Home Blog Page 131

चोरीचे सोने घेणाऱ्या नांदूर घाटच्या व्यापाऱ्यावर कारवाई; छतावरून उडी टाकून पळाला

0

केज — तामिळनाडूत दरोडा टाकून चोरीचे एक किलो 200 ग्रॅम वजनाचे एक कोटी रुपये किमतीचे सोने नांदूर घाट येथील सोन्याच्या व्यापाऱ्याला विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे तामिळनाडू पोलीस व केज पोलीसांनी सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी नांदुरघाट येथील व्यापाऱ्याच्या घरावर अचानक छापा टाकून कारवाई केली. पोलीस आल्याचे पाहून सोन्याच्या व्यापारी घराच्या छतावरून उडी टाकून पसार झाला आहे.


तालुक्यातील नांदूरघाट येथील सोन्याचे व्यापारी असलेल्या अनिल बडे याने तामिळनाडू राज्यातील चोरीच्या घटनेतील चोरांनी चोरी केलेले तब्बल एक किलो दोनशे ग्रॅम वजनाचे अंदाजे एक कोटी रूपये किंमतीचे सोने तडजोडीत केवळ पंचेवीस लाख रूपयाला चोरांकडून घेतले होते.

या चोरीच्या घटनेचा तपास करणाऱ्या तामिळनाडू पोलीसांनी या चोरीच्या गुन्ह्यातील तिघा संशयितांना ताब्यात घेऊन चोरीचे सोने कोणाला विकले याची माहिती घेतली. त्या तीन संशयितांना घेऊन केज पोलीसांच्या मदतीने सोमवारी सकाळी नांदुरघाट येथील संबंधीत सोन्याच्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला.त्यावेळी पोलीस आल्याचे पाहून अनिल बडे हा घराच्या छतावरून उडी टाकून पसार झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस नांदुरघाट येथे ठाण मांडून आहेत. व्यापाऱ्याने ठरलेल्या पंचेवीस लाख रक्कमेपैकी चौदा लाख रूपये चोरांना दिले असून अकरा लाख रुपये देणे बाकी आहेत.

ही कारवाई तामिळनाडू पोलिसांसह केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, नांदूरघाट पोलीस चौकीचे पाशा शेख, राजू वंजारे व शमीम पाशा यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे. मागील दोन दिवसांपासून तामिळनाडू पोलीस चोरीच्या घटनेत ताब्यात घेतलेल्या तीन चोरांना घेऊन नांदूरघाट मध्ये तळ ठोकून आहेत.

विशेष म्हणजे कोणाला संशय येऊ नये, यासाठी तामिळनाडू पोलीस वाहनाला बनावट नंबर प्लेट खोटा नंबर लावून ही कारवाई केली आहे. या तामिळनाडू पोलीसांच्या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

शिवजयंती साजरी करण्यासाठी बाँडची मागणी, धक्कादायक प्रकार

0

बीड — छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची असेल, तर बॉण्ड वर लिहून द्या अशी मागणी पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावच्या सरपंच डॉ. रेशमा पोळ, ग्रामसेवक परमेश्वर सावंत यांनी जयंती समितीकडे केली आहे. या प्रकाराने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

जयंती समितीने ग्रामपंचायतकडे रितसर लेखी अर्ज करून परवानगी मागितली आहे. असे असतानाही बॉण्ड की सक्ती का? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष पोलीस प्रशासनाच्या परवानगीसाठी लेखी अर्ज केला आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळेल तुम्ही परवानगी द्या अशी मागणी समितीने केली होती. मात्र, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी अगोदर बॉण्डवर लिहून आणा त्यानंतर परवानगी देते असे डॉ. रेशमा पोळ सरपंच काही झालं तर याला उत्सव समिती जबाबदार असेल. अशी भूमिका घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जयंती साजरी करायची असेल तर बाँडची सक्ती का असा प्रश्न उपस्थित केला जात असून शिवप्रेमी मधून संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. यावेळी गावातील शिवप्रेमी सरपंचाचे बंधू यांनीही जाब विचारत बाँडवर परवानगी मागणं हे काय पाकिस्तान आहे का असा सवाल केला आहे.

सार्वजनिक शिवजयंती उत्सवात सहभागी व्हा — आ.संदीप क्षीरसागर

0
बीड  — दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहर (चंपावती नगरी) च्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या स्वरूपात शिवजयंती साजरी करण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांनी याहीवर्षी शिवजयंती साजरी होणार आहे. शिवजयंती सोहळ्यास सर्व बीडकर बंधू-भगिनिंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
                   गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे बीड शहरात आ.संदीप क्षीरसागरांच्या पुढाकारातून आणि मार्गदर्शनातून भव्य दिव्य आणि आगळ्यावेगळ्या स्वरूपात शिवजयंती साजरी केली जात आहे. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य आणि क्रीडा कार्यक्रमांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे शिवजयंती साजरी होत आली आहे. दरवर्षी प्रमाणे बीडच्या सांस्कृतिक परंपरेनुसार सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहर (चंपावती नगरी) च्या माध्यमातून दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शासकीय महापूजा आणि सायंकाळी ६:०० वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्व बीडकरांनी या शिवजयंती उत्सव सोहळ्यात सहभागी होऊन भव्य दिव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे साक्षीदार व्हा. असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
ही आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणं 
– तब्बल ४५० ढोलताशांचे ‘करवीर नाद’ नावाचे सुप्रसिद्ध असलेल्या ढोलताशा पथकाचे सादरीकरण
🔴 ‘तिबेटियन मॉंक’ अर्थात तिबेट देशातील धर्मगुरूंचे जगप्रसिद्ध असलेले ‘शाओलीन मार्शल आर्ट’
🔴  पश्चिम बंगाल येथील ‘रायबिशी आर्ट स्कूल’ नावाचे पथक ऍक्रोबाईक्स आणि वेगवेगळे चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर करणार.
🔴  ओडिशा राज्यातील ‘दुलदुली बाजा’ नावाचे आदिवासी वाद्य पथक आपली कला सादर करणार.
🔴  आंतरराष्ट्रीय दर्जाचा लाईट आणि लेजर शो.
महिला, वृध्द आणि बालकांसाठी असणार विशेष बैठक व्यवस्था
दरम्यान या कार्यक्रमामध्ये महिला, लहान मुले आणि वृद्धांसाठी विशेष बैठक व्यवस्था असणार आहे. जेणेकरून महिला भगिनींनाही कार्यक्रमाचा आनंद घेता यावा‌. तसेच कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचेही समितीकडून सांगण्यात आले आहे.

लाडक्या बहिणींसाठी योजनेतील नियम बदलणार, काय असणार नवे नियम जाणून घ्या

0

मुंबई — लाडक्या बहिणी आठवा हफ्ता येण्याची वाट बघत आहे. त्यापूर्वी फडणवीस सरकारने या योजनेत नवी सुधारणा केली आहे. लाभार्थी महिलांना आता दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान केवायसी करणे अनिवार्य केले आहे.तसेच राज्य सरकारने लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारच्या तिजोरीवरील भार वाढवण्याऱ्या या योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी आणि केवळ पात्र लाभार्थींनाच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने नवी सुधारणा केली आहे. लोक या योजनेला लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचे षडयंत्र म्हणत आहे.या योजनेत पूर्वीच पाच लाख महिलांची पात्रता काढून टाकण्यात आली असून अद्याप 2 कोटींहून अधिक बहिणी या योजनेचा लाभ घेत आहे. राज्य सरकार कडून आशा वर्कर्स आणि अंगणवाडी वर्कर्सच्या मदतीने लाडक्या बहिणीच्या पात्रतेची तपासणी आधीच सुरु केली आहे. लाभार्थी बहिणींच्या खात्यात आठव्या हफ्ताचे पैसे पुढील 8 दिवसांत बँकेच्या खात्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे बीडय काहीही घडू शकतं! कोर्टाच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त

0

बीड — जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची शासकीय गाडी जप्त करण्याचे आदेश माजलगावच्या कोर्टाने दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणीही तडकाफडकी करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिखल बीड येथे 1998 मध्ये लघु सिंचन प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पासाठी तीन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला देऊन त्यांची बोळवण करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. 1998 पासून संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा अद्याप मिळालाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना 32 लाखांची भरपाई देण्याचे आदेश माजलगाव सत्र न्यायालयाने दिले. कोर्टाच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही. नऊ वर्षांपासून जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांच्या कार्यालयाच्या खेट्या घालूनही पैसे मिळत नसल्याने शेतकरी हातबल झाले होते. शेतकऱ्यांनी अखेर कोर्टात धाव घेतली. कोर्टाने शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य करत त्यांच्या बाजूने निकाल दिला.

कोर्टाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही. त्यांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही. शेतकऱ्यांना बीड प्रशासन काय करु शकते याचे जीवंत उदाहरण देत कोर्टाच्या आदेशाकडे सपशेल दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला दिलाच नाही. शेतकऱ्यांनी पुन्हा कोर्टाचे दार ठोठावले. कोर्टाने त्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले. संपूर्ण प्रकरण समजून घेत कोर्टाने बीड जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज बीडचे जिल्हाधिकारी अविनास पाठक यांची धावती कार अडवून जप्त करण्यात आली.

माजलगाव कोर्टाच्या या आदेशाने बीडच्या इतिहासात आणखी एक नवा अध्याय लिहिला गेला. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी इतिहासात प्रथमच जप्त करण्यात आली. बीडचे पालकमंत्री अजित पवार आहेत. त्यांनी बीडचे पालकत्व घेतले आहे. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात बीड जिल्हाधिकाऱ्यांची गाडी कोर्टाने जप्त करुन कोर्टाच्या आवारात आणून ठेवली आहे. कोर्टाने काही दिवसांची मुदत जिल्हा प्रशासनाला दिली आहे. निर्धारित मुदतीमध्ये शेतकऱ्यांना त्यांचा मावेजा दिला गेला नाही तर कोर्ट गाडीचा लिलाव करण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे.

दिल्ली-एनसीआरमध्ये 4.0 तीव्रतेचा भूकंप

0

नवी दिल्ली — आज सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पहाटे 5.36 वाजता भूकंप झाला. भारत सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भूकंपाची नोंद करणारी संस्था, राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) नुसार, त्याची तीव्रता 4.0 इतकी मोजली गेली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वांना शांत राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तसेच संभाव्य भूकंपानंतरच्या धक्क्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.लोक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की घरांमधून भांडी खाली पडू लागली आणि घरांमध्ये प्रचंड कंपने निर्माण झाली. भूकंपानंतर दिल्लीच्या कार्यवाहक मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर एक संदेश पोस्ट केला.

अमेरिकन संस्था- USGS नेही दिल्ली-NCR मध्ये भूकंप झाल्याची पुष्टी केली आहे. त्यानुसार, सोमवारी पहाटे २८० हून अधिक लोकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद केली. पृथ्वीवरील हादऱ्यांनंतर, भूकंपशास्त्रज्ञांनीही भूकंपाची पुष्टी केली.राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिल्ली-एनसीआरमध्ये झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांची माहिती दिली. भूकंपाचे केंद्र राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीजवळ होते.

भूकंपाच्या वेळी काय करावे

भूकंपाच्या वेळी शक्य तितके सुरक्षित रहा. कोणते भूकंप प्रत्यक्षात पूर्वसूचना देणारे भूकंप आहेत आणि कोणते भूकंपानंतर मोठा भूकंप येऊ शकतो याची जाणीव ठेवा. हळू हळू हालचाल करा, जवळच्या सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी काही पावलांपर्यंत तुमची हालचाल मर्यादित करा आणि एकदा हादरे थांबले की, बाहेर पडणे सुरक्षित आहे याची खात्री होईपर्यंत घरातच रहा.

एस पीं सोबत दिलजमाई; पवन ऊर्जा कंपन्यांची ही मोगलाई!

0

कंपन्यांच्या नित “नव” दादागिरीने शेतकरी मात्र कावत (संताप) आहे ?

बीड — पाऊल ठेवताच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पवन ऊर्जा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. बिनधास्त काम करा मी तुमच्या पाठीशी आहे असं म्हणत दिल जमाई केली. मात्र पवन ऊर्जा कंपन्यांनी याचाच गैरफायदा घेत मोगलाई सुरू झाल्याचं चित्र उभं केलं. उभी पिक उध्वस्त करत शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा सपाटा लावला. पण प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी म्हणून गाजावाजा करून घेणारे एस पी कावत यांनी शेतकऱ्यांची बाजू मागणी करूनही ऐकून घेण्याची तसदी घेतली नाही किंवा त्यांना गरजही वाटली नाही. ते कंपन्यांच्या संरक्षणासाठी आले आहेत की सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी जिल्ह्यात आले आहेत असा प्रश्न मात्र निर्माण होऊ लागला आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर हा प्रश्न राज्यातच नव्हे तर देशभरात गाजला. त्यातूनच प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी जनतेला न्याय देईल यासाठी नवनीत कावत यांच्याकडे जिल्ह्याची सूत्र दिली. बीडमध्ये पाऊल ठेवताच मी आधी पूर्ण अभ्यास करून नंतरच पावलं उचलेल कायद्याचं राज्य स्थापन करेल अस आश्वासन दिलं. त्या अनुषंगाने पावलंही उचलली. वाळू तस्करी ला आळा घालण्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर, हायवा यांच्यावर मोलमजुरी करणारी पण गुन्हे दाखल असणारी मंडळी एसपी कार्यालयात बोलावून दम भरला गेला. तीच स्थिती गुटखा माफीयांच्या बाबतीत देखील आहे.

गुटखा विक्री करणाऱ्या टपऱ्यावर कारवाई करण्यात आली पण गुटखा माफियांच्या तस्करीला आळा घालण्यात सपशेल यंत्रणा फेल ठरली. त्यामुळे गुटखा विक्री अजूनही जिल्ह्यात सुरूच आहे. चिल्लर चालर गुन्हेगारांना बोलावून देखील यापुढे गुन्हे केले तर याद राखा अशी तंबी दिली. पण गुन्हे घडवून आणणाऱ्या मास्टर माईंड अद्याप एकही पोलिसांच्या हाती सापडला नाही किंवा तशी ठोस कारवाई. केली गेली नाही. पोलीस दलातच अनेक जण वाळू तस्करीत गुंतलेले आहेत. ते तस्कर सापडून त्यांच्यावर देखील कारवाई झालीच नाही. एकूणच स्टंटबाजीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षकांची वाहवाई मोठ्या प्रमाणावर माध्यमातून झाली असली तरी शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र त्यांचं धोरण सापत्न पणाचच राहिला आहे. विकासाच्या नावाखाली पवन ऊर्जा कंपन्यांनी घातलेला धुडगूस एसपींना दिसलाच नाही. किंवा मग धृतराष्ट्रासारखी त्यांनी भूमिका घेतल्यामूळेच पवन ऊर्जा कंपन्यांनी मोगलाई सुरू केली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पवन ऊर्जा कंपन्यांना अश्वस्त करण्यासाठी वेळ मिळाला. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची देखील बैठक घेऊन अश्वस्त करावं अशी मागणी केली. सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाला एस पी नी केराची टोपली दाखविली. त्यांना वेळ मिळालाच नाही. किंवा त्यांना शेतकऱ्यांची कैफियत ऐकून घेण्याची गरज वाटली नाही मेले तर मरू बापडीचे असाच जणू त्यांनी संदेश दिला आहे. जमिनीचा मोबदला न देणे, कराराचे पालन न करणे, संपादित क्षेत्रापेक्षा जास्तीचे अतिक्रमण करणे,जाब विचारलाच तर दांडगाई करणे असे नव “नीत” किस्से रोज ऐकायला मिळू लागले आहेत. रोहित ढास या शेतकऱ्याची मुळूकवाडी शिवारात गट क्रमांक 657 मध्ये जमीन आहे. या जमिनीलगतच रिन्यू ग्रीन एम एच पी वन प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली ही कंपनी पवनचक्की उभा करत आहे. उभारणीसाठी रस्ता म्हणून रोहित ढास या शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून या कंपनीने कुठलाही मोबदला अथवा संबंधित शेतकऱ्याची परवानगी न घेता रस्ता म्हणून जमिनीचा वापर सुरू केला आहे. याच जमिनीतून पोकलेन, जेसीबी, जीप, पिक अप यासारखी वाहन घेऊन जात शेतकरी देशोधडीला लावून उध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे संबंधित शेतकऱ्यांने जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना देखील निवेदन दिलं आहे. या निवेदनाला देखील दोन दिवस उलटून गेले आहेत. अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी देखील कर्तव्य दक्ष पणा दाखवला नाही. पोलीस अधीक्षकांची देखील तीच स्थिती पाहायला मिळत आहे. एकंदरच जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचं धोरण शेतकऱ्यांच्या नाश्याचच आहे. तर पोलीस अधीक्षक यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी मात्र नव “नीत” होणाऱ्या अन्यायामुळे कावत ( संतापणे )आहे.

पवन ऊर्जा प्रकल्पाशी निगडित व्यवहाराची कायदेशीर बाबी व अनिश्चितता तपासण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती ती फक्त कागदावरच राहिली. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत तर मुख्य कार्यकारी अधिकारी जि प तसेच पोलीस अधीक्षक सदस्य आहेत. मात्र पवन ऊर्जा प्रकल्पासंदर्भात शेतकऱ्यांकडे जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.यासाठी कागदावरील समित्या प्रत्यक्षात उतरावाव्यात
       डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
              सामाजिक कार्यकर्ते

बीडच्या पाणीपुरवठ्याप्रश्नी आ.संदीप क्षीरसागरांकडून पुन्हा अजितदादांची भेट

0

उन्हाळ्यापूर्वी सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी आ.क्षीरसागरांचा पाठपुरावा सुरू

जुन्नर  — बीड शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आताही रविवारी (दि.१६) रोजी जुन्नर येथे आ.संदीप क्षीरसागर यांनी दुसर्‍यांदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची याच संदर्भात भेट घेतली.


बीड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत अटल योजना आणि बिंदुसरा धरण आणि माजलगाव बॅकवॉटरमध्ये पाण्याची पुरेशी उपलब्धता आहे. मात्र नगरपालिकेकडे महावितरण कंपनीचे ३६ कोटी रुपयांचे वीजबिल थकलेले आहे. त्यामुळे अमृत अटल पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेले नवीन वीज कनेक्शन देण्यात येत नसल्याने पाणी उपलब्ध असताना देखील बीड शहराला पाणी मिळत नाही. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून विधीमंडळ अधिवेशनात, शासनाकडे, प्रशासकीय स्तरावर आणि न्यायालयात देखील हा बीडकरांचा मुलभूत प्रश्न मांडला आहे. सुयोगाने कर्तव्यदक्ष नेते ना.अजित दादा पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आले असल्यामुळे आ.संदीप क्षीरसागर याविषयी ना.अजितदादांकडे या विषयात न्याय मागत आहेत. आ.क्षीरसागर यांनी याच विषयावर दोन आठवड्यांपूर्वी मुंबई येथे ना.अजितदादांची भेट घेतली होती. आता पुन्हा याच विषयावर आ.क्षीरसागरांनी ना.अजितदादांची रविवारी (दि.१६) रोजी जुन्नर येथे भेट घेतली. यावेळी ना.अजित दादा पवार यांनी विद्युत विभागाचे व्यवस्थापकीय संचालक यांना याविषयी तातडीने मार्ग काढण्यासाठी आदेश दिले आहेत‌. उन्हाळ्याच्या पूर्वी बीड शहराचा पाणीपुरवठा ना.अजितदादांच्या माध्यमातून सुरळीत होईल आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बीडकरांच्या मुलभूत सोयीसाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश येईल असा विश्वास आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

धनंजय मुंडे राजीनामा देणार?, अजित पवार यांच्या वक्तव्याने खळबळ

0

मुंबई — महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून अन्न-नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे.त्यांच्याविरोधात गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी मोठं वक्तव्य करत चर्चांना अधिक रंगत आणली आहे.

‘सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता, त्यामुळे राजीनामा द्यायचा की नाही, हे धनंजय मुंडे यांनी ठरवावं,’ असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. नेमकं अजित पवार यांना काय सूचवायचं आहे?, असं प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे राजीनामा देणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अजित पवार यांना सुद्धा या अनुषंगाने प्रश्न विचारले जात होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर थेट भाष्य केलं.

‘आरोप सिद्ध झाले किंवा चौकशीत काही निष्पन्न झालं तरच कारवाई केली जाते. आता तुम्ही प्रश्न विचारलात की २०१० मध्ये माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते. तेव्हा मी राजीनामा दिला होता. मात्र, तो माझा वैयक्तिक निर्णय होता. माझ्या  सद्सत् विवेक बुद्धीला  ते योग्य वाटलं,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता धनंजय मुंडे खरंच मंत्रिपदाचा राजीनामा देतील का?, यावर चर्चा सुरू झाली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देतील का, की पक्ष नेतृत्व यावर निर्णय घेईल, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण; फरार आरोपी कृष्णा आंधळे ची संपत्ती जप्त होणार

0

बीड — संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 65 दिवसापासून फरार आहे.त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती.
ज्यामध्ये कृष्णा आंधळे हा प्रमुख आरोपी होता. पण हत्येच्या दिवसापासून कृष्णा आंधळे हा फरार असून अद्यापही त्याचा शोध पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे आता त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे काही दिवसांपूर्वीच केला होता, तसेच याबाबतची माहिती देखील सादर केली होती. याच बाबत आता कोर्टाने संपत्ती जप्तीचे आदेश दिले आहेत.कृष्णा आंधळे याच्याकडे 5 विविध प्रकारची वाहने असून धारूर व केज येथील बँकेत तीन खाते देखील आहेत. सदरची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, कृष्णा आंधळेच्या संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाने आदेश दिल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काही महत्त्वाची मागणी केली आहे. उद्या 17 फेब्रुवारी रोजी मस्साजोग ग्रामस्थ एक महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करणे एक प्रक्रियेचा भाग आहे. मात्र, कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी. असेही ते म्हणाले आहेत. ज्यावेळेस या प्रकरणातील सर्व आरोपी फासावर लटकतील त्यावेळेस आमचं समाधान होईल. तपास योग्य दिशेने आणि निष्पक्ष पातीपणे चालवा यासाठी आम्ही वेळोवेळी विनंती करत आहोत.’ असेही धनंजय देशमुख म्हणाले आहेत.