बीड — शेतकऱ्याची संमती न घेता सामूहिक शेती असलेल्या ठिकाणी पवन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या रेन्यू पॉवर या कंपनीचे बीड तालुक्यातील मोरगाव हद्दीमध्ये कार्यालय असून तेथील संबंधित गुत्तेदाराने मनमानी करत शेतकऱ्यांची पूर्ण परवानगी न घेता वहीत शेतामध्ये विद्युत पूल उभे केले असून ते पोल काढून टाकण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे सदर निवेदन संबंधित कंपनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, नेकानूर पोलीस स्टेशन तहसीलदार बीड यांना दिले आहे.
बीड तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी विलास नरहरी चौरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्या रिन्यू पावर कंपनी ही सौर ऊर्जा (पवनचक्की) निर्माण करणारी कंपनी असून या कंपनीचे मोरगाव हद्दीमध्ये मांजरसुंबा लिंबागणेश रस्त्यावर कार्यालय असून या कंपनीने विद्युत लाईन ओढण्यासाठी काही कंत्राटदाराची नेमणूक केली आहे प्रामुख्याने ज्यांच्या वहीती असलेल्या शेतामधून किंवा मालकी हक्कातून पोल किंवा लाईन ओढली जाणार आहे त्यापूर्वी संबंधित शेतकऱ्याची परवानगी घेणे बंधनकारक असताना या कंपनीने मनमानी करत गुत्तेदाराकरवी नियमबाह्यरित्या विद्युत पोल उभे केले आहेत विशेषतः हे पोल उभे करताना ज्या गटातून शेतातून विद्युत लाईन किंवा पॉल उभे केले जाणार आहेत त्या शेतकऱ्यांची संमती घेणे गरजेचे असताना ती घेतली गेली नाही सामूहिक शेती असेल तर सर्वांची संमती घेणे गरजेचे असताना ती घेतली गेली नाही विशेष म्हणजे यापूर्वीच गाव तलावासाठी आमची जमीन शासनाने संपादित केली आहे आणि आमच्या कुटुंबाची उपजीविका आता त्याच वहिती जमिनीवर असल्याने त्याच वहिती जमिनीवर मनमानी पद्धतीने रेन्यू पॉवर कंपनीने व त्यांच्या गुत्तेदाराने विद्युत पूल उभे केल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे भविष्यातही ही जमीन नापीक होऊ शकते तेव्हा माझ्या जमिनीमध्ये उभे केलेले रेन्यू कंपनीने विद्युत पोल त्वरित काढण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे संबंधित कंपनीला निवेदन देण्यासाठी गेली चार दिवस चकरा मारल्या मात्र तेथे कोणीही अधिकारी आढळून आला नाही म्हणून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले
रेन्यू पॉवर कंपनीची मनमानीः संमती न घेता वहीती शेतात उभे केले विद्युत पोल
चोर नेकनूर पोलीस मौसेरे भाई; कोपरापर्यंत ओघळ येईपर्यंत लोकांना खाई; नेकनूरच्या बाजारातून 15 किलो चांदी चोरीला
नेकनूर — ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावीं चा कारभार वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी चक्क नेकनूरसह चौसाळ्याचा आठवडी बाजार चोरांना आंदण दिला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सणाच्या ऐन मोक्यावर नेकनूरच्या आठवडी बाजारातून सराफा व्यापाऱ्याची 15 किलो चांदी असलेली पेटीसह 50 हजार रुपयांची रोकड डल्ला मारून चोर घेऊन गेला. व्यापाऱ्यावर जवळपास 35 लाख रुपयाची संक्रांत आली.विशेष म्हणजे ही घटना पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सकाळी दहाच्या सुमारास घडल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांच्या कृपेने या घटनांमध्ये वाढ झाल्याचा आरोप होऊ लागला आहे. मोबाईल चोरीला गेला, खिसा कापला गेला, महिलांच्या गळ्यातील दागिने गेले तर पोलीस ठाण्यात तक्रारदाराचीच होणाऱ्या उलट तपासणीमूळे नव्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे तक्रारी ही करायला कुणी धजावत नाही तपास व्हायचा तर विषयच येत नाही अशा चोर पोलिसांच्या अडकित्यात जनता मात्र भरडली जात असताना एसपी मात्र कायदा सुव्यवस्थेची घडी बसवल्याचा ढोल कशाच्या जीवावर वाजवत आहेत. असा प्रश्न विचारला जात आहे.
नेकनूर चा आठवडी बाजार जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. पण सध्या तो चोरांचा बाजार बनलं असल्याचं पाहायला मिळत आहे. मोबाईल चोर, खिसे कापू यांना सुगीचे दिवस आले आहेत. जी स्थिती नेकनुर ची तीच चौसाळा बाजार ची. विशेष म्हणजे अशा तक्रारी घेऊन कागदं काळे करायला पोलिसांना वेळ नाही. एखादी मोठी घटना चोरीची अथवा अन्य गुन्ह्यांची घडलीच तर नेकनूर पोलीस ठाण्याला तक्रार द्यायची. पुन्हा दखल घेतली नाही म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सयाजी शिंदेंचा डाळिंबाचा बाग चोरीला गेला. त्याकरता तक्रारदाराला एसपींची भेट घ्यावी लागली. एस पीं नी गुन्हे दाखल करा असे आदेश देण्या ऐवजी विनंतीच्या सुरात चंद्रकांत गोसावींना घ्या तक्रार असं सांगितलं. त्यानंतरही तक्रारीची दखल घेतली नव्हती. माध्यमांनी बोंब ठोकली त्यावेळी कसातरी गुन्हा नोंद केला. तीच स्थिती जोगवा मागून खाणाऱ्या घारगावच्या अंजना बन यांची झाली. देवळात झोपायचं नाही म्हणून एकाने मारहाण केली नाकातली मोरणी चोरली.आजींनी रीतसर तक्रार दिली. एसपींना आत्मदहनाचा इशारा दिला. तरीही दखल घेतली गेली नाही. शेवटी या प्रकरणात देखील माध्यमांना ओरड करण्याची वेळ आली. ओरड होताच तात्काळ कारवाई झाली. आजीला न्याय मिळाला. नेकनूर बस स्थानक, बँक, शिक्षक कॉलनीत चोरीच्या अनेक घटना घडल्या. या प्रकरणांमध्ये देखील काहीच झालं नाही. अनेक शेतकऱ्यांचा दारात ठेवलेला सोयाबीन सारखा माल चोरांनी रात्रीच भरून नेला. त्यातही तक्रार देऊनही पुढे काहीच झालं नाही. पोलिसांना चोर सापडलेच नाही. सापडतील कसे तपास झालाच नाही. ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींना तो करावासा वाटला नाही. आपण तर एसपी चे लाडके म्हणून खाकी वर्दीची इज्जत त्यांनी ठेवली नाही. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी तक्रारदाराने ठाण्याला येण्याची गरज नाही. क्यू आर कोड स्कॅन करा तक्रार दाखल करा असा आधुनिकतेचा मंत्र जनतेला दिला. याचाही ढोल नगारा माध्यमांनी जोरात वाजवला. पण जिथे प्रत्यक्षात तक्रार देऊन काही होत नाही. तिथे क्यू आर कोड ची दखल कोण घेणार? असा प्रश्न जनतेला का पडू नये अशी स्थिती सध्याची तरी आहे.
नेकनूर पोलीस आठवडी बाजारात येणाऱ्या वाहनांना अडवून निधी संकलन करतात. चौसाळ्यात तर “खास” नेकनूर मधून माणूस रिक्षावाल्यांकडून वसुली करण्यासाठी पाठवला जातो.बाजारात चोर चुपचाप खिसे कापून, महिलांचे दागिने लंपास करून, मोबाईल चोरून पोलिसांच्या नाकावर टिच्चून निघून जातात. वसुली पुढे पोलिसांना होणाऱ्या चोऱ्यांशी काहीच देणे घेणे नाही. तक्रार घेऊन एखादा ठाण्यात आलाच तर दाप दडप करून कसा पिटाळून लावायचा त्याचीच उलट तपासणी कशी घ्यायची यामध्ये नेकनूर पोलिसांचा हात कोणीच धरू शकणार नाही अशी स्थिती आहे. आज नेकनूरच्या आठवडी बाजारात पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर बबन पांडुरंग कानडे नावाच्या सराफा व्यापाऱ्याची 35 लाख रुपये किमतीची 15 किलो चांदी असलेली पेटी चोरांनी पळवली. नुसती पेटीच पळवली नाही तर 50 हजार रुपयांची रोकड देखील लंपास केली. संक्रांतीचा बाजार असल्यामुळे व्यापाऱ्यावर देखील सकाळी दहाच्या सुमारास चोरांची संक्रांत आली. चोरांचा दुपारपर्यंत शोध सुरू होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणात तरी पोलीस अधीक्षक सराफा व्यापाऱ्याला न्याय देऊ शकतील का? चंद्रकांत गोसावींच्या कारभाराला आळा घालू शकतील का? गोसावी लाडके आहेत म्हणून पुन्हा त्यांना पाठीशी घातलं जाणार का? यासारखे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
माजलगावमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई; दोघे ताब्यात, चौघांवर गुन्हा दाखल
माजलगाव — तालुक्यामध्ये धार्मिक कार्याच्या नावा खाली बेकायदेशीर निधी जमवण्याच्या आरोपावरुन चार जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.अहिल्यानगरमधील वैध ट्रस्टचा नोंदणी क्रमांक चोरी करून बनावट ट्रस्ट तयार करुन हा निधी गोळा केला जात होता.लातूरमध्ये पाच वेगवेगळी खाते उघडून धार्मिक कामाच्या नावाखाली चार कोटी ७३ लाख ६७ हजार ५०३ रुपयांचा निधी जमा करण्यात आला.
संबंधित रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरण्यात आल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराजवळील पात्रुड गावात गुरुवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास छापा मारून दोघांना ताब्यात घेतले. तर चार जणांविरुद्ध माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईबाबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी दुजोरा दिला आहे.
इमरान कलीम शेख (सदर बाजार, अंबाजोगाई), मुज्जम्मिल नूर सय्यद (सत्तार गल्ली पात्रुड), अहमदुद्दीन कैसर काझी (रोजा मोहल्ला, केज) व तौफीक जावेद काझी, अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील मुज्जम्मिल नूर व अहमदुद्दीन काझी या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या संदर्भाने मिळालेल्या माहितीनुसार वरील आरोपींनी पात्रुडमध्ये गुलजार ए रझा या नावाच्या ट्रस्टचा फलक लावला होता. निती आयोगाच्या नियमानुसार ट्रस्टची नोंदणी दर्पण पोर्टलवर करणे आवश्यक आहे.
मात्र, गुलजार ए रझाचे चुकीच्या पद्धतीने नोंदणी केल्याचे कागदपत्रांच्या पडताळणीमध्ये आढळून आले. या न्यासाच्या नावाने लातूरमधील ॲक्सिस बँकेमध्ये पाच बोगस खाते तयार करण्यात आले होते. त्यामध्ये चार कोटी रुपये जमा करण्यात आले होते. हा निधी धार्मिक कामाच्या संदर्भाने जमा करण्यात येत असल्याची माहिती आहे. गुलजार ए रझाची बीड जिल्ह्यातील ११ ही तालुक्यांमधील दुय्यम निबंधक कार्यालयांकडून माहिती घेतली असता तेथेही त्यांची नाेंदणी आढळून आली नाही.
महाराष्ट्रामध्ये काेणत्याही ट्रस्ट किंवा संस्थेने त्यांची नाेंदणी धर्मादाय आयुक्तांकडे करणे आवश्यक आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडूनही वरील ट्रस्टची माहिती घेतली असता त्यांच्याकडे नाेंदणी नसल्याचे कळवले आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ज्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे ताे इम्रान शेख हा गुलजार ए रझा ट्रस्टचा अध्यक्ष, सय्यद मुज्जम्मिल हा उपाध्यक्ष, असमदुद्दीन कैसर काझी हा सचिव तर ताैफीक काझी याचा विश्वस्त म्हणून बँकेच्या खात्यांमध्ये नाेंदणी असल्याची माहिती पुढे आली आहे.
गणेश डोंगरेंच्या कुटुंबांला न्याय मिळण्यासाठी अजित पवारांचा कारखाना बंद पाडला
धाराशिव — काही दिवसांपूर्वी ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांचा ऊस कारखान्यात ट्रॉलीखाली दबून मृत्यू झाला होता. या प्रकरणी डोंगरे कुटुंबीयांना मदत मिळावी, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कारखान्यावर ऊसतोड कामगारांनी तीव्र आंदोलन केलं.डोंगरे यांच्या नातेवाईक आणि आंदोलकांनी कारखानाच बंद पाडला.
रील स्टार आणि ऊसतोड मजूर असलेल्या गणेश डोंगरे याचा ३ जानेवारी २०२५ रोजी उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार कारखान्यावर ऊस ट्रॉलीच्या अपघातामध्ये मृत्यू झाला होता. गणेश डोंगरेच्या मृत्यू नंतर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. घटनेला ६ दिवस उलटले तरी कारखाना प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. एवढंच नाहीतर डोंगरे कुटुंबीयांना मदतही दिली नाही.
त्यामुळे डोंगरे कुटुंबीय आणि स्थानिकांनी कारखान्यासमोर जोरदार आंदोलन केलं. मयत गणेश डोंगरे याच्या पश्चात ३ लहान मुलं आहे. त्याच्याा कुटुंबीय आणि मुलांना दहा लाखाची मदत करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. पण, कारखाना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे कारखान्यावर अपघातामध्ये मृत झालेल्या गणेश डोंगरेच्या कुटुंबाला मदत न केल्यामुळे नातेवाईक आक्रमक झाले. कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उतरून महिला मुला बाळांसह आंदोलन केलं.
यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी उमरगा तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा क्यू एनर्जी संचलित भाऊसाहेब बिराजदार कारखाना बंद पाडला. या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. कारखान्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.कारखाना प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत कारखान्याच्या गव्हाणीमध्ये नागरिकांनी ठिय्या मांडला. कारखान्याचे गाळप पूर्णतः बंद पाडले. या आंदोलनात गणेश डोंगरे यांच्या पत्नी अश्विनी डोंगरे, त्यांच्या तीन लहान मुली, भाऊ, आई सहभागी झालेल्या असून आंदोलकांनी कारखाना प्रशासनासमोर गणेश डोंगरेंच्या तिन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी १० लाख रुपये आणि जखमींना दोन लाखांची मदत द्यावी, अशी मागणी केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
बीडच्या सहयोग नगर मधील स्क्रॅप गोडाऊनला आग; आगीत मोठे नुकसान
बीड — शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेल्या सहयोगनगर परिसरारतील गणपती मंदिराजवळ एका गल्लीत स्क्रॅप गोडाऊनला आज सकाळी अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने आक्राळविक्राळ रुप धारण केल्याने परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बीड नगरपालिकेकडे अग्निशामक दलाची गाडी नसल्याने आग विझविण्यासाठी नागरिकांना खासगी टँकरसह स्थानिक बोअरवेलमधून पाणी उपसावा लागला. तब्बल एका तासाच्या प्रयत्नानंतर सदरील आग आटोक्यात आली.
बीड न. प.अग्निशामक दलाकडे चार अग्निशामक गाड्या आहेत त्या तात्काळ दुरुस्त करून सेवेत दाखल करण्याच्या सूचना आ. विजयराजे पंडित पालिका प्रशासनाला यावेळी दिल्या.जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घेण्याचा निर्णय घेतलेला असून त्या लवकरच बीडकरांच्या सेवेत दाखल होतील असे ही आ. पंडित यांनी सांगितले.
अग्निशामक दलाचे बंब उपलब्ध नसल्याने नागरिकांत नाराजीचा सूर पहावयास मिळाला. शहरात एखादी मोठी आग लागली तर ती विझवायची कशी ? असा प्रश्नही या वेळी उपस्थित झाला. या आगीत मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
बीड शहरातल्या सहयोगनगर परिसरात गणपती मंदिराजवळ एका गल्लीत अग्रवाल यांचे स्क्रॅप गोडाऊन आहे. आज या गोडाऊनला अचानक आग लागली. बघता बघता आगीने मोठे स्वरुप धारण केले. सदरचं गोडाऊन हे मध्यवर्ती वस्तीत असल्याने आजुबाजुच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरले. त्यामुळे काही काळ या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी परिसरातील नागरिकांनी आपल्याकडील आहे त्या भांड्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला. खासगी टँकरही बोलवण्यात आलं. स्थानिक नागरिकांच्या घरातले बोअर चालू करून ही आग विझविण्याचा प्रयत्न झाला. अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण; बीड जिल्ह्यात 256 रेकॉर्ड ब्रेक आत्महत्या
शेतकऱ्यांची घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं
बीड — मराठवाड्यात २०२५ या वर्षात एकूण ११२९ शेतकरी आत्महत्या झाल्या असून, त्यामध्ये बीड जिल्ह्यातील २५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत मरणाला कवटाळले आहे. मागील दोन वर्षांपासून बीड जिल्हा मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये आघाडीवर असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
शासन व प्रशासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, “सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण” या घोषणेच्या निषेधार्थ आज शुक्रवार दि. ०९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ” सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण” घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करण्यात आली.
ही निदर्शने सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
यावेळी आंदोलकांनी सरकार व प्रशासनाने केवळ फोटोसेशनपुरते मर्यादित न राहता शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस व परिणामकारक पावले उचलावीत अशी ठाम मागणी केली.
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांची मालिका सुरूच असून, त्यामागे कर्जबाजारीपणा, नापिकी, सावकारांचा विळखा, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे, तसेच प्रशासनाची उदासीनता ही प्रमुख कारणे आहेत.
२०२४ मध्ये मराठवाड्यात ९८४ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या, तर २०२५ मध्ये हा आकडा वाढून ११२९ वर पोहोचला आहे.
यावर्षी मराठवाड्यावर आसमानी संकट कोसळल्याने ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.
सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण ठरत असून, प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांनी निव्वळ दिखाऊ उपाय न करता शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठोस धोरणे तात्काळ राबवावीत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले. यावेळी आंदोलनात माजी सैनिक अशोक येडे ( जिल्हाध्यक्ष,आम आदमी पार्टी ,रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), कुलदीप करपे ( जिल्हाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना ) शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, सुहास जायभाये , माहिती आधिकार कार्यकर्ते शेख मुबीन , पांडुरंग हराळे , गणेश नाईकवाडे (जिल्हाध्यक्ष मराठा महासंघ),प्रा.डी.जी.तांदळे(अध्यक्ष म.रा.किसानसभा जि.बीड, प्रा.राजकुमार यादव, डॉ.संजय तांदळे आदी सहभागी होते.
ट्युशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन अत्याचार
केज — ट्युशनला जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे भरदिवसा कारमधून अपहरण करून तिला निर्जन डोंगराळ भागात नेण्यात आले आणि तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे. केज तालुक्यातील एका गावात राहत असलेली अल्पवयीन मुलीची आरोपी धीरज सांजुरे याच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचा गैरफायदा घेत धीरज सांजुरे याने ६ जानेवारी रोजी पीडितेला फिरायला जाण्याचे आमिष दाखवलं. त्यानंतर पीडिता ७ जानेवारीला सकाळी ट्युशनला जाण्यासाठी सकाळी साडे नऊ वाजता निघाली होती. धीरज सांजुरे त्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात थांबवलं. तिला कारमध्ये बसवलं आणि धारूर तालुक्यातील अंबाचोंडी येथील डोंगरात नेलं. डोंगरात एका
निर्जनस्थळी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीनं ही माहिती तिच्या पालकांना दिली. पालकांनी पीडित मुलीसह केज पोलिस स्टेशन गाठून या घटनेची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू होणार; 12 जिल्ह्यातील निवडणुकांची घोषणा लवकरच
मुंबई — ग्रामीण भागातील राजकारण तापवणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.आरक्षणाच्या पेचामुळे रखडलेल्या या निवडणुकांबाबत निवडणूक आयोग सक्रिय झाला असून, येत्या दोन ते तीन दिवसांत अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात सध्या ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. यामधील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपून बराच काळ लोटला आहे, सध्या प्रशासकीय राजवटीतून कारभार सुरू आहे.
मात्र, यापैकी २० जिल्हा परिषदांमध्ये आणि त्याअंतर्गत ८८ पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची एकूण मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक असल्याने त्या ठिकाणच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जानेवारीला होणार असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आरक्षण मर्यादा कायदेशीर चौकटीत असलेल्या १२ जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची तयारी आयोगाने जवळपास पूर्ण केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार, कायदेशीर अडथळे नसलेल्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका घेण्याची प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकारण तापणार असून, आगामी विधानसभा व लोकसभा राजकारणालाही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत होणारी निवडणूक घोषणा ही केवळ प्रशासनिक प्रक्रिया न राहता, राज्याच्या राजकीय भवितव्याला दिशा देणारी ठरणार आहे.
पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील चार जिल्हे
पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये मतदार याद्या, प्रशासकीय तयारी आणि संभाव्य आचारसंहिता लागू करण्याबाबत प्राथमिक नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास 7 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
बीड — शिरूर पोलिस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या वडीलांकडून मारहाण करत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तब्बल 16 महिन्यानंतर या प्रकरणात नराधम बापाला दोषी धरत न्यायालयाने सात वर्ष सक्षम कारवासासह वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी वेगवेगळी शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,16 ऑगस्ट 2024 रोजी 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच बापाकडून मारहाण करत वारंवार लैंगिक अत्याचार केला गेला.या प्रकरणी 18 ऑगस्ट 2024 रोजी शिरूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरनं 147/2024 या अंतर्गत पोस्कोसह लैंगिक अत्याचार प्रकरणातील कलम लावण्यात आले होते. कलम 74,75,76,115 अधिनियम 2012 अंतर्गत कलम 10 व
12 अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. पिडीत अल्पवयीन मुलीचा जबाब, साक्षीदारांचे जबाब आवश्यक असलेले महत्वाचे पुरावे गोळा करून तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल केले होते. हा खटला न्यायमुर्ती एस.एस.घोरपडे विशेष सत्र न्यायालय बीड यांच्या न्यायालयात चालल्यानंतर सबळ पुरावे, पिडीतेची साक्ष या सारख्या बाबी आरोपीस दोषी ठरविण्यास कारणीभूत ठरले. त्यामुळे पोस्को कलम 10 अंतर्गत 7 वर्षाची सक्त मजूरी, पोस्को कलम 12 अंतर्गत 3 वर्षाची सक्त मजूरी, बीएनएस कलम 115 अंतर्गत 6 महिने शिक्षा, आर्थीक दंड व पिडीतेस भरपाई अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ए.बी.तिडके यांचा युक्तीवाद व पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गोविंद सानप यांची भूमिका महत्वाची ठरली.
एस पी साहेब अजून किती देणार लाडक्या गोसावींना पाठबळ; 78 वर्षाच्या आज्जी न्यायासाठी आत्मदहन करायला हतबल
बीड — पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी पोलीस प्रशासन किती लोकाभिमुख केलं याची टिमकी नववर्षाच्या स्वागताला वाजवली त्याचा भांडाफोड करण्याची वेळ आली आहे.एसपींच्या खास मर्जीतले नेकनूर चे ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावी यांनी 78 वर्षीय अंजना बन नावाच्या आज्जीला न्यायासाठी आत्मदहन करण्याची वेळ आणली आहे. 11 जानेवारीला नेकनूर पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा इशारा 10 दिवसापूर्वीच देऊनही पोलीस अधीक्षकांनी देखील कुठलीच दखल घेण्याची तसदी घेतली नसल्याचं पाहायला मिळत आहे.
. बीड जिल्ह्यात खून, दरोडे, चोऱ्या, गोळीबार, अपहरण, राजरोस चालणारे अवैध धंदे यांच्यापुढे हे प्रकरण तसं पाहिलं तर अतिशय क्षूल्लक आहे.पण पोलीस अधीक्षकांनी नववर्षाच्या स्वागतालाच किती लोकाभिमुख कामं केली आहेत.पोलीस प्रशासन किती सतर्क आहे. याचा ढोल वाजवला. तो वाजवायला ही हरकत नाही. पण कायदा सुव्यवस्था आणि एस पी चा आदेश कितपत मानला जातो. हा खरा प्रश्न सगळ्याच परिस्थितीतून निर्माण होतो. एसपींनी मर्जीतली माणसं अनेक ठिकाणी जनतेच्या माथी बळच मारली. अनेक वेळा कंट्रोलला बसवा असे सांगूनही एसपींनी त्यांच्या विनंतीला मान दिला नाही. मग काय? नंगा नाच करायला अख्खं रान यांना कमी पडू लागलं. अवैध धंद्यांची भरमार झाली. त्यातून स्वतःचे बंगल्यांचे इमले बांधले गेले. ही कहाणी आहे एसपींच्या मर्जीतल्या नेकनूरच्या ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावी ची त्याच्या अकार्यशैलीची गौरव गाथा माध्यमांनी अनेक वेळा मांडली.पण पिंडीवरच्या विंचवाला ठेचायचं कसं हे माध्यमांना देखील कळालं नाही. शेवटी अनेकांनी आपल्याच पापाचे भोग आहेत म्हणून घडतय ते घडू द्या म्हणून गोसावी चा नंगानाचाकडे दुर्लक्ष केलं.पण लोकाभिमुख प्रशासनाचा ढोल वाजवला त्यामुळे सत्य सांगण्यासाठी अशा गोष्टी पुढे आणण्याची वेळ “सह्याद्री माझा”वर आली.
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील घारगाव येथील अंजना दगडू बन या 78 वर्षाच्या आज्जीवर न्यायासाठी आत्मदहनाची वेळ चंद्रकांत गोसावी यांनी आणली अंजना बन या गावाकडे एकट्याच राहतात परडी चा जोगवा मागून उदरनिर्वाह करतात परडी हेच एकमेव त्याचं जगण्याचं साधन. घरी कुणीच नसल्यामुळे मंदिरात झोपण्याच्या कारणावरून गणेश अंकुश सपकाळ याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. नुसती धमकीच दिली नाही तर नाकातली सोन्याची “मोरणी” काढून घेतली. याची रीतसर तक्रार नेकनूर पोलीस ठाण्याला दिली. तक्रारीला दीड महिना उलटून गेला मात्र कुठलीच कारवाई झाली नाही. चौसाळा पोलीस चौकीचा जमादार गर्जे याने तक्रार करणाऱ्या आज्जीलाच दापदडप करायला सुरुवात केली. “चोराला मेसाई धार्जिन” या म्हणीप्रमाणे “चोराला गोसावी धार्जीन” असं म्हणण्याची वेळ आणली. आज्जीने चंद्रकांत गोसावी ची देखील भेट घेतली. नातवासारख्या असलेल्या गोसावींनी देखील आज्जीची फरपटच केली. गर्जेची व आरोपीची बाजू घेतली. शेवटी अंजना बन यांनी 29 डिसेंबर 2025 रोजी येत्या आठ दिवसात गर्जे साहेब व गोसावी तसेच आरोपीवर कारवाई केली नाही तर 11 जानेवारी 2026 ला नेकनुर पोलीस ठाण्यात आत्मदहन करणार असल्याच निवेदन पोलीस अधीक्षकांना दिलं. पोलीस अधीक्षकांनी देखील पिंडीवरच्या विंचवालाच नेहमीप्रमाणे वरदान दिलं. निवेदन देऊन दहा-बारा दिवस होत आले तरी कुठलीच कारवाई कांवत यांनी देखील केली नाही. आत्मस्तुतीच्या ढोलाच्या आवाजात म्हाताऱ्या जोगवा मागून खाणाऱ्या निराधार आज्जीची आर्त हाक स्वतःला कर्तव्यदक्ष समजणाऱ्या पोलीस अधीक्षकांच्या कानावर गेली नाही. जर इतकी बिकट परिस्थिती असेल तर पोलीस अधीक्षकांनी प्रशासनाला लोकाभिमुख केल्याचे ढोल वाजवणं बंद करावं अशी मागणी जनतेतून केली जाऊ लागली आहे.











