Home Blog Page 118

खेळताना तोंडात घातलेलं चॉकलेट अडकलं सात महिन्याच्या मुलीचा मृत्यू

बीड —  एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. एका सात महिन्यांच्या मुलीच्या घशात चॉकलेट  अडकल्यानं तिचा हृदयद्रावक अंत झाला आहे. या चिमुरडीचा मृतदेह कुशीत घेऊन नातेवाईकांनी बीडच जिल्हा रुग्णालय गाठलं.

बीड तालुक्यातील काटवटवाडी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोही आनंद खोड असं मृत मुलीचं नाव असून ती अवघ्या सात महिन्यांची होती. घरातच खेळत असताना खाली पडलेलं चॉकलेट तिने तोंडात टाकून गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चॉकलेट तिच्या घशात अडकलं आणि तिचा यात दुर्दैवी अंत झाला. आपली सात महिन्यांनी लेक गेल्यानं आई-वडिलांसह कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. तसेच या घटनेनं परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

बेपत्ता 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

बीड शहरालगत असलेल्या इमामपूर परिसरात मागच्या दोन दिवसांपासून एका पाठोपाठ एक अशा हादरवणाऱ्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. आता वडिलांसोबत दोन दिवसांपूर्वी घरातून निघालेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीचा गळाफास घेतलेल्या अवस्थेतीत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्या चिमुरडीच्या पित्याचाही मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. आता या चिमुकल्या मुलीचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला आहे.

या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बीड जवळील इमामपूर रोड परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीचा गळफास दिलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दोन दिवसांपूर्वी याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

या परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणांना एका लिंबाच्या झाडाला या चिमुकलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला

नगरपरिषदेसह सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून बीड शहराचे सौंदर्यीकरण

डॉ.योगेश क्षीरसागर यांची सीओंसोबत चर्चा; वृक्षलागवड, सुशोभीकरण, फाऊंटेन, पार्किंगच्या मुद्द्यांकडे वेधले लक्ष

बीड — शहराचे सौंदर्यीकरणासाठी बीड नगरपरिषदेत मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध सामाजिक संस्थांची गुरुवारी (दि.११) बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांची उपस्थिती होती. शहरातील रस्त्यांचे डेव्हलपमेंट, वृक्षलागवड, स्वच्छता, सुशोभीकरण, सार्वजनिक सोयीसुविधा या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रस्तावित नवीन रोड व डीपी रोडमध्ये वृक्षारोपणासाठी जागा सोडून अंडरग्राउंड ड्रिपद्वारे पाणीपुरवठ्याची सोय करणे, बंद असलेल्या जिल्हा परिषद कन्या शाळेच्या ठिकाणी भाजी मंडई व महिला बचत गटासाठी मॉल उभारणे, शहरातील ओपन स्पेसला तारकंपाउंड करून वृक्षलागवड करणे, नवीन फुलांचे गार्डन प्रस्तावित करणे, चौक सुशोभीकरणांतर्गत शहरातील प्रमुख चौकात फाउंटेन उभारणे, सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समधील आतील जागा पार्किंगसाठी उपलब्ध करणे, जालना रोड दुभाजकाचे सुशोभीकरण करणे, शहर व उपनगरातील ओपन स्पेसमध्ये घनदाट जंगल प्रकल्प उभारणे हे निर्णय घेतले. बैठकीत कोटक महिंद्रा बँकेने सामाजिक जबाबदारी अंतर्गत १ घंटागाडी व १०० डस्टबीन देण्याचे पत्र नगरपरिषदेला सुपूर्द केले. याबाबत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. ही छोटेखानी बैठक झाली असली तरी लवकरच व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी फडसे यांनी स्पष्ट केले. या बैठकीस आय.एम.ए. जिल्हाध्यक्ष डॉ. अनंत मुळे, रोटरी क्लब अध्यक्ष विकास उमापूरकर, शहराध्यक्ष राहुल बोरा, झाडांची भिसीच्या प्रतिनिधी डॉ. नाईकवाडे, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, कॅनरा बँक, कोटक बँक, आयडीबीआय आदी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे राज्यपाल

मुंबई — महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदी निवड झाली. त्यामुळे राज्यपाल पद रिक्त झाले होते. आता त्या जागी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार आहेत.

राष्ट्रपती भवनाने गुरुवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, सी.पी. राधाकृष्णन यांची भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. आचार्य देवव्रत हे त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांसह महाराष्ट्राच्या राज्यपालपदाच्या जबाबदाऱ्या पार पाडतील.ही नियुक्ती तात्काळ प्रभावी होईल. हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील समलखा तहसीलमध्ये जन्मलेले आचार्य देवव्रत हे एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत. ते २०१९ पासून गुजरातचे २० वे राज्यपाल म्हणून काम करत आहेत. याआधी ते २०१५ ते २०१९ पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते.

आत्महत्यांच सत्र सुरूच: सरकारी वकील, डॉक्टर आता विस्ताराधिकाऱ्याने संपवले जीवन

बीड — येथील पंचायत समितीत कार्यरत असलेल्या विस्तार अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परळी येथे उघडकीस आली असून, या घटनेने खळबळ उडाली आहे. यापूर्वी वडवणी येथील सरकारी वकील त्यानंतर डॉक्टर आणि आज विस्तार अधिकाऱ्याने जीवन संपवल्यामुळे जिल्ह्यात नेमकं काय घडत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
विलास डोंगरे रा. शिवाजीनगर परळी असे आत्महत्या केलेल्या विस्तार अधिकारी यांचे नाव आहे. ते बीड पंचायत समिती मध्ये विस्तार अधिकारी या पदावर कार्यरत होते. कुटुंबासह ते परळी येथे राहत होते. परळी येथे रहात्या घरीच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी दुपारी उघडकीस आली. वडवणी येथील सरकारी वकील, प्राथमिक आरोग्य केंद्राचा डॉक्टर यांनी आत्महत्या
केल्याची घटना ताजी असतानाच आज डोंगरे या विस्तार अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समजताच जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी दवाखान्यात पाठवला. या आत्महत्ये मागील कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. मयत विलास डोंगरे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. ते ग्रामविकास अधिकारी होते पण त्यांची पदोन्नतीवर बीड पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी म्हणून ते सध्या काम पाहत होते.

जिल्हाधिकाऱ्यांचा इव्हेंट चा “अ”विवेकी कारभारच फट्टू; जनतेसह प्रशासनाचं मन खट्टू !

बीड — महसूल विभागातील तीन कर्मचाऱ्यांच म्हणण मांडण्याची संधी न देता निलंबन करण्याची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. परिणामी महसूलची व्यवस्था पूर्ण कोलमडली. अन्याया विरोधात कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या सामूहिक रजा आंदोलनाची माहिती नाही. बेमुदत काम बंद आंदोलनाच तर जिल्हाधिकाऱ्यांच्या गावीही नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेल्या लोकांना भेटायला वेळ नाही. यामध्ये काम घेऊन आलेल्या ग्रामीण जनतेची होरपळ होऊ लागली आहे याचं सोयर सुतक नाही.इव्हेंट करण्याला मात्र भरपूर वेळ असल्याचं विदारक चित्र सध्या निर्माण झाला आहे. या लहरी कारभाराला च अविवेकी फट्टू कारभार असं जनतेत म्हटलं जाऊ लागल आहे.

जिल्ह्याच नेतृत्व करणारी व्यक्ती ही सहकाऱ्यांना सोबत घेऊन चालणारी,जनतेत तसेच सहकारी यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण करून प्रशासनाला गतिमान करत विकासाला चालना देणं, न्याय भूमिका घेणं, सोबत काम करणाऱ्यांना नवी ऊर्जा देणं सोबतच शिस्तही लावण.हे जिल्हाधिकाऱ्यांचं काम असतं तसे नेतृत्व गुण असावे लागतात. बीडमध्ये मात्र या उलट चित्र निर्माण करण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे. विवेक जॉन्सन यांनी कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत तीन कर्मचाऱ्यांचा निलंबन केलं. त्यानंतर या तीन कर्मचाऱ्यांचे म्हणणं ऐकून घेणं देखील गरजेचं होतं. लहरीपणात कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणं देखील गरजेचं होतं. पण “हम करे सो कायदा”या भूमिकेमुळे प्रशासकीय व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसापासून आंदोलनाचा इशारा महसूल कर्मचाऱ्यांनी दिला होता. मात्र जिल्हाधिकारी इतके सजग आहेत की त्यांना याची माहितीच नाही असं माध्यमां समोर म्हणायला देखील त्यांना काहीच वैशम्य वाटलं नाही. स्वतःच्या कार्यालयात कर्मचारी हजर आहेत नाहीत याची दखल घेण्याची तसदी न घेणारा व्यक्ती जिल्हाधिकारी म्हणून पालकमंत्र्यांनी माथी मारला. बाराशेहून अधिक कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनावर गेले असले. लोकांची काम खोळंबली असली तरी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांना काहीच फरक पडत नाही कारण जनता जगली काय मेली काय? पगारात आणि रुबाबात थोडाच फरक पडणार आहे? असं म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. स्वतःच्या कार्यालयात जर एवढी गू घाण होत असेल त्याच “अ”विवेकी जिल्हाधिकाऱ्यांना काहीच वाटत नसेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर न्यायासाठी उपोषणाला बसलेल्या लोकांचं काय? न्यायाची अपेक्षा करायचीच नाही का? कासारी येथील रामहरी महादेव वायबसे कुटुंब न्यायासाठी 15 ऑगस्ट च्या दिवशी उपोषणाला बसलं होतं. न्याय मिळतच नाही. हे बघून 29 ऑगस्ट रोजी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांचं प्रशासन जागं झालं. आजही पाच-सहा जण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करत आहेत. जिथं विवेक जॉन्सन यांना कार्यालय ओस पडल्याचं दिसत नाही. तिथं बाहेर बसलेले उपोषणकर्ते कधी दिसणार? त्यांना न्याय कसा मिळणार? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे.आरक्षण विषय ताजा आहे.अशावेळी विवेक जॉन्सन यांच्या तुघलकी कारभाराने महसूल व्यवस्था कोलमडल्याने जनतेचे मात्र हाल होऊ लागले आहेत. इव्हेंट चा बादशहा असलेले जिल्हाधिकारी मात्र वृक्ष लागवडीचा रेकॉर्ड करून लावलेली झाड जगली आहेत का ती वाळून गेली आहेत. हे पाहायला तयार नाहीत. प्रशासकीय कार्यालयातील जुने झाड तोडायची नवी झाडे लावायची. झाड लावताना चा फोटो सेशन करायचं. माध्यमामधून स्वतःची टिमकी वाजवायची एवढाच एकमेव इव्हेंट राबवला जात असेल तर ज्या जनतेने पालकमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला भरभरून साथ बीड जिल्ह्यात दिली. त्याच पापाची फळ जनतेला भोगावे लागत आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
एकंदरच अजितदादांनी जनतेच्या बोकांडी बसवलेला जिल्हाधिकारी अवघड जागेवरच दुखणं होऊन बसल्याचं जनतेत उद्विग्नपणाने बोललं जात आहे.जिल्हाधिकाऱ्यांचा इव्हेंट चा “अ”विवेकी कारभारच फट्टू; जनतेसह प्रशासनाचं मन खट्टू असं जनतेत गमतीने बोललं जाऊ लागला आहे

डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन रद्द!

बीड — बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक असताना राज्य शासनाने निलंबित केलेले डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन अखेर शासनाने रद्द केले आहे. मात्र त्यांना बीडलाच पुनर्नियुक्ती न देता त्यांना राज्य कामगार विमा सोसायटीचे म्हणून प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे. आपले निलंबन रद्द व्हावे यासाठी डॉ. अशोक थोरात यांनी न्यायालयीन लढाई सुरु केल्यानंतर शासनाने ही भूमिका घेतली आहे.

बीडचे जिल्हाशल्य चिकित्सक म्हणून डॉ. अशोक थोरात यांची कारकीर्द चांगली राहिली होती. मात्र कोरोना काळातील काही गोष्टींचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात ११ अधिकाऱ्यांची नावे असताना केवळ डॉ. अशोक थोरात यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. शासनाच्या निलंबन आदेशाला डॉ. अशोक थोरात यांनी मॅट आणि उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर उच्च न्यायालयाने मॅट ला कालबद्ध सुनावणीच्या निर्देश दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉ. अशोक थोरात यांच्या निलंबनचे आदेश रद्द केले असून त्यांना प्रतिनियुक्तीवर राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक म्हणून नियुक्ती दिली आहे.

जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या नविन जोडणीमुळे बीडकरांचा पाण्याचा प्रश्न सुटणार- आ.संदीप क्षीरसागर

बीड — बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 220 के.व्ही. नाळवंडी या लाईनवरून 33/11 के.व्ही. म्हाळसजवळा फिडरला जोडून ईट येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या Water purification project

विद्युत फिडरला नविन जोडणीच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला.

बीड विधानसभेचे आ. संदीप क्षीरसागर Sandeep kshirsagar यांच्या हस्ते बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ईट येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या Water purification project विद्युत फिडरला जवळा येथील सबस्टेशन substation मधून विद्युत प्रवाह वाहीनीच्या नविन जोडणीच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला.

सदर लाईन जोडल्यामुळे २४ तास लाईट जल शुद्धीकरण केंद्रला उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे बीड शहराला अखंडित पाणी पुरवठा होणार असून बीड शहरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी ईट येथील जलशुद्धीकरण प्रकल्पावर भेट देऊन दुरुस्तीचे कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. बीड शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असून, त्यासाठी माजलगाव धरणातून पाणी आणण्याचा विचार देखील केला जात आहे.

संपादक राजेंद्र होळकर यांना पत्नीशोक; सुहासिनी होळकर कालवश

बीड — अभिमान परिवाराचा आधार असलेल्या संपादक राजेंद्र होळकर यांच्या पत्नी सुहासिनी होळकर (वय 54) यांचे उपचारा दरम्यान पुणे येथे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. सुहासिनी होळकर यांच्या निधनाने अभिमान परिवाराचा मोठा आधार कोसळला आहे.
अभिमानचे संपादक राजेंद्र होळकर यांच्या पत्नी सुहासिनी होळकर मागच्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. तब्बल 1 महिन्याहून अधिक काळ त्यांनी आजाराशी कडवी झुंज दिली. मात्र बुधवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
सुहासिनी होळकर यांनी अत्यंत जिद्दीने आणि संघर्षाने जीवन जगले होते, अभिमान परिवार मोठा करण्यात संपादक राजेंद्र होळकर यांना त्यांनी कायम खंबीरसाथ दिली होती. एक संवेदनशील व्यक्ती, कर्तव्यदक्ष गृहीणी, कर्तव्यकठोर माता अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडत त्यांनी आयुष्य जगले. मागच्या काही काळात त्या आजारी असतानाही त्यांनी जिद्द सोडली नव्हती. अभिमानच्या वाटचालीत संपादक राजेंद्र होळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका त्या कायम घेत आल्या होत्या. बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी दुपारी पुणे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी होळकर कुटूंबासोबतच अभिमान परिवारावर प्रेम करणार्‍या अनेकांची उपस्थिती होती.
सुहासिनी होळकर यांच्या निधनाचे वृत्त कळताच जिल्हाभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राजेंद्र होळकर यांचे फोनवर सांत्वन केले. सुहासिनी होळकर यांच्या पश्‍चात पती राजेंद्र होळकर, मुलगा डॉ.साहिल असा परिवार आहे. होळकर कुटुंबीयांच्या दुःखात “सह्याद्री माझा” परिवार सहभागी आहे

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती!

  1. नवी दिल्ली — जगदीप धनखड यांनी अधिवेशनकाळातच अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदासाठी vice president आज मतदान voting झाले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे supreme court माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी B. Sudarshan Reddy हे उमेदवार होते.

एकूण मतदान 768 झाले होते, परंतू १५ मते अवैध ठरली आहेत. सीपी राधाकृष्णन CP Radhakrishnan यांना ४५२ मते मिळाली आहेत. तर बी सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली आहेत. एनडीएची मते वाढल्याने इंडिया आघाडीला मोठा सुरुंग लागला आहे.

लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून ७८८ खासदार असतात. यापैकी ७ जागा रिक्त आहेत. तर १३ खासदारांनी मतदान केलेले नाही. एकूण ७८१ मतदान होणे अपेक्षित होते. परंतू, १३ मते पडलेली नाहीत. यामुळे आता 768 मतांची मोजणी केलाी जाणार आहे. मतदान न करणाऱ्यामध्ये बीआरएसचे ४, बीजेडीचे ७, अकाली दलाचे १ आणि अपक्ष १ अशा खासदारांचा समावेश आहे. एनडीएच्या ४२७ खासदारांनी मतदान केले आहे.

जनसुरक्षा विधेयक विरोधातील आंदोलनात बहुसंख्येने उपस्थित रहा – राहुल सोनवणे

बीड — सातत्याने सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या भाजप सरकारने आणलेला महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा सर्वसामान्यांची गळचेपी करणारा आहे.या कायद्यामुळे निष्पाप लोकांना वेठीस धरल्या जाणार असल्याने सदरील कायदा रद्द करण्यासाठी महाविकास आघाडी मैदानात उतरली असून बीड येथे मोठे आंदोलन उभारल्या जाणार असून सदरील आंदोलनात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी केले आहे.
जनसुरक्षा कायद्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी राज्यभर आंदोलन होणार असून काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडी दि.१० रोजी सकाळी ११.३० वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोठे आंदोलन व निदर्शने करणार आहे.
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनतेच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. सध्याच्या सरकारने हे जनसुरक्षा विधेयक सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी व हुकूमशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणले आहे. सरकार या कायद्याचा उपयोग विरोधक, डाव्या संघटना आणि डाव्या संघटनांशी संबंधीत लोकांना, सरकारच्या विरोधात बोलणा-या सामान्य नागरीकांना तसेच पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना अटक करुन दडपशाही आणि बळाचा वापर करुन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल अशी भीती विविध संघटना आणि विरोधकांनी व्यक्त केली असून कार्यकर्ते व सामान्य नागरीकांमध्ये या विधेयका विरोधात प्रचंड तिव्र असंतोष व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, सामान्य जनतेच्या प्रश्नावर, शेतकरी, बेरोजगार युवक यांच्या विविध प्रश्नांवर राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटना सरकारच्या विरोधात लोकशाही मार्गाने जन आंदोलन करतात ही न्याय हक्काची आंदोलन दडपून टाकण्यासाठीच जनसुरक्षा कायद्यांचा वापर केला जाणार आहे. सदरील जनसुरक्षा कायद्या विरोधात काँग्रेस सह महाविकास आघाडी एकवटणार असून काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राहुल सोनवणे यांनी केले आहे.