Home Blog Page 21

शिवसेना कोणाची?बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीदिनी ठरणार

0

 नवी दिल्ली — शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. शुक्रवारी 23 जानेवारीपासून ही सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे याबाबतची अंतिम सुनावणी आजपासुन सर्वोच्च न्यायलायत सुरु होणार होती.
सुनावणी सुरु होण्यापूर्वीच पुढची तारीख मिळाली आहे. येत्या 23 जानेवारीपासून सुनावणी सुरु होणार आहे, विशेष म्हणजे 23 जानेवारी रोजी शिवसेना स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी सुनावणीला सुरुवात होऊन जन्मशताब्दी वर्षात तरी पक्ष आणि चिन्ह कोणाचे याचा निर्णय होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या नाव आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. आज अंतिम सुनावणी घेऊन पुढील दोन-तीन दिवसांमध्ये निर्णय येण्याची शक्यता होती. मात्र आज पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली. 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सुनावणी घेतली जाईल असे आज कोर्टाकडून सांगण्यात आले.

अंतिम सुनावणीसाठी पाच तासांचा वेळ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वकिलांना देण्यात येणार होता. मात्र आज सॉलिसिटर जनरल यांना दुसऱ्या एका प्रकरणात सुनावण्यासाठी जावे लागणार असल्यामुळे त्यांनी वेळ वाढवून मागितला. त्यावर कोर्टाने दोन्ही पक्षकारांची मते जाणून घेतली आणि शुक्रवारी 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सुनावणी घेण्याचे ठरले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष आणि त्यांचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. विधिमंडळातील त्यांच्या आमदारांच्या संख्येच्या आधारे आयोगाने त्यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केले. हाच निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायम ठेवत विधिमंडळातही शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निवाडा दिला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. साधारण साडेतीन वर्षांपासून हा खटला सुरु आहे. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक झाली. 2019 च्या विधानसभेचा कार्यकाळ संपला, त्यामुळे शिंदेंसह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवरील अपात्रतेचा खटला निवाड्याविनाच राहिला. मात्र शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे कोणाचे या खटल्याला फक्त तारखा मिळत आहेत. दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयात चार सरन्यायाधीश येऊन गेले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठासमोर हा खटला आहे. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ आहे. तर यंदाचे वर्ष हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या जयंतीदिनी खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होऊन याच वर्षात हा निकाल लागेल अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शाळेत प्रचंड गैरसोय आम्ही यशाचं स्वप्न बघायचंच नाही का? विद्यार्थिनीच उपमुख्यमंत्र्यांना पत्र; अजित काका न्याय देणार का?

0

बीड — जिल्ह्यातील परभणी केसापुरी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या अंकिता कवचट या विद्यार्थिनीने शाळेत मूलभूत सुविधाच मिळत नसल्याच सांगत
होणाऱ्या कथित भ्रष्टाचाराबाबत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पत्राची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून प्रशासन याची काय दखल घेते तसेच पालकमंत्री या विद्यार्थिनीला न्याय देणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून समाजसेवक गणेश ढवळे लिंबागणेश कर हे सातत्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेल्या असुविधा विरोधात आवाज उठवत आहेत.आंदोलनही करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातच आता परभणी केसापुरी येथील अंकिता कवचट विद्यार्थिनीला शाळेमध्ये असलेल्या गैरसोई विरोधात दुर्दैवाने थेट अजित पवारांपाशीच पत्रव्यवहार करून कैफियत मांडावी लागली.अंकिताने आपल्या पत्रात शाळेची दयनीय अवस्था अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडली आहे. शाळेत पिण्याचे स्वच्छ पाणी नाही, स्वच्छतागृहांची अवस्था खराब आहे, वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे, बसण्याची योग्य सोय नाही तसेच शैक्षणिक साहित्याचाही अभाव आहे, असे तिने नमूद केले आहे. कागदोपत्री खेळाचे साहित्य, पाणी फिल्टर, प्रोजेक्टर व इतर साहित्य दाखवले जाते; मात्र प्रत्यक्षात ते शाळेत उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही तिने पत्रात स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाबाबत गावच्या सरपंच प्रतीक्षा शिंदे यांना विचारणा केली असता, आमच्या गावातील विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण आहेत, हे माहिती आहे, हाच आमच्या गावचा खरा विकास आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच संबंधित विद्यार्थिनीला भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एका विद्यार्थिनीने धाडसाने आवाज उठवत थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आपली व्यथा पोहोचवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, या पत्रामुळे ग्रामीण भागातील शाळांची वास्तविक परिस्थिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून प्रशासनाकडून यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिमुकल्या मुलीने पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय ?

प्रति, अजित काका उर्फ दादा पवार

विषय – आमच्या शाळेसाठी मदत हवी आहे काका आदरणीय अजित दादा पवार साहेब (उपमुख्यमंत्री व पालकमंत्री बीड जिल्हा)

नमस्कार दादा आणि माझे काका मी बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारी एक साधी मुलगी आहे. आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या माणसाला पत्र लिहीत आहे. हात थरथरतोय पण मनातलं दुःख कोणाला तरी सांगायलाच हवं म्हणून धीर करून हे पत्र लिहीत आहे.
दादा आमची ही शाळा नावापुरती नसून आमच्यासाठी ज्ञानमंदिर आहे. येथील सर्व शिक्षक वृंद आमच्यासाठी शिकवताना आमच्या भविष्यासाठी ज्ञानार्जनाची शिदोरी आमच्या कायम पाठीशी उभे राहतील, इतके ज्ञानी, सज्जन आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक वृंद आम्हाला लाभले आहेत. पण तिथे शिकण्यासाठी कुठलीच सोय नाही, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, नाही हात धुण्यासाठी हँडवॉश नाही, खेळण्यासाठी साधं साहित्यही नाही, तरीही आम्ही शाळेत येतो. कारण आम्हाला शिकायचं आहे. पण दादा कागदावरच मात्र सगळं आहे असं दाखवलं जातं. आमच्या शाळेत सगळी व्यवस्था झाली आहे, असं सांगून लाखो रुपये काढले गेले आहेत, असं आम्हाला कळतंय. सरपंच बाईंचे पती हे सगळं पाहतात म्हणे, पण आम्हाला मात्र काहीच मिळालेलं नाही. आम्ही रोज रिकाम्या डोळ्यांनी शाळेकडे पाहतो. दादा आम्ही काय आयुष्यभर ऊसतोड मजूरच बनायचं का? आणि स्वप्न नाहीत का ? आम्हालाही डॉक्टर, शिक्षक, अधिकारी व्हायचं आहे. पण शाळेतच सोय नसेल तर आम्ही कसं पुढे जाणार? काका तुम्ही आमचे पालकमंत्री आहात, हा तुमचा जिल्हा आहे, आम्ही फार काही मागत नाही, फक्त शिकण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा, स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय, खेळाचे साहित्य आणि आमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी व्यवस्था द्या. दादा हे माझं पत्र वाचताना कदाचित तुम्हाला मी फार लहान वाटेल. पण आमचं दुःख मोठा आहे. एकदा तरी आमच्या शाळेकडे लक्ष द्या. तुमच्या एका निर्णयाने आमचा आयुष्य बदलू शकत.

आपलीच
परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील एक विद्यार्थिनी

“ज्ञानराधा बँक” घोटाळ्याचे आरोपी कुटे पती-पत्नीला आणणाऱ्या पोलीस व्हॅनची मोटार सायकल ला धडक; 2 गंभीर जखमी

0

नेकनूर — ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले मुख्य आरोपी सुरेश कुटे आणि त्यांची पत्नी अर्चना कुटे यांना केज येथून बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी त्यांना पोलीस व्हॅन मध्ये घेऊन येत असताना भीषण अपघात  आज सायंकाळी झाला. नेकनूर–येळंब रस्त्यावर पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या व्हॅन ची एका मोटरसायकलशी समोरासमोर धडक झाली.

या अपघातात मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय अक्षरशः तुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. अपघात इतका भीषण होता की मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जखमी मोटरसायकलस्वाराला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या अपघातात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अर्चना कुटे यांनाही दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावरही वैद्यकीय तपासणी करून उपचार करण्यात येत असून प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी सुरेश कुटे यांना कोणतीही गंभीर दुखापत झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे काही काळ नेकनूर–येळंब रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात येत असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेग, रस्त्याची परिस्थिती अथवा निष्काळजीपणा यापैकी कोणते कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणातील आरोपींच्या प्रवासादरम्यान झालेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

चौसाळा : कला व विज्ञान महाविद्यालया तर्फे भव्य क्रिकेट स्पर्धा; स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

0

चौसाळा — कला व विज्ञान महाविद्यालय शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित ग्रामीण भव्य टेनिस बॉल स्पर्धा चौसाळा कॉलेज प्रीमियर लीग CCPL वर्ष १ पहिले चे आयोजन दि २१/०१/२०२६ पासून महाविद्यालयाच्या मैदानावर केले असून, स्पर्धेचे उद्घाटन नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. योगेश भैय्या योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते बुधवारी सकाळी ११:०० वाजता संपन्न होणार असल्याची प्राचार्य डॉ. पंडित खाकरे यांनी माहिती दिली असून स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात सुरु आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक २१००० रु. व स्मृती चिन्ह महाविद्यालया तर्फे तर द्वितीय पारितोषिक १५००० रु.व स्मृती चिन्ह भूषण पेट्रोलियम, भूषण मनोहर झोडगे, व हॉटेल गंधर्व. रमेश कळासे यांच्या तर्फे देण्यात येणार असून तृतीय पारितोषिक ११००० रु. स्मृती चिन्ह वैद्यकीय अधिकारी चौसाळा डॉ. वैभव मोटे यांच्या कडून.चतुर्थ पारितोषिक ७०००रु. आर.एस. तांगडे पेट्रोलियम, सिद्धार्थ एनर्जी स्टेशन चौसाळा तर्फे दिले जाणार आहे.याशिवाय उत्कृष्ट गोलंदाज २५००रु. उत्कृष्ट फलंदाज २५००रु. जय मल्हार फर्निचर चौसाळा यांच्या तर्फे उत्कृष्ट फिल्डर २५००रु. व ट्रॉफी शिल्ड हे शिशीर गेस एजन्सी अशोक शिंदे चौसाळा ,यांच्याकडून देण्यात येणार असून स्पर्धेत सहभाग प्रवेश फी. २१०० रु. ठेवण्यात आलेली आहे. अधिकाधिक संघाने सहभागी होण्याचे आवाहन क्रीडा विभाग प्रमुख डॉ. संजय कदम, डॉ. शानुर सय्यद यांनी केली आहे. तर स्पर्धा यशस्वी नियोजनासाठी डॉ. सुधाकर वणवे , प्रा. गणपती ढवळशंख , प्रा.डॉ. विलास भिल्लारे, प्रा.सुधीर माने,प्रा.डॉ. पंढरीनाथ हिरवे, प्रा. डॉ.कुशाबा साळुंके, डॉ.प्रशांत साबळे, प्रा.सुधीर तेलप, प्रा. विकास शिंदे व खेळाडू संजय बांगर,डॉ.प्रशांत (दादा ) जोगदंड पाटील, विपुल चव्हाण,अरबाज मुलाना. सह प्राध्यापक कर्मचारी,खेळाडू विशेष प्रयत्न करत आहेत.

अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाच्या स्थगितीमुळे “त्या” प्रकरणातही मूंडेंना मोठा दिलासा

0

परळी — माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्यासाठी २०२४ ही वर्ष कठीण होते. या वर्षात त्यांना अनेक प्रकारचे आरोप, बदनामी आणि हकनाक त्रास सहन करावा लागला. मात्र वर्ष सरत आले तसे विविध न्यायालयीन लढाईत धनंजय मुंडे जिंकत गेले आणि न्यायालयीन निकालांचे कल मुंडेंच्या पथ्यावर पडल्याने त्यांचे ग्रहमान बदलले असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

२०११-१२ मध्ये आपल्या प्रस्तावित जगमित्र कारखान्यासाठी जमीन खरेदी केली त्याविरुद्ध संबंधित विक्रेत्याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिस तपासात त्यातील आरोपांमध्ये तथ्य आढळले नाही, त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही, मात्र फिर्यादीने उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आणि मुंडेंच्या विरोधात खटला सुरू झाला. अंबाजोगाई कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात धनंजय मुंडे व अन्य तिघांना दोषमुक्त केले होते. त्यानंतर फिर्यादीने जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले, त्या आव्हान याचिकेनंतर खटला पुन्हा सुरू होईल अशी परिस्थिती निर्माण झाली असता मुंडेंच्या वकिलांनी स्थगिती अर्ज दाखल केला व न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली. तसेच मुंडेना अपील करण्यासाठी पुरेसा वेळ देखील दिला, त्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला.

स्थानिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दोषमुक्त करून देखील त्यांना या प्रकरणात नाहक बदनामी सहन करावी लागली होती.

उच्च न्यायालयासह विविध निकाल मुंडेंच्या पथ्यावर

याआधी देखील धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री कार्यकाळात केलेल्या खरेदी वरून घोटाळा झाल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत मुंडेंच्या विरोधातली याचिका तथ्यहीन असल्याचा निवाडा देत याचिका फेटाळून लावली इतकेच नाही तर याचिका कर्त्या व्यक्तीस एक लाखांचा दंड ठोठावला. संबंधिताने आपली चूक मान्य करत तो दंड भरला सुद्धा! मात्र याही प्रकरणात धनंजय मुंडे यांना टोकाची बदनामी आणि ट्रोलिंग सहन करावी लागली.

इतकेच नाही तर धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या शपथपत्रात दिलेल्या माहितीबाबत परळी येथील न्यायालयात याचिका दाखल करून मुंडेंची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याही प्रकरणात परळी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी अंतिम निकाल दिला असून संबंधित याचिका फेटाळून लावली आहे.

एका पाठोपाठ एक न्यायालयीन प्रकरणांमध्ये क्लीन चिट मिळालेली पाहता ही प्रकरणे केवळ मुंडेंच्या बदनामी साठी दाखल करण्यात आली होती, हे स्पष्ट होत आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीड जिल्ह्यातील कथित हत्या प्रकरणात करण्यात आलेल्या चौकशी किंवा तपासात धनंजय मुंडे यांचा कुठेही संबंध किंवा नाव आलेले नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच केली होती. त्यामुळे एकूणच न्यायालयीन निकाल हे धनंजय मुंडे यांच्या बाजूने लागत असून न्यायदेवतेच्या समोर मुंडेंच्या बदनामीचा उद्देश समोर येत असलेल्या निकालातून हाणून पडल्याचे दिसून येते आहे.

वरिष्ठ जीएसटी अधिकाऱ्याचा मृतदेह कारमध्ये आढळला; घातपाताचा संशय

0

बीड — शुक्रवारी सकाळी ड्युटीला घरातून बाहेर पडलेले जीएसटी अधिकारी सचिन जाधवर घरी परतलेच नाहीत. सकाळी यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर त्यांचा मृतदेह कपिलधारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कमानीजवळ कारमध्ये आढळून आला. अधिकाऱ्याच्या या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने खळबळ माजली आहे.
सचिन नारायण जाधवर वय 45 वर्ष रा.चूंब ता बार्शी, ह.मू. बीड असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे.जाधवर हे वस्तू व सेवा कर विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते.सचिन जाधवर हे शुक्रवारी रात्रीपासून बेपत्ता होते.ते घरी न परतल्याने आणि त्यांचा संपर्क होऊ न शकल्याने कुटुंबीय काळजीत होते. रात्रभर शोध घेऊनही ते न सापडल्याने अखेर त्यांच्या नातेवाईकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.पोलीस जाधवर यांचा शोध घेत असतानाच आज शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या कपिलधारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कमानी जवळ बायपास रोडवर एक कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याची माहिती मिळाली.परिसरातील ग्रामस्थांनी ही माहिती बीड ग्रामीण पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन उभ्या असलेल्या चारचाकी गाडीची तपासणी केली असता, गाडीमध्ये सचिन जाधवर यांचा मृतदेह आढळून आला. एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्याचा मृतदेह अशा प्रकारे महामार्गालगत सापडल्याने पोलिसांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
जाधवर यांचा मृत्यू नैसर्गिक आहे, की त्यांनी आपल्या आयुष्याची अखेर केली, की हा घातपाताचा प्रकार आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. नातेवाईकांकडून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. ते रात्री नेमके कोणाला भेटायला गेले होते? त्यांच्यावर काही मानसिक दडपण होते का? या बाबींचा शोध घेतला जात आहे.या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि जाधवर यांचे कॉल डिटेल्स तपासण्याचे काम पोलिसांनी करावे अशी नातेवाईकांची मागणी आहे बीड ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.

एपीआय चंद्रकांत गोसावी यांना मातृ शोक !

0

बीड — नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मातोश्री श्रीमती शोभा गोसावी (वय 65 वर्ष ) यांचं पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे उपचारादरम्यान निधन झालं.
श्रीमती शोभा गोविंद गोसावी अतिशय धार्मिक स्वभावाच्या होत्या. हरिनाम सप्ताह असो की कुठलाही धार्मिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती आवर्जून असायचीच. चारीधाम यात्रेसाठी पश्चिम बंगालमधील गंगासागरला त्या गेल्या होत्या.या ठिकाणी सोमवारी त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्यावर कलकत्ता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच सायंकाळी सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवार दि. 15 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या विठ्ठल वाडी येथील गोसावी मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावाई, नातवंड असा परिवार आहे.
“सह्याद्री माझा” परिवार गोसावी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.

अंकुश नगर हत्या प्रकरण; हत्येचं चक्रावणार कारण समोर

1

बीड — शहरातील अंकुशनगर भागात नगरपालिका कंत्राटी कर्मचारी हर्षद शिंदे वय-38 वर्षे याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांना या हत्त्ये मागच्या कारणाचा शोध घेण्यात यश आले आहे. आरोपी विशाल सूर्यवंशी आता पोलिस कोठडीत आहे. या घटनेमागचं कारण ऐकून पोलिसही चक्रावून गेले आहेत. लहानपणी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी आपण हर्षदचा काटा काढल्याची कबुली आरोपीनं दिली आहे.

अंकुशनगर भागात हर्षद शिंदेची मंगळवारी (6 जानेवारी) रोजी विशाल सूर्यवंशी या तरुणाने निर्घृण हत्या केली होती. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाल्यानंतर आरोपी विशाल सूर्यवंशी याला शिवाजीनगर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून रविवारी (11 जानेवारी) ताब्यात घेतले. आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिस तपासातून हर्षद शिंदेच्या हत्याकांडामागचे खरे कारण समोर आले आहे. लहानपणीच्या भांडणांचा राग मनात साठल्यामुळे आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी दिली आहे.विशाल सूर्यवंशीने हर्षदला जीवे मारण्यामागे लहानपणीचे भांडणे कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. लहानपणीच्या भांडणाचा राग मनात ठेवून तब्बल 15 ते 20 वर्षानंतर त्याचा बदला घेण्यासाठी आरोपीने एवढे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येते.हर्षदला घरासमोर काम करताना पाहिल्यानंतर त्याला बालपणीच्या भांडणाची आठवण झाली. जुन्या आठवणी नशेत ताज्या झाल्यानंतर त्याने पिस्टल सोबत घेत हर्षदवर आधी गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न आल्यामुळे त्याचा पाठलाग करून खून केला

डॉक्टरांना उच्च शिक्षणाचे अमिष दाखवत गंडवणारा महाठग सौरभ कुलकर्णी जेरबंद

1

केज — मॅनेजमेंट कोट्यातून एमडी मेडिसिन ला प्रवेश मिळवून देतो असं अमिष दाखवून
वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना कोट्यावधी रुपयांना गंडा घालणाऱ्या महाठगास उपविभागीय पोलिस अधिकारी व्यंकटराम यांच्या पथकाने कराड येथून जेरबंद केले. अशाच ठगीचे महाराष्ट्रासह गुजरात, चंदिगढ, पंजाबसह इतर राज्यात पंधरा पेक्षा जास्त गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. आतापर्यंत सुमारे 3 कोटी 86 लाख 61 हजार रु. घेऊन अनेक डॉक्टरांना फसविले आहे.
सौरभ सुहास कुलकर्णी रा. नागपूर असं या लुटारू च नाव आहे. धारूर येथील फिर्यादी वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश रामचंद्र तोंडे हे बारामती येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना एम डी या पदव्यूत्तर उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी एस. के. इज्युकेशन संस्था वरील फेसबुक अकाऊंटवरुन सौरभ सुहास कुलकर्णी रा. नागपुर याचे सोबत ओळख झाली.डॉ तोंडे यांना एमडी मेडीसीनसाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घ्यायचा असल्याने ते सौरभ कुलकर्णी याचे संपर्कात होते. सौरभ कुलकर्णी याने मॅनेजमेंट कोट्यातून एमडी साठी इमर्जन्सी या शाखेसाठी प्रवेश हवा असे म्हण्यावरून कुलकर्णी तीन वर्षाची फिस ही 99 लाख रु. असल्याचे सांगितले. ती फी कमी करून 65 लाख रु मध्ये जवाहलाल नेहरू मेडिकल कॉलेज येथे ॲडमिशन करून देण्याचे त्याने सांगितले. या साठी त्याने डॉ तोंडे यांच्याकडून 8 लाख रु घेतले. परंतु त्यांचे कोणत्याही यादीत नाव नसल्याने डॉ तोंडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आहे. त्यावरून त्यांनी धारूर पोलिस ठाण्यात सौरभ कुलकर्णी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकट राम यांनी तपास केला असता सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र आणि राज्या बाहेर अनेक गुन्हे असल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन गुन्हयाचा तपास जलद गतीने करुन आरोपीची गोपनीय, टेक्निकल ॲनालिसिस सेल बीड व इतर माध्यमाद्वारे माहीती काढून आरोपीचा ठावठिकाणा माहीती करुन घेवून आरोपीस अटक करणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय केज येथील एक तपास पथक रवाना केले. आरोपी यास शिताफीने कराड जि. सातारा येथे आज दि.13 जानेवारी रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीवर विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले पुणे

🌑सरकार वाडा नाशीक शहर गुरनं. ०९/२०१६

🌑 टेंभुणी सोलापुर ग्रामीण गुरनं. ६१७/२०१७

🌑 चंदनजिरा – जालना गुरनं. ४५९/२०२३ ४)🌑घनसांगवी -जालना गुरनं. ५१४/२०२५ ५)🌑 धनतोली- नागपुर गुरनं. २०३/२०२५

🌑 खडकी- पुणे गुरनं. २८७/२०२५

🌑 दहीसर – मुंबई गुरनं.676/2024

🌑 विजापुर नाका- सोलापुर शहर

🌑 धनतोली -नागपुर शहर गुरनं. १७१/२०२२

🌑 अमृतसर- राज्य-पंजाब गुरनं. ५३/२०२४

🌑 जरी फटका-नागपुर शहर गुरनं. ७७१/२०२४

🌑 तासगाव- सांगली गरनं. ४७६/२०२५

🌑 हुडकेश्वर- नागपुर शहर गुरनं. ४९५/२०२४

🌑 डेसा सीटी, बनास फाटा गुजरात गुरनं. २४५/२०२४

🌑 धारुर जि.बीड गुरनं.४५३/२०२५ येथे देखील वरील प्रमाणे विविध प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे केले

सौरभ कुलकर्णी याने आता पर्यंत अनेकाना फसवून 3 कोटी 86 लाख 61 हजार रु. लाटले असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले आहे. यापेक्षा जास्त लोकांना त्याने फसविले असल्याचा अंदाज आहे. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम, पोलिस उपनिरीक्षक जावेद कराडकर, पोलिस उपनिरीक्षक अमिर ईनामदार, पोलिस नाईक अनिल मंदे आणि आरोपीला ताब्यात घेण्यासाठी त्यांना कराड येथील नागरिक महेश कुर्ले आणि अशोक कांबळे याच बरोबर महामार्ग पोलिस कर्मचारी मोहिते यांनी मदत केली.

बीडच्या आरटीओ ऑफिससाठी १२ कोटींचा निधी; आ.संदीप क्षीरसागर यांचा पाठपुरावा

2
बीड —  येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ ऑफीसच्या बांधकामांसाठी तब्बल १२ कोटी रूपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे. यातून आ.संदीप क्षीरसागर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
                 गेल्या अनेक वर्षांपासून बीडच्या आरटीओ ऑफिसला स्वतःच्या मालकीची इमारत नव्हती. बीड शहरातील विविध ठिकाणी किरायाच्या जागेत सदरील महत्वाचे कार्यालय चालत होते. त्यामुळे नागरिक, अधिकारी व वाहनधारक यांना सोयीसुविधांच्या अभावामुळे अडचणींना सामोरे जावे लागत होते. बीडच्या आरटीओ ऑफिसचा प्रश्न प्रलंबित होता. ही बाब लक्षात घेऊन बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आरटीओ ऑफिससाठी एक सुसज्ज इमारत असावी याकरिता शासनदरबारी पाठपुरावा केला होता. त्यावर आता शासनाकडून या कामासाठी तब्बल १२ कोटी रूपयांचा भरघोस निधी प्रशासकीय मान्यतेसह मंजूर करण्यात आला आहे. यामुळे बीडच्या आरटीओ ऑफीससाठी एक सुसज्ज आणि सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण इमारत मिळणार आहे. या कामास मंजुरी दिल्याबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.