Home Blog Page 18

सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; पार पडला शपथविधी

0

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच विमान अपघातात बुधवारी निधन झालं. त्यांच निधन होताच राजकीय हालचालींनी वेग पकडला रिक्त झालेली त्यांची जागा भरून काढण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी घेतली.राजभवनातील लोकभवनात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.

शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंचावर उपस्थिती होती.
सरकारमधील अनेक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, भाजप आणि शिवसेना त्यांची उपस्थिती होती. कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने शपथविधी सोहळा पार पडला आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी शपथविधीबद्दल माहिती नसल्याचं म्हटलं होतं. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, आपल्याला याबाबत काहीही सांगितलं नसल्याचं पवार म्हणाले होते. त्यानंतर पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि शपथविधीचं निमंत्रण दिल्याचं सांगितलं गेलं. मात्र शरद पवार हे शपथविधीसाठी हजर नव्हते.

दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे जात अजित पवारांच्या आईंची भेट घेतली. एकीकडे मुंबईत शपथविधी सोहळा सुरु होता तर दुसरीकडे बारामतीमध्ये मात्र शोकाकूल वातावरण होतं. वेगाने घडलेल्या या राजकीय घडामोडींच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे

परळीतील साई लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

0

बीड — परळीतील टोकवाडी भागात असलेल्या साई लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा मारून पर्दाफाश केला यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
बाहेरच्या जिल्ह्यातून महिलांना आणून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे. हा व्यवसाय टोकवाडी भागातील साई लॉजवर सुरू असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष परळी ग्रामीण पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच
पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव व परळी ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक सदानंद मेंडके यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. त्यावरून वरिष्ठांनी या ठिकाणी छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले.त्यावरून परळी ग्रामीण चे पीआय मझहरअली सय्यद, एपीआय सदानंद मेंडके स्टाफसह व अ. मा. वा. प्र. कक्षाच्या प्रमुख पी एस आय पल्लवी जाधव या त्यांच्या संपूर्ण स्टाफसह तसेच डमी ग्राहक व दोन शासकीय पंचासह सापळा पूर्व पंचनामा करून सदर ठिकाणी गेले. डमी ग्राहकास या ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे असलेल्या एजंटने वेश्या गमनासाठी होकार देवून त्यासाठी 1500 रुपयांची मागणी केली. डमी ग्राहकाने ठरल्या प्रमाणे रक्कम देवून पोलीस पथकास ठरलेला इशारा केला असता, पोलीस पथकाने या लॉजवर छापा मारला. पैसे स्वीकारलेल्या पुरुषाला त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव नाशर नशीर शेख असे सांगितले.या पुरुषाची पंचासमक्ष झडती घेतली असता, डमी ग्राहकाने दिलेल्या नमूद वर्णनाच्या 500 रू. दराच्या 3 नोटा सापडल्या. पंचासमक्ष नोटा जप्त केल्या. लॉजवर दोन पीडित महिला मिळून आल्या . त्यापैकी डमी ग्राहकासोबत रूम मधे मिळून आलेल्या पीडीत महिलेला विश्वासात घेवून चौकशी केली असता , तीने सांगितले की, ती भिवंडी ठाणे ची असून दत्ता अंतराम मुंडे याने मला फोन करून इथे बोलावून घेतले आहे. तसेच दुसरी महिला पुणे येथून आली आहे. प्रत्येक ग्राहकाकडून 1500 रू घेतात व त्यापैकी आम्हाला 500 रु देतात अशी माहिती दिली. एजंट नाशर नशीर शेख व लॉजचा मॅनेजर सोमनाथ ज्ञानोबा मुंडे रा. टोकवाडी तसेच दत्ता अन्तराम मुंडे रा. कन्हेरवाडी ता. परळी जि बीड पीडीत महिलांना बोलवून घेतात व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेवून, पीडीत महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे सांगितले. तसेच रुमची झडती घेतली असता 6 विना वापरलेले निरोध मिळून आले आहे. आरोपी , पीडीत महिलेस स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बोलावून घेऊन, स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करुन त्याच कमाईवर उदरनिर्वाह करुन वेश्याव्यवसाय करण्यास लावले व सदर महिलांचे शोषण करण्याच्या उद्देशाने बोलावले म्हणून त्यांच्या विरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 कलम 3,4,5,6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. हि कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे अंबाजोगाई उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मझहरअली सय्यद , परळी ग्रामीणचे सपोनि सदानंद मेंडके, पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव, अंकुश निमोने, महीला पोलीस हवालदार उषा चौरे, पोलीस हवालदार अशोक शिंदे, राजेंद्र मिसाळ, नवनाथ हारगावकर, रमेश तोटेवाड, तुळशीराम परतवाड, रावसाहेब मुंडे, विठ्ठल परजणे, पोलीस शिपाई योगेश निर्धार, महादेव केदार यांनी केली.

उसन्या पैशाच्या वादातून धक्काबुक्की; तरुणाचा मृत्यू

0

सिरसाळा — उसणे दिलेल्या पैशांच्या वादातून झालेल्या धक्काबुक्कीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजू गंगाराम उबदे वय 40 वर्ष, रा.सिरसाळा असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
येथील मसनजोगी वस्तीत राहणारे सायलू रामलू पस्तमवाड आणि गंगा पस्तमवाड यांचा संजू उबदे याच्याशी पैशांच्या उसने दिलेल्या दोनशे रुपयाच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सायलू आणि गंगा यांनी संजू उबदे यांना पाठीवर जोरात धक्का दिला. या धक्क्यामुळे संजू यांचा तोल गेला आणि ते तोंडावर जमिनीवर आदळले. यात त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सिरसाळा परिसरात खळबळ उडाली आहे.

केजचा माजी सरपंच व व्यापारी तामिळनाडूत बनावट नोटा खपवताच पकडला; साडेआठ लाखाच्या नोटा जप्त

0

केज — तालुक्यातील एका माजी सरपंचासह एका कृषी पंप व्यापाऱ्याने तामिळनाडू राज्यात बनावट नोटा चालवण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला. तामिळनाडू पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून साडेआठ लाख रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थुवाकुडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.या प्रकरणाचा तपास तामिळनाडूच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे.
केज येथील माजी सरपंच रमेश बाबुराव भांगे आणि मूळचा राजस्थानचा असलेला व्यापारी नारायण राम पटेल हे दोघे त्यांच्या खाजगी कार क्र.एम.एच 44 झेड 2383 ने तामिळनाडूत फिरायला गेले होते. बुधवारी इंधन भरताना त्यांनी एका पेट्रोल पंपावर 200 रुपयांच्या काही नोटा दिल्या. तेथून ते निघूनही गेले मात्र कर्मचाऱ्याला नोटांचा स्पर्श आणि कागदावरून संशय आला. त्याने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी मंजाथिदल चेक पोस्टवर सापळा रचून ही कार अडवली. कार अडवल्यानंतर
पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये 200 रुपयांच्या बनावट नोटांचे तब्बल 41 बंडल दडवून ठेवलेले आढळले. कारवाईत सापडलेल्या 8 लाख 37 हजार 800 रुपयांच्या नोटा या बनावट असल्याचे समोर आले. तपासादरम्यान या दोघांनी मदुराई, पुदुक्कोट्टई आणि तंजावर भागात यापूर्वीच अनेक नोटा चलनात आणल्याची कबुली दिली आहे.
या बनावट नोटा त्यांना कोणी पुरवल्या? या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत? आणि तामिळनाडूमध्ये त्यांना कोणी आश्रय दिला होता? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता गुप्त वार्ता विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभाग सक्रिय झाला आहे. या घटनेमुळे केज तालुक्यासह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अजित दादा या शतकातले जननायक — अमरसिंह पंडित

0

गेवराई येथे शोकाकुल वातावरणात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन

गेवराई — अजितदादा पवार हे सामान्य माणसाचे नशीब बदलणारे नेते होते, सगळे व्यवस्थित होत असताना त्यांचे जाणे आम्हा सर्वांना उध्वस्थ करणारे आहे. अजितदादा शेवटच्या घटकाची नोंद करणारे नेते होते, त्यांचे असे अकाली जाणे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. दादांना कुणीही विसरणार नाही. अजितदादा हे या शतकातले जननायक होते अशा भावना माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी भावनिक होऊन व्यक्त केल्या, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक दु:खद निधनाच्या निमित्ताने गेवराई येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सर्पक्षीय नेते उपस्थित होते.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक दु:खद निधनाच्या निमित्ताने गेवराई येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित,
आ. विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख उद्धव मडके, भाजपाचे समन्वयक श्रीकांत सानप, रिपाईचे तालूकाध्यक्ष किशोर कांडेकर, कॉग्रेसचे महेश बेदरे, शरद पवार गटाचे राजेंद्र मोटे, सामाजिक कार्यकर्ते गजानन काळे, सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, सावता परिषदेचे दादासाहेब चौधरी, महेश दाभाडे, भाजपचे सचिन दाभाडे, राजेश पवार, राजेंद्र बेदरे, विठ्ठलराव शेळके, शेख खाजा, शितल धोंडरे यांसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण म्हणाले की, अजित दादा कार्यकर्त्यांची काळजी घेणारे नेते होते, विकासकामावर त्यांचे बारीक लक्ष होते. आ. विजयसिंहना त्यांचे सतत मार्गदर्शन होते. कामाचा झपाटा असणारा नेता गेला, त्यांनी केलेला संकल्प आपल्याला पुर्ण करावयाचा आहे. दादांची स्वप्न पुर्ती हीच त्यांना आदरांजली असेल असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी भावनिक होऊन बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, नियती कठोर आणि निर्दयी असते. दादांच्या अपघाताने होत्याचे नव्हते झाले, अजितदादा कर्तृत्ववान होते. लोकांच्या मनातील नेते होते. जाती पातीचा विचार त्यांनी केला नाही, असा नेता आपला पालकमंत्री व्हावा हे आपल्या जिल्ह्याचे भाग्य होते. सगळे चालीजुपीला लागले असताना असे घडणे आम्हला उद्ध्वस्त करुन गेले आहे. अजितदादांकडून शिस्त आणि वक्तशीरपणा आम्ही शिकलो. त्यांना श्रद्धांजलीसाठी शोकसभा घ्यावी असे कधीच वाटले नाही. शेवटच्या घटकाची नोंद करणारे अजितदादा होते. सामान्य लोकांसाठी त्यांचे जाणे दुर्दैवी आहे. दादांना कुणीही विसरणारा नाही. दादा हे या शतकातले जननायक होते असेही ते यावेळी म्हणाले.

आपल्या भावना व्यक्त करताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, ही घटना मनाला चटका लावणारी आहे. आज दादा आपल्यात नाहीत हे मनाला पटत नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांवर हा मोठा आघात आहे. अतिशय कमी कालावधीत त्यांनी जे केले ते विचार करण्याच्या पलिकडे आहे. अनेक विकासकामे दिली. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मोठे नियोजन त्यांनी केले होते.

यावेळी शोकसभेत बोलताना भाऊसाहेब नाटकर म्हणाले की, दादांचे जाणे आपल्यासाठी दुर्भाग्य आहे, असा नेता पुन्हा होणार नाही‌. शिवसेना शिदें गटाचे तालुकाप्रमुख उद्धव मडके म्हणाले की, बीड जिल्ह्याला वरदान ठरलेले दादा आता आपल्यात नाहीत हे अतिशय वेदनादायक आहे. आज त्यांच्याबद्द बोलताना शब्द फुटत नाहीत. रिपाईचे तालूकाध्यक्ष किशोर कांडेकर म्हणाले की, दादांचे जाणे सर्वांना वेदना देऊन गेले आहे. ही वेदना सांगण्या पलीकडची आहे. मानवी हक्क अभियानाचे कडुदास कांबळे म्हणाले, अजितदादा हे खुप मोठे व्यक्तीमत्व होते, त्यांच्या जाण्याने खुप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भाजपाचे समन्वयक श्रीकांत सानप म्हणाले की, अजितदादा यांच्या तोडीचा राज्यात नेता नव्हता, आपला जिल्हा विकासाला मुकला. कॉग्रेसचे महेश बेदरे म्हणाले की, अजितदादाच्या रुपाने एक धाडसी व करारी नेतृत्व हरपले. बीड जिल्ह्याचे हे दुर्दैव. विकासाचे नेतृत्व त्यांच्या माध्यमातून मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेंद्र मोटे म्हणाले की, महाराष्ट्र एका गुणी नेतृत्वाला मुकला. त्यांच्या अकाली निधनानंतर बीड जिल्हा आणि महाराष्ट्र मागे जाणार आहे. अजितदादा हे रिफ्लेसमेंन्टचा विषय नाही, त्यांच्या आदर्शावर आपण चालू हीच त्यांना आदरांजली आहे. गणेश सावंत म्हणाले की, दादा हे राजा मनाचे माणूस होते. दादा कळायला दादांना मरावे लागले. आपण या पुढील काळात काम करुन दादांना आदरांजली आणि दादांचा संकल्प आपण पुर्ण करु. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन काळे, बाजार समितीचे उपसभापती श्रीहरी पवार, सौ. शितलताई धोंडरे, गेवराई नगर परिषदेचे गटनेते शेख खाजामामू यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी ऋषिकेश बेदरे, बीड बाजार समितीचे उप सभापती शामराव पडुळे, प्रकाश सुरवसे, परमेश्वर वाघमोडे यांच्यासह सर्वपक्षिय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अजित दादा पवार यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार; सुनेत्रा पवार उद्या घेणार शपथ!

0

मुंबई — अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अजित पवार यांच्यानंतर आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विराजमान होण्याची शक्यता असून, तशी तयारी सुरु झाली आहे.

उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला आहे. त्या आता उद्या सायंकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाणार आहे. त्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पक्षाच्या वतीने सूनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार असल्याची माहिती देण्यात आल्याचं समजत आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की दादा गेले आणि ज्या पद्धतीने ते गेले त्यामुळे सर्वांची झोप उडाल्यासारखं झालं आहे. आता कोणाकडे तरी सर्व जबाबदारी देऊन पक्ष किंवा सरकार चालवावं तर लागणार आहे. विधीमंडळाच्या सदस्यांची उद्या बैठक बोलावली आहे. त्याच्यात विधिमंडळ पक्षनेतेपद जे अजित पवारांकडे होतं ते देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. सुनेत्राताईंकडे पद द्यावं अशी अनेकांची मागणी आहे आणि ते चूक आहे असं वाटत नाही. पण निर्णय बैठकीत होईल,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.
अजित पवार राष्ट्रवादीसंदर्भातील कामांवर आम्ही लक्ष देत आहोत असं सांगताना त्यांनी आपल्याला 14 बैठका झाल्याची काही कल्पना नसल्याचं म्हटलं. ते म्हणाले, “उपमुख्यमंत्रीपदाची जागा रिकामी आहे ती, सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून कशी भरता येईल याकडे लक्ष आहे. पक्ष ठरवेल त्याप्रमाणे निर्णय होईल. उद्या विधिमंडळ पक्षनेता ठरवला जाईल आणि कदाचित एकमत झालं आणि प्रक्रिया झाली तर उद्याच शपथविधीही होऊ शकतो”.
शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीत सूनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवडीचे पत्र दिले जाणार आहे.
ही निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. या शपथविधीसाठी कोणतीही जय्यत तयारी केली जाणार नाही, अत्यंत साधेपणाने तो पार पडेल. या शपथविधीनंतर सूनेत्रा पवारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल. यासह राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळतील

ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा; साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

0

बीड — बीड बायपास जवळील शेतात ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या सात जनांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडून त्यांच्याकडून पाच लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड बायपास जवळील घाटे यांच्या शेतातील उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाइन जुगार खेळला जात आहे. या माहिती आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे गोविंद राख, मनोज परजणे, राहुल शिंदे, अश्फाक व चालक वडमारे यांनी 27 जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास छापा मारला.या ठिकाणी वैभव आण्णासाहेब आमटे वय 21 वर्षे रा. खांडे पारगाव ता. जि.बीड व अभिषेक भारत आमटे वय 23 वर्षे रा. खांडे पारगाव ता.जि.बीड यांच्यासह इतर सात जणांनी मिळून त्यांच्या सर्वाच्या आर्थिक फायद्याकरीता लोकांना जास्त पैसे मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन विनापरवाना बेकायेदशिररित्या लोटस् 365 अँपमध्ये विविध खेळावर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून घेवुन जुगार खेळत व खेळवित असतांना आढळून आले. यावेळी आरोपींकडून लॅपटॉप, टॅब, मोबाईल फोन असा एकुन 5 लाख26 हजार रूपयांचा मुद्देमालासह मिळुन आला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

लाच घेताना माजलगाव शहर पोलीस एसीबीने पकडला; पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

0

माजलगाव — वाळूचे टेंडर होऊन चार दिवसही होत नाही तोच वाहने सुरळीत चालू देण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाच घेताना खाजगी इसमासह जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर पोलीस अधीक्षकांनी शहर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना नियंत्रण कक्षात हलवले आहे.
माजलगाव पोलिसांची वाळू वाहतुकीत हप्तेखोरी सुरू झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने समोर आले. माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल कदम याने एका तक्रारदाराकडे वाळू वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम खासगी इसम तात्यासाहेब आर्डे याच्यामार्फत स्वीकारली जाणार होती. जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या पथकाने बुधवारी माजलगाव बायपास रोडवरील लेंडाळ हॉस्पिटलसमोर सापळा रचला. यावेळी अमोल कदम याच्या सांगण्यावरून आर्डे याने २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाच घेताच पथकाने दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ माजली.दरम्यान लाचखोरी चे प्रकरण उघडकीस येताच पोलीस अधीक्षक नवनीत प्राबत यांनी तत्काळ कारवाईचे आदेश देत. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची माजलगाव शहर ठाण्यातून नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली आहे. पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्याकडे माजलगाव शहर पोलीस ठाण्याचा नवीन पदभार सोपवण्यात आला आहे.

अजित दादांना शासकीय इतमामात दिला जाणार निरोप, कुठे होणार अंत्यसंस्कार?

0

बारामती — मुंबईहून बारामतीकडे जाणारे त्यांचे लिअरजेट ४५ (Learjet 45) हे विमान उतरत असताना कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या अपघातात विमानातील वैमानिकांसह इतर चार जणांचाही मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. सध्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर असंख्य कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. आता त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन कुठे करता येणार आणि त्यांचे अंत्यसंस्कार कुठे होणार याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. आज बुधवारी संध्याकाळी ४ वाजल्यापासून त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान, विद्या नगरी चौक येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आज रात्री उशिरापर्यंत नागरिकांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल.

यानंतर गुरुवारी सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा विद्या प्रतिष्ठान चौक आणि भिगवण रोड सेवा रस्त्यावरून मार्गक्रमण करेल. यानंतर सकाळी ११ च्या दरम्यान विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी सध्या बारामतीमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासकीय आणि कौटुंबिक पातळीवर वेगाने तयारी सुरू आहे. एकीकडे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात नियोजनाची तयारी केली जात असताना, दुसरीकडे अजित दादांचे मूळ गाव असलेल्या काटेवाडीतही हालचालींना वेग आला आहे. काटेवाडीतील त्यांच्या निवासस्थाना शेजारील स्वतःच्या शेतात संपूर्ण जमीन नांगरून आणि सपाटीकरण करून जागा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, अंत्यसंस्कारासाठी नेमकी कोणती जागा निवडायची याबाबतचा अंतिम निर्णय पवार कुटुंब घेणार आहे.

अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच लोकसभेत दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या निधनामुळे बारामती आणि बीड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून सर्व सरकारी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू

0

बारामती — उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार विमानात अजित पवारांसह एकूण 6 जण प्रवास करत होते, त्यापैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना अजित पवार यांचे छोटे विमान बारामतीच्या धावपट्टीवर लँडिंगच्या वेळी अपघातग्रस्त झाले.
सकाळी ८:४५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या शेतात कोसळले. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली.
आज अजित पवार यांचे बारामतीत एकूण 4 ठिकाणी नियोजित कार्यक्रम होते. या कार्यक्रमांसाठीच ते मुंबईहून बारामतीत दाखल होत होते.विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे. घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि वैद्यकीय पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लँडिंगदरम्यान तांत्रिक बिघाड झाला की हवामान अथवा धावपट्टीवरील अडथळ्यामुळे हा प्रकार घडला, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.