Home Blog Page 117

धनंजय मुंडेंचा परळी मतदारसंघात प्रचाराचा झंझावात; परळीच्या मैदानात अकरा उमेदवार

0

अंबाजोगाई तालुक्यात गाव भेट दौरा, परळीत आ.इंद्रिस नायकवडी यांच्या समवेत अल्पसंख्यांक मेळावा तर सायंकाळी व्यापारी संवाद मेळाव्याचे आयोजन

बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात घेणार सभा

परळी — परळी विधानसभेच्या लढतीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांच्यासह अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लढतीचे चित्र स्पष्ट होताच राज्याचे कृषिमंत्री तथा महायुतीचे परळी विधानसभेचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांचा परळी मतदारसंघात उद्यापासून प्रचाराचा झंजावात सुरू होत असून, उद्या सकाळच्या सत्रात अंबाजोगाई तालुक्यात गाव भेट दौरा, दुपारच्या सत्रात राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नाईकवडी यांच्या समवेत परळी शहरात अल्पसंख्यांक मेळावा तर सायंकाळी व्यापारी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे उद्या (दि.05) सकाळी आठ वाजता अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथून गाव भेट दौऱ्यात सुरुवात करतील. त्यानंतर सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीस ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहतील, पुढे सकाळी साडेनऊ वाजता दैठणा राडी व त्यानंतर मुडेगाव आणि राडी तांडा येथील ग्रामस्थांशी संवाद साधतील.

धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार इद्रीस नायकवडी यांच्या उपस्थितीत परळी शहरातील व्हीआयपी फंक्शन हॉल येथे दुपारी दोन वाजता अल्पसंख्यांक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यास अल्पसंख्याक समाज बांधव तसेच महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

सायंकाळी साडेपाच वाजता अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथे ग्रामस्थांशी संवाद साधून सायंकाळी आठ वाजता श्री मुंडे हे भागवत मंगल कार्यालय परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी मेळाव्यास उपस्थित राहणार असून या मेळाव्यास परळी शहरासह तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान धनंजय मुंडे हे स्वतःच्या परळी विधानसभा मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार असून राज्यभरातही धनंजय मुंडे यांच्या सभांना प्रचंड मागणी आहे. त्या सर्व ठिकाणी धनंजय मुंडे हे सभा घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

बीडमध्ये दुरंगी लढत होणार; क्षीरसागर बंधू आमने-सामने

0

बीड — बीड विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बीडची निवडणूक भावाभावातच दुरंगी लढत होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे अनिल जगताप यांच्यासह ज्योती मेटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवला असला तरी लढत संदीप व योगेश क्षीरसागर यांच्यातच होणार आहे.

बीड विधानसभेच्या मैदानात रंगत कोण भरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. विशेषतः माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेवरच सगळी दारोमदार अवलंबून होती. मात्र त्यांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट होऊन लढत संदीप क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यातच होणार आहे. शेवटच्या दिवशी अनेक बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तरी देखील बीड विधानसभेच्या निवडणूक रिंगणात या दोघांशिवाय 29 उमेदवार लुटूपूटूची का होईना लढाई लढणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे अनिल जगताप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ज्योती मेटे यांनी बंडखोरी करून आपले उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून कायम ठेवले आहेत. आता जयदत्त क्षीरसागर आपली ताकद कोणत्या पुतण्या च्या मागे लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेच्या विजयासाठी अमरसिंह पंडित यांनी डॉ.योगेश क्षीरसागरांना दिल्या शुभेच्छा

0

बीड — महायुतीचे बीड विधानसभेचे अधिकृत उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांनी शहरातील शिवछत्र निवासस्थानी भेट देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांना दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी डॉ.योगेशभैय्यांचा सत्कार करून निवडणूक जिंकण्यासाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष इकबाल शेख, नगरसेवक शुभम धुत, नबील जमा, शुभम कातांगळे, रौफ मोमीन, बाबा खान, सागर वाव्हुळ, अभिनंदन सारडा आदी उपस्थित होते. अमरसिंह पंडित यांनी बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद असून पक्षाला मानणारा वर्ग असल्याचे सांगितले. आगामी काळात ना.अजितदादा पवार, ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्याच्या दृष्टीने रणनीती कशी असावी, यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांची निवडणुकीतून माघार

0

बीड — बीड विधानसभा निवडणुकीची समीकरण बदलणारी घडामोड घडली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.या निवडणुकीत क्षीरसागर कुटुंबातील तिघांनी अर्ज भरले होते. मात्र आता माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी काहीवेळापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज माघारी घेत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे आता निवडणुकीची समीकरण प्रचंड वेगाने बदलत असून निवडणूक रिंगणात कोणते उमेदवार राहतील याकडे संपूर्ण जिल्हा वासियांचे याकडे लक्ष लागले आहे.

निवडणुकीची समीकरणं बदलणार; मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार? 

0

जालना ‌– मराठा आरक्षणासाठी आंदोलन लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन 15 ते 20 जागांवर लढायचं तर उर्वरित मतदारसंघांमध्ये आपल्या भूमिकेला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडायचे असल्याचे सांगितले होते. मात्र आता विधानसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याची घोषणा सोमवारी केली आहे.यावेळी त्यांनी सर्व उमेदवारांना माघार घेण्याचे आवाहन केले. एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नाही असेही त्यांनी सांगितले.

काल जरांगे पाटील यांनी 25 मतदारसंघांवर चर्चा झाली आहे. ज्या मतदारसंघाची नावे येणार नाहीत तेथे आपले अर्ज काढून घ्या. आपल्याला आपल्या स्वार्थासाठी लढायचं आहे. आपल्याला आपल्यासाठी दहा ते पाच असेनात, पण निवडून आणायचं आहे. गोरगरीब उमेदवाराला पैशाचा ताकदीवर दमदाटी केली तर आम्ही आमच्या मतदानातून तुम्हाला ताकद दाखवणार. दुसऱ्या जिल्ह्यात तुमच्या पक्षाचा उमेदवार पाडलाच म्हणून समजावे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. पण, मित्रपक्षाची यादी न आल्यामुळे एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी ही माघार घेतल्याचे सांगितले.
राज्यात या विधानसभा मतदार संघात उमेदवार देणार होते
१) केज – बीड जिल्हा –
२) बीड – बीड जिल्हा –
३) दौंड – जिल्हा पुणे –
४) पार्वती- जिल्हा पुणे –
५) परतूर – जालना जिल्हा –
६) फुलंब्री – छत्रपती संभाजीनगर जिल्हा –
७) हिंगोली – हिंगोली जिल्हा –
८) पाथरी, परभणी जिल्हा –
९) हदगाव – जिल्हा नांदेड –
१०) कळंब – जिल्हा धाराशिव –
११) भूम-परांडा – जिल्हा धाराशिव –
१२) करमाळा – जिल्हा सोलापूर-
१३) निलंगा – जिल्हा लातूर –

तर या मतदार संघावर चर्चा सुरु होती
पाथर्डी – जिल्हा नगर
कोपरगाव – जिल्हा नगर
पाचोरा – जिल्हा जळगाव
करमाळा – -जिल्हा सोलापूर
माढा -जिल्हा सोलापूर
धुळे शहर -जिल्हा धुळे
निफाड -जिल्हा नाशिक
नांदगाव – जिल्हा नाशिक

सासुरवाडीत राहणाऱ्या जावयाचा ऐन दिवाळीत खून

0

अंबाजोगाई — सासरवाडी मध्ये राहणाऱ्या जावयाचा ऐन दिवाळीच्या काळात डोक्यात दगड घालून खून झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील डोंगर पिंपळा येथे उघडकीस आली.

सचिन शिवाजी तिडके वय 35 वर्ष,रा. भोगलवाडी, हल्ली मुक्काम डोंगरपिंपळा, ता. अंबाजोगाई येथील रहिवासी व डोंगरपिंपळा गावचे जावई आहेत. मागील एक वर्षापासून ते सासुरवाडी डोंगरपिंपळा येथे पत्नी व मुलांसोबत राहत होते. मंगळवारी रात्रीपासून सचिन तिडके हे बेपत्ता होते. बुधवारी दुपारी एक वाजता त्यांचा मृतदेह डोंगरपिंपळा शिवारात चेहऱ्यावर दगड मारून चेंदामेंदा केलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घुगे व पो कॉ‌. भागवत यांनी घटनास्थळी धाव घेत सचिन यांचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदरील खून हा सासुरवाडीतील लोकांनीच घडवून आणला असल्याचे सचिन यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. कारण, ते मृतदेहाजवळ गेले असता सासुरवाडीकडील लोकांनी मयताच्या नातेवाइकांना शिवीगाळ व अंगावर दगड घेऊन धावले असल्याचे सांगत आहेत. सचिन यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आईवडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

सगळेच सत्ताधारी पक्षाचे आमदार झाले; विरोधकच उरला नाही; देशात पहिल्यांदाच अशी परिस्थिती

0

गंगटोक — सध्या देशात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि 13 राज्यांच्या पोटनिवडणुकांचा काळ सुरु आहे. यापैकी महाराष्ट्र विधानसभा आणि उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीवर सगळ्यांचे लक्ष आहे. अशातच पूर्वेकडील राज्यात मोठी घडामोड घडली आहे.

राज्य विधानसभेत विरोधकच नसलेले एकमेव राज्य ठरले आहे.

सिक्कीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. तेथील प्रमुख विरोधी पक्ष सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट (एसडीएफ) संपला आहे. यामुळे सिक्कीम विधानसभा विरोधी पक्षच राहिलेला नाही. सिक्कीममध्ये दोन जागांवर पोटनिवडणूक होत आहे. सोरेंग-चाकुंग आणि नामची-सिंघीथांग या जागांवर एसडीएफने उमेदवार उतरविले होते. परंतू, या उमेदवारांचे अर्ज अयोग्य घोषित करण्यात आले आहेत. 13 नोव्हेंबरला या ठिकाणी मतदान होणार होते. यामुळे सत्ताधाऱी एसकेएमचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

देशात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्ष नाही, असे घडले आहे. प्रेम बहादुर भंडारी आणि डेनियल राय यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. यामुळे सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे उमेदवार आदित्य गोळे आणि सतीश चंद्र राय हे बिनविरोध निवडले गेले आहेत. मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांच्या नेतृत्वात एसकेएमकडे आता विधानसभेचे सर्वच्या सर्व 32 आमदार असणार आहेत.

दोन्ही उमेदवारांकडे प्रस्तावकांची अपेक्षित संख्या नव्हती असे अर्ज पडताळणीत समोर आले आहे. यामुळे त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तर पोबिन हंग सुब्बा यांचाही अर्ज अपूर्ण अॅफिडेविट दिल्याने फेटाळण्यात आल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान विरोधी पक्षांनी यावर टीका केली आहे. विरोधी पक्षांनी यावर टीका करताना लोकशाहीवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. तसेच याविरोधात हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेही म्हटले आहे.

मनोज जरांगे पाटलांनी समीकरण जुळवलं; मराठा, दलित, मुस्लीम एकत्र

0

जालना — अंतरवाली सराटीमधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मुस्लीम धर्मगुरू, बौद्ध धर्मगुरू आणि दलित नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मुस्लीम, दलित, मराठा समीकरणावर एकमत झालं असून, मराठ, दलित आणि मुस्लीम एकत्र आल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर बंजारा समाज आणि ओबीसी समाजासोबतही चर्चा करणार असल्याचं यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटीमध्ये मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरू तसेच दलित नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे. मुस्लीम, दलित, मराठा समीकरण जुळलं, मराठा, मुस्लीम आणि दलित एकत्र आले असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, अन्यायाचं संकट आम्हाला परतवून लावायचं आहे, आता गुलामगिरीत जगायचं नाही म्हणजे नाही. बंजारा समजा आणि ओबीसी समाजासोबतही चर्चा करणार आहे. कोणत्या जागा लढवायच्या आणि किती जागा लढवायच्या याबाबत येत्या तीन तारखेला निर्णय घेणार आहे. आम्ही सर्व जागा लोकशाही मार्गानं लढणार आहोत. कोणाचीही दादागिरी आणि गुंडगिरी चालू देणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आमच्या देवेंद्र तात्यांनी मला लक्ष केलं. राजकारणाच्या वाटेवर नेऊ नका सांगत होतो, त्यांनी नेलं. आता माझा कोणी विरोधक नाही. मी लोकशाही मार्गाने जात आहे. आम्हाला तुमच्या वाटेनं जायचं नाही. पण आडवा आला तर सोडणार नाही. तुमचा एक कागद आला तरी माणूस मोकळा जाऊ देणार नाही. कुणाचीही जात पाहात नाही. मला एखादा कागद आला तर एका फोनवर मी त्यांचं काम करतो.
दलित, मुस्लीम असो की धनगर असो प्रत्येकाचे काम करतो. मी जात कधीच पाहत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

लाइट’ गेली नो टेन्शन, थेट अंतराळातून मिळणार 24 तास वीज!

0

मुंबई — आजच्या काळात वीज ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे. विजेअभावी आपली जवळपास सर्वच कामं ठप्प होऊ शकतात. त्यामुळे विजेला सातत्याने मागणी असते; पण काही कारणांमुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो आणि त्याचा परिणाम अनेक गोष्टींवर पाहायला मिळतो; पण लवकरच ही समस्या दूर होऊ शकते.

आपल्याला 24 तास अखंडित वीज मिळू शकते. ब्रिटनमधली एक स्टार्टअप कंपनी एका अनोख्या प्रकल्पावर काम करत आहे. यात यश मिळालं, तर 24 तास वीजपुरवठा होऊ शकतो. हा वीजपुरवठा थेट उपग्रहाद्वारे होऊ शकतो. अंतराळात वीजनिर्मिती करून ती उपग्रहाद्वारे वितरित केली जाऊ शकते. यासाठी आणखी एका पर्यायावरदेखील विचार सुरू आहे. पृथ्वीवर कोणताही ऋतू किंवा खराब हवामान असलं, तरी वीजपुरवठा अखंडित राहू शकतो.

थोडासा वादळी पाऊस झाला तरी लगेच वीजपुरवठा खंडित होतो. जगभरात भारतासह अनेक देश या समस्येचा सामना करत आहेत. काही वेळा वादळामुळे झाडांसह विजेच्या तारा, खांबदेखील कोसळतात. यामुळे अनिश्चित काळासाठी वीजपुरवठा खंडित होतो. आता ही समस्या कायमची सुटू शकणार आहे. ऋतू कोणताही असला तरी आपल्याला 24 तास 365 दिवस अखंडपणे वीज उपलब्ध होऊ शकणार आहे.
संशोधकांनी ही अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी काम सुरू केलं आहे. जेव्हा हवामान स्वच्छ असतं, तेव्हाच सू्र्यकिरणं आपल्यापर्यंत पोहोचतात; पण अंतराळात कायम सूर्यप्रकाश आणि त्याची ऊर्जा उपलब्ध असते. त्यामुळे संशोधक अंतराळात वीजनिर्मिती करून ती वीज पृथ्वीवर पोहोचवण्याच्या योजनेवर काम करत आहेत.

अंतराळातून वीजपुरवठा या संकल्पनेवर अमेरिका, जपानसह युरोपातले अनेक देश काम करत आहेत. ब्रिटनमधल्या एका स्टार्टअप फर्मने 2030 पूर्वी यास सुरुवात होईल असा दावा केला आहे. स्पेस सोलरच्या माध्यमातून किफायतशीर, वाढवता येण्याजोगं आणि पूर्णपणे अक्षय ऊर्जा तंत्रज्ञान विकसित करणं, हा ब्रिटनमधल्या स्पेस सोलर फर्मचा उद्देश आहे. स्पेस सोलर इंजिनीअरिंगच्या स्पेस बेस्ड सोलर पॉवर प्रकल्पासाठी ब्रिटन सरकारने या वर्षी एप्रिलमध्ये सुमारे 13 कोटी रुपयांचा निधीदेखील दिला आहे.
अंतराळातून वीजपुरवठ्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे 24 तास वीजपुरवठा करणं शक्य होईल. याशिवाय ही स्वच्छ, हरित ऊर्जा असेल. यामुळे 2050पर्यंत पृथ्वीवरचं कार्बन उत्सर्जन शून्य करण्याच्या दिशेने मोठी मदत होईल. या माध्यमातून ब्रिटनची विजेची गरज पुरेशा प्रमाणात भागू शकते. सोलर स्पेस कंपनीच्या माहितीनुसार, कंपनी 2030पर्यंत पहिला ऑर्बायटल डेमॉन्स्ट्रेटर सॅटेलाइट पाठवणार आहे. त्यात यश मिळालं, तर तो जगातला अक्षय ऊर्जास्रोतासाठीचा पहिला प्रयत्न असेल.

या प्रकल्पांतर्गत कमी दरात विजेचं उत्पादन हे एक मोठं आव्हान असेल. अंतराळात उभारल्या जाणाऱ्या पॉवर स्टेशनचा पाया आकारने खूप मोठा असेल. याशिवाय पृथ्वीच्या कक्षेतून वीज पुरवठा करणाऱ्या उपग्रहांमध्ये एक किलोमीटर लांबीचा ट्रान्समीटर पृष्ठभाग असू शकतो. त्यामुळे हे काम सोपं नसेल. अंतराळात तयार केलं जाणारं पॉवर स्टेशन स्पेस स्टेशनसारखे असेल; पण त्याची किंमत आणि ते तयार करण्यासाठी लागणारा वेळ या दोन्ही गोष्टी स्पेस स्टेशनच्या तुलनेत खूप जास्त असू शकतात. या दृष्टिकोनातून अंतराळातून मिळणारी वीज फारशी स्वस्त नसेल. स्पेस सोलर इंजिनीअरिंग जर हे तंत्रज्ञान कमी खर्चात विकसित करू शकलं तर ही मोठी कामगिरी ठरेल.

या प्रकल्पात संशोधक मोठी सोलर पॅनेल्स लावलेला एक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करणार आहेत. ही सोलर पॅनेल्स कोणत्याही उपकरणाशिवाय केवळ सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मिती करतील. ही वीज कोणतीही तार किंवा खांबाशिवाय 2.45 गीगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीने पृथ्वीवरील रिसीव्हरकडे पाठवली जाईल. याशिवाय दुसरा पर्यायाचा विचार करता उपग्रहाद्वारे थेट 30 मेगावॉट ऊर्जेची बीम पृथ्वीवर पाठवली जाईल. यामुळे सुमारे तीन हजार घरांपर्यंत वीज पोहोचू शकेल.
स्पेस सोलर इंजिनीअरिंगच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून 2036पर्यंत सहा वीज स्टेशन्स उभारणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. या प्रत्येक स्टेशनसाठी सुमारे 80 कोटी डॉलरपर्यंत खर्च येऊ शकतो. या पॉवर स्टेशनच्या माध्यमातून 24 तास वीजपुरवठा करणं शक्य होईल. पृथ्वीवर कोणताही ऋतू असला तरी त्याचा कोणताही परिणाम वीजपुरवठ्यावर होणार नाही.

परळीकरांची बदनामी करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवा – धनंजय मुंडे

0

भावसार समाज, गोंधळी समाज, गवळी समाज तसेच जैन समाजातील बांधवांच्या धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठका

मंदिरे, सामाजिक सभागृह यांसह समाज बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध – धनंजय मुंडेंची ग्वाही

परळी  — सातत्याने काही लोक निवडणुकीच्या तोंडावर परळीत गुंडगिरी, दहशत वगैरे शब्द वापरून परळी शहराची व शहरातील रहिवाशांची बदनामी करत आहेत. इथे सर्व समाजातील लोक गुण्या-गोविंदाने राहतात. परळी हे कायम विकसनशील शहर आहे, या शहराची व शहरातील लोकांची बदनामी करणाऱ्यांना आता जनतेने मतदानातून उत्तर द्यावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी परळी येथे बोलताना केले आहे.

परळी शहरातील भावसार समाज, गोंधळी समाज, गवळी समाज, रावळ समाज, तसेच जैन समाजातील बांधवांच्या धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आज मॅरेथॉन बैठका संपन्न झाल्या. यावेळी धनंजय मुंडे यांनी विविध समाज बांधवांच्या समस्या तसेच मागण्या समजून घेतल्या.

समाज बांधवांच्या विविध मंदिरांची उभारणी तसेच सभागृहांच्या उभारणीसाठी जागेसह निधीचे प्रश्न सोडवले जातील, तसेच ज्या ठिकाणी रस्ते व विजेची समस्या आहे ते प्रश्न निवडणूक क्षमताच प्राधान्याने सोडवले जातील अशी ग्वाही यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली.

कधी म्हणतात परळीत बोगस बूथ आहेत, कधी म्हणतात परळीतल्या लोकांनी बोगस मतदान केले, इथल्या लोकांच्या भावनांचा व आमच्यावरील प्रेमाचा अनादर करून यांना केवळ परळीची बदनामी साधायची आहे अशा लोकांना जनतेने मतदानातूनच धडा शिकवावा असेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.

या बैठकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यासह सुरेश अण्णा टाक, अय्युब पठाण, प्रा.विनोद जगतकर, ऍड.मनजीत सुगरे, दत्ताभाऊ सावंत, चेतन सौंदळे, महेंद्र रोडे, अनिल अष्टेकर, यांच्यासह प्रभाकर हजारे, गोपाळ मामा, सारिका तांदळे, विलास सुगावे, अरुण अर्धापुरे, बाबू काका तांदळे, गवळी समाजातील मुन्ना बागवाले, अरुण चिखले, नितीन बागवाले, मारुती काळे, बापू शिंदे, संभाजी काळे, बंडू बागवाले,सोनाप्पा बागवाले, गोंधळी व रावळ समाजातील जगदीश इगवे, दत्ता दुलदुले, राहुल इगवे, वैजनाथ घोटकर, दीपक सुपले, सचिन मांडे, गणपत इगवे, लिंबाजी ढवळे, रतन मिरगे, नरसिंह मिरगे, गजानन रेणुके यांसह विविध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.