Home Blog Page 126

शरद पवारांची नवी रणनीती; बीड जिल्ह्यातील इच्छुकांच्या झाल्या मुलाखती

0

पुणे –मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरल्याने लोकसभेला आरक्षणाच्या मागणीचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणावर बसला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मराठवाड्यात उमेदवार निवडीसाठी मोठी रणनीती आखल्याचे सांगितले जात आहे.आज बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत पुण्यात शरद पवार स्वत:मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेताना दिसले आहेत. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराशी शरद पवार स्वत: चर्चा करत आहेत. शरद पवार यांच्या कार्यपद्धत पाहिली तर त्याच्यासाठी कुणी लहान किंवा मोठा नाही. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. त्या प्रत्येकाशी शरद पवार स्वत: भेटणार असून त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सर्वांचे ऐकूण घेतल्यानंतरच ते कुणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय घेतील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.आज बजरंग सोनावणे यांच्या मतदारसंघातील उमेदवारीसाठी मुलाखती घेतल्या. ज्या ज्या ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षांचे आमदार- खासदार आहेत, त्यांची मते विचारात घेऊनच निर्णय घेतले जाणार आहेत. पण ज्यांनी ज्यांनी इच्छुक म्हणून अर्ज केलाय त्यांचाही मानसन्मान होणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालनामधून आंदोलनाला सुरुवात केली. त्यावेळी आंतरवली सराटीत उपोषणस्थळी लाठीमार झाला, त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पसरले. लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्यांचे गंभीर परिणाम पाहायला मिळाले. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

38 बिर्याणी हाऊस वर पोलिसांची छापेमारी; साडेचार लाखाची दारू जप्त

0

बीड — जिल्ह्यातील 38 बिर्याणी हाऊस वर पोलिसांनी आज छापेमारी करत साडेचार लाख रुपयाची अवैध दारू जप्त केली. गेल्या अनेक दिवसापासून विनापरवाना दारू विक्री केली जात होती.

बीड शहर व जिल्ह्यात चालु असलेल्या बिर्याणी हाऊस मध्ये अवैधरित्या दारु विक्री तसेच ग्राहकांना अवैधरीत्या दारु पिण्यासाठी बिर्याणी हाऊस चालकांकडुन जागा उपलब्ध करुन दिल्या जात होती.याची गोपनिय माहीती बीड पोलीसांना मिळाली होती. त्यावरुन पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगाळ यांनी 4 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील बिर्याणी हाऊसवर छापे टाकुन करवाया करण्याच्या सुचना सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी व अंमलदारांमार्फत पोलीस ठाणे हद्दीतील 38 बिर्याणी हाऊसवर छापे टाकुन एकुण 4 लाख 43 हजार 155 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याप्रकरणी विनापरवाना अवैध दारु कब्जात बाळगणे, विक्री करणे तसेच विनापरवाना ग्राहकांना दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन देवुन गुत्ता चालवणे या कृत्यांसाठी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत एकुण ३८ गुन्हे दाखल करण्यात आले असुन एकुण 38 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहा. पोलीस अधीक्षक धिरजकुमार बच्चु, सहा. पोलीस अधीक्षक कमलेश मिना, उपविभागीय पोलीस अधिकारी बीड, विश्वांभर गोल्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई निरज राजगुरु, उपविभागय पोलीस अधिकारी अंबाजोगई अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.शितलकुमार बल्लाळ, शिवाजी बंटेवाड, मारुती खेडकर, एस.एम जाधव, मजहर सय्यद, बालक कोळी, प्रशांत महाजन, विनोद घोळवे, रामराव पडवळ, संभाजी ढोणे, सपोनि. मधुसुदन घुगे, सोमनाथ नरके, मंगेश साळवे, भार्गव सपकाळ, अमन शिरसट, अनिल खोडेवाड, भाऊसाहेब वाघमोडे, मच्छिद्र शेंडगे, अनमोल केदार, राजकुमार ससाणे व पोलीस अंमलदार यांच्या मदतीने यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली आहे.

तरुणांना रोजगार मिळवून देणाऱ्या अभ्यासक्रमासाठी आग्रही -डॉ.योगेश क्षीरसागर

0

नाळवंडी येथे भाऊसाहेब डावकर यांच्या पुढाकारातून ४० शाळांना संगणक वाटप

बीड — देशभरात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. स्पर्धेच्या युगात आपल्या विद्यार्थ्यांना टिकायचे असेल तर दर्जेदार शिक्षण देणे काळाची गरज बनली असून ती आपली जबाबदारी आहे. आपल्या शिक्षण संस्थांमध्ये तरुणांना रोजगार मिळवून देणारे विविध अभ्यासक्रम आणण्यासाठी आपण कायम आग्रही असतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे.

बीड तालुक्यातील नाळवंडी येथील निवासी आश्रमशाळेत शुक्रवारी (दि.५) जिल्हा परिषद गटातील ४० शाळांना संगणक संच वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.योगेश क्षीरसागर हे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ॲड.राजेंद्र राऊत हे होते. व्यासपीठावर अरुण लांडे, सुधीर काकडे, पंचायत समितीचे माजी सदस्य अच्युतराव शेळके, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्दीकी, युवा नेते अशोक वाघमारे, माजी नगरसेवक रमेश चव्हाण, सुनिल सुरवसे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम कातांगळे, माजेद कुरेशी, सरपंच भारत कानडे, सरपंच रवी गंगावणे, सरपंच तेजाब चव्हाण, अशोक वैद्य, बाबासाहेब शिंदे, शाम राऊत, बाळासाहेब डोळस, संजय काळे, बाळराजे राठोड, भगीरथ बांडे, मिलिंद ठोकळ, अभिमान गुंदेकर, प्रा.अमोल घुमरे, बाळू आमटे आदींची उपस्थिती होती.

डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, माझे सहकारी भाऊसाहेब डावकर यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकी म्हणून खाजगी कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून ४० संगणक संच जिल्हा परिषद शाळांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच तांत्रिक शिक्षण मिळेल. त्यातून विद्यार्थी अभ्यासू होतील. बीड विधानसभा मतदारसंघात स्व.केशरकाकू क्षीरसागर यांनी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा आणली. या क्षेत्रात अलीकडे अमुलाग्र बदल झाले आहेत. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि रोजगार मिळवून देणारे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आपण कायम आग्रही असतो, असेही डॉ.क्षीरसागर म्हणाले. यावेळी भाऊसाहेब डावकर यांचा सत्कार करून मान्यवरांनी नाळवंडी जिल्हा परिषद गटातील ४० शाळांना संगणक संच वितरित केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस दलात खांदेपालटाला सुरुवात!

0

बीड –निवडणुकांच्या अनुषंगाने बीड पोलीस दलात फेरबदल केले जाऊ लागले आहेत. चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी नारायण एकशिंगे यांना बदलण्यात आले असून आष्टी पोलीस ठाण्याचा कारभार शरद भुतेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

चकलांबा पोलीस ठाण्याचे वादग्रस्त प्रभारी नारायण एकशिंगे यांना हटवून त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेतून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना नियुक्त करण्यात आले आहे.नारायण एकशिंगे यांना वाचक उपविभागीय गेवराई येथे हलवण्यात आले आहे.आष्टी पोलीस ठाण्याच्या प्रमुखपदी असलेल्या सोमनाथ जाधव यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना नियंत्रण कक्षात हलवण्यात आले आहे. त्यांच्या जागी शरद भुतेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी हे आदेश काढले.

‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना’ लागू

0

मुंबई — राज्य मंत्रिमंडाळाच्या आज झालेल्या बैठकीत ऊसतोड कामगारांसाठी ‘संत भगवानबाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना लागू करण्यात आली आहे.यासह 33 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली होती. त्या अंतर्गत ऊसतोड कामगार आणि वाहतूकदार, मुकादम आदींसाठी संत भगवानबाबा ऊसतोड कामगार विमा योजना प्रस्तावित केली होती. त्या योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील सुमारे 10 लाख ऊसतोड कामगारांना विम्याचे कवच

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 10 लाख ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम तसेच सुमारे दीड ते दोन लाख बैलजोड्या त्याचबरोबर कामगारांच्या झोपड्या यांना सुद्धा विम्याचे कवच मिळणार आहे. आज झालेल्या निर्णयानुसार ही योजना लागू करण्यात येत असून या योजनेचा संपूर्ण खर्च स्व.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या भांडवलातून करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार, मुकादम, कारखाना यांपैकी कुणावरही या योजनेचा कसलाही आर्थिक भार राहणार नाही.राज्याच्या बीडसह अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यातील सुमारे 10 लाख ऊसतोड कामगार वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच शेजारील राज्यात कमीत कमी 6 महिने स्थलांतर करून उसतोडणीला जातात. ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा कोणत्याही परिस्थितीत दिवसरात्र अत्यंत मेहनत आणि जोखमीचे काम त्यांना करावे लागते. ऊसतोडणी व वाहतुकीदरम्यान अनेक अपघात, विजेचा शॉक, सर्पदंश, वाऱ्या-पावसाने नुकसान, रस्ते अपघात यांसारख्या शेकडो समस्यांना तोंड देताना ऊसतोड कामगारांचे अनेकदा जीव जातात, अनेकजण कायमस्वरूपी अपंग होतात आणि त्यांच्या कुटुंबाचा आधार नाहीसा होतो.त्यामुळे या ऊसतोड कामगारांना, वाहतूक कामगारांना तसेच त्यांच्या पशूंना स्वतंत्र अपघात विमा योजना असावी, त्याद्वारे मृत्यू झाल्यास आर्थिक मदत, अपंगत्व आल्यास आर्थिक मदत व उपचार अशा निरनिराळ्या तरतुदी असाव्यात असे 2022 मध्ये धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत प्रस्तावित केले होते.

बदलापूरची माजलगावात पुनरावृत्ती: अंगणवाडीत चिमुरडीवर अत्याचार!

0

माजलगाव — बदलापूर अत्याचार प्रकरणा नंतरही परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. याच प्रकरणाची पुनरावृत्ती माजलगाव मध्ये घडली आहे. पाच वर्षाच्या चिमुकलीवर अंगणवाडीत अत्याचार झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. या प्रकरणी एका अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून माजलगाव मध्ये देखील बदलापूर घटनेची पुनरावृत्ती झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. शहरालगत असलेल्या एका शाळेत अंगणवाडी आहे. त्यामध्ये परिसरातील लहान मुले-मुली दररोज येतात. या परिसरातीलच एक पाच वर्षाची चिमुरडी नियमित शाळेत येते. तिच्यावर शाळेतील एका अज्ञात इसमाने 27 सप्टेंबर रोजी मधल्या सुटीतील डबा खाल्यानंतर अत्याचार केला. घटनेनंतर चिमुरडी ताप येऊन आजारी पडली. त्यामुळे तिला दवाखान्यात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरने तपासणी केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पालकांनी मुलीला विचारले असता चिमुकलीने शाळेत पांढरे कपडे घातलेल्या व्यक्तीने घाणेरडे कृत्य केल्याचे पालकांना सांगितले. शाळेतील पांढरे कपडे घातलेला त्या माणसाला ओळखत असल्याच चिमुरडीने सांगितले.या माहितीने हादरलेल्या पालकांनी गुरुवारी थेट माजलगाव शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध लैंगिक अत्याचार पाॅस्को एक्ट नूसार गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ व त्यांचे सहकारी करत आहेत. या घटनेने मात्र जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

बापू आंधळे खून प्रकरणातील सहा आरोपींना जामीन

0

छत्रपती संभाजी नगर — परळीतील मरळवाडी चे सरपंच बापूराव आंधळे खून प्रकरणातील सहा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस जी मेहरे यांनी जामीन मंजूर केला आहे.

गाजलेल्या या बहुचर्चित खून प्रकरणी ग्यानबा उर्फ गोट्या गिते यांच्या फिर्यादीवरुन परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीत म्हटले होते की, 29 जुन 2024 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आरोपी महादेव गिते यांच्या घरासमोर बापुराव आंधळे यांना पैसे घेण्यासाठी बोलावले होते.
त्यानंतर आरोपी शशिकांत उर्फ बबन गिते व इतरांनी कट रचून बापुराव आंधळे याचा गोळया घालून खुन केला.त्याचप्रमाणे फिर्यादी ग्यानबा गिते यांच्यावरही गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विरुध्द कलम 302, 307, 120 (ब), 201 भारतीय दंड विधान अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात सहा आरोपींना अटक करण्यात आली होती.
या सहा आरोपींचा जामीन अर्ज अंबाजोगाई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यातील पाच आरोपींनी ॲड. सुदर्शन जी. साळुंके यांच्यामार्फत तर एकाने ॲड. पी. पी. मोरे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता. ॲड. साळुंके यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना आरोपींना केवळ राजकीय कारणास्तव अटक केल्याचे सांगीतले.तर न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे की, सरकार पक्षातर्फे आरोपी विरुध्द केलेले आरोप अविश्वसनीय आहेत. अर्जदार आरोपी हे प्रत्यक्ष मारेकरी नाहीत. गुन्ह्याचा तपास पुर्ण झालेला असून आरोपी हे जामीनावर सोडण्यास पात्र आहेत. सुनावणी नंतर न्यायालयाने आसाराम गव्हाणे, मयुर कदम, अनिल सोनटक्के, ज्योतीराम औताडे, रोहित गायकवाड, रजतकुमार जेधे या सहा जणांचा प्रत्येकी 50 हजाराच्या जात मुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात आरोपींतर्फे ॲड. सुदर्शन जी. साळुंके व ॲड. पी.पी. मोरे यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील ॲड. ए. बी. गिरासे यांनी काम पाहिले. बीड जिल्ह्यातील परळीच्या बॅंक काँलनीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. आरोपींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत उर्फ बबन गिते याचाही समावेश होता. गिते हा खून झाल्यापासून अद्याप फरार आहे. सरपंच बापू आंधळे यांची आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.

अविनाश साबळे सह 47 खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर

0

मुंबई — बीड सारख्या मागास ग्रामीण भागातून ऑलिंपिक पर्यंतचा प्रवास करणाऱ्या अविनाश साबळेला शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच्यासह अन्य ४७ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. खेळाडूंसह त्यांना धडे देणा-या प्रशिक्षकांनाही पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्र सरकारने गुरुवारी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. यंदाचा महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठित शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार दिग्गज बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना घोषित जाहीर झाला.

अविनाश साबळे, दीप रामभीया, निलम घोडके, संदीप दिवे, अभिजीत त्रिपणकर, आदित्य मित्तल, शुशिकला आगाशे, प्रतिक पाटील, कशीश भराड, गिरीश काते, कुणाल कोठेकर, जान्हवी जाधव, अक्षय तरळ, रुपाली गंगावणे, चितारा विनेरकर, रुद्रांक्ष पाटील, याश्वी शाह, सुह्रद सुर्वे, दिया चितळे, श्रेयस वैद्य, श्रुती कडव, सर्वेश मेनन, सिद्धांत मोरे, पूनम कैथवास, रेनॉल्ड जोसेफ, अक्षता ढेकळे, अपूर्वी पाटील, अंकित जगताप, पंकज मोहिते.

प्रियंका इंगळे, सुयश गरगटे, अक्षया शेडगे, धर्मेंद्रकुमार यादव, कोमल वाकळे, नंदिनी साळोखे, कल्याणी जोशी, विष्णू सर्वानन, वैष्णवी पाटील, श्रीधर निगडे, श्रेया नानकर, साहिल खान, नेहा देशमुख, जयेश मोरे, पूर्वा किनरे, नितिन पवळे.

प्रदीप गंधे – जीवन गौरव पुरस्कार
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक
पवन भोईर (जिम्नॅस्टिक्स), शुभांगी रोकडे (धनुर्विद्या), अनिल घाटे (कबड्डी), राजाराम घाग (दिव्यांग खेळाचे क्रीडामार्गदर्शक), दिनेश लाड (थेट पुरस्कार-क्रिकेट), सुमा शिरुर (थेट-पुरस्कार पॅराशूटिंग)

बीड बायपासवर झालेल्या अपघांतांची न्यायालयाकडून गंभीर दखल

0

डिसेंबर २०२४ पर्यंत स्लीप सर्विस रोड आणि उड्डाणपूलांना मंजुरी देण्याचे न्यायालयाकडून निर्देश

आ.संंदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांच्या प्रयत्नांना यश

बीड — बीड बायपासवर दिवसेंदिवस होत असलेले अपघात आणि जाणारे जीव यांची दखल आता मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली असून यासंदर्भातील आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला असून, डिसेंबर २०२४ पर्यंत १२ कि.मी. अंतर असलेल्या बीड शहराच्या लगत असलेल्या बायपासवर छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक येथे उड्डाणपूल तसेच इमामपूर रोड, माजलगाव रोड, परळी रोड या ठिकाणांवर स्लीप सर्विस रोड मंजूर करण्याचे निर्देश मा.उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ यांनी एराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून औरंगाबाद-येडशी महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम २०१५ साली सुरू करण्यात आले होते. याच कामांतर्गत महामार्गावर बीड शहराच्या पूर्व बाजूने १२ कि.मी. अंतराचा बायपास म्हणजेच बाह्यवळण रस्ता तयार करण्यात आला. परंतु हा बायपास तयार करताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंडियन रोड काँग्रेसच्या (IRC) गाईड लाइन्स प्रमाणे काम केले नाही. इंडियन रोड काँग्रेसच्या (IRC) च्या गाईड लाइन्स नुसार बायपासला क्रॉस होणार्‍या राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग याठिकाणी स्लीप सर्विस रोड करणे आवश्यक आहे. परंतु बीड बायपासवर बीड-परळी रोड हा राष्ट्रीय महामार्ग, बीड-माजलगाव हा राज्य महामार्ग व बीड-इमामपूर हा प्रमुख जिल्हा मार्ग असे तीन महत्वाचे रस्ते क्रॉस होतात. तसेच बीड शहरात महामार्गावरून प्रवेश करताना असलेले छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल करण्यात आलेला नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याठिकाणी आवश्यक असलेल्या बाबींचे पालन न केल्यामुळे आत्तापर्यंत दोन्ही चौकांमध्ये एकूण १३ लोकांचा बळी गेल्याची नोंद आहे. तर दरदिवस अपघात होऊन असंख्य लोक जखमी होत आहेत.
सदरील बाबी नागरिकांच्या, प्रवाशांच्या आणि वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना ४ डिसेंबर २०१९ रोजी, बीड बायपासवर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या दोन्ही ठिकाणी म्हणजेच महालक्ष्मी चौक व छत्रपती संभाजी महाराज चौक येथे उड्डाणपूल तसेच बीड-परळी रोड, बीड-माजलगाव रोड व बीड-इमामपूर या तीन ठिकाणी स्लीप सर्विस रोड मंजूर करण्याबाबत पत्रव्यवहार केला. यावर मा.नितीन गडकरी यांनी १४ जुलै २०२० रोजी पत्राद्वारे सदरील कामे करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुचविले होते. त्यानंतर आ.संदीप क्षीरसागर यांनी सदरील कामांच्या मंजुरीची शिफारस राज्य शासनाने केंद्र शासनाकडे करावी अशी वारंवार मागणी केली. तसेच माजी आ.सय्यद सलीम यांनीही बायपासवर दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल आणि तीन ठिकाणी स्लीप सर्विस रोड मंजूरीसाठी पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबत दखल घेतली जात नसल्याने शेवटी माजी आ.सय्यद सलीम यांनी मा.उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात याचिका क्रमांक ११७६/२०२४ व पिटीशन क्रमांक ८८०८/२०२४ दाखल केली. या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठात दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी न्यायमूर्ती रविंद्र व्ही. घुगे व न्यायमूर्ती वाय.जी.खोब्रागडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांचे म्हणने राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य कार्यालय, द्वारका, नवी दिल्ली येथे पाठविले असून या कामासाठी तांत्रिक समिती देखील स्थापन केली आहे. तसेच मार्च २०२५ पर्यंत बीड बायपासवर छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक याठिकाणी उड्डाणपूल व इमामपूर रोडच्या स्लीप सर्विस रोडला मंजुरी देऊ असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून न्यायालयात सांगण्यात आले. परंतु न्यायालयाने या ठिकाणी होत असलेले अपघात आणि सुरक्षेच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत डिसेंबर २०२४ पर्यंत तीनही कामांना मंजुरी द्या असे निर्देश दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बीड बायपासवरील अपघात आणि सुरक्षेचा प्रलंबित असलेला मोठा प्रश्न मार्गी लागणार असून आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. दरम्यान या प्रकरणात याचिकाकर्ते माजी आ.सय्यद सलीम यांच्या वतीने ॲड.सय्यद तौसिफ यासीन यांनी काम पाहिले.

महामार्ग प्राधिकरणाकडून तांत्रिक अडचणी सांगून टाळण्याचा प्रयत्न
परळी व माजलगाव रोडला स्लीप सर्विस रोडसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दि.७ सप्टेंबर २०१८ रोजी मंजुरी दिली होती‌. सदरील स्लीप सर्विस रोड करताना जमीन संपादन करण्याचे ठरले होते. परंतु त्यानंतर प्राधिकरणाने नवीन धोरण अवलंबिले आणि बीड बायपासच्या स्लीप सर्विस रोडसाठी जमीन संपादित करायची नाही असे ठरविले. तसेच परळी रोडला स्लीप सर्विस रोड देत असताना, येडशीला जाणार्‍या रस्त्याला नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा पूल आहे. यासोबतच माजलगाव रोडवर, माजलगाव बॅकवॉटरची पाइपलाइन आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांवर स्लीप सर्विस रोड करणे तांत्रिक अडचणींचे असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून न्यायालयात सांगण्यात आले. परंतु तुमच्याकडे असलेले कौशल्याचा वापर करून तांत्रिक अडचणी दूर करा, असे मा.न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गाला निर्देश दिले.

सर्वसामान्यांना भुर्दंड 100 रुपयांचा स्टँप बंद

0

मुंबई — नेहमीच्या सरकारी कामकाजात वापरण्यात येणारा 100, दोनशे रुपयाचा स्टॅम्प आता इतिहास जमा होणार आहे. यापुढे पाचशे रुपयांचा स्टॅंप पेपर ग्राह्य धरणार असल्यामुळे शासनाच्या महसूल वाढवण्याच्या या प्रयत्नाने मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे.

100,200 आणि 500 रुपयांच्या स्टँपवर नागरिकाचा दस्तावेज ग्राह्य धरला जात होता.मात्र, यापुढे 100 आणि 200 रुपयांचे स्टँप पेप इतिहासजमा होणार आहेत. कारण, आता किमान 500 रुपयांच्या स्टँपवरच खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतित्रापत्र दिले जाणार आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतल्यामुळे महसूल विभागाकडून आता केवळ 500 रुपयांचे स्टँप जारी केला जातील. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. राज्य शासनाने सरकारचा महसूल वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
तहसील किंवा महसूल कार्यालयात अवघ्या शंभर, दोनशे रुपयांत स्टँप केले जात. वैयक्तिक कारणांसह बँक व विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञा पत्रासह साठे खतानंतरचे खरेदी खत,हक्क सोडपत्रासाठी आता पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे. राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेसह विविध प्रकारच्या योजनांवर कोट्यवधी रुपयांची खैरात केल्याने अन्य योजनांसाठी निधी कमी पडू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे महसुली उत्पन्न वाढविण्यासाठी मुद्रांक शुल्कात वाढ केल्याची चर्चा महसूल खात्यांतर्गत बोलली जात आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारने लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे,आता महसूल वाढविण्यासाठी नवनवीन प्रयोग केला जात आहेत. प्रतिज्ञा पत्र, हक्कसोडपत्र, साठेखत केल्यानंतर पुन्हा खरेदीखत करताना ते शंभर रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर केले जात होते. त्यासाठी आता शंभरऐवजी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क वापरण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयातील कामांसाठी मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्यामध्ये, कोणताही बदल झाला नसल्याचीही माहिती आहे.

स्थावर, जंगम मालमत्तेसाठीचा दस्तावेज

कंपन्यांच्या एकत्रीकरण, पुनर्रचना, विलिनीकरण तसेच विभागणीमध्ये विद्यमान किंवा भविष्यातील मतभेद मिटविताना लवादामार्फत लेखी निर्णय दिला जातो. कंपन्यांचे भाग भांडवल मोठे असल्याने त्यांच्या स्थावर, जंगम मालमत्तेप्रकरणी अभिहस्तांतरणामध्ये सध्या पाचशे रुपये मुद्रांक शुल्क आकारणी होते. वाढीसाठी पाचशे रुपयांवरून चल व अचल मालमत्तेच्या बाजारमूल्यप्रमाणे दर बदलले जातात. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना 100 आणि 200 रुपयांच्या स्टँप पेपरवर त्यांचे दस्तावेज तयार करता येत होते. आता, त्यासाठी किमान 500 रुपयांच्या स्टँपवर दस्तावेजवर बनवावे लागणार आहेत.