Home Blog Page 19

ऊसतोड मजुराच्या अंगावरून वाहन गेलं मजूरासह पाळीव श्वानाचाही मृत्यू

0

आष्टी — तालुक्यातील आंबेवाडी येथील बाळासाहेब नवनाथ नरवडे वय 35 वर्ष या ऊसतोड मजुराचा करमाळा बायपासवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेला त्यांचा पाळीव श्वानही या अपघातात ठार झाला असून, या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
बाळासाहेब नरवडे हे अनगर येथील साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते. 26 जानेवारी रोजी काही कामानिमित्त ते आपल्या पाळीव श्वानासह दुचाकीवरूनआंबेवाडीकडे निघाले होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास करमाळा बायपासवरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि ते रस्त्यावर कोसळले. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांना चिरडले. या भीषण अपघातात बाळासाहेब आणि त्यांच्या गळ्यात साखळी असलेल्या पाळीव श्वानाचा जागीच मृत्यू झाला.

लोकांची काम का करतोस असं म्हणून धनंजय गुंदेकर यांना पं.स. कार्यालयात मारहाण

0

बीड — जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा देणारे धनंजय गुंदेकर यांना आमच्या गावातले लोकांचे प्रश्न का सोडवतो आमच्या गावात का येतो असे प्रश्न विचारून पंचायत समिती कार्यालयात “मौज”चा सरपंच संदीप डावकर याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. शासकीय कार्यालयात सुद्धा अशा घटना घडत असल्याने बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून धनंजय गुंदेकर काम पाहतात. सोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नाविरोधात जनजागृतीचं काम देखील ते सातत्याने करत आहेत. मात्र त्याच्या याच कामामुळे झारीतले शुक्राचार्य बेचैन असल्याच पाहायला मिळत आहे. धनंजय गुंदेकर हे लोकांचे प्रश्न घेऊन पंचायत समितीत गेले असता त्या ठिकाणी “मौज” गावचे सरपंच संदीप डावकर हा देखील तिथेच होता. धनंजय गुंदेकर यांना तू आमच्या गावात का येतोस? लोकांचे प्रश्न का सोडवतोस? असा जाब विचारून मारहाण करण्यास सुरुवात केली. गुंदेकर यांना मारहाण होत असताना तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी डावकर याला आवरण्याचा प्रयत्न केला. सोबतच घटनेचा व्हिडिओ काढून समाज माध्यमावर देखील व्हायरल केला. या घटनेमुळे खळबळ माजली असून बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुंड प्रवृत्तीची लोक बाहेरच नाही तर शासकीय कार्यालयात देखील कायद्याचा धाक नसल्यामुळे मारहाण करत असल्याचं चित्र पाहायला मिळू लागला आहे. याप्रकरणी धनंजय गुंदेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.

बीड न.प. सभापती निवड : आ. विजयसिंह पंडितांकडून समान संधी; विनोद मुळूक पाणीपुरवठा तर बांधकाम संजय उडानकडे बांधकाम

0

बीड — बीड नगर परिषदेच्या सभापतीपदाची निवडणुक बिनविरोध पार पडली. शिव-शाहू-फुले-आंबेडकर-मौलाना आझाद बीड शहर विकास आघाडीकडून उपाध्यक्ष विनोद मुळूक यांना पाणीपुरवठा, बांधकाम सभापतीपदी संजय उडान, स्वच्छता सभापतीपदी शेख निजाम, नियोजन सभापतीपदी बाळासाहेब गुंजाळ, महिला व बालकल्याण सभापतीपदी आरती बनसोडे, उपसभापती पदी शेख शबनम बिलाल, शिक्षण व विद्युत सभापतीपदी मोमीन सिमा जकी सौदागर तर स्थायी समितीवर अमर नाईकवाडे यांना संधी देण्यात आली. आ. विजयसिंह पंडित यांनी या निवडणुकीत सर्वांना समान संधीचा फॉर्म्युला आणून प्रत्येक समितीमध्ये जास्तीत जास्त सदस्यांना काम करण्याची संधी मिळेल अशा पध्दतीने समित्यांची रचना केली आहे. सभापती पदाच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. शिवछत्र कार्यालयात नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

बीड नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवडणुक प्रक्रिया मंगळवार, दि.२७ रोजी संपन्न झाली. पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी काम पाहिले. विषय समित्यांची सदस्य संख्या १४ करण्याचा ठराव करून उपाध्यक्षांना पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे पदसिध्द सभापती म्हणून निवड करण्याचा निर्णय पहिल्या बैठकीत करण्यात आला. विषय समित्यांवर नगर परिषद सदस्यांचे नामनिर्देशन झाल्यानंतर समितीच्या सभापती पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. विहित मुदतीत केवळ शिव-शाहू-फुले-आंबेडकर-मौलाना आझाद बीड शहर विकास आघाडीकडून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले, त्यामुळे ही निवडणुक प्रक्रिया बिनविरोध संपन्न झाली. आघाडीचे गटनेते फारुक पटेल यांनी प्रत्येक विषय समितीसाठी सात सदस्यांच्या नावांची शिफारस पिठासीन अधिकारी यांच्याकडे केली. स्थायी समितीसाठी ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली.

शिव-शाहू-फुले-आंबेडकर-मौलाना आझाद बीड शहर विकास आघाडीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी संजय उडान, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी शेख निजाम, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी धर्मराज उर्फ बाळासाहेब गुंजाळ, शिक्षण, विद्युत, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी मोमीन सीमा परवीन अब्दुल रशिद उर्फ सीमा जकी सौदागर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी आरती रंजित बनसोडे, उपसभापती पदी शेख शबनम बिलाल यांना संधी देण्यात आली आहे. नवनिर्वाचित सभापतींचा ‘शिवछत्र’ येथे यथोचित सन्मान करून त्यांना भविष्यकालीन वाटचालीसाठी आ. विजयसिंह पंडित यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगर परिषद निवडणुकीचे निरीक्षक तथा माजी आमदार संजय दौंड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, स्वप्निल गलधर, राष्ट्रवादीचे माध्यम प्रमुख भागवत तावरे, बीड बाजार समितीचे उपसभापती शामराव पडुळे, नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे, गटनेते फारुक पटेल, दै.सिटीझनचे संपादक शेख मुजीबभाई यांच्यासह आघाडीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

शिवसेनेला बांधकाम सभापती पदाची संधी

बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत शिवसेना व शिवसंग्राम यांनी युती करून ही निवडणुक लढविली होती. शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकर-मौलाना आझाद बीड शहर विकास आघाडीची नोंदणी करताना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी आ. विजयसिंह पंडित यांनी शिवसेनेचा यथोचित सन्मान होईल असा शब्द दिला होता. दिलेल्या शब्दाप्रमाणे आ. विजयसिंह पंडित यांनी शिवसेनेच्या संजय उडान यांना बांधकाम समितीच्या सभापतीपदी काम करण्याची संधी दिली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप आणि स्वप्निल गलधर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकऱ्यांनी या निवडीबाबत समाधान व्यक्त केले आहे.

फळं झाड उपटली, बांध उध्वस्त करून उभ्या पिकाचा सुफडा साफ केला; ओटू पॉवर कंपनी विरोधात शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार

0

बीड — पवन ऊर्जा कंपन्यांनी व त्यांच्या गुंडांनी बालाघाटावर नंगानाच सुरू केलेला असल्याने सर्वसामान्य शेतकरी मात्र हैराण झाला आहे. कंपन्यांचे गुंड शेतकऱ्यांच्या शेतात घुसून अनाधिकृत रीतीने पोल उभे करून पिकांची नासधूस करू लागले आहेत. याप्रकरणी ओ-टू पाॅवर कंपनी विरोधात घारगाव येथील शेतकरी ओंकार इंद्रभूषण गिरी यांनी एस पी सह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे‌‌. ‌
गेल्या दीड वर्षापासून पवनचक्की कंपन्यांनी बीड जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. शेतकऱ्यांवर दादागिरी करण्यासाठी स्वतःचे गुंड कंपन्यांनी पाळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. कोणाच्याही शेतात अनाधिकृतपणे घुसायचे शेतकऱ्याची संमती न घेता अनाधिकृत रीत्या वीज वहनासाठी पोल उभे करायचे एखाद्या शेतकऱ्याने काम अडवलंच तर दादागिरी करून शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरवायची एवढा एकमेव उपक्रम कंपन्यांनी सध्या सुरू केला आहे. घारगाव शिवारात देखील हाच प्रकार सर्रास सुरू आहे. गट क्रमांक 60 मध्ये पवनचक्की उभारली आहे. येथे निर्मिती झालेली वीज वहनासाठी शेतकऱ्यांच्या शेतात पोल उभे करण्यात आले आहेत. लोखंडी पोल घेऊन जाण्यासाठी उभ्या पिकांची वाहन घालून नासधूस करायची, बांधावर असलेली फळझाडं तोडून टाकायची. पुन्हा दादागिरी करायची असा प्रकार ओंकार इंद्रभूषण गिरी या शेतकऱ्याच्या शेतात केला गट नंबर 61मधील पूर्वीचे डोक्या एवढाले उंचीचे बांध कंपनीने निस्तनाभूत केले. 14 फळझाड उपटून काढली. शेतात आस्ताव्यस्तपणे पोल टाकून दिले. या संदर्भात कंपनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता तुला काय करायचे ते कर असं म्हणून दादागिरी करत दहशतीचे वातावरण निर्माण केले. नुसते दहशतीचे वातावरण निर्माण केले नाही तर स्थानिक पोलीस देखील कंपनीच्या गुंडांनाच संरक्षण देण्याचे काम करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कंपनी गुंडांनी शेतकरी इतका दहशतीत आणला की जीवाला धोका निर्माण होईल या भीतीपोटी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना ओंकार गिरी यांनी निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. कामाला माझा विरोध नाही मात्र योग्य तो मोबदला देण्यात यावा. मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे झालेली नुकसान भरून द्यावी तसेच नुकसानीला जबाबदार असणाऱ्या कंपनी अधिकारी कर्मचारी तसेच कंपनी गुंडांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील ओंकार गिरी यांनी केली आहे.

🇮🇳🇮🇳. बीड की बिहार? चौघांची लोखंडी राॅड, काठ्या, चाकूने तरुणाला मारहाण 🇮🇳🇮🇳

0

शिरूर कासार  — तालुक्यातील खालापुरी येथील एका हॉटेलमध्ये ४ जणांनी एका तरुणावर लोखंडी रॉड, चाकू व लाकडी काठ्यांनी हल्ला चढविला. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ माजली आहे.

या हल्ल्यात नितीन लोंढे (वय ३२) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण मारहाण हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओत चारही आरोपी एकाच व्यक्तीवर अमानुषपणे हल्ला करताना स्पष्टपणे दिसत आहेत. या प्रकरणी रोहित गायकवाड, शुभम लोंढे, आसिफ शेख आणि साहिल पठाण या चार जणांविरोधात शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मारहाणीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याचा अधिक तपास शिरूर कासार पोलिस करत आहेत.

🇮🇳🇮🇳 माजलगावात सराफा व्यापाऱ्याचे 60 लाखाचे सोन्या चांदीचे दागिने लुटले 🇮🇳🇮🇳

0

माजलगाव — व्यापार करण्यासाठी मोटरसायकलवरून खेडे गावाकडे जात असलेल्या सराफा व्यापाऱ्याला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या दुचाकीचा पाठलाग करत शस्त्राचा धाक दाखवत व्यापाऱ्याकडील 50 लाख रुपये किमतीचे साडेतीनशे ग्रॅम सोने तसेच दहा लाख रुपये किमतीतीची तीन किलो चांदी लुटली आहे. नेकनूरच्या आठवडी बाजारातून देखील 11 जानेवारी रोजी सराफा व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली होती ‌

माजलगाव शहरातील हनुमान चौक येथे अमोल पंढरीनाथ गायके यांचे अमोल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आज सकाळी 9 वाजता अमोल गायके माजलगाव शहरातून व्यवसाय करण्यासाठी मोटारसायकलवरून खेडेगावला जात होते. तालखेड फाट्याजवळ त्यांची मोटारसायकल आली असता पाठीमागून अज्ञात चोरटे चार चाकी वाहनातून त्याचा पाठलाग करत आले.यावेळी त्यांनी सराफा व्यापाऱ्याच्या मोटरसायकलच्या समोर गाडी लावून कोयता, शस्त्राचा धाक दाखवला. जीवे मारण्याची धमकी दिली. व्यापाऱ्याच्या हातातील सोन्या चांदीची बॅग हिसकावली. ज्यात साडेतीनशे ग्रॅम सोन्याचे दागिने होते. ज्याची अंदाजे किंमत ५० लाख रुपये तर तीन किलो चांदीचे दागिने ज्याचे अंदाजे किंमत १० लाख रुपये असल्याची माहिती आहे.अज्ञात चोरट्यांनी लागलीच घटनास्थळावरून पलायन केले. दिवसाढवळ्या घडलेल्या या रोड रॉबरीच्या (दरोडा) घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेकनूरच्या आठवडी बाजारातून 11 जानेवारी रोजी सराफा व्यापाऱ्याची 15 किलो चांदी असलेली पेटीसह 50 हजार रुपयांची रोकड डल्ला मारून चोर घेऊन गेला असल्याची घटना घडली होती.

🇮🇳🇮🇳 अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर 🇮🇳🇮🇳

0

नवी दिल्ली — चित्रपट सृष्टीतले दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना त्यांच्या कला क्षेत्रातील गौरवाबद्दल पद्म विभूषण या सन्मानाने गौरवण्यात आलं आहे. धर्मेंद्र यांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबाबत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

धर्मेंद्र यांच्यासह शिबू सोरेन यांना राजकीय क्षेत्रातील योगदानासाठी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. त्याच प्रमाणे अलका याज्ञिक यांनाही पद्म भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. तर जाहिरात लेखक पियुष पांडे यांनाही मरणोत्तर पद्म भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.धर्मेंद्र. १९६० च्या दशकात तो आला. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’, ‘शोला और शबनम’, ‘अनपढ’, ‘शादी’, ‘बंदिनी’, ‘बेगाना’, ‘आयी मिलन की बेला’, ‘पुर्णिमा’, ‘फुल और पत्थर’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘आये दिन बहार के’ या सिनेमांमधून त्याच्या अभिनयाची जादू दाखवत राहिला. ‘मेरा नाम जोकर’मधला त्याने साकारलेला सर्कसचा मालक आठवा. ‘यादो की बारात’ सिनेमातला शंकर आठवा. अजितच्या पायात ८ आणि ९ नंबरचा बूट पाहून चिडणारा. लहानपणी ताटातूट झालेल्या भावांची ओळख ‘यादो की बारात निकली है आज’ गाणारा शंकर, आपल्या भावांना, कुटुंबाला वाचवण्याची धडपड करणारा शंकर सगळ्यामध्ये धर्मेंद्र अगदी चपखल बसला आहे. ‘ड्रीम गर्ल’, ‘सीता और गीता’, ‘चुपके चुपके’ या सिनेमातल्या त्याच्या भूमिकाही खास गाजल्या. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जया भादुरी, शर्मिला टागोर, ओमप्रकाश अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या ‘चुपके चुपके’ सिनेमात धर्मेंद्रने त्याच्यात विनोदी अभिनेताही लपला आहे हे दाखवून दिलं. ऋषिकेश मुखर्जींचं दिग्दर्शन आणि इतक्या सगळ्या कलाकारांची फौज यात ओम प्रकाशची जिरवताना ‘प्यारे मोहन’ बनून त्याने जी काही धमाल केली आहे ती केवळ अविस्मरणीय. त्यांच्या या सगळ्या योगदानाचा गौरव भारत सरकारने केला आहे. त्यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

२०१२ मध्ये सिनेसृष्टीतल्या कारकिर्दीबाबत पद्म भूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. मात्र फिल्मफेअर किंवा अगदी सहाय्यक अभिनेता म्हणूनही त्याला पुरस्कार मिळाला नाही. आता त्यांना मरणोत्तर पद्म विभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

🇮🇳🇮🇳 प्रजासत्ताक दिन:महाराष्ट्रातील 4 दिग्गजांना पद्म पुरस्कार, देशातील 45 जणांचा होणार सन्मान 🇮🇳🇮🇳

0

नवी दिल्ली — प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून एकूण 45 दिग्गजांसाठी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
यामध्ये 4 महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे. या सर्व दिग्गजांना प्रजासत्ताक दिनी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील उत्कृष्ट तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्म पुरस्काराची घोषणा झाली आहे. यासोबतच महाराष्ट्रातील लोकप्रिय तमाशा कलाकार रघुवीर खेडकर यांनादेखील पद्म पुरस्कार घोषित झाला आहे. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे श्रीरंग देवबा लाड यांना पद्म पुरस्कार घोषित झाला आहे. तसेच प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांनादेखील पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहेत.

भिकल्या लाडक्या धिंडा 

भिकल्या लाडक्या धिंडा हे पालघर जिल्ह्यातील वलवंडे गावचे रहिवासी आहेत. ते 89 वर्षीय आहेत. ते आदिवासी तारपा वादक आहेत. ते अतिशय उत्कृष्ट तारपावादन करतात. तसेच ते तारपाची निर्मिती देखील करतात. ते तरुणांना तारपावादन शिकवतात. तारपा हे बांबू आणि सुक्या भोपळ्यापासून बनवले जाणारे पारंपरिक वाद्य आहे. ते जवळपास 9 ते 10 फूट लांबीचे असते. भिकल्या लडक्या धिंडा यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी व्यथित केलं. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव आता सर्वोच्च पुरस्काराने करण्यात येणार आहे.
         रघुवीर खेडकर 

रघुवीर खेडकर हे प्रसिद्ध तमाशा कलावंत आहेत. ते गेल्या 40 ते 45 वर्षांपासून तमाशा क्षेत्रात कार्यरत आहेत. तमाशा संस्कृती टिकवणं आणि ती राज्याबाहेर नेण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना यावर्षी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. रघुवीर खेडकर हे तमाशातील सोंगाड्या या भूमिकेसाठी लोकप्रिय आहेत. त्यांना त्यांच्या योगदानासाठी तमाशा महर्षी म्हणून देखील ओळखलं जातं. विशेष म्हणजे डॉ. जब्बार पटेल यांनी लिहिलेला ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट रघुनाथ खेडकर यांना डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आल्याचं मानलं जात. रघुवीर खेडकर हे मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे आहेत. प्रसिद्ध तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे ते पुत्र आहेत. रंगभूमीची सेवा करण्याचा वारसा रघुवीर खेडकर यांना आईपासून मिळाला. हा वारसा त्यांनी समर्थपणे जपला देखील आहे. त्यांच्या नेतृत्वातील तमाशा मंडळ रघुवीर खेडकर तमाशा मंडळ हे लोकप्रिय आहे.

श्रीरंग देवबा लाड 

परभणी जिल्ह्यातील माळसोन्नाचे श्रीरंग देवबा लाड यांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. ते कापूस तंत्रज्ञानाचे जनक मानले जातात. तसेच शेतकरी-केंद्रीत कृषी नवप्रवर्तनाचे प्रेरक, स्वदेशी पशुधन संवर्धनाचे आदर्श मार्गदर्शक, ग्रामीण विकास, शाश्वत शेती यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांचं सामाजिक कार्यदेखील तितकेच मोठं देखील आहे. त्यांना याआधी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स (मानद) पदवी प्रदान करण्यात आली आहे. यासोबतच अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.

डॉ. आर्मिडा फर्नांडीस कोण आहेत?

डॉ. आर्मिडा फर्नांडीस यांचं देखील समाजासाठी मोठं योगदान आहे. आर्मिडा या मुबंईतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशुतज्ज्ञ आहेत. भारतीय नवजात शिशु आरोग्य सेवेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी 1989 मध्ये आशिया खंडातील पहिली दूध बँकेची स्थापना केली होती. नवजात शिशु मृत्यू दर कमी करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांना यश देखील आलं. त्यांनी मुंबईतील शीव रुग्णालयात 25 वर्षांपेक्षा जास्त काळ बालरोग विभाग प्रमुख आणि डीन म्हणून काम केले आहे. यासोबतच 2000 पेक्षा जास्त परिचारिका आणि डॉक्टरांना प्रशिक्षण दिलं आहे.

विशेष म्हणजे निवृत्तीनंतर त्यांनी स्नेहा संस्थेची स्थापना केली. ही संस्था मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या महिला आणि मुलांच्या आरोग्यासाठी काम करते. त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील या अफाट योगदानासाठी त्यांना केंद्र सरकारकडून सर्वोच्च मानला जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

या’ दिग्गजांना जाहीर झाले पद्म पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी

भगवानदास रायकर (मध्य प्रदेश)
भिकल्या लाडक्या धिंडा (महाराष्ट्र)
ब्रिजलाल भट्ट (जम्मू आणि काश्मीर)
चरण हेमब्रम (ओडिशा)
चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)
डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू आणि काश्मीर)
कोल्लक्काइल देवकी अम्मा जी (केरळ)
महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)
नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)
ओथुवर तिरुथनी (तामिळनाडू)
रघुपत सिंग (उत्तर प्रदेश)
रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)
राजस्थानपती कलिअप्पा गौंडर (तामिळनाडू)
सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालँड)
श्रीरंग देवबा लाड (महाराष्ट्र)
तिरुवरूर बख्तवासलम (तामिळनाडू)
अंके गौडा (कर्नाटक)
डॉ. आर्मिडा फर्नांडिस (महाराष्ट्र)
डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)
गफ्फारुद्दीन मेवाती (राजस्थान)
खेम राज सुंदरियाल (हरियाणा)
मीर हाजीभाई कासंबाई (गुजरात)
मोहन नगर (मध्य प्रदेश)
नीलेश मांडलेवाला (गुजरात)
आर अँड एस गोडबोले (छत्तीसगड)
राम रेड्डी मामिदी (तेलंगणा)
सिमांचल पात्रो (ओडिशा)
सुरेश हनगवाडी (कर्नाटक)
तेची गुबिन (अरुणाचल प्रदेश)
युनाम जात्रा सिंग (मणिपूर)
बुधरी थाठी (छत्तीसगड)
डॉ. कुमारसामी थंगराज (तेलंगणा)
डॉ. पुननियामूर्ती नटेसन (तामिळनाडू)
हेले वॉर (मेघालय)
इंद्रजित सिंग सिद्धू (चंदीगड)
के. पंजनिवेल (पुडुचेरी)
कैलास चंद्र पंत (मध्य प्रदेश)
नुरुद्दीन अहमद (आसाम)
पोकिला लेकटेपी (आसाम)
आर. कृष्णन (तामिळनाडू)
एस जी सुशीलम्मा (कर्नाटक)
तागा राम भील (राजस्थान)
विश्व बंधू (बिहार)
धर्मिकलाल चुनीलाल पंड्या (गुजरात)
शफी शौक (जम्मू आणि काश्मीर)

दर्जेदार बंधारे उभारुन पाण्याचा प्रश्न सोडवणार — अमरसिंह पंडित

0

कुंभेजळगाव आणि राजपिंप्री येथील ३० लाख रुपये किंमतीच्या सिमेंट बंधा-याचे उद्घाटन

गेवराई — पाण्याचे दुर्भिक्ष असताना देखील कुंभेजळगाव, राजपिंप्री आणि परिसरातील शेतकरी उत्तम पद्धतीने शेती करत असल्याने आपण प्रभावित झालो, त्यामुळे अशा दुष्काळी भागाची निवड करुन पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बंधारा उभारण्याचे काम आपण हाती घेतले आहे. बंधा-याचे काम दर्जेदार होईल याचा फायदा या भागातील शेतकरी व नागरिकांना होईल. आगामी काळात गेवराई तालुक्यात २२ बंधारे उभारणार असल्याचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सांगितले.जिल्हा नियोजनातून कुंभेजळगाव येथील १५ लाख रुपये किंमतीच्या सिमेंट बंधारा बांधकामांचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

जिल्हा नियोजनातून कुंभेजळगाव आणि राजपिंप्री येथील ३० लाख रुपये किंमतीच्या सिमेंट बंधारा बांधकामांचे उद्घाटन माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, माजी सभापती कुमारराव ढाकणे, जगन्नाथ काळे, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष कालिदास नवले, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीराम आरगडे, शिवाजीराव दिवाण, राधाकिसन शेंबडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, कुंभेजळगाव, राजपिंप्री या भागातील बंधारे आणि ईतर विकास कामामुळे या भागातली लोकांच्या दैनंदिन जीवन आणि अर्थकारणावर सकारात्मक परिणाम होईल. रस्ते, नाली, पुल, लाईट तसेच या भागातील वाहून गेलेल्या बंधारे दुरुस्तीचे काम केले जाईल. ब्रम्हगाव, कुंभेजळगाव, रामनगर तांडा या ग्रुप ग्रामपंचायत विभागून प्रत्येक गावात स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा विचार असून यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळेल. कुंभेजळगाव येथील गावाला जोडणारा ५०० मिटरच्या रस्त्याचा प्रश्न सोडवला जाईल, त्याच बरोबर दलित समाजाच्या स्मशानभूमीचे काम र्लवकरच केले जाईल. गेवराईच्या दुष्काळी भागात आगामी काळात २२ बंधारे उभा करतोय. बंधा-यांचे काम दर्जेदार काम होईल. याचा फायदा या भागातील शेतकरी व नागरिकांना होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामबप्पा लेंडगुळे यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कुभेजळगाव येथील उपसरपंच शेख सद्दाम, सुदाम लेंडगुळे, कल्याणराव पांगरे, लहुराव पांगरे, बळीराम पांगरे, भुजंगबापू पांगरे, महादेव पांगरे, हरी झेंडे, भिकाजी राठोड, रुस्तुम पांगरे, चेअरमन गणपत राठोड, अभिमान लेंडगुळे, उद्धव पांगरे, योगिराज चव्हाण, सुरेश पांगरे, संजय गायके, रामचंद्र पांगरे, पोपट चव्हाण, कोळगावचे सरपंच राजेंद्र कदम, अशोक करांडे तसेच राजपिंप्री येथे संतोष पानखडे, दिलीप पानखडे, बापु धोत्रे, गोरख म्हेत्रे, सुरेश पानखडे, विष्णू चव्हाण, विजय हराळे, सौ. विमल धोत्रे यांच्यासह कुंभेळगाव आणि राजपिंप्री येथील येथील नागरिक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परळी येथील थर्मल च्या जागेत सोलार एनर्जी प्लांट उभारण्याची निविदा प्रसिद्ध

0

मुख्यमंत्री देवाभाऊंनी धनंजय मुंडेंना दिलेल्या शब्दाची केली पूर्ती!

मेगा सोलर प्रकल्प परळीच्या विकासात ठरणार मैलाचा दगड

परळी — राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांना विधानसभा सभागृहात दिलेल्या शब्दाची पूर्तता केली असून परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित झालेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत मेगा सोलर प्रकल्प उभारण्यास शासनाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात याठिकाणी ५० मेगा वॅट वीज निर्मिती क्षमता असलेला सोलर प्रकल्प उभारण्यात येत असून त्याची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केली आहे.

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित झालेल्या संच क्रमांक एक ते पाच च्या रिकाम्या जागेत 350 मेगा वॅट वीज निर्मितीची क्षमता असलेला मेगा सोलर प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी मागील अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची ती मागणी मान्य करून लवकरच मेगा सोलर एनर्जी प्रकल्प उभा करण्याचा शब्द दिला होता.

या सोलार निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीमुळे वीज निर्मितीसह परळी व परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार असून हा प्रकल्प परळीच्या विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे.

पहिल्या टप्प्यात 50 मेगा वॅट वीज निर्मिती क्षमता असलेल्या संचाची उभारणी करण्यात येणार असून याबाबतची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी ऊर्जामंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समस्त परळीकरांच्या वतीने आभार मानले आहेत.