Home Blog Page 111

स्थानिक गुन्हे शाखेला अजगराची सूस्ती; दराडे यांनी उतरवली गुटखा माफियाची मस्ती

0

बीड — अजगरासारखी स्थानिक गुन्हे शाखा सुस्तावलेली असताना एसपींच्या विशेष पथकाने मात्र पुन्हा कारवायांचा धडाका सुरू केला आहे.अंबाजोगाई शहरात गुटख्याच्या गोदामावर मंगळवारी (दि.3) सायंकाळी सातच्या सुमारास छापा टाकला यावेळी 10 लाख 67 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला.

पोलीस यंत्रणेत स्थानिक गुन्हे शाखा देखील असते हे जनतेच्या विस्मरणातून जाऊ लागले आहे. भक्ष गिळून पडलेल्या अजगरासारखी स्थिती स्थानिक गुन्हे शाखेची बनली आहे. निष्क्रिय अधिकारी म्हणून उस्मान शेख यांची ओळख निर्माण झाली आहे. हप्ते खोरीतच शाखा ही अग्रेसर आहे की काय असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. पोलीस अधीक्षकांना देखील याचं काहीच कसं वाटत नाही? ही खुर्ची नुसती उबवायला नाही? त्यांच्यावर कारवाई का होत नाही?त्यांच्या कामाचा लेखाजोखा का पाहिला जात नाही?याबद्दल देखील आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. फुटकळ कारवाया करायच्या अन गावभर दवंडी द्यायची अशी पद्धती एलसीबीची झाली आहे.यातच पोलीस यंत्रणेत बाळराजे दराडे यांच्याच कारवाया जनतेच्या मनावर सध्या तरी राज्य करू लागल्या आहेत.सहा.पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी अंबाजोगाई शहरातील एका गुटख्याच्या गोदामावर मंगळवारी छापा मारला. हा छापा अंबाजोगाई शहरातील गणेश प्रोव्हिजन च्या गोदामावर मारून रजनीगंधा, आर.एम.डी, विमल, गोवा, बाबा या नावाचा गुटखा ताब्यात घेतला आहे. या कारवाईत 10 लाख 67 हजारांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.गणेश बिडवे, किरण रविंद्र शेटे या दोन गुटखा व्यापाऱ्यांना देखील पकडण्यात आले. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे, पोलीस उपनिरीक्षक घाडगे,मोराळे, मुंडे,नागरगोजे,मस्के, नामदेव सानप यांचा सहभाग होता.

सुलतानपुरात पवनचक्की कंपनीसह पोलिसांची सुलतानी! गुन्हेगारापुढे शेपूट घालणाऱ्या पोलिसांची शेतकऱ्यांवर दादागिरी ?

0

बीड — जिल्ह्यात सगळीकडे अवैध धंदे बोकाळलेले असताना गुन्हेगारीवर आळा घालताना शेपूट घालणारी पोलीस यंत्रणा शेतकऱ्यावर मात्र मर्दानगी दाखवू लागली आहे. बालाघाटावर पवनचक्की कंपन्यांचा धुमाकूळ सुरू असून पोलीस यंत्रणा मावेजा न देता शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची नासाडी करणाऱ्या कंपन्यांना संरक्षण देत कर्तबगार हे दाखवू लागले आहेत. या त्रासाला कंटाळून वैतागलेल्या शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्यावरच गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र आत्महत्येची वेळ आणणाऱ्या कंपन्यांचे मात्र पोलीस तळवे चाटत असल्याचे चित्र सुलतानपूर मध्ये पाहायला मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसापासून बालाघाटावर पवनचक्की कंपन्या धुमाकूळ घालत आहेत. बीडच्या आमदारांसह परळीतून देखील पवनचक्की कंपन्यांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप होत आहे. चौसाळा जवळील सुलतानपूर येथील शेतकऱ्यांना एक रुपया देखील मावेजा न देता त्यांच्या उभ्या पिकातून स्टिंगिंग म्हणजेच तार ओढण्याचा काम ओ टू कंपनीने अक्षरशः पोलीस संरक्षणात सुरू केल आहे. मावेजा मिळाल्यानंतर काम सुरू करा ही मागणी शेतकऱ्यांनी केली असता भाडोत्री गुंड व पोलिसांच्या मदतीने शेतकऱ्यावर दादागिरी आज केली गेली. तार ओढण्याचे सुलतानपुर शिवारातील गट नंबर 247,250,251 मधील
काम थांबत नसल्याने, मावेजा मिळत नसल्याने, उभ्या पिकाचे नुकसान न पाहवल्याने शेतकऱ्याने कंटाळून अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. मात्र सुलतानपूरचे शेतकरी पंजाब अनुरथ नाईकवाडे वय 42 वर्ष व त्यांचे वडील अनुरथ नाईकवाडे यांना शासकीय कामात अडथळा आणला व आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी चौसाळा पोलीस चौकीत आणले गेले. एरवी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या पोलिसांनी मात्र आम्हाला पोलीस अधीक्षकांचा आदेश आहे त्या आदेशाने आम्ही गुन्हा दाखल करणारच अशी भूमिका घेतली.

पोलिसांसह पवनचक्की कंपन्यांची सुलतानी कधी संपणार?
गेल्या एक ते दीड वर्षापासून पवनचक्की कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक व आमीष दाखवत वेळप्रसंगी दादागिरी करत हे राज्य सुलतानाचं आहे याचा प्रत्यय वारंवार आणून दिला.एरवी एखादा मोठा गुन्हा घडला तर दिरंगाई करणारे पोलीस मात्र या सुलतानांचे पाय चाटत असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस संरक्षण न मागता देखील अनेक वेळा पैसा मिळतो म्हणून कंपन्यांच्या गाड्याला संरक्षण दिल्याचे पाहायला मिळाले. राजकीय अभय बीडच्या आमदाराकडून तसेच परळी कडून मिळत असल्याने हे प्रकार होत असल्याचा आरोप वारंवार होऊ लागला असला तरी याचा खंडन मात्र दोघांनीही केलेलं नाही. त्यामुळे या आरोपात तथ्य असल्याचं शेतकरी आता उघड उघड बोलू लागले आहेत.

बारगळ साहेब..! माफियावर कारवाई करताना शेपूट घालणारी पोलीस यंत्रणा इथेच मर्दानगी का दाखवू लागली?
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना वाळू वाहतूक करणारे टिप्पर स्वतःला पकडावे लागले. पोलीस संरक्षणात हे पकडलेले टिप्पर ठेवलेले असताना त्यांना अर्ध्या रात्रीत पाय फुटले. गुन्हेगारीने जिल्ह्यात कळस गाठलेला असताना तुमचे डोळे सावली समजली जाणाऱ्या गुन्हे शाखेचे अधिकारी खुर्च्या उबवित तोंडावर बोट हाताची घडी अशा स्थितीत बसलेले आहेत.गुन्हेगारांनी उच्छाद मांडलेला असताना शेपूट घालणारी तुमची पोलीस यंत्रणा शेतकऱ्यांच्या बाबतीतच मर्दानगी का दाखवू लागली आहे? असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.

शेतकऱ्यावर गुन्हा मग आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे तळवे का चाटता?
मावेजा न मिळाल्यामुळे पवनचक्की दादागिरीला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांनी दिला असं नेकनूर पोलीस म्हणत आहेत. मग एस पी साहेब ज्यांनी शेतकऱ्यावर आत्मदहनाची वेळ आणली त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले जात नाहीत?त्यांचे तळवे तुमची पोलीस यंत्रणा का चाटत आहे याचंही उत्तर आता शेतकरी मागे लागले आहेत.

पोलिस प्रशासन पवनचक्की कंपन्यांच्या संरक्षणासाठी सर्वात पुढे पिडीत शेतकऱ्यांची जबाबदारी कोणाची?

पवनचक्की कंपन्यांनी बालाघाटावर गेल्या २ वर्षांपासून उच्छाद मांडला असुन शेतकऱ्यांच्या अडाणी पणाचा फायदा घेऊन स्थानिक व बाहेरील गुंड बाळगुन आर्थिक लुट सुरू असुन पोलिस प्रशासनाला हाताशी धरून मनमानी कारभार करत आहेत. बालाघाटावरील शेतकरी पवनचक्की कंपन्यांच्या दहशतीखाली असुन पोलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली कंपन्यांपुढे लोटांगण घालत असुन शेतकऱ्यांवर दडपशाही करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मग नेमका प्रश्न पडतो पोलिस प्रशासन शेतकऱ्यांसाठी काम करतंय की पवनचक्की कंपन्यांसाठी असा प्रश्न उपस्थित करत मग पिडीत शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी कोणाची?? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी विचारला आहे.

आपणच गरुड असल्याचा आव; घाणीत चोंचं बुडवण्याचा कसा जाईल कावळ्याचा स्वभाव?

0

बीड — कावळा गरुडावर स्वार झाला. त्याकडे दुर्लक्ष करत गरुडाने उंच भरारी घेतली मात्र त्या कावळ्यालाच आपण किती उंच भरारी घेऊ शकतो.आपण गरुडा पेक्षा शक्तिशाली झालो असा भास होण स्वाभाविक बनलं पण घाणीत चोंच बुडवण्याची सवय कशी जाणार ? याचा विचार मात्र केला जात नसल्याचं चित्र अनेक वेळा पाहायला मिळतं.अशीच स्थिती बीडमध्ये लाटेवर स्वार होऊन नशीबाच “खास”असलेलं “दार” उघडलेल्याची निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.
घाणीत तोंड घालायचं हा कावळ्याचा मूळचा स्थायीभाव तो कधीच विसरला जात नाही.मग तो कावळा एखाद्या मंदिराच्या कळसावर बसो की आणखी गरुडावर स्वार होवो.आणखी त्याला एखाद्या देवाच्या नावाने कोणी लाडाने हाक मारो त्याच्यात बदल काय होणार? अशीच प्रवृत्ती काही मंडळींमध्ये देखील आढळते. मग ती कितीही उच्च पदावर गेली तरी मूळचा स्थायी भाव कधीच विसरत नाही.हे प्रत्यक्ष प्रमाण बीडच्या जनतेला तरी सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणात तर अशा डोमकावळ्यांची कमतरता कधीच भासत नाही. नगरपंचायत च्या निवडणुकीत एखाद्याला निवडून आणण्याची क्षमता नसलेली व्यक्ती निर्माण झालेल्या लाटेवर स्वार होतो मतलबासाठी पक्षाची अदलाबदल करतो. सुदैवाने तो निवडूनही येतो. निवडून येताना प्रत्येक घटकाला तितकच महत्त्व देतो. मात्र निवडून येताच ज्या लाटेवर आपण स्वार झालोत. त्या लाटेच्या जीवावर आपल्यासाठी “खास”असलेलं नशिबाचं “दार”उघडलं हे चक्क विसरून जातो.ती लाट निर्माण करणाऱ्यांनाच पश्चातापाची वेळ आणतो. कृतघ्नपनाची परिसिमा गाठतो. आपली चूक झाली याची जाणीव मदत करणाऱ्यांना होईल अशी वर्तवणूक करतो. ज्या भागातून आपल्याला मताधिक्य मिळालं. त्याला स्वतःच कर्तुत्व समजतो. ज्याने पायाला भिंगरी बांधून गावोगाव हिंडत याच्यासाठी प्रत्येकापुढे झोळी पसरली,अंधारलेल्या स्थितीत असताना (सं) “दीप” पेटता ठेवत भविष्य प्रकाशमान केलं त्याच्याच बाबतीत तो कसा काजवा होता याची वानगी वाटत वाट्टेल इतक्या बोंबा मारल्या. गेल्या महिनाभर तर गरुड झेप घेण्यात आपण कसे तुर्रम खान आहोत याच्या भूशारक्या
देखील मारल्या. त्या कितीही “बजा” “बजा” के मारलेल्या असल्या तरी त्याचा “रंग” उघडाच पडला
गरुडाचा आव आणून ज्याने जनतेला फसवले त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे कावळ्याला त्याची जागा जनतेने दाखवली. त्याच्या भूशारकीला भिक घातली गेली नाही. अनेकांना कावळ्याच्या नादी लागून नुकसान मात्र सहन करावे लागले. असे असले तरी
जनरोषाच्या वादळात देखील (सं) दीप च एकटा तेवत राहण्यात यशस्वी ठरला.पण ज्यांनी गरुडावर स्वार झालेल्या कावळ्याला गरुड असल्याचीच आवई उठवण्यात मदत केली त्यांनाच चोंच मारण्याचं काम आता सुरू केलं आहे. कावळा कळसावर बसून तेथून प्रत्येकाला कस्पटासारखा पाहू लागला. कळसावर घाण करण्याची वृत्ती देखील विसरला नाही. कळसावर बसून आपल्यात कळसाचं पावित्र्य आलं असा भास देखील झाला.मात्र घाणीत चोंच बुडण्याच्या स्थायी भावाने मात्र गरुडावर स्वार होऊन उंच घेतलेली भरारी आकाशाशी केलेलं हितगुज क्षणार्धात कवडीमोल झालं.

बीडच्या विकासासाठी डॉ. योगेश क्षीरसागरांना विधान परिषदेवर घ्या — संजय धुरंधरे

0

बीड — बीड विधानसभेत जातीपातीच्या राजकारणात महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांचा अवघ्या ५ हजार मतांनी निसटता पराभव झाला आहे. महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांना बीडच्या जनतेने ९६५५० मते दिली असून या मताची किंमत ठेवून पक्षश्रेष्ठींनी बीडच्या जनतेच्या मनातील खरा आमदार डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांना विधानपरिषदेचे संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय धुरंधरे यांनी केली आहे.

केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी जनतेने मोठा कौल दिला आहे. बीड विधानसभेत जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे बीड विधानसभेचे अध्यक्ष डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर हे तत्पर असून त्यांनी मागील काही वर्षात महायुतीच्या काळात विविध विकासकामे करून जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले याची पावती म्हणून महायुतीकडून डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांना विधानसभेची उमेदवारी दिली गेली मात्र या निवडणुकीत डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांचा निसटता पराभव झाला आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार राजेश विटेकर हे विधानसभेत विजयी झाले आहेत. त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली असून अजित दादा आपण विटेकरांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीड विधानसभेचे अध्यक्ष डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांना बीड विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी विधान परिषदेची संधी देऊन बीडच्या जनतेच्या मनातील खरा आमदार म्हणून संधी द्यावी अशी मागणी बीड शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संजय धुरंधरे यांनी केली आहे.

पंकजा मुंडेंनी असं करायला नको होतं — सुरेश धस

0

आष्टी — निवडणुकीत तुम्ही माझ्यासोबत राहणे गरजेचे होते पण तुम्ही मला एकटे पाडत विरोधकांचा छुपा प्रचार केला असा खळबळ जनक आरोप सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला आहे. यामुळे बीडच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

आष्टी मतदारसंघात भाजपाचे सुरेश धस यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवल्यानंतर आयोजित जाहीर सभेत पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. आ.धस म्हणाले, पंकजा मुंडे यांनी या निवडणूकीत तुम्ही माझ्या सोबत राहणे आवश्यक होते मात्र तुम्ही मला एकटे पाडले. तुमच्या दुटप्पी भूमिकेमुळे मतदार राजामध्ये संभ्रम निर्माण झाला. शेवटी मतदार राजा हा हुशार आणि चतुर आहे. त्यांनी मलाच हेरल. मी आयुष्यात कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा मी चेला आहे. त्यामुळे आयुष्यात कधीच मला राजकारण करण्यासाठी जात पात शिवणार नाही.

मी लोकसभेच्या वेळेस एकतर्फी माझ्या मराठा समाजाचा तुमचा प्रचार करून अंगावर रोष घेतला मात्र तुम्ही या विधानसभा निवडणुकीत छुपा डाव खेळलात हे चांगलं केलं नाही. त्यामुळे तुम्ही हलक्या कानाने राजकारण करता असं मला वाटलं. असा थेट आरोप सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर आष्टी येथील जाहीर विजयी सभेत केला. पंकजा मुंडे यांनी असं करायला नको होतं, असं देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे.

मुंडेंचा धनंजय “अजय”; राज्यात विक्रमी मतांनी मिळवला विजय

0

बीड — महायुतीच्या विजयात भर घालताना धनंजय मुंडे यांनी स्वतःचा बालेकिल्ला असलेला बीड आपल्याकडेच राखण्यात यश मिळवले. इतकच नाही तर परळीतून एक लाख 40 हजार 224 मतांनी विजय मिळवत राज्यात विक्रमी मताधिक्य मिळवत धनंजय “अजय” असल्याचं सिद्ध केलं. त्यांना 75.97% मत परळीच्या जनतेने दिली आहेत.

मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी तसेच ओबीसी समीकरणं जुळवत समाजातील अनेक नेत्यांना आपल्या कंपूत सामील करून घेत धनंजय मुंडे विरोधात चक्रव्यूह रचल्या गेलं. मतदार संघातच अडकून पडावं यासाठी सर्व चाली राजकारणातील धुरंदर समजल्या जाणाऱ्या शरद पवारांनी खेळल्या. मात्र या सर्व चालींना चोख प्रत्युत्तर देत चक्रव्यूह भेदण्यात धनंजय मुंडे यशस्वी ठरले. राज्यात महायुतीची सत्ता आणण्यासाठी प्रचार सभा घेत असताना त्यांनी स्वतःच्या मतदारसंघात एकाही मोठ्या नेत्याची सभा घेतली नाही. जनतेशी जोडली गेलेली नाळ नियोजनबद्ध प्रचार या गोष्टी त्यांच्या कामाला आल्या.नेता म्हणून हाकेला ओ देण्याची त्यांची तयारी आज भरभरून प्रतिसाद देणारी ठरली. धनंजय मुंडे यांना एक लाख 94 हजार 889 मत पडली. टक्केवारीचा विचार केला तर 75.97% मत त्यांनी एकट्याने मिळवली आहेत.
राजेसाहेब देशमुख यांना 54 हजार 665 मतं मिळाली आहेत. एकूण 21.31% इतकीच मतं त्यांना मिळू शकली. राज्यात सर्वाधिक एक लाख 40 हजार 224 मत मिळवून धनंजय मुंडे यांनी नवा विक्रम स्थापन केला आहे.

आष्टीतील चौरंगी लढतीत सुरेश धस यांचा दणदणीत विजय

0

बीड — आष्टीत झालेल्या चौरंगी लढतीकडे राज्याचे लक्ष झालेल्या बंडखोरीमुळे लागले होते. भीमराव धोंडे यांनी निवडणुकीत शड्डू ठोकली तर आ. बाळासाहेब आजबे ,मेहबूब शेख यांनी देखील उडी घेतली होती मात्र या निवडणुकीत सुरेश धस यांनी सरस कामगिरी करत 77 हजार 732 अशा विक्रमी मताधिक्याने भीमराव धोंडे यांना मात दिली.

भीमराव धोंडे यांनी बंडखोरी केल्यानंतर आष्टी पाटोदा मतदारसंघातील वातावरण देखील त्यांच्यासाठी प्रचंड अनुकूल बनले होते. त्यामुळे त्यांच्या विजयाच्या अटकली बांधल्या जात होत्या. मात्र मतदानाच्या दोन-तीन दिवस आधी सुरेश धस यांनी मतदार संघातील वातावरण अनुकूल करून घेण्यात यश मिळवले. सुरेश धस यांना पंकजा मुंडे यांनी देखील साथ दिली नाही. ओबीसी मतदारांचा चांगला प्रभाव या मतदारसंघावर आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना भाजपला लोकसभेला केलेली मदत यामुळे सुरेश धस यांना मराठा मतदारांचा देखील विरोध होता. बंडखोर उमेदवार ओबीसी असल्याने अडकित्यात अडकल्यासारखी परिस्थिती सुरेश धस यांची निर्माण झाली होती. मात्र मातब्बर राजकारणी असल्याने त्यांनी या कात्रीतून सोडवनूक करून घेतली.
या निवडणुकीत सुरेश धस यांना एक लाख 38 हजार 638 इतकी मतं मिळाली. दुसऱ्या नंबर वर असलेल्या भीमराव धोंडे यांना साठ हजार 906 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मेहबूब शेख यांना 52 हजार 37 मत मिळाली. विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे एकवीस हजार 332 मतांनी चौथ्या क्रमांकावर राहिले गेले. या निवडणुकीत सुरेश धस यांना 77 हजार 732 मतांनी दणदणीत विजय मिळाला आहे.

चितपट केले दिग्गज सर्व; गेवराईत “विजय ” पर्व

0

बीड — गेवराई विधानसभा मतदारसंघात पंडितांचे “विजय” पर्व सुरू झाले आहे. तब्बल 42 हजार 390 मतांनी दणदणीत विजय त्यांनी मिळवला आहे. गेल्यावेळी ज्यांच्याकडून पराभव पत्करावा लागला ते लक्ष्मण पवार तिरंगी लढतीत यावेळी तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत.

गेवराई मतदार संघ तिरंगी लढतीमुळे प्रत्येकांचे लक्ष खेचून राहिला होता. बदामराव पंडित, लक्ष्मण पवार यांच्याबरोबर लढत देताना विजयाची समीकरणं माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सटिक मांडली होती. त्या अनुषंगाने प्रयत्न केले जात होते. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा, आज पर्यंत जनतेशी जोडलेली नाळ, विकासासाठी आजपर्यंत शिवछत्र ने दाखवलेली तळमळ या निवडणुकीत विजयसिंह पंडित यांच्या कामाला आली. विजयसिंह पंडित यांना एक लाख 16 हजार 141 मत पडली दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार बदामराव पंडित यांना 73 हजार 751 मत मिळाली. तर गेल्या वेळी आमदार राहिलेले लक्ष्मण पवार हे यावेळी केवळ 38,171 मतं मिळवू शकले. विजयसिंह पंडित 42 हजार 390 अशा भरघोस मतांनी विजयी झाले आहेत.

नमिताने साठेला नमवलं; पुन्हा केज वर वर्चस्व मिळवलं

0

बीड — राखीव मतदार संघ असलेल्या केज विधानसभा मतदार संघात नमिता मुंदडा यांनी वर्चस्व राखण्यात यश मिळवलं आहे. 26 87 मतांनी त्या विजयी झाल्या आहेत.

नमिता मुंदडा यांचे विरोधी उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट मोठ्या प्रमाणावर होती. याबरोबरच पंकजा मुंडे यांना केज विधानसभा मतदारसंघात लोकसभेला मोठा दणका बसला होता. त्यामुळे या मतदारसंघाची समीकरणे पूर्ण बदलली होती. असा असताना देखील नमिता मुंदडा यांनी विजयश्री आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवले त्यांना एक लाख 17 हजार 81 मतं पडली तर पृथ्वीराज साठे यांना एक लाख 14 हजार 394 मत मिळाली. 2687 मतांनी त्या आपला गड कायम राखण्यात यशस्वी ठरलेल्या आहेत.

उमेदवारांना मिळालेली मतं

नमिता मुंदडा-117081
पृथ्वीराज साठे–114394
अशोक थोरात — 3559
वैभव स्वामी–2007
रमेश गालफाडे –1537

बीडमध्ये संदीप क्षीरसागरांची तुतारी वाजली

0

बीड — बीड विधानसभा मतदारसंघात दोन्ही क्षीरसागर बंधूत झालेल्या अटीतटीच्या लढतीत संदीप क्षीरसागर साडेपाच हजार मतांनी विजयी झाले आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गट व शरद पवार गटामधून योगेश क्षीरसागर व संदीप क्षीरसागर यांनी एकमेका विरोधात मैदानात उडी घेतली होती. विजय कोणाचाही होवो शेवटी क्षीरसागर हेच विजयी होणार हे समीकरण बनलं होतं. मात्र त्यातही योगेश क्षीरसागर यांच्या बाजूने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ताकद उभी केल्यानंतर योगेश क्षीरसागर विजयी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. समीकरण बदलली असली तरी संदीप क्षीरसागर यांनी आपला गड काय कायम ठेवण्यात यश मिळवले. 5559 मतांनी संदीप क्षीरसागर विजयी झाले आहेत.संदीप क्षीरसागर यांना 99300 मत पडली तर योगेश क्षीरसागर 93739 इतकी मतं पडली आहेत.

उमेदवारांना पडलेली मतं
संदीप क्षीरसागर-101874
डॉ.योगेश क्षीरसागर –96550

अनिल जगताप -15613
डॉ. ज्योती मेटे – 9768
कुंडलिक खांडे -3359