वडवणी — मध्यरात्रीच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोरांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सव्वा लाखाची रक्कम लुटली. दरोडेखोरांचा पाठलाग करणाऱ्या एकावर सशस्त्र हल्ला करुन जखमी केल्याची घटना वडवणी तालुक्यातील खळवट निमगाव येथे घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खळवट निमगाव मध्ये 5 ते 6 अज्ञात दरोडेखोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास अभिमान मारुती राऊत यांच्या घराचे मुख्य गेट तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील झोपलेल्या मंडळींना धारदार शस्त्राचा धाक दाखवत धमकावलं आणि कपाटातील ठेवलेले साडेसात तोळे सोने, 1 लाख 24 हजार रुपयांची रक्कम लुटली त्यानंतर हरिभाऊ दिगंबर राऊत यांच्या घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले दोन तोळे सोने लुटले. त्यानंतर दरोडेखोर पळून जात असताना हरिभाऊ राऊत यांनी पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पळापळी करत असताना एका दरोडेखोराने त्यांच्या पाठीवर शस्त्राने वार करत गंभीर जखमी केले.याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे खळबळ माजली असून जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा; पाठलाग करणारावर दरोडेखोराचा सशस्त्र हल्ला
स्व. अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी कटिबध्द — पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार
जिल्हा नियोजन समितीची भावूक वातावरणात सभा
सन 2026- 2027 चा आराखडा सभागृहात सादर
बीड — जिल्ह्याचा पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामतीसारखा विकास करण्याचे स्वप्न उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी उराशी बाळगले होते. त्यांच्या या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी सर्व अधिका-यांनी व यंत्रणेने काम करावे असे भावनिक आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केले. या बैठकीत सन 2026-2027 चा आराखडा सादर करण्यात आला व चालू आर्थिक वर्षाच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. चालू आर्थिक वर्षात 575 कोटींचा नियतव्यय प्राप्त असून यातील 565 कोटी 41 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
आज दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे झालेल्या या बैठकीस पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, यांची मुंबईतुन तर खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती. समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मुंबईत याबाबतचे सादरीकरण केले. जिल्ह्याचे पालक सचिव विजय वाघमारे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख यावेळी उपस्थित होते.
बैठकीत प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा परिचय देणारी चित्रफित दाखवण्यात आली. माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी यावेळी शोकप्रस्ताव मांडला. याप्रसंगी सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर सभागृहात दोन मिनिटे मौन पाळून स्व. अजित पवार यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
दुरदृश्य प्रणालीव्दारे जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांची उपस्थिती होती. अत्यंत भावूक वातावरणात झालेल्या या सभेस बीड येथील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. सुधाकर चिंचाणे यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना बीड जिल्हयाविषयी विशेष ओढ होती. या जिल्हयाचा कायापालट करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. जिल्ह्याचा विकास करण्याचे त्यांचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिका-यांनी एकदिलाने आणि प्रमाणिकपणे काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांनी या प्रसंगी केले. त्यांची विकासगंगा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्याचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे त्या म्हणाल्या.
यावेळी कामकाजाचा आढावा सादर करताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की, सन 2025-2026 साठी मंजूर नियतव्यय सर्वसाधारण गटासाठी 575 कोटी रूपये इतका आहे. यातील 565 कोटी 41 लक्ष रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून 199 कोटी 64 लक्ष इतकी रकम खर्च झाली आहे. हे प्रमाण नियतव्ययाच्या 34.72 टक्के इतके आहे.
अनूसुचित जाती योजनेंतर्गत 129 कोटी नियतव्यय असून प्रशासकीय मान्यता 81 कोटी 57 लक्ष आहे. हे प्रमाण 52.20 टक्के इतके आहे.
जिल्हा वार्षिक योजना ओटीएसपी अंतर्गत 2 कोटी 39 लक्ष रुपये निधी प्राप्त झालेला असून 2 कोटी 19 लक्ष रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी 61 लक्ष रुपये खर्च झालेले आहे. खर्चाची टक्केवारी 25.69 टक्के इतकी आहे.
या बैठकीत सन 2026-2027 चा प्रारुप आराखडा सादर करण्यात आला. यंदा नियोजन विभागातर्फे 481 कोटी 62 लक्ष कमाल आर्थिक नियतव्यय निर्धारित करुन दिला आहे. त्यानुसार आराखडा नियोजन करण्यात आला असून आज तो बैठकीत सादर झाला. यानंतर जिल्हयाच्या वतीने दुपारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तर बैठकीत तो सादर करण्यात आला. यात अतिरिक्त निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीने केली आहे.
नावाजलेल्या जिओचं भंगार नेटवर्क; टॉवरवर चढून लक्षवेधी आंदोलन
लिंबागणेश — घाटमाथ्यावर जिओच्या नेटवर्कला समस्या येत आहेत. सगळ्यात भंगार नेटवर्क म्हणून जिओची गणना होऊ लागली आहे. याचा फटका लिंबागणेशसह चौसाळा परिसराला देखील होत आहे. जिओ मोबाईल नेटवर्क सेवा गेल्या महिनाभरापासून वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेटवर्क रेंज पूर्ण दिसत असतानाही इंटरनेट बंद पडणे, कॉल न लागणे व कॉल ड्रॉप होणे यासारख्या गंभीर तांत्रिक समस्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला, बँक व डिजिटल व्यवहारांना, व्यापारी उलाढालींना तसेच आरोग्य व शासकीय सेवांना बसत आहे. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने ऑनलाईन पेमेंट, पैसे ट्रान्सफर व सरकारी पोर्टलवरील कामे ठप्प झाल्याचे नागरिकांनी सांगितले. जिओच्या भंगार नेटवर्कला वैतागून शेवटी आज लिंबागणेशकरांनी टॉवर वर चढून लक्षवेधी आंदोलन केले.
जिओ कंपनीने तातडीने नेटवर्क सेवा सुरळीत करावी, कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात व तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी लिंबागणेश येथील जिओ टॉवरवर चढून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.महसूल व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. निवेदन लिंबागणेश पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार राठोड, मंडळ अधिकारी पंडित नाईकवाडे व तलाठी पोतदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व नेकनूर पोलिस स्टेशन यांना देण्यात आले.
या आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, शिवशक्ती–भीमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, ग्रामपंचायत सदस्य दामोदर थोरात, सुरेश निर्मळ, मधुकर थोरात, सर्पमित्र अशोक जाधव, औदुंबर नाईकवाडे, विक्रांत वाणी, सोनाजी शिंदे, सोनाजी कुदळे, संजय पावले,केशव गिरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, जिओ कंपनीच्या ढिसाळ सेवे विरोधात ग्रामस्थांनी बहिष्काराचा निर्धार व्यक्त केला असून अनेक युवकांनी आपली जिओ सिमकार्ड इतर कंपन्यांकडे पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. तातडीने सेवा सुधारली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
वळण रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू
माजलगाव — शेतातील वळण रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली तो दबल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना हिवरा बुद्रुक गावात गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली
गणेश भारत गाडे वय 28 वर्ष असं मृत तरुणाचं नाव आहे.
गणेश गाडे हा गुरवारी पहाटे 2 वाजता शेतातील कामासाठी ट्रॅक्टर घेऊन जात होता.यावेळी शेत वळण रस्त्यावर ट्रॅक्टरला टर्न मारत असताना ट्रॅक्टर पलटी झाला. या झालेल्या अपघातात ट्रॅक्टर अंगावर पडल्याने गणेश गाडे हा गंभीर जखमी झाला. अपघात झाल्यानंतर स्थानिक लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुण शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.या घटनेमुळे तरुणाच्या गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत
नेकनूर पोलीसांची कामगिरी;गांजा तस्करी करणारे दोन जण पकडले तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
नेकनूर — नेकनूर पोलिसांना गांजा तस्करीचे रॅकेट उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे.सिमेंटच्या गोणीतून गांज्याची तस्करी कांहीं जण करत असल्याची गूप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना मिळाली. त्यांनी माहिती मिळताच तात्काळ कारवाई करत एका शेतात छापा मारुन फर्दाफ़ाश केला.या कारवाईत तीन लाखांचा गांजा जप्त करत दोघांना ताब्यात घेण्यात यश मिळवले.
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील हिंगणी बुद्रुक येथील एका उसाच्या शेतात सिमेंटच्या गोणीत गांज्या भरून ठेवण्यात आला होता.याची माहिती नेकनूर पोलिसांना झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी व त्यांच्या टीमने छापा मारला.यावेळी शेतात दोन सिमेंटच्या गोणीत 11 किलो 150 ग्रॅम गांज्या पोलिसांना सापडला.याची किंमत 2 लाख 78 हजार 750 रुपये इतकी आहे या गांज्याची तस्करी होणार असतानाच पोलिसांनी गुमानसिंग शिवराम पावरा वय-35 वर्ष,रा.बोरमल्ली पाडा,ता.शिरपूर,जि. धुळे व मनोज सीताराम मेहता वय19 वर्ष,रा.बाखरली,ता.वरला,जि.बडवानी राज्य.मध्यप्रदेश या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.नेकनूर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आहेर हे करीत आहेत.
कॉपी प्रकरणी चौसाळा महाविद्यालयाच्या केंद्र प्रमुखांसह 17 जणांवर गुन्हा दाखल
बीड — चौसाळा येथील महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा ड्रोन व्हिडिओ शिक्षण अधिकाऱ्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याची बातमी समोर आली आहे.काही पालक खिडक्यांमधून चढून कॉपी पुरवताना दिसले. हा ड्रोन व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी केंद्र संचालकासह 17 शिक्षकाविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौसाळा येथील बारावी परीक्षेदरम्यान कॉपी पुरवतानाचा प्रकार ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला होता.शिक्षण विभागाने हा व्हिडिओ जारी केला असून त्यात परीक्षेच्या वेळी कोणत्याही प्रकारची बाहेरून मदत किंवा साहित्य पुरवणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचं स्पष्ट केले आहे. असं असूनही, काही लोक नियमांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मुलांना कॉपी पोहोचवताना दिसले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचं गंभीर्य लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.ड्रोन व्हिडिओच्या आधारे, परीक्षा केंद्राचे सीसीटीव्ही फुटेज महसूल अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी रात्री तपासले. जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकरणात शिक्षक, केंद्रप्रमुख आणि इतर संबंधित लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणात बीडचे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी समंदर हमीद खान पठाण यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी केंद्र संचालक संजय घाडगे,भागवत बब्रुवान कुरुंद दोन्ही कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,चौसाळा ता.जि. बीड, गोरोबा धोंडीराम बचुटे, श्रीमती राजेश्री गोविंद माने, वसीम शेख,आर.जी करडकर
एस.आर दांगट सर्व रा.प्रमीलादेवी कनिष्ठ महाविद्यालय नेकनुर ,विनायक अशोकराव वजे, ताराचंद रेवा राठोड , ए.बी अघाव, पी. के. रसाळ, जी. बी चक्रे सर्व रा. डाॅ. पारनेरकर महाराज विद्यालय मांजरसुंबा, सी.एस मुळीक बी. बी. सुपेकर, यु डी उगले, एम.एस गवई
बालासाहेब दामो पवार सर्व रा.भालचंद्र माध्य उच्य मा. विद्यालय लिंबागणेश यांच्या नावाचा तक्रारीत समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
बीड — येथे 174 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. सोळाशे मीटर धावण्याच्या चाचणी दरम्यान बुधवारी (दि.11) दुपारी एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दीपक भास्कर वाव्हळ रा. मांडेखेल.ता. परळी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मूळचा मांडेखेल येथील रहिवासी आहे. दीपक सकाळी परळीहून बीड येथे पोलीस भरतीसाठी दाखल झाला होता. भरती दरम्यान कवायत, धावणे आदी शारीरिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी सुरू असतानाच अचानक मैदानावर भोवळ येऊन कोसळला त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. डीहायड्रेशन मुळे हार्ट अटॅक आला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे
दीपकचे आई-वडील ऊसतोड कामगार असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. मयत युवक दीपक याचे प्राथमिक व बारावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले आहे. उपजीविकेसाठी दीपक पुण्याला काम करत होता. मात्र पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो गेल्या दोन महिन्यांपासून गावाकडे येऊन पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याचा एक लहान भाऊ असुन तो ऑटो रिक्षा चालवतो. ऊसतोड मजूर असलेल्या या कुटुंबात कुटुंबाचा आधार होण्याची धडपड करणाऱ्या या युवकावर नियतीने अशा पद्धतीने घाला घातल्याने मांडेखेल गावात शोक व्यक्त केला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मांडेखेल व परळी परिसरात हळहळ व्यक्त होत असून या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
उद्या भारत बंदची हाक!! काय बंद, काय सुरु राहणार?
नवी दिल्ली — देशभारतील कामगार संघटना, बँक कर्मचारी आणि शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. उद्या 12 फेब्रुवारी रोजी बंद पाळण्यात येणार आहे.
उद्याच्या संपात ३० कोटींहून अधिक कामगार सहभागी होऊ शकतात असा कामगार संघटना नेत्यांचा दावा आहे. परिणामी, उद्या अनेक राज्यांमध्ये बँकिंग सेवा, सार्वजनिक वाहतूक, सरकारी कार्यालये आणि औद्योगिक कामकाजावर मोठा परिणाम होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर उद्या कोणकोणत्या सेवा या बंद राहतील आणि कोणत्या सुविधांना मुभा देण्यात आली आहे ते आपण जाणून घेऊया.
उद्याची भारत बंदची हाक हि नवीन लेबर कोड आणि भारत-अमेरिकेतली व्यापारी कराराविरोधात आहे. या नवीन बदलांमुळे देशाच्या कामगार वर्ग, अर्थव्यवस्था आणि सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारच्या नवीन धोरणांचा या संघटनांनी विरोध केला आहे. भारत बंदमध्ये 10 केंद्रीय ट्रेड युनियनचा समावेश आहे. यामध्ये INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC यांचा समावेश आहे. कामगार संघटनांचे म्हणणे आहे की हे कायदे कंपन्यांना अधिक फायदे देत असून कामगार संरक्षण कमी करतील. शेतकरी संघटनांनीही या चळवळीला पाठिंबा दर्शविला आहे.
उद्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँका काही भागात बंद राहू शकतात किंवा मर्यादित कर्मचाऱ्यांसह काम करू शकतात.
सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये उपस्थिती कमी असू शकते.
बस, टॅक्सी आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा कमी वेगाने चालू शकतात किंवा काही भागात बंद राहतील.
कारखाने आणि औद्योगिक युनिट्स एका दिवसासाठी कामकाज थांबवू शकतात.
ज्या भागात संप सर्वात प्रभावी आहे तेथे शाळा आणि महाविद्यालये बंद राहू शकतात.
अनेक शहरांमध्ये बाजारपेठा आणि स्थानिक दुकाने देखील बंद राहू शकतात.
उद्या, १२ फेब्रुवारी रोजी भारत बंद असला तरी काही जीवनावश्यक सेवा सुरूच राहतील. रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका सेवा, वैद्यकीय मेडिकल, एटीएम, अग्निशमन दल आणि मदत सेवा, दूध पुरवठा, वर्तमानपत्र वितरण, विमानसेवा सुरूच राहणार आहेत .
अपहरण मुलीच्या पीडित कुटुंबाला पोलिसांकडून मारहाण अधीक्षकांचे चौकशीचे आदेश
पीडित कुटुंबाविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल
बीड — धावज्याची वाडी येथील अल्पवयीन मुलीच अपहरण केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी घडली होती. या प्रकरणात तक्रारदाराच्या नातेवाईकांना मारहाण करून गुन्हे दाखल करण्याचा प्रकार नेकनूर पोलिसांनी केला. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांसह इतर अज्ञात इसमावर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, धावज्याची वाडी येथील अल्पवयीन मुलगी एक डिसेंबर 2025 पासून गायब आहे. या प्रकरणात नातेवाईकांनी तक्रारही दाखल करून दोन महिन्याहून अधिक काळ उलटला आहे. मुलीच्या वडिलांनी संशयितांची नाव देखील सांगितली आहेत. मात्र पोलिसांच्या हाती अजून काहीच लागले नाही. पीडित कुटुंबाने पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. ठाण्याचे उंबरे झिजवले मात्र पोलिसांनी समाधानकारक उत्तर कधीच दिले नाही. दरम्यान मंगळवारी पीडित कुटुंब नातेवाईकांसोबत पोलीस ठाण्यात आले असता नातेवाईकांना पोलिसांनी मारहाण केली. पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकाराला ही दमदाटी करण्यात आली. एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर गुन्हे देखील दाखल करण्यात आले. मात्र पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आर मध्ये संशयित आरोपीचे नातेवाईक रुक्मिण पांडुरंग चोबे, धर्मा रघुनाथ खिल्लारे या दोघांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. मात्र अपहरण झालेल्या मुलीचे पीडीत कुटुंब न बोलवता पोलीस ठाण्यात त्याच वेळेत हजर झाले. पीडित कुटुंबाला तपासाची माहिती देण्यात आली. दरम्यान फिर्यादीचे व आरोपीचे कुटुंब बाहेर पडत असताना एकमेकांना शिवीगाळ करू लागले. एकमेकांना मारहाण देखील करू लागले. हा प्रकार पोलिसांनी सोडवला. या प्रकारामुळे सामाजिक शांतता भंग झाली. पोलीस ठाणे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी पोलिसांनी रुक्मीन पांडुरंग चोबे, कृष्णा गोविंद चोबे, पांडुरंग बाबासाहेब चौबे, धर्मा रघुनाथ खिल्लारे, बब्रुवान नवनाथ गायकवाड, गवळण बाई बब्रुवान गायकवाड, बिभीषण हरिदास भोसले व इतर अन्य यांच्या विरोधात पोलीस हवालदार सतीश राऊत यांच्या फिर्यादीवरून कलम 194 (2) बीएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी केजचे उपविभागीय अधिकारी करणार असून सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत. या प्रकरणात पुढे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.
कोयत्याचा धाक दाखवला; टोळीतील ट्रॅक्टर चालकाने बालिकेवर दोन वेळा अत्याचार केला
केज — ऊस तोडणीच्या कामासाठी परभणी जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड मजुराच्या तेरा वर्षीय मुलीवर टोळीतील ट्रॅक्टर चालकाने कोयत्याचा धाक दाखवून दोन वेळेला बलात्कार केल्याची घटना घडली आहे.युसूफवडगाव पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ अंतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, सूरज अशोक खरात रा. जामरून, ता. जिंतूर, जि. परभणी हा त्याच टोळीत ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो. १४ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास सुर्डी शिवारातील एका कोपीत तेरा वर्षीय मुलीला एकटे गाठून सुरज खरात ने कोयत्याचा धाक दाखवत अत्याचार केला. एवढ्यावरच तो न थांबता ८ फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा हादगाव शिवारात त्याने पीडितेवर बळजबरी केली. जिवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या चिमुकलीने अखेर आपल्या आईला हा प्रकार सांगितला.पीडित बालिकेच्या आईने हिंमत दाखवत मंगळवारी रात्री उशिरा युसूफवडगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच नराधम सूरज खरात आपला ट्रॅक्टर हादगाव शिवारात सोडून फरार झाला आहे. सध्या ‘पिंक पथका’चे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके या प्रकरणाचा तपास करत असून फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत.











