक पाणीस्रोत असलेल्या तलाव, साठवण तलाव आणि धरणांतील पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी बीड तालुक्यातील करचुंडी वनक्षेत्र अंतर्गत बेलगाव, पिंपरनई, फुकेवाडी, सोमनाथवाडी परिसरातील वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठे कोरडे पडले आहेत.

यामुळे हरीण, मोर, लांडोर, वानर आदी वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असून ते पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे तसेच गाव तलावांकडे धाव घेत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

वनविभागाने तयार केलेले अनेक कृत्रिम पाणवठे कोरडेठाक पडले असून त्यामध्ये नियमितपणे पाणी सोडले जात नाही. काही ठिकाणी महिनाभरापूर्वी सोडलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात शेवाळ साचल्याने ते पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे.

वन्यजीव पाण्यासाठी मानवी वस्तीकडे येत असल्याने त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होण्याचा तसेच अज्ञात वाहनांच्या धडकेत जीव गमावण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे वनविभागाने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये नियमितपणे स्वच्छ पाणी सोडून वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

लक्षवेधी ! खरवंडी — राजूरी महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाची अनियमितता ;आ.क्षीरसागर आक्रमक

0
बीड — राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ खरवंडी ते नवगन राजुरी रस्त्यासंबधी आ.संदीप क्षीरसागर यांनी लक्षवेधी मुद्दा उपस्थित करीत या रस्त्याचे काम मागील अनेक वर्षापासून रखडले आहे. हा रस्ता पूर्ण होणार की, नाही ? रस्त्याचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे असून याची आयआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांची चौकशी करण्याची मागणीही आ.क्षीरसागर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.
             राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ चे काम पूर्ण करण्याचा कालावधी हा १८ महिन्यांचा होता. मात्र ९ वर्ष झाले तरी हा रस्ता अपूर्ण असून, आजही २५ टक्के काम राहिलेले आहे. तसेच या रस्त्याचे काम करणान्या कंत्राटदाराला ६० टक्क्‌यांपेक्षा जास्त रकम देण्यात आली आहे. काम रखडण्याचे कारण कोरोना आणि भूसंपादन असल्याचे सांगितले जात आहे. पण कोरोना काळ हा दोन वर्षांचा होता, तर १० टक्के भूसंपादन राहिले आहे. राष्ट्रीय महामार्गाची वर्क ऑर्डर निघण्याआधी पूर्ण होत असते तरीही यात हलगर्जीपणा झाला आहे. १० टके भूसंपादन ९ वर्षात पूर्ण करु न शकणारे अधिकारी, कर्मचारी याला कारणीभूत असल्याच सांगितले आहे. तसच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या मात्र त्याचा मोबदला ही मिळाला नसल्याचे आ. क्षीरसागर यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी या लक्षवेधी सूचनेत सांगताना रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून यापेक्षा पाणंद रस्ता बरा असे सांगत याची आयआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, यासोबतच हे काम कधीपर्यंत पूर्ण होणार आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. यावर मंत्र्यांनी उत्तर देताना भूसंपादन मावेजासाठी केंद्राकडे निधीची मागणी करण्यात आली असून, येत्या मे महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांच्याकडे पदवी नसतानाही कार्यकारी अभियंता पदाचा, अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. यामुळे यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली. याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी यासंदर्भात सविस्तर चौकशी करण्याचीही घोषणा केली.
छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याची उंची वाढवून सुशोभीकरण करण्याची केली मागणी
बीड शहरापासून जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील महालक्ष्मी चौकात छत्रपती संभाजी महाराज पांचा पुतळा उभारण्यात आला आहे. याठिकाणी काही दिवसांत उड्डाणपूल होणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकाच्या धर्तीवर या पुतळ्याची उंची वाढवून सुशोभीकरण करण्याची मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी याच लक्षवेधी मांडताना केली. याला ही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

फार्मर आयडी मधील तांत्रिक त्रुटी महिनाभरात दुरुस्त होणार

0

आ. विजयसिंह पंडित
यांच्या लक्षवेधी सूचनेला कृषी मंत्र्यांचे उत्तर

मुंबई —  फार्मर आयडी हा शेतकऱ्यांचा एकमेव ओळख क्रमांक असून शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी तो महत्वाचा आहे. फार्मर आयडी ची नोंदणी करताना शेतजमीनीच्या क्षेत्रातील तफावत, गट क्रमांक, नावातील चुका, गावाच्या नावातील बदल यांसह अनेक तांत्रिक त्रुटी झाल्यामुळे हजारो शेतकरी शासन योजनांच्या रास्त लाभापासून वंचित आहेत. वांरवार तक्रारी देऊनही फार्मर आयडी मधील त्रुटींची दुरुस्ती होत नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गऱ्हाणे आ. विजयसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून थेट विधानसभेत मांडले. कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय बैठक घेऊन एक महिन्यात फार्मर आयडी मधील तांत्रिक त्रुटी दुरुस्त करून दिल्या जातील असे आश्वासन दिले आहे. नादुरुस्त फार्मर आयडीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आ. विजयसिंह पंडित यांचे आभार मानले आहेत.

सन २०२३ मध्ये बीड जिल्ह्यात फार्मर रजिस्ट्री पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला, पायलट प्रोजेक्ट राबविताना शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या फार्मर आयडीमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक चुका झाल्या, अनेक शेतकऱ्यांचे क्षेत्र १.९९ हेक्टर नोंद झाले परिणामी नादुरुस्त फार्मर आयडीमुळे अनेक शेतकऱ्यांना शासन योजनांच्या रास्त लाभापासून वंचित रहावे लागले. फार्मर आयडी दुरुस्त करणे संदर्भात सर्वाधिक तक्रारी गेवराई विधानसभा मतदार संघातून येत होत्या. आ. विजयसिंह पंडित यांनी याप्रकरणी पुढाकार घेऊन तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेतल्या, स्थानिक स्तरावर फार्मर आयडीमधील त्रुटी दूर करण्याची यंत्रणा नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे राज्याच्या जमाबंदी आयुक्तांकडे या बाबत सविस्तर माहिती दिली. तरीही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्यामुळे आ. विजयसिंह पंडित यांनी हा विषय लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला.

आ. विजयसिंह पंडित यांनी या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करताना शासनाच्या महा डीबीटी वरील सर्व योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पिक विमा, नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान, कर्जमाफी यांसह शासनाच्या ई-सेवासाठी फार्मर आयडीचा उपयोग होत असल्याचे सांगितले. शासन योजनांचा लाभ घेण्यासाठी क्षेत्र मर्यादा २ हेक्टर असल्यामुळे आणि फार्मर आयडीमधील चुकीच्या नोंदीमुळे सुमारे २ लाख ४१ हजार शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीवर १.९९ हेक्टर क्षेत्राची नोंद झाल्यामुळे हे शेतकरी शासन योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. फार्मर आयडी दुरुस्त करण्याची सुविधा तालुकास्तरावर करा, ॲग्री स्टॅक प्रणालीमध्ये नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भाने तक्रारींचा निपटारा लवकर करा, गट नंबर, गाव तालुक्यातील बदल, मोबाईल नंबर दुरुस्त करणे आदी लहान-सहान बदलांबाबतचे अधिकार तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांना द्या, फार्मर आयडीमधील दोषमुक्त करण्यासाठी विशेष अभियान राबवून तालुकास्तरावर वेगळा संगणक कक्ष उभारा अशी मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी विधानसभेत केली.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून आ. विजयसिंह पंडित यांनी उपस्थित केल्याचे सांगताना राज्याचे कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांनी याप्रकरणी महिनाभरात बीड जिल्ह्यातील विशेषतः गेवराई विधानसभा मतदार संघातील फार्मर आयडीच्या दुरुस्ती करणार असल्याचे आश्वासित केले. जमाबंदी आयुक्त, ॲग्री स्टॅकचे संचालक, तंत्रज्ञ आणि सेंट्रल प्रोजेक्ट मॉनिटरींग युनिटची टिम यांच्यासोबत आ. विजयसिंह पंडित यांच्या उपस्थित बैठकीचे आयोजन करून सर्व फार्मर आयडी दुरुस्त करून दिले जातील असे त्यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नाला सभागृहात वाचा फोडून या बाबत कार्यवाहीचे आश्वासन मिळवून दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी आ. विजयसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले आहे.

अवैध वाळू वाहतुक करणारा हायवा पकडला; साडे अठरा लाखाचा मुद्देमाल जप्त

0

गेवराई — अवैध वाळू वाहतूक करणाऱा हायवा पोलिसांनी पकडला असून साडेअठरा लाख रुपयांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी पहाटे करण्यात आली.


पोलीस ठाणे गेवराई येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक हिमांशु नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे पोलिस पथकाने बुधवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास संभाजी चौकाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील झमझम पेट्रोल पंप परिसरात नाकाबंदी केली होती.यावेळी बीडकडे वाळू भरून जाणारा एक हायवा येताना दिसल्याने पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली. चालकाने आपले नाव साहिल शांताराम कापसे वय २० वर्ष, रा. अचानक नगर, गेवराई असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याच्याकडे वाळू वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळून आले.पोलिसांनी एमएच-१२-क्यूडब्ल्यू-४२२२ क्रमांकाचे हायवा वाहन (अंदाजे किंमत १८ लाख रुपये) तसेच सुमारे ३० हजार रुपये किमतीची पाच ब्रास वाळू असा एकूण १८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चालक साहिल कापसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

लाडकी बहिण’ योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक, आरोपी अटक

0

बीड — ‘लाडकी बहिण’ योजनेच्या नावाखाली समाज कल्याण विभागातील कर्मचारी असल्याचे भासवून महिलांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन व भांड्यांचे किट देण्याचे आमिष दाखवत ऑनलाईन पैसे उकळणाऱ्या आरोपीला अंमळनेर पोलिसांनी जालन्यातून अटक केली आहे.
गोरक्षनाथ नवनाथ पन्हाळकर रा. नाळवंडी, ता. पाटोदा, ह.मु. तळेगाव, जि. बीड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलांना फोन करून आपण समाजकल्याण विभागातून बोलत असल्याचे सांगितले. “तुमची शासनाच्या ‘लाडक्या बहिणी’ योजनेत विशेष निवड झाली असून तुम्हाला पिठाची गिरणी, शिलाई मशीन व भांड्यांचे किट देण्यात येणार आहे,” असे सांगून विश्वास संपादन केला. मात्र या वस्तू पाठविण्यासाठी वाहतूक खर्च म्हणून आधी ऑनलाईन पैसे पाठवावे लागतील, असे सांगत फोन-पेवर रक्कम पाठवण्यास सांगितले.या आमिषाला बळी पडत पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील पाच महिलांनी मिळून सुमारे ९ हजार रुपये आरोपीला पाठवले. मात्र पैसे पाठवूनही कोणतीही वस्तू न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने १५ फेब्रुवारी २०२६ रोजी अंमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आला. तपासादरम्यान सुमारे २५ ते ३० मोबाईल क्रमांकांचे सीडीआर काढून हजारो मोबाईल क्रमांकांची पडताळणी करण्यात आली. आरोपी वारंवार सिम कार्ड बदलत तसेच मोबाईल सुरू-बंद करत असल्याने तपासात अडचणी येत होत्या. मात्र तांत्रिक मदतीच्या साहाय्याने आणि बारकाईने तपास करत पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अखेर ९ मार्च २०२६ रोजी जालना येथील रेल्वे स्थानक परिसरातून आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल योगेश बहिरवाळ, दिलीप घोशीर, पूजा तिपटे व शितल पवळ यांनी केली. पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बबन शिंदे, विलास माळी, भरत राठोड, शाम खाडे, संतोष कसाब, गणेश गोसावी, मारुती म्हेत्रे, शत्रुघ्न दिंडे व चालक ईसूफ शेख हे करीत आहेत.

घरगुती गॅसचा वापर पुरवठा विभागाची 3 हॉटेलवर कारवाई

0

बीड — इराण इजराइल अमेरिका युद्धामुळे स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून व्यावसायिक नफा कमवणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तीन हॉटेलवर पुरवठा विभागाने कारवाई केली आहे. या छाप्यामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.

युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे इंधन टंचाईचं संकट उभा राहिला आहे. घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना उपलब्ध व्हावं. यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पावलं उचलत एस्मा कायदा लागू करत व्यावसायिक गॅस सिलेंडर चा पुरवठावर बंधन आणले आहे. यामुळे मोठमोठ्या शहरांमधील हॉटेलिंग व्यवसाय धोक्यात आला आहे. मात्र बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक वापरासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. जिल्ह्याचा पुरवठा विभाग ही याकडे आज पर्यंत कानाडोळा करत आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र बीडमध्ये सिलेंडरची उपलब्धता सर्वसामान्य जनतेला व्हावी या उद्देशाने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाने मोठी कारवाई पहिल्यांदाच केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील “श्री” हॉटेल, समाधान हॉटेल आणि रायगड हॉटेल वर छापा मारला. या हॉटेलमधून अवैध पद्धतीने नफाखोरीसाठी घरगुती गॅस वापर होत असल्याचे छाप्यात उघड झाले. या तीनही हॉटेलमधून घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर, मंडळ अधिकारी अनील तांदळे, तलाठी शब्बीर पठाण, तालुका पुरवठा विभागातील अवल कारकून श्रीराम वैभव आणि संतोष मुळीक यांनी केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या कारवाईमुळे हॉटेल, खानावळ, धाबे चालकांच्या धंद्याला लगाम लागणार असून गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर अशा कारवाया वाढवण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले.

पहिल्यांदाच ! कोमात असलेल्या हरीश राणाला इच्छामरणाची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

0

नवी दिल्ली —13 वर्षांपासून कोमात असलेल्या गाझियाबादच्या 31 वर्षीय हरीश राणा यांना इच्छामरणाची परवानगी देत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना मानली जात आहे.
न्यायालयाने हरीश राणा यांना जीवनरक्षक यंत्रणांवरून टप्प्याटप्प्याने हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले असून ती प्रक्रिया रुग्णाच्या सन्मानाचे भान ठेवून पार पाडली जावी, असे स्पष्ट केले आहे.

न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) हरीश राणा यांना उपशामक उपचार विभागात दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली जीवनरक्षक उपचार हळूहळू काढून टाकण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. न्यायालयाने यावेळी रुग्णाची प्रतिष्ठा आणि मानवी मूल्ये जपणे अत्यंत आवश्यक असल्याचेही नमूद केले.

हरीश राणा प्रकरण अत्यंत वेदनादायक आहे. दिल्लीमध्ये जन्मलेले हरीश राणा चंदीगडमधील पंजाब विद्यापीठातून बीटेकचे शिक्षण घेत होते. 2013 मध्ये ते वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली आणि ते कोमात गेले. त्यानंतर ते कधीच शुद्धीवर आले नाहीत. डॉक्टरांच्या मते त्यांच्या मेंदूतील नसांवर गंभीर परिणाम झाला असून त्या पूर्णपणे सुकल्या आहेत. त्यामुळे ते बोलू शकत नाहीत, कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत आणि पूर्णपणे लाइफ सपोर्ट सिस्टमवर अवलंबून आहेत.

अपघातानंतर गेल्या 13 वर्षांपासून हरीश राणा अंथरुणावरच आहेत. डॉक्टरांनी त्यांना ‘क्वाड्रिप्लेजिया’ या गंभीर अवस्थेत असल्याचे घोषित केले आहे. या स्थितीत रुग्णाच्या शरीराच्या चारही अवयवांवर नियंत्रण राहत नाही आणि तो पूर्णपणे फीडिंग ट्यूब व व्हेंटिलेटरवर अवलंबून राहतो. डॉक्टरांच्या मते अशा स्थितीत बरे होण्याची कोणतीही शक्यता नसते.

हरीश यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाने प्रचंड संघर्ष केला आहे. उपचारासाठी कुटुंबाला दिल्लीतील द्वारका येथील स्वतःचे घर विकावे लागले. सध्या ते गाझियाबादमधील दोन खोल्यांच्या छोट्या फ्लॅटमध्ये राहतात. हरीश यांचे वडील अशोक राणा पूर्वी ताज केटरिंगमध्ये नोकरी करत होते. निवृत्तीनंतर त्यांना दरमहा फक्त 3600 रुपयांची पेन्शन मिळते. घरखर्च भागवण्यासाठी ते शनिवार आणि रविवारी गाझियाबादमधील एका क्रिकेट मैदानावर सँडविच आणि बर्गर विकतात.

हरीशच्या उपचारावर दरमहा किमान 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च येतो. गेल्या अनेक वर्षांत औषधे, व्हेंटिलेटर, नर्सिंग आणि देखभाल यावर मोठा खर्च झाल्याने कुटुंब आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचले आहे. त्यातच दीर्घकाळ अंथरुणावर असल्यामुळे हरीश यांच्या शरीरावर गंभीर बेडसोर्स म्हणजे खोल जखमा निर्माण झाल्या आहेत आणि त्यांची प्रकृती सतत खालावत चालली आहे.

हरीश यांची आई निर्मला राणा यांनीच सर्वोच्च न्यायालयात इच्छामरणाची मागणी केली होती. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी मुलाच्या बरे होण्याची आशा गमावली आहे. त्यांच्या पश्चात मुलाची काळजी घेणारे कोणीही नसल्याची भीती त्यांना सतावत आहे. मुलाला अशा अवस्थेत पाहणे त्यांच्या कुटुंबासाठी मानसिकदृष्ट्या अत्यंत वेदनादायक ठरत असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.

दरम्यान, भारतात इच्छामरणाच्या अधिकाराबाबत 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली होती. त्यानुसार अत्यंत गंभीर आणि असाध्य अवस्थेत असलेल्या रुग्णांसाठी काही अटींसह जीवनरक्षक उपचार मागे घेण्याची परवानगी देण्यात आली होती.

हरीश राणा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय मानवी प्रतिष्ठा, करुणा आणि वैद्यकीय नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर; बीड मधील काळाबाजारी कधी बंद होणार ?

0

बीड — सर्वसामान्य जनतेचे गॅस टंचाईमुळे हाल होऊ नयेत यासाठी केंद्र सरकारने एस्मा कायदा लागू केलेला आहे मात्र बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी सर्रास केला जात असल्याने होणारी काळाबाजारी कधी रोखली जाणार असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

जग एकीकडे इंधन टंचाईमुळे त्रस्त आहे. अशावेळी जनतेला घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारने कडक पावलं उचलली आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर बंधन आणल्यामुळे सध्या तरी जनतेला घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध होऊ लागला आहे. इराण युद्धामुळे आणखी किती दिवस इंधन टंचाई जाणवेल याचा अंदाज बांधणं अवघड झालेलं आहे अशावेळी
पेट्रोकेमिकल विभागातून गॅस वळवल्यामुळे दैनंदिन वापराच्या गॅस उत्पादनात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकीकडे केंद्र सरकार राज्य सरकार कडक पावलं उचलत असताना दुसरीकडे मात्र बीड शहरासह जिल्ह्यात
हॉटेल खानावळ, चहाची टपरी, चाट भांडार,धाबे आशा व्यावसायिक ठिकाणी गेल्या सर्रास घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जात आहे. त्यामुळे मोठमोठ्या शहरांमध्ये हॉटेलिंग व्यवसाय धोक्यात आलेला असताना बीडमध्ये मात्र अशा व्यवसायांना कुठलाच फरक पडला नाही.गॅस टंचाई जाणवली नाही. मात्र राजरोस होणाऱ्या या काळाबाजारी मुळे सर्वसामान्य जनतेला गॅस टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी जिल्हा पुरवठा विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत काळाबाजारीला खतपाणी घालत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवला तर याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.व्यावसायिक प्रतिष्ठानासह काळाबाजार करणाऱ्या लोकाविरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होऊ लागली आहे.

महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल; राजभवनात पार पडला शपथविधी

0

मुंबई — जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जिष्णू देव वर्मा यांना प्रशासन आणि राजकारणाचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी तेलंगणा राज्याचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच ते त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून ऊर्जा आणि ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. जिष्णू देव वर्मा हे मूळचे त्रिपुराचे असून त्यांचा संबंध त्रिपुराच्या राजघराण्याशी असल्याचेही सांगितले जाते. त्यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची अधिकृत जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. दरम्यान, त्यांच्या कार्यकाळात राज्यातील विविध प्रशासकीय आणि विकासात्मक कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.