Home Blog Page 130

मनोज जरांगे यांची प्रकृती बनली नाजूक;आरोग्य तपासणीस नकार

0

जालना — मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.

आज (दि.२४) सकाळी त्यांनी आरोग्य पथकातील डॉक्टरांना तपासणी करण्यास नकार दिला. त्यामुळे समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

डॉक्टरांचे पथक तपासणी न करता परत गेले. तर दुपारच्या सत्रातील आरोग्य पथक आरोग्य तपासणी करू द्या, अशी विनंती करत होते. मात्र, तपासणीसाठी जरांगे यांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे आता त्यांचा बीपी किती आहे? शुगर किती आहे? ताप किती आहे? पल्स किती आहेत? याबाबत मराठा समाजासह सर्वांच्या मनात धाकधूक वाढली आहे. आंदोलक महिलांकडून जरांगे यांना पाणी आणि आरोग्य तपासणी करून उपचार घेण्याची विनंती केली.आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. महिलांच्या डोळ्यात अश्रू असून पोटतिडकीने त्या उपोषण मागे घेण्याची विनंती करीत आहेत. परंतु मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत
मराठा आंदोलक संतप्त झालेले असून वडीगोद्री येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. दुसरीकडे बीडमध्ये तर एसटी प्रशासनाने बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलक संतप्त असून सरकारने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
जरांगे यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आज सकाळी ९ वाजता जिल्हा आरोग्यपथक व्यासपीठावर दाखल झाले. केवळ बीपी तपासणी तरी करून देण्याची विनंती आरोग्य पथकातील डॉक्टरांनी केली. मात्र, त्यांनी त्यास विरोध केला. दरम्यान, उपोषणाच्या सातव्या दिवशी सोमवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास जरांगे बाथरूममध्ये जात असताना भोवळ येवून कोसळले होते. त्यांचा बीपी कमी झाला होता. मात्र, उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला होता.

रेल्वे मार्गाच्या अडचणींसंदर्भात आ.क्षीरसागरांनी घेतली बैठक

0

तक्रारी असलेल्या मार्गावर तात्काळ पाहणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना

बीड — बीड मतदारसंघातुन जाणाऱ्या रेल्वे मार्गावर नागरिकांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. रेल्वे मार्गाच्या कामात अनेक त्रुटी असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच काही ठिकाणी अपघात होत आहेत. या भागातील नागरिकांनी यासंदर्भात अनेकवेळा रेल्वे विभागाशी अनेकवेळा संपर्क केला आहे. परंतु रेल्वेकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद नागरिकांना मिळाला नाही. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवार (दि.२३) रोजी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्यक्ष, सविस्तर चर्चा करून तक्रारी असलेल्या ठिकाणांची तात्काळ पाहणी करून येथील अडचणी दूर करण्यासंदर्भात सत्वर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
बीड मतदारसंघातून नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग मोठ्या प्रमाणात गेलेला आहे. याचे कामही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. परंतु या कामांमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे पुलांच्या खाली पावसामुळे नेहमीच खूप जास्त पाणी साचून राहते. त्यामुळे येथून वाहतूक करणे अवघड होते. ऊस वाहतूक करणारी वाहने याठिकाणाहून जाऊ शकत नाही. वाहतुकीची अडचण होत असल्याने या परिसरात रहिवाशी असलेले १५ ते २० हजार लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी रोड तिरका झाल्याने अपघात होत आहेत. या होत असलेल्या अडचणींमुळे येथील नागरिकांनी आतापर्यंत रेल्वे विभागाकडे अनेकवेळा संपर्क केला. परंतु नागरिकांना याबाबत रेल्वेकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२३) शासकीय विश्रामगृह, बीड येथे रेल्वे विभागाचे संबंधित अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या अडचणी संदर्भात अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून अडचणी दूर करण्यासाठी संबंधित ठिकाणच्या प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय स्तरावर तात्काळ कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना आ.क्षीरसागर यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीस आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, रेल्वे विभागाचे सर्व संबंधित अधिकारी व या भागातील नागरिक उपस्थित होते.

पत्रकार रवी उबाळे यांना पितृशोक; सुरेश उबाळे यांचे निधन

0

बीड — एस.टी. महामंडळ बीड आगार येथील सेवावृत्त वाहतूक नियंत्रक सुरेश उबाळे यांचे अल्पशा आजाराने सोमवारी दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १ .५५ वाजता उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मंगळवारी दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता शहरातील अमरधाम मोंढा रोड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उबाळे कुटुंबीयांच्या दुखात “सह्याद्री माझा” परिवार सहभागी आहे.

केज मध्ये भर दिवसा विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न!

0

केज — शहरातील मुख्य रस्त्यावर सोनार गल्लीत चार चाकी मधून आलेल्या तिघांनी शाळेत चाललेल्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही तरुणांनी हा प्रयत्न हाणून पाडला. अपहरण करणारा एक जण हाती लागला असून दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

पकडलेल्या त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून नेमका हा प्रकार काय ? हे तपासातून समोर येईल. मेन रोडने सकाळी १० च्या सुमारास एक विद्यार्थी सोनार गल्लीतून शाळेला जात होता. त्यावेळी अचानक एक चारचाकी वाहन आले. ते वाहन मुलाजवळ येऊन थांबले काही समजण्याच्या आत अकरा वर्षे वयाच्या विद्यार्थ्याला उचलून वाहनात टाकण्याचा प्रयत्न केला असता घडलेल्या या अनुचित प्रकाराने विद्यार्थी घाबरुन ओरडू लागला हे पाहून बाजुला उभी असलेल्या महिलेनेही आरडाओरडा केली.यावेळी नागरिकांनी धाव घेतली तर दोघांनी दुचाकी चारचाकीच्या समोर लावली असता त्यांना पळता आले नाही. परंतु झटापटीत दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले तर एकजण जमावाच्या हाती लागला. त्यास जमावाने चांगलाच चोप दिला. दरम्यान पकडलेला आरोपी हा गेल्या चार-पाच दिवसापासून पाळतीवर असल्याचं विद्यार्थ्याच्या पालकानी म्हटलं आहे.
भरदिवसा रहदारीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने केज शहरात खळबळ उडाली आहे. या पकडलेल्या एका अपहरणकर्त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा प्रकार नेमका काय ? हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. पण शहरात मूल चोरणारी टोळी पकडल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मात्र पोलिसांनी हा सिंधी विकणारा असून मुलं चोरणारा नसल्याचं खाजगीत सांगत असल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केज पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

मराठवाडयात सुर्यघर योजनेतून 31 हजार घरे उजळणार  

0
छत्रपती संभाजीनगर –घराच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेला मराठवाडयात उदंड प्रतिसाद मिळत आहे. मराठवाडयातील आठ जिल्हयात 31,153 सुर्यघर योजनेसाठी अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 31,102 अर्जांना मान्यता मिळाली आहे. तसेच छतावरील सुर्यघर योजनेचे संच बसविण्याचे काम प्रगतिपथावर असून  ही घरे प्रकाशमान होणार आहेत.

या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. राज्यात सौर प्रकल्प बसविणाऱ्या २५,०८६ ग्राहकांना अनुदानाची रक्कम रुपये १६० कोटी थेट ग्राहकांना हस्तांतरीत करण्याचे काम सुरु आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात एकूण ३,५१,९४२ ग्राहकांची प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेच्या पोर्टलमध्ये नोंदणी झालेली आहे. यापैकी योजनेत २,३३,४३१ ग्राहकांनी महावितरण पोर्टलवर अर्ज केलेला आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करुन देण्यासाठी १ कोटी घरांना रुफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने  महाराष्ट्रासाठी २० लाख घरांवर रुफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. देशाचा हा प्रकल्प रु.७५,००० कोटी पेक्षा जास्त गुंतवणुकीचा आहे.
ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीजबिल शुन्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते.निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३०,००० रुपये अनुदान २ किलोवॅट पर्यंत मिळते. ३ किलोवॅट पर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी रु. १८,००० अनुदान मिळते. ३ किलावेंट पेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान रु. ७८,००० पर्यंत मयांदित आहे
मराठवाडयात सुर्यघर योजनेचे लाभार्थी
मंडल कार्यालय          लाभार्थी
छ. संभाजीनगर          5,361
शहर
छ. संभाजीनगर          3,696
ग्रामीण
जालना मंडल             3,096
छ.संभाजीनगर
परिमंडल                12,153

लातूर मंडल              4,481
बीड मंडल               3,408
धाराशिव मंडल            2,066
लातूर परिमंडल            9,955
नांदेड मंडल              3,746
परभणी मंडल             3,348
हिंगोली मंडल             1,900
नांदेड परिमंडल            8,994
छ. संभाजीनगर
प्रादेशिक कार्यालय         31,102 

मराठवाडयात 31,153 ग्राहकांनी प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज केले. त्यापैकी 31,102 ग्राहकांचे अर्ज मंजूर झाले असून यातून 20,781.43 किलोवॅट उर्जा निर्मिती होणार आहे. व 5225 ग्राहकांच्या घराच्या छतांवर संच बसवून वीज निर्मिती सुरू झाली असल्याने  यांना मोफत विजेचा लाभ मिळून शुन्य विजबिलाचे लाभार्थी झाले आहेत.  या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध असून ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी केले आहे.

नागरिकांची काम प्रलंबित ठेवू नका लोकाभिमुख प्रशासनाची गरज — तहसीलदार शेळके

0

चौसाळा — प्रशासनाला लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने बीड चे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी चौसाळा महसूल मंडळाची आढावा बैठक आज घेतली. समाजातील सर्व घटकांशी चर्चा करून प्रश्न समजावून घेत सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना लोकाभिमुख प्रशासन राबवण्यासाठी जनतेचे प्रश्न समजून घ्या. त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील रहा, नागरिकांची काम प्रलंबित ठेवू नका अशा सूचना यावेळी दिल्या.


चौसाळा महसूल मंडळातील जनतेच्या अडीअडचणी जनतेत गेल्याशिवाय कळणार नाहीत. प्रश्न कळल्याशिवाय लोकाभिमुख प्रशासन राबवता येणार नाही. हे लक्षात घेऊन चौसाळा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जनतेसह सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी बोलवली होती. यावेळी बैठकीत ग्रामपंचायत तर्फे तहसीलदार शेळके यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीत शेतकऱ्यांसह, मजूर, वीज,अनुदान प्रश्न,श्रावण बाळ योजना, ई.के वाय सी, स्वस्त धान्य, मतदार नोंदणी, ई पिक पाहणी, अतिवृष्टी अनुदान, यासारख्या अनेक प्रश्नांची माहिती समाजातील सर्व स्तरातील नागरिकांशी चर्चा करून घेतली. नागरिकांची समस्या जाणून घेत. तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना तहसीलदार शेळके यांनी दिल्या.अधिकारी कर्मचारी यांच्यात समोरासमोर चर्चा व निराकरण झाल्यामुळे लोकाभिमुख प्रशासन कसं असतं याची चुणूक आज चौसाळकरांना पाहायला मिळाली.
यावेळी मंडळ अधिकारी जायेभाये, तलाठी शिवराम येवले, तलाठी कमलेश निर्मळ, तलाठी निशा खांडेकर, तलाठी उषा राठोड, स्वस्त धान्य दुकानदार, मंडळ कृषी कार्यालयातील कर्मचारी, शिक्षक, चौसाळा ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, पत्रकार व चौसाळा महसूल मंडळातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता “या”दिवशी मिळणार

0

मुंबई — बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते मिळाल्यानंतर तिसरा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागलेले असताना तिसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे.२९ सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे.

रायगडमध्ये योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून तेव्हाच २ कोटी महिलांना तिसरा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी सांगितलं.
आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी रायगडमध्ये होणार आहे. २९ तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत असून सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जांचे लाभ वितरित करण्यात येतील.
त्या पुढे म्हणाल्या, ज्या महिलांना स्क्रूटिनीमुळे अद्याप लाभ प्राप्त झाला नाही त्यांचे सर्व लाभ दिले जाणार आहेत. २ कोटी महिलांना लाभ दिले जाणार असून लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
दोन हप्त्यांचा एकत्रित लाभ

ज्या महिलांना अर्ज भरण्यास विलंब झाला होता, त्या महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्र तीन हजार रुपये सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मिळणार आहेत, अशी माहिती रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात दिली होती.

लाभार्थ्यांसाठीचे निकष

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी महिलांनाच दिला जातो

योजनेचा लाभ केवळ त्या महिलांनाच मिळेल ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात

जर महिलेच्या कुटुंबातील कोणतीही सदस्य सरकारी नोकरीत असेल किंवा कर भरत असेल तर त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत

मांजरसुंबा येथील मोफत आरोग्य शिबिरात ९३२ रुग्णांची तपासणी

0

रा.काँ.चे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांचा स्तुत्य उपक्रम

बीड — तालुक्यातील मांजरसुंबा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांच्या पुढाकारातून रविवारी (दि.२२) मोफत आरोग्य शिबीर पार पडले. या शिबिरात ९३२ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.योगेश क्षीरसागर होते. प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.प.विष्णुदास महाराज सुरवसे, डॉ.सारिकाताई क्षीरसागर, माजी पंचायत समिती सभापती काकासाहेब जोगदंड, मांजरसुंबाचे सरपंच अरुण रसाळ, उपसरपंच शेख पप्पू, अच्युतराव रसाळ, मोहनराव रसाळ, बालासाहेब जाधव, आमेर सिद्दिकी, शुभम कातांगळे, संदीप इंगोले, संदीप कदम, बाबासाहेब खिल्लारे, महादेव खोसे, शंकर चव्हाण, शिवाजी येडे, रामकिसन कदम, समीर शेख, प्रकाश मांडवे, विष्णुपंत मेंगडे, शहाजी घोडके, राजाभाऊ क्षीरसागर, माजेद कुरेशी, मिलिंद ठोकळ, फुलचंद येडे आदींची उपस्थिती होती. या शिबिरात हृदयाची अन्जिओग्राफि, कॅन्सर शस्त्रक्रिया, अजिओप्लास्टी, मुत्रमार्ग शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, स्त्रियांचे आजार अशा १७ आजारावर निदान व मोफत उपचार केले जाणार आहेत. या आरोग्य शिबिरात पंचक्रोशीतील नागरिक व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, डॉक्टर क्षीरसागर दाम्पत्याच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

३४५ जणांना चष्मे वाटप; २१ जणांचे रक्तदान

मांजरसुंबासह पंचक्रोशीतील ९३२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी ३४५ जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच, १७५ जणांची रक्त तपासणी मोफत केली. याच आरोग्य शिबिरात २१ जणांनी रक्तदान केले. आवश्यकतेनुसार सोयीसुविधायुक्त रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया मोफत करून दिल्या जाणार आहेत.

पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा

0

वर्धा, दि.20 (जिमाका) : पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा प्रदान करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. ही योजना म्हणजे देशात हजारो वर्षापासून असलेल्या पारंपरिक कौशल्याचा वापर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. या कौशल्यामध्ये सर्वाधिक भागिदारी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजसमुहाची आहे. या समुहातील कारागिर उद्योजक व्हावेत असा आमचा प्रयत्न असून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या बहुआयामी प्रगतीचा नायक शेतकरीच राहणार असून त्याच्या समृध्दीसाठी सरकार सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी येथे दिली.

पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा वर्धा येथील स्वावलंबी मैदानात आज पार पडला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ.सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या राज्य शासनाच्या दोन योजनांचा शुभारंभही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला.

आजच्याच दिवशी 1932 मध्ये महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता निर्मूलनसाठी सुरू केलेल्या अभियानाची आठवण करुन देतानांच बापूजींची कर्मभूमी आणि विनोबांची साधनाभूमी असलेल्या वर्ध्यातून विकसित भारताची निर्मिती करण्याच्या आमच्या संकल्पास ऊर्जा मिळते, असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले, विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या सोहळ्यासाठी आम्ही यामुळेच वर्ध्याची निवड केली. ही योजना केवळ एक सरकारी कार्यक्रम नसून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशात हजारो वर्षापासून असलेल्या कौशल्याचा वापर करण्याचा एक परिपूर्ण रोडमॅप आहे. इतिहासात आपल्या देशातील समृध्दीचा मोठा आधार पारंपरिक कौशल्य हाच होता. येथील वस्त्रोद्योग, शिल्पकला, धातूविज्ञान, अभियांत्रिकी अशा साऱ्याच बाबी जगात वैशिष्टपूर्ण होत्या. जगातील सर्वात मोठा वस्त्रनिर्माता भारतच होता. मात्र पारतंत्र्याच्या कालखंडात इंग्रजांनी स्वदेशी कौशल्य नष्ट केले. या पार्श्वभूमीवर गांधीजींनी वर्ध्यातूनच ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात बलुतेदारी समुहाची सातत्याने उपेक्षा झाली. त्यामुळेच प्रगती आणि आधुनिकतेत देशाची पिछेहाट झाल्याची खंत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.

कारागिरांच्या पारंपरिक कौशल्याचा सन्मान, सामर्थ्य आणि या समाजसमूहाची समृध्दी ही या योजनेमागची मूळ भूमिका असल्याचे स्पष्ट करुन श्री. मोदी म्हणाले, देशातील सातशेहून अधिक जिल्हे, अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायती तसेच हजारो स्थानिक नागरी संस्था या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत. दहा लाखांहून अधिक लोक या योजनेशी जोडले गेले असून आठ लाख शिल्पकारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यात केवळ महाराष्ट्रातीलच साठ हजारांहून कारागिर समाविष्ट आहेत. त्यांच्या कामाला आधुनिक आणि डिजिटल तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. साडेसहा लाख बलुतेदारांना आधुनिक साधने दिली गेली आहेत. या योजनेचा सर्वाधिक फायदा याच समाजसमूहांना होत आहे. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासोबतच ‘सप्लाय चेन’सारख्या व्यवस्थेचा भाग व्हावे, अशी अपेक्षा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रात मोठ्या औद्योगिक विकासाची क्षमता असून त्यात वस्त्रोद्योग हा अग्रणी आहे. विदर्भात कापसाचे क्षेत्र मोठे असुनही येथील शेतकऱ्यांची यापूर्वी उपेक्षा झाल्याची खंत व्यक्त करुन प्रधानमंत्री मोदी म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर नांदगाव खंडेश्वर येथे टेक्सटाइल पार्कची निर्मिती झाली. आता अमरावती येथे होत असलेले पीएम मित्रा पार्क हे वस्त्रोद्योगास नवी झळाळी प्राप्त करुन देण्याच्या प्रयत्नातील पुढचे पाऊल आहे. फार्म टू फायबर, फायबर टू फॅब्रिक, फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन अशा सुत्रातून आमचे प्रयत्न सुरू असून विदर्भातील उच्च दर्जाच्या सूतापासून तयार होणारे कपडे परदेशात निर्यात होऊन येथील शेतकरी समृध्द होतील. अमरावतीच्या पार्कमध्ये दहा हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून 1 लाखाचा रोजगार उपलब्ध होईल. औद्योगिक विकासासाठी पुरक असणाऱ्या विविध पायाभूत सुविधांचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. विदर्भातील सिंचन विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या वैनगंगा-नळगंगा योजनेच्या अंमलबजावणीतून 10 लाख एकर क्षेत्र सिंचित होणार आहे. याशिवाय कांदा, सोयाबीन उत्पादकांनाही विविध निर्णयाच्या माध्यमातून सरकार मदत करत आहे, असे प्रधानमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा योजना महत्वाची

–          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशातील गरीब, वंचित तसेच परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कारागिरांच्या आर्थिक प्रगतीसाठी पीएम विश्वकर्मा ही योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अमरावती येथे पीएम मित्रा पार्क हा देशातील वस्त्रोद्योगाच्या विकासाला चालना देणारा ठरणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसावर प्रक्रिया करून कापड निर्यातीला चालना मिळणार आहे. या पार्कमध्ये 10 हजार कोटीची गुंतवणूक होणार असून सुमारे 1 लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांमुळे राज्यातील महिला व इतर घटकांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला पोषक ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी यावेळी म्हणाले की, पीएम विश्वकर्मा ही योजना पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडविणारी आहे. त्यांना उच्च गुणवत्ता व प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेला माल जागतिक बाजारपेठेत पाठवण्यास प्राधान्य दिले आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात 1 लाख 46 हजार कारागिरांची नोंदणी झाली आहे. कारागिरांना अत्याधुनिक साधनांसाठी 5 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून त्यांच्या उत्पादीत वस्तुंना मोठी बाजारपेठ निर्माण करण्यात आली आहे. भारतातील कारागिरांनी तयार केलेल्या विविध वस्तुंच्या उत्पादनांचे प्रदर्शन वर्धा येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामिण कारागिरांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे श्री.मांझी यांनी यावेळी सांगितले.

देशातील सात पीएम मित्रा पार्कपैकी अमरावती येथे होत असलेल्या पार्कच्या माध्यमातून  कापसापासून कापडापर्यंत व कापडापासून फॅशनपर्यंतच्या सर्व प्रकारच्या एकत्र सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे मोठ्या गुंतवणुकीसह रोजगार उपलब्ध होईल. पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या बारा बलुतेदारांच्या विकासाचा विचार अद्यापपर्यंत कोणीही केला नाही, परंतू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा सारख्या योजनेच्या माध्यमातून बाजारपेठेला अनुकूल असलेल्या वस्तुंची निर्मिती करण्यासाठी प्रशिक्षणासह आर्थिक सहाय्य कारागिरांना उपलब्ध करून दिले आहे. याचा लाभ समाजातील शेवटच्या कारागिरापर्यंत पोहोचत आहे. बलुतेदार समाजसमुहाच्या जीवनात परिवर्तन घडविण्याची मोठी संधी या योजनेमधून उपलब्ध झाले असल्याचे सांगून शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून विदर्भासह राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. या पार्कमुळे पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार असून येथे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये मोठे प्रकल्प गतिमानतेने पूर्ण केल्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा विक्रम केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. गडचिरोली येथे स्टील उद्योग तसेच महापे येथे सेमी कंडक्टर या उद्योगांचा यामध्ये समावेश आहे. प्रधानमंत्र्यांच्या विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सरकार संपुर्ण योगदान देईल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कारागिरांना प्रमाणपत्रधनादेशाचे वितरण

प्रधानमंत्र्यांनी कळ दाबून अमरावती येथील पीएम मित्र पार्क, राज्यातील 1 हजार आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्रांचे उद्घाटन केले तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा योजनेच्या 1 लाख कारागिरांना ओळखपत्र व प्रमाणपत्र तसेच 1 लाख कारागिरांना डिजिटल कौशल्य प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. देशभरातील 75 हजार कारागिरांना कर्जाचे वितरण देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय डाक विभागाने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरण प्रधानमंत्र्यांनी केले.

सुरुवातीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चरख्याची प्रतिकृती तर केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या कलाकृती भेट देऊन प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले. लघु, सुक्ष्म व मध्यम विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या परंपरागत ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या विविध आकर्षक कलाकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ.पंकज भोयर, दादाराव केचे, समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस, प्रभारी विभागीय आयुक्त डॅा.विपीन ईटनकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती.

Hello world!

0

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!