राजुरी परिसरातील ८ ते १० गावांच्या शेतीसिंचनाचा प्रश्न आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्यातून मार्गी
बीड — वंजारवाडी लघु प्रकल्प तलाव दुरूस्ती आणि पाट दुरूस्तीच्या कामासाठी जलसंपदा विभागाकडून १ कोटी ७ लाखांच्या निधीसह मंजुरी देण्यात आली आहे. सदरील काम हे निविदास्तरावर असून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे राजुरी परिसरातील ८ ते १० गावांच्या शेतीसिंचनाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यातून हा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.
बीड तालुक्यातील वंजारवाडी लघू प्रकल्प असलेला तलावाचे काम सन १९६५ मध्ये पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची सिंचन क्षमता ही १०५२ हेक्टर आहे. तलाव म्हणजे राजूरी परिसरातील ८ ते १० गावांना शेती सिंचनासाठी पूरक ठरू शकणारा स्त्रोत आहे. परंतु सदरील तलावाचे काम मोठ्या कालवधीपूर्वी झाल्यामुळे याठिकाणी मुख्य बांधकाम कमकुवत होणे, त्यातून पाण्याची गळती होणे, सांडव्याची दुभाजक भिंत मोडकळीस आली होती. त्यामुळे येथे आवश्यक ती दुरूस्तीची कामे होणे अत्यंत गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन राजूरी परिसरातील शेतकरी बांधवांनी आदर्श गाव वंजारवाडीचे सरपंच वैजनाथ तांदळे यांच्या माध्यमातून हा प्रश्न आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडे मांडला. त्यावर आ.क्षीरसागर यांनी या संदर्भात शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. परिणामी वंजारवाडी तलाव आणि पाटदुरूस्तीच्या कामासाठी १ कोटी ७ लाख रूपयांचा भरघोस निधीसह मंजूरी मिळाली आहे.आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे राजूरी, वंजारवाडी आणि परिसरातील गावांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
डोमरी तलावाचे पाणी वंजारवाडी तलावात आणण्यासाठीही पाठपुरावा सुरू, स्व.अजितदादांनीही दिले होते निर्देश
मागील अनेक वर्षांपासून डोमरी तलावामध्ये अतिरिक्त असलेले पाणी वंजारवाडी तलावात वळविण्यासाठी मागणी आहे. आ.संदीप क्षीरसागर हे मागील अनेक दिवसांपासून डोमरी तलावातील अतिरिक्त (ओव्हरफ्लो) पाणी वंजारवाडी तलावात लिफ्टींगद्वारे आणण्यासाठी आणि वंजारवाडी धरणाची उंची वाढवण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत. दरम्यान सन २००७ मध्ये स्व.अजित दादा पवार जलसंपदा मंत्री असताना, डोमरी धरणातील अतिरिक्त पाणी वंजारवाडी धरणात वळवणे आणि वंजारवाडी तलावाची उंची वाढविण्याचा कामासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.






शुक्रवार, दि.६ फेब्रुवारी रोजी आ. विजयसिंह पंडित यांनी बीड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी माजलगाव बॅक वॉटर काडीवडगाव आणि ईट येथील जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी केली. या पाहणीत योजनेच्या पाईपलाईनवर पाणी गळती, पाणी वितरणातील अवमेळ, फिल्डवरील बिघाड याकडे झालेले दुर्लक्ष आणि तांत्रिक चुका अशा धक्कादायक बाबी यावेळी समोर आल्या. या सर्वांचा बीड शहराच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. माजलगावच्या काडीवडगाव येथील बॅकवॉटरवरून ३६ एमएलटी पाणी प्रत्यक्षात उचलण्यात येत असले तरी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाणी गळतीमुळे ईटच्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत हे पाणी पोहोचत नाही. ही अशीच गळती जलशुध्दीकरण केंद्रावरही होत असल्याचे निदर्शनास आल्याने याचा बीड शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे दिसताच आ. विजयसिंह पंडित यांनी भविष्यातील उन्हाळी परिस्थिती, रजमान व इतर सण लक्षात घेता तातडीने उपलब्ध साधन सामग्रीचा व यंत्रणेचा वापर करून बीड शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्या बाबतच्या सूचना पालिका प्रशासन, पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना दिल्या आहेत.




