Home Blog Page 110

 2 कोटीची खंडणी मागितली; वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटेवर गुन्हा दाखल

0

बीड — धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादीच्या केज तालुकाध्यक्षवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावत असल्याची तक्रार केली असून संबंधित अधिकाऱ्यांचं अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची तक्रार अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केज पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे केज पोलिसांनी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांवर दोन कोटीची खंडणी मागितली आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

‌‌. याबाबत मस्साजोग येथील अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनिल केदु शिंदे रा. नाशिक ह.मु. मोंढा रोड बीड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मागील एक वर्षापासून ते अवादा एनर्जी प्राव्हेट लिमीटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहे. त्यांच्याकडे बीड जिल्हयातील केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन उर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचं काम आहे. मस्साजोग या ठिकाणी प्रकल्पाचे मुख्य कार्यालय असून, त्या ठिकाणी विविध प्रकल्पाचे अधिकारी काम पाहत आहेत.
२९ नोव्हेंबर रोजी मस्साजोग येथील अवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना सुनिल शिंदे यांच्या फोनवर विष्णू चाटे याने फोन केला आणि त्यांनी मला वाल्मीक आण्णा बोलणार आहेत असे म्हणाले, ते काम बंद करा, ज्या परिस्थीतीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थीतीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून प्रकल्पाचं काम बंद करण्याबाबत धमकी दिली.

कार्यालयात हजर असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुदर्शन घुले, रा. टाकळी हा मस्साजोग येथील प्रकल्पाच्या ठिकाणी आला आणि त्याने पुन्हा काम बंद करा, अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे त्याची पुर्तता करा, असं म्हणून केजमध्ये चालू असलेल्या इतर ठिकाणाचे अवादा कंपनीचे सर्व काम बंद करा, अन्यथा तुमचे हात-पाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकेन, असं म्हणत धमकी दिली होती.
काही दिवसांपूर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मीक आण्णा कराड यांनी त्यांचे परळी येथील कार्यालयात बोलावून अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा अन्यथा काम चालू ठेवायचं, असेल तर दोन करोड रुपये द्या असं सांगितलं होतं. त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांच्या मोबाईलवरुन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचं काम बंद न ठेवल्यास सांगितलं. तसंच मारहाण करण्याच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. यापूर्वी २८ मे २०२४ रोजी ११ वाजता याच कारणावरुन आपलं आपहरण केल्याचं सुनिल शिंदे यांनी सांगितलं. त्याबाबत पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिल्याचंही ते म्हणाले.
त्यानंतर ६ डिसेंबर २०२४ रोजी देखील सुदर्शन घुले आणि इतरांनी आवादा कंपनीचे मस्साजोग येथील प्रकल्पाच्या ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करुन गेटवरील कामगारांना धमकी देऊन मारहाण केली होती. त्यावेळी कंपनीचे शिवाजी थोपटे यांनी सुदर्शन घुले आणि इतर लोकांविरुध्द पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झालेला आहे.
अवादा कपंनीचे केज तालुक्यातील पवन उर्जा प्रकल्पाचे काम बंद करण्यासाठी वाल्मीक कराड रा. परळी, विष्णु चाटे रा. कौडगाव ता. केज आणि सुदर्शन घुले रा. टाकळी ता. केज हे वारंवार प्रकल्पाचे काम चालु झाल्यापासुन धमकी देत आहेत. त्यामुळे त्यांच्या दहशतीखाली असल्याने, तसंच मनस्थिती बरी नसल्याने सुनिल केदु शिंदे त्यांनी कपंनीचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्याने बुधवारी तक्रार दाखल केली असल्याचे म्हटले आहे

न्यायाधीशालाच लाच घेताना पकडलं; एसीबीची मोठी कारवाई

0

सातारा — न्यायपालिकेवर आजही सर्वसामान्य जनतेचा पूर्ण विश्वास आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्याय,अत्याचारविरुद्ध दाद मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय. लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्याने प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्याविरुद्धची लढाई देखील मोठ्या आशेने न्यायालयात लढली जाते. मात्र साताऱ्यात न्याय देण्यासाठी एका न्यायाधीशालाच लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.शहराती एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यानंतर, गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांच्या न्याय-हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तडा गेला आहे.

पुणे-सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने संयुक्तिकपणे साताऱ्यात ही मोठी कारवाई केली आहे. सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयांविरुद्धच गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले, त्यानंतर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरू आहे. पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात न्यायाधीश महोदयांसह खाजगी इसम किशोर खरात व आनंद खरात तसेच एक अनोळखी इसम यांना रंगेहात पकडल्याने न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली. होती, अशी प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घडामोडी घडल्या आहेत. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अँटीकरप्शनच्या पोलिसांनी सर्वांना रंगेहात पकडले, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेने सातारा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. ज्या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसांचा शेवटचा विश्वास असतो, त्याच न्यायव्यवस्थेवरही या कारवाईनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हा न्यायपालिकेवर आहे, पोलिस यंत्रणांकडून अन्याय झाला तरी न्यायालयात आपणास दाद मिळेल, न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तींकडून आपल्यावरील अन्याय दूर होईल, अशी सर्वसाधारण भावना असते. मात्र, चक्क न्यायाधीश महोदयच लाच घेताना आढळून आल्याने विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पोलीस, व प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत. पण, थेट न्यायपालिकेतील वरिष्ठ अधिकारीच अडकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पकडला

0

 

बीड — केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी आज तिसऱ्या आरोपीला पुण्यामधून अटक केली आहे.

प्रतिक भीमराव घुले वय 25 वर्ष, रा.टाकळी ता.केज असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.प्रतिकच्या अगोदर पोलिसांनी जयराम माणिक चाटे वय 25 वर्ष रा.तांबवा ता. केज, महेश सखाराम केदार वय 21 रा. मैंदवाडी ता.धारुर या दोघांना अटक केली होती. आरोपी प्रतिक हा खून केल्यानंतर पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली आहे. या आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान जयराम चाटे व महेश केदार यांना सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
असं आहे प्रकरण ?
संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले.
याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन देखील करण्यात आले. देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं तपासात कसूर केल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आल्याने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी संबंधित पीएसआयचे निलंबन केले.

पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम; मोठ्या संख्येने उपस्थित रहा –.संदीप क्षीरसागर

0

बीड  — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे जाणते राजे पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या ८४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बीडमध्ये जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांनी गुरूवारी (दि.१२) रोजी राष्ट्रवादी भवन येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार साहेब यांचा ८४ वा वाढदिवस गुरूवारी (दि.१२) रोजी आहे. पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बीडमध्ये राष्ट्रवादी भवन येथे सकाळी ११:०० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ८४ उत्कृष्ट विद्यार्थी, ८४ जेष्ठ नागरिक, ८४ विशेष कार्य केलेल्या महिला यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासोबतच विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

अनागोंदी कारभाराने रब्बी पिके धोक्यात;महावितरण विरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

0

लिंबागणेश — बीड तालुक्यातील लिंबागणेश पंचक्रोशीतील गावांना विद्युत पुरवठा असणाऱ्या लिंबागणेश येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील अनागोंदी कारभारामुळे विजेच्या समस्येने तिव्र रुप धारण केले असुन दिवसभरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने तसेच कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने मुबलक पाणी उपलब्ध असुनही वीजे अभावी शेताला पाणी देता येत नाही .

रब्बी हंगामातील कांदा ज्वारी,गहु, हरभरा आदी पिके वाळु लागल्याने शेतकऱ्यांना हातची पिके वाया जाण्याची धास्ती असुन लिंबागणेश येथील ३३ केव्ही.उपकेंद्रातील उप अभियंता पद २ महिन्यांपासून रिक्त असुन लाईनमन वेळेवर ड्युटी करत नसल्याने तसेच मुख्यालयी रहात नसल्याने रात्री अपरात्री ग्रामस्थांना फ्युज टाकणे,केबल बदलणे आदी कामे करावी लागत असुन महावितरणच्या अनागोंदी कारभार विरोधात आज दि.५ सकाळी गुरुवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर ते अहमदनगर ५४८ डी राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान लिंबागणेश बसस्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्तारोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ,शिवशक्ती भिमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे, मुळुकवाडीचे माजी सरपंच कृष्णा पितळे, मसेवाडीचे तुळशीराम काटकर यांची समायोजित भाषणे झाली.

सावकारे एस.जी.उपकार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग ग्रामीण बीड यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी निवेदन स्विकारताना पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे , मंडळ अधिकारी अशोक डरपे,पो.हे. संतोष राऊत, बाबासाहेब डोंगरे, नवनाथ मुंढे , मधुकर तांदळे, इसाक शेख, उबाळे, कुलकर्णी उपस्थित होते. आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, राजाभाऊ गिरे, विक्रांत वाणी, सुरेश निर्मळ,रमेश पाटील विनायक मोरे, पांडुरंग वाणी, अँड.गणेश वाणी,कृष्णा पितळे, सय्यद बशीर, औदुंबर नाईकवाडे, बोरखेडचे आरुण काकडे, विनायक शिंदे, निळकंठ काकडे , आजिनाथ घरत, शिवाजी घरत, साहेबराव घरत, विश्वंभर गिरी,अशोक जाधव, संतोष भोसले, सहभागी होते.

आश्वासनानंतर आंदोलन मागे

उप कार्यकारी अभियंता महावितरण उप विभाग बीड ग्रामीण यांनी आंदोलनातील मागण्यांच्या अनुषंगाने लिंबागणेश येथील ३३ केव्ही.उपकेंद्रातील सहायक अभियंता रिक्त पदावर पदस्थापना. नियुक्तीसाठी वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा केला आहे.लिंबागणेश व पोखरी ( घाट) गावच्या पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या रोहित्रास जवळच्या ११ केव्ही वाहिनीपासुन तातडीने सर्वे करून अंदाज पत्रक मंजुरीसाठी वरीष्ठ कार्यालयास सादर करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कृषी वाहिनीवर लोड वाढल्याने चक्राकार पद्धतीने विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. लिंबागणेश गावातील दुरूस्ती व केबल व कट आऊट दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. लिंबागणेश येथील विद्युत कर्मचारी यांचा अपघात झाल्याने सद्यस्थितीत अन्य कर्मचाऱ्यांना देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी देण्यात आली असल्याचे लेखी दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

हिंगणीत सोयाबीनच्या 62 कट्ट्यांची चोरी

0

चौसाळा — जवळच असलेल्या हिंगणी (बु) येथील शेतकरी शहाजी वायसे यांच्या घराबाहेर ठेवलेलं सोयाबीनची 62 कट्टे बुधवारी मध्यरात्री चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे चौसाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगणी (बु.) येथील शेतकरी शहाजी शंकरराव वायसे यांनी घराबाहेर सोयाबीन पोत्यांची थप्पी लावलेली होती. बुधवारी रात्री वायसे कुटुंबातील सगळे झोपलेले असताना मध्यरात्रीच्या
सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोबत आणलेले वाहन चौसाळा नांदूर रस्त्यावर उभे केले. चोरट्यांनी सोबत आणलेल्या माणसाच्या साह्याने सोयाबीन थप्पीतील 62 पोते जवळपास एक हजार फूट अंतरापर्यंत पाठीवर घेऊन जात. सोबत आणलेल्या वाहनात भरून ते लंपास केले. चोरीला गेलेले सोयाबीन अंदाजे 40 क्विंटल इतके होते. अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला असून नेकनूर पोलिसांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने मात्र खळबळ माजली असून भीतीचे सावट पसरले आहे.

आष्टी:शाळेत जाणाऱ्या 15 वर्षीय मुलीवर ट्रेनमधून उतरून तिघांनी केला अत्याचार

0

आष्टी — वीट भट्टीवर दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या मजुराच्या पंधरा वर्षीय मुलीवर रेल्वेतून उतरलेल्या तिघांनी लैंगिक अत्याचार घटना घडली. पीडिता नऊ महिन्याची गर्भवती असल्यानंतर ही बाब समोर आली.

याप्रकरणी तिघांविरुद्ध सोमवारी आष्टी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील एक कुटुंब मागील दोन वर्षांपूर्वी आष्टी तालुक्यातील एका गावात वीटभट्टीवर कामासाठी आले होते. याच कालावधीत मार्च 2024 नक्की तारीख माहीत नाही.15 वर्षीय अल्पवयीन मुलगी याच गावातील शाळेत रेल्वे पटरीच्या बाजूने जात असताना अनोळखी तिघे जण रेल्वेतून उतरले व यातील दोघांनी तिच्या हाताला धरून शेजारच्या शेतात नेले. यातील एकाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना समोर आली. पीडिता यातून 9 महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून 2 डिसेंबर रोजी अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे, पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे याच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे करीत आहेत.

विकासकामांच्या वचनपूर्तीसाठी कटिबद्ध राहू-डॉ.योगेश क्षीरसागर

0

बीडमध्ये संत सावता महाराज मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

बीड — नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपण विकासाचे व्हिजन मांडले होते. महायुती सरकारच्या माध्यमातून आपण विकासकामांच्या वचनपूर्तीसाठी कटिबद्ध राहणार आहे, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिली.

बीडमध्ये संत सावता महाराज मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन बुधवारी (दि.४) करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नागरिक नामदेवराव दुधाळ, माजी नगरसेवक बाबूराव दुधाळ, नितीन साखरे, शुभम धूत, बिभीषण लांडगे, मोहनराव गोरे, प्रा.लक्ष्मण गुंजाळ, रमेश दुधाळ, राजेंद्र शेलकर, राजेश साळुंके, गोरख यादव, संतराम पानखेडे, दिलीप बेदरे, मयुर आखाडे, मनोज काळे, निलेश घाडगे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, शहरातील सावता माळी चौक परिसरातील बिंदूसरा नदीकाठेला संत सावता महाराजांचे भव्य मंदिर निर्माण केले जात आहे. या मंदिरासमोरील सभागृहासाठी मी व माजी मंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागर यांनी यापूर्वी ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. याठिकाणी लोकवर्गणीतून ४० लक्ष रुपयांचे मंदिर उभारले आहे. आपण मंदिर, सभागृह व परिसर विकासाकरिता निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. हे काम अंतिम टप्यात असून मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी आता २० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या मंदिराचे काम पूर्णत्वास जात असून लवकरच प्राणप्रतिष्ठापणा सोहळा आयोजित केला जाणार आहे. या धार्मिक कार्यात आपला खारीचा वाटा असल्याचे मनाला समाधान वाटते, असेही डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एपीआय गणेश मुंडे यांची गेवराई येथे बदली

0

बीड — जिल्ह्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण करणारे एपीआय गणेश मुंडे यांची गेवराई येथे महामार्ग पोलीस विभागात बदली करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वीच एपीआय गणेश मुंडे यांची नळदुर्ग येथे बदली करण्यात आली होती. मुंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे अवैध धंद्ये करणाऱ्यांचे धाबे दणाणत असत. 3 डिसेंबर रोजी त्यांची नळदुर्ग येथून गेवराई येथील महामार्ग पोलीस विभागात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक (मुख्यालय) अरविंद साळवे, अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक मुंबई यांनी हे आदेश काढले आहेत.

“बप्पा “गिरलेल्या दिलाची प्रचिती देण्यापेक्षा विमा, आरक्षण, पवन ऊर्जेचे प्रश्न लोकसभेत मांडा!

0

बीड — लोकसभेचं हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर पासून सुरू झालेलं असताना खासदार बजरंग सोनवणे जिल्ह्यातील जनतेला गिरलेल्या दिलाची प्रचिती देत आहेत. बजरंग बप्पांनी पत्रकारांना शिव्या देण्यापेक्षा मराठा आरक्षण, पिक विमा, पवन ऊर्जा कंपन्यांची शेतकऱ्यावर सुरू असलेली दादागिरी यावर संसदेत आवाज उठवत रान पेटवून संकटमोचक म्हणून “बजरंग” नावाला साजेस काम करावं.अन्याय, अत्याचाराची लंका दहन करा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

एकीकडे लोकसभेच अधिवेशन सुरू असताना त्याला गैरहजर राहत खा.बजरंग सोनवणे यांची गाडी पत्रकारांवरच घसरली त्यांच्या बायको लेकरावर अशोभनीय टिका टिप्पणी केली. पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेताच सल्लेवजा गिरलेल्या दिलाची प्रचिती देत टोमणे वजा दिलगिरी व्यक्त केली.आपल्याला ज्या पदावर जनतेने बसवले आहे.त्या पदाच्या प्रतिष्ठेची धूळधाण केली. ज्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाने स्वतःच्या कष्टातून कमावलेला पैसा खर्च करत बजरंग सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं. त्यांच्या आरक्षण मुद्द्याचा विसर बजरंग सोनवणे यांना अधिवेशन काळातच पडला हे समाजाच दुर्दैव आहे. 2020 चा पिक विमा शेतकऱ्यांच नुकसान होऊन देखील न्यायालयीन तसेच रस्त्यावरची आंदोलनाची लढाई लढून देखील अजून मिळालेला नाही. 2024 चा पिक विमा अजूनही मिळण्यासाठी प्रशासनाच्या कुठल्याही हालचाली नाहीत. अनुदानाचा प्रश्न देखील मोठा आहे.

शेतीवर उपजीविका करणारा शेतकरी वर्ग विशिष्ट जातीचा जरी नसला तरी बहुसंख्य मराठा समाज या क्षेत्रात आहे याचा विसर देखील खासदार महोदयांना पडला. पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा अशी सद्बुद्धी त्यांना कधी येणार असा प्रश्न शेतकरी वर्गातून देखील विचारला जात आहे. याचबरोबर ज्या बालाघाटाने बजरंग सोनवणे यांना निवडणुकीत डोक्यावर घेतलं. प्रचंड मताधिक्य दिलं. ज्या मताधिक्याच्या जोरावर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं दुर्दैवाने त्या बालाघाटाचीच सध्या ससेहोलपट होताना दिसून येत आहे. ज्या केंद्र सरकारने अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताला महत्व देत मोठमोठ्या प्रकल्पाला मंजूरी दिली. या प्रकल्पामध्ये उतरलेल्या पवन ऊर्जा कंपन्या शेतकरी वर्गालाच कच्चं खाण्याचं काम सध्या करत आहेत. दादागिरी, गुंडगिरी आमिष दाखवत शेतकऱ्यांची लूट करत आहेत. त्याकडे लक्ष द्यायला मात्र खासदार महोदयांना वेळ नाही. पवन ऊर्जा कंपन्या पोलीस यंत्रणा हाताशी धरून शेतकऱ्यांच जगण हराम करत आहेत त्या कंपन्या विरोधात मात्र खासदार शब्दही बोलायला आज तयार नाहीत. मंगळवारी पवन ऊर्जा कंपनी व पोलीस यंत्रणेच्या दादागिरीने निर्माण केलेल्या सुलतानीला कंटाळून शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न सुलतानपूर मध्ये केला. तळहाताच्या फोडासारख जपलेल्या पिकाची तार ओढण्यासाठी नासाडी केली जात होती. एवढं घडूनही त्यावरही चकार शब्द बोलायला देखील जिभ जड होऊ लागली आहे. उलट त्या शेतकऱ्यावरच सरकारी कामात अडथळा आणणे, आत्मदहनाचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं सांगत मानसिक अत्याचार करण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणे कडून केला गेला. एवढं सगळं घडत असताना पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले की त्यांना शिव्या हसडायच्या ही कुठली पदाची प्रतिष्ठा असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचे, जाती,मातीचे ज्वलंत प्रश्न संसदेत पेटवून “बजरंग” नावाची बुज राखा अशी मागणी जनतेतून केली जात आहे. तुमच्याकडून पत्रकारांना अजूनही शिव्या दिल्या गेल्या तरी चालतील पण जनतेचे प्रश्न लोकसभेत उठवून रानपेटवत अन्याय अत्याचाराची “लंका” दहन करण्याचं काम आता तरी करा अशी मागणी जनतेतून होत आहे.