शिरूर का.– मध्यरात्री चोरट्यांनी घराच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून घरात प्रवेश करत पावणेदोन लाखाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बारगजवाडी येथे रविवारी घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बारगजवाडी येथील द्रौपदीबाई बाळासाहेब मिसाळ या रात्रीचे जेवण करून घरासमोरील पडवीत झोपल्या होत्या. घराला कुलूपही लावले होते. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास घराची भिंत फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले 4 ग्रॅमचे वेलजोड अंदाजे किंमत 33 हजार610 रुपये, 7 हजार सहाशे रुपये किमतीचे एक ग्रॅमचे हुजूर जोड, दोन ग्रॅमचे 49 मणी दिड ग्रॅमची बुगडी या दागिन्यांसह एक लाख रुपये नगद रक्कम असा 1 लाख 68 हजार 210 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरीची ही घटना सोमवारी सकाळी मिसाळ कुटुंबियांच्या लक्षात आली. या प्रकरणाची तात्काळ पोलिसांना माहिती देत शिरूर पोलीस ठाण्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यरात्री घराची भिंत फोडून बारगजवाडीत चोरी
जबरी चोरी करणारे 4 आरोपी गुन्हे शाखेने पकडले
बीड — ऑनलाइन पैसे टाकतो असं सांगून मोटार सायकलवर बसवून घेऊन जात त्याची लूट करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शेख इम्रान दस्तगीर, वय 28 वर्ष, रा होळ याला त्याच्या मित्रांने ऑनलाइन पैसे पाठव म्हणून सांगितले होते. परंतु ऑनलाईन पैसे नसल्यामुळे तो आडस फाटा येथील एका बियर बार समोर थांबून विचारपूस करत होता.यावेळी तीन तरुण मोटार सायकल वरून या ठिकाणी आले. शेख इम्रान यास ऑनलाइन पैसे टाकतो असं सांगून मोटार सायकल वर बसवले.आडस रोडला घेवुन जावुन त्याच्याकडील पैसे व मोबाईल हिसकावुन घेवुन पळुन गेले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात 309(4), 3(5) बी.एन.. एस प्रमाणे दि. 7 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस गून्हयातील आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान गुप्त बातमीदाराकडून स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा हा सुमित अरुण गायकवाड व त्याचे साथीदारासह केला असुन ते सध्या अंबाजोगाई येथे असल्याची माहीती मिळाली.पथकाने अंबाजोगाई शहर परीसरातुन गुन्हयातील आरोपी सुमित अरुण गायकवाड, वय 20 वर्ष, रा पंचशिल नगर अंबाजोगाई, विनय गोविंद जगधने, वय 19 वर्ष, रा संभाजीनगर अंबाजोगाई, विश्वजीत विश्वास गंडले, वय 19 वर्ष, रा लाल नगर अंबाजोगाई व शिवम जनक कसबे, वय 19 वर्ष, रा आर्मी कॉलनी अंबाजोगाई यांना ताब्यात घेवुन त्यांच्या कडून बळजबरीने चोरुन नेलेला मोबाईल व गुन्हयात वापरलेली दुचाकी मोटार सायकल जप्त करुन पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांच्या ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करीत आहेत.हि कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारोती कांबळे, रामचंद्र केकाण, गोविंद भताने, सचिन आंधळे, विकी सुरवसे व चालक अतुल हराळे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
सर्वोच्च झटका;वाल्मीक कराडला जामीन नाहीच
बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील फेटाळण्यात आला त्यामुळे त्याचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग धूसर झाला आहे.
आरोपी वाल्मीक कराड याने बीड जिल्हा न्यायालयात दोष मुक्तीचा अर्ज दाखल केला होता मात्र गुन्ह्याची गंभीरता व समोर आलेल्या पुराव्या वरून हा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये देखील अपयश आले. बीड न्यायालयाचा निर्णय खंडपीठाने देखील कायम ठेवला. त्यानंतर वाल्मीक कराडने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठासमोर आज झाली. सर्वोच्च न्यायालयात देखील वाल्मीक कराडला दिलासा मिळाला नाही. त्यामुळे सध्या तरी वाल्मीकचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग धूसर झाला आहे. दरम्यान महादेव मुंडे हत्या प्रकरणात देखील त्याचे नाव समोर आले असून आणखी अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणात अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.
10 वीच्या विद्यार्थ्यांना छतावर मंडपात बसवणं भोवलं, केंद्र संचालक निलंबित
बीड — कुर्ला येथील यशवंत विद्यालयातील परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था चक्क शाळेच्या छतावर मंडप टाकून केल्याचा धक्कादायक प्रकार दहावी पेपरच्या सुरुवातीस समोर आला होता. याप्रकरणी शिक्षण विभागाने गंभीर दखल घेऊन केंद्र संचालकास निलंबित केले आहे.
बीडमध्ये कॉपीमुक्त अभियान सुरू आहे. कॉपी प्रकरणावरून शिक्षण विभागाने 17 शिक्षकांना आतापर्यंत निलंबित केले आहे. यामुळे धाबे दणाणले असतानाच कुर्ल्यातील यशवंत विद्यालयात घडलेल्या प्रकार राज्यभर चर्चेचा विषय ठरला. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मंडप टाकून इमारतीच्या छतावर बसवण्यात आले होतेया प्रकरणात शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. विभागाने कडक पाऊल उचलत थेट परीक्षा केंद्र संचालक अभिषेक राऊत यांना निलंबित केले आहे. दुसरीकडे, संस्थेने देखील अभिषेक राऊत यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि नियमांचा विचार न करता चक्क शाळेच्या छतावर मंडप टाकून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवण्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला होता. या गंभीर प्रकरणाची दखल घेत शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. कुर्ला येथील यशवंत विद्यालय केंद्राचे संचालक अभिषेक राऊत यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर मनमानी करणाऱ्या संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत.
आरटीई पोर्टलवर ७५ शाळांचा तात्काळ पुनःसमावेश करण्याची मनोज जाधव यांची मागणी
पोद्दार शाळेचा आरटीई पोर्टलवर तात्काळ पुनःसमावेश करावा
बीड — अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आलेल्या आणि त्यानंतर निर्णय रद्द झालेल्या ७५ शाळांचा आरटीई पोर्टलवर तात्काळ पुनःसमावेश करण्यात यावा, अशी मागणी शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अल्पसंख्यांक मंत्री, शिक्षण मंत्री ,तसेच प्राथमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, काही शाळांना अल्पसंख्यांक दर्जा प्रदान करण्याच्या प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. संबंधित शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाबाबत यापूर्वीच स्थगिती असतानाही काही तासांत प्रमाणपत्रांचे वाटप झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची दखल घेत माननीय मुख्यमंत्र्यांनी संबंधित निर्णयास स्थगिती दिली आहे.
दरम्यान, सध्या राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू असून पालकांकडून अर्ज सादर केले जात आहेत. मात्र, नियमबाह्य पद्धतीने अल्पसंख्यांक प्रमाणपत्र देण्यात आलेल्या ७५ शाळांची नावे आरटीई पोर्टलवरून वगळण्यात
आले आहेत यात बीड जिल्ह्यातील पोद्दार शाळेचा देखील समावेश आहे. त्यामुळे या शाळेत आरटीई मार्फत आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना अर्ज प्रक्रियेत अडचणी येत आहेत. अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे प्रवेशप्रक्रियेत नुकसान होत असल्याची बाबही पुढे आली आहे.
ज्या तत्परतेने संबंधित शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देऊन त्यांची नावे आरटीई पोर्टलवरून वगळण्यात आली, त्याचप्रमाणे निर्णय रद्द झाल्यानंतर त्या शाळांचा आरटीई पोर्टलवर तात्काळ पुनःसमावेश व्हावा, अशी मागणी मनोज जाधव यांनी केली आहे. शासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागास आवश्यक सूचना द्याव्यात, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखून सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, हीच या मागणीमागील भूमिका असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
फडणवीस साहेब..! हा तर बुजगावण्याचा कारभार; पोलिसांना आरोपी “फाटे” कधी सापडणार?
बीड — फडणवीस साहेब….!संतोष देशमुख हत्याकांड झालं अन् बीड जिल्ह्याचं ग्रहमानच फिरलं. कायदा सुव्यवस्थेची द्वाही देत “प्रामाणिक, कर्तव्यदक्ष“यासारखी बिरुदावली लावलेलं मोठ्ठच्या मोठं बुजगावणं तुम्ही बीडच्या जमिनीत आणून बसवलं. नव्याचे नऊ दिवस म्हणून त्याचं कौतुकही झालं. पण थोड्याच दिवसात नवलाई संपली अन् शेतातल्या बुजगावण्याला जी किंमत असते ती देखील या बुजगावण्याला आज राहिली नाही. बुजगावण्यानच अंगा खांद्यावर पाखर खेळवायला सुरवात केली . अन् चोर पावलाने शेतात घुसणाऱ्या व लचके तोडणाऱ्या श्वापदांची रात्रीच्या अंधारातली भीती देखील मेली.यामध्ये शेताच्या मालकाला (जनतेला) नासाडी झालेलं शेत बघून उर बडवायची वेळ आली. ही कहाणी नाही तर बीडचं वास्तव चित्र बनलं आहे. यामुळे घरातल्या कर्त्या पुरुषाची आत्महत्या झाली असली तरी आत्महत्येस भाग पाडणारा महाभाग अख्या पोलीस यंत्रणेला फाट्यावर मारून गायब आहे. माय माऊली वर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची वेळ आणली गेली आहे. मग फडणवीस साहेब…! तुम्हीच सांगा तुमचा कारभार न्यायाचा आहे काय? असल्या बुजगावण्याच्या जीवावर अच्छे दिन येणार काय? तुम्हाला मतदान करून निवडून दिले त्याची ही फळ आहेत काय? यासारखे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.
बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे रोज निघताना उघड्या डोळ्याने पहावे लागत आहेत.न्यायासाठी आंदोलन करावी लागत आहेत.रक्षण कर्तेच भक्षण कर्ते झाले आहेत. आरोपींना पाठीशी कसं घालायचं याचा नवा पायंडा बीड जिल्ह्यामध्ये पाडला गेला आहे. खबरदार…! न्यायासाठी आंदोलन केलं तर तुम्हालाच आरोपी ठरवून कठड्यात उभा करणार असा नवा अलिखित अध्यादेश बुजगावण्या ने काढला आहे. बार्शी नाक्यावर लहान मुलगा वीज डीपीला चिटकला म्हणून महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यां विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करणारावरच गुन्हे दाखल केले गेले. पतीची हत्या झाली म्हणून न्याय मिळावा यासाठी उपोषण करूनही तो मिळालाच नाही म्हणून महादेव मुंडे च्या पत्नीला पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येची वेळ आणली गेली. एवढ्यावरच भागलं नाही तर तिच्यावर देखील गुन्हा दाखल केला गेला. यश ढाका खून प्रकरणात देखील आंदोलन कर्त्यावर गुन्हे दाखल केले गेले. अशा एक ना अनेक घटना बीड जिल्ह्याच्या इतिहासात कधी नव्हे ते घडू लागल्या. 40 दिवसा हून आधी कालावधी उलटून गेलेल्या जीएसटी अधिकारी सचिन जाधवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप फाटे याला अटक करावी म्हणून त्यांच्या कुटुंबीयाला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ शेवटी आणलीच. जीएसटी अधिकारी जाधवर यांच्या पत्नीला पतीने आत्महत्या केलेली असताना देखील शोक करायला वेळ पोलिसांनी मिळू दिला नाही. प्रेत तसंच ठेवून ग्रामीण पोलीस ठाण्यात यावं लागलं. दुसऱ्या दिवशीही तीच परिस्थिती तिला अनुभवायला मिळाली.एवढ्यावरच भागलं नाही तर जाधवर कुटुंबाने उपोषण काळात उन्हापासून संरक्षण मिळावं म्हणून मंडप उभारला तो देखील पोलिसगिरी करून व गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन उखडून टाकला असा आरोप केला जात आहे. पाच पाच सहा वर्षाची चिमुकली देखील आपल्याआई-वडिलांसोबत उपोषणाला भर उन्हात बसली होती. हे दृश्य पाहून माणुसकी असणाऱ्यांच देखील हृदय कळवळलं पण पोलिसांना याचं काहीच वाटलं नाही. त्या बालकांना सावलीत बसवावं एवढी देखील माणुसकी पोलिसांनी दाखवली नाही हे चित्र काळजाचा थरकाप उडवणार होतं.

प्रदीप फाटे सारखा फुटकळ पांढरपेशा नोकरदार आरोपी पोलिसांना सापडत नाही. तो सहज हातावर तुरी देतो आहे. हे सांगूनही पटणार नाही. मग या प्रदीप फाटे ला संरक्षण कोणाचं मिळत आहे. वरिष्ठांच्या मनात आलं तर क्षणात लपून बसलेला फाटे फरफटत आणण्याची धमक बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आहे. पण वरिष्ठां पुढे जाण्याची हिंमत दाखवायची कशी हा खरा प्रश्न आहे.संरक्षण कर्ताच पाठीराखा असेल तर आरोपी सापडणार कसा? असा प्रश्न विचारला जात आहे. जाधवर कुटुंबीयांनी देखील असेच आरोप केले आहेत. जाधवर कुटुंबीय आज उपोषण करत असताना त्यांनी केलेला आरोप उल्लेखनीय आहे. जाधवर कुटुंबाने आरोप करताना म्हटले आहे की, पोलीस अधीक्षकांची पत्नी आणि आरोपी प्रदीप फाटे ची पत्नी मैत्रिणी आहेत म्हणून ही पाठराखण केली जात आहे. दरम्यान या आरोपाची पुष्टी “सह्याद्री माझा ” करत नाही.

. जाधवर कुटुंबीयांची ही कैफियत तर होत्या तर नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारे वकील देखील बुजगावण्या कारभारामूळे भरडून निघाले. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास एड. राम डोंगरे यांना राधाकिसन करपे नावाच्या इसमाने महिलांना सोबत घेऊन येत न्यायालयाच्या आवारात मारहाण केली. या प्रकरणात संतप्त झालेल्या वकिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. रीतसर तक्रारही दिली. पोलीस अधीक्षकांची देखील भेट घेतली पण दुसऱ्या दिवशी देखील गुन्हा दाखल झाला नाही. वकील संघाने न्यायालयाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केलं. न्यायालयाच्या कामकाजात सहभाग घेतला नाही. वकील संघाच्या अध्यक्षांनी तर मारहाण करणारा आरोपी हा दलाल असून त्याचे पोलिसांशी लागेबांधे असल्याचा आरोप केला. महिलाही दलालीतल्याच होत्या तरीदेखील पोलीस आरोपींना पाठीशी घालत आहेत असा आरोप माध्यमांसमोर केला. तरीदेखील पोलीस यंत्रणेला फरक पडला नाही. शेवटी वकिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोर्चा नेला. नाही हो नाही हो करत घटनेच्या 27 तासानंतर पोलिसांना आरोपी विरोधात गुन्हा दाखल करावा लागला. पण जोपर्यंत आरोपी अटक होणार नाही तोपर्यंत न्यायालयीन कामकाजात सहभाग घेणार नसल्याचं वकील संघाने निर्धार केला आहे. दरम्यान या अशाच एक ना अनेक घटनांनी सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याला काळीमा फासण्याचे काम केलं जात आहे. दरम्यान फडणवीस साहेब बीडची जनता आता तुमच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण करू लागली आहे. कायदा सूव्यवस्थेच जीवन बीडच्या जनतेला मिळणार का? बीडचा बिहार होताना मुख्यमंत्री साहेब तुम्ही तरी थांबवणार का? सामान्य जनतेला न्याय मिळणार का? यासारखे देखील प्रश्न विचारले जात आहेत.
राज्यातील २५५ मराठी शाळा बंद; शिक्षणमंत्री दादा भुसे
मूंबई — राज्यात विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळामध्ये प्रवेश देण्याकडे पालकांचा कल वाढत असून कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात २५५ मराठी शाळा बंद झाल्याची कबुली खुद्द शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
मराठी शाळांचा पट वाढविण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात दोन हजार मराठी शाळा अडचणीत आल्या असून २५ हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याबाबतचा तारांकित प्रश्न अमोल मिटकरी, विक्रम काळे यांनी उपस्थित केला.
राज्यात २०२५मध्ये ६२० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून ७० गावांत ‘ना शाळा ना पाटी-पेन्सिल’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे मराठी शाळा वाचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक, विद्यार्थी व संस्थाचालकांनी लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून शासनाला निवेदन दिल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना दोन हजार मराठी शाळा अडचणीत तसेच २५ हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची बाब मंत्री दादा भुसे यांनी आपल्या लेखी उत्तरात फेटाळली. त्याचप्रमाणे मराठी शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतला नसल्याचेही स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोर्चा काढण्यात आल्याची बाब खरी असून पालकांचा कल इंग्रजी माध्यमांत पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी वाढत असल्याने मागील दोन वर्षांच्या तुलनेत कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या भागांत २५५ मराठी शाळा बंद पडल्याची कबुली त्यांनी दिली.
शाळांचा पट वाढविण्यासाठी प्रयत्न
राज्यात कमी पटाच्या मराठी शाळा सुरू असताना शाळांचा पट वाढविणे व मराठी शाळा टिकवणे यासाठी उपाययोजना करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा प्रवेशोत्सव, इयत्ता पिहली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप, प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना, इयत्ता पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पायमोजे, बूट, निपूण महाराष्ट्र, समग्र शिक्षा अभियान, स्टार्स प्रकल्प, पीएमश्री प्रकल्प, माझी मराठी सुंदर शाळा, नियतकालिक चाचण्या, शिक्षक प्रशिक्षण उपक्रम इ. उपाययोजनांची अंमलबजावणी सरकारकडून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोठी बातमी! देशातील महत्त्वाच्या राज्याचं थेट नाव बदललं; कोणतं आहे “ते” राज्य?
नवी दिल्ली — केंद्र सरकारने देशातील एका राज्याचेच थेट नाव बदलण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने या मागणीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे आता भविष्यात या राज्याला त्याच्या नव्या नावानेच ओळखावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केरळ राज्याचे नाव बदलले जाणार आहे. केंद्र सरकारने मंगळवारी या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. काही दिवसांपूर्वी केरळमधील राज्य सरकारकडून तसा प्रस्ताव आला होता. या प्रस्तावावर विचार करून केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावानुसार आता केरळचे नाव केरळम केले जाणार आहे. येत्या एप्रिल, मे महिन्यात केरळमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता केरळचे नाव केरळम करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तशी माहिती दिली आहे. केरळच्या विधानसभेत 24 जून 2024 रोजी सर्वसहमतीने केरळ राज्याचे नाव बदलून ते केरळम करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव नंतर केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. याच प्रस्तावावर आता निर्णय घेण्यात आला आहे. याआधीदेखील 2023 साली केरळच्या राज्य सरकारने असाच एक प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी केंद्र सरकारने या प्रस्तावाचा अभ्यास करून प्रस्तावात काही तांत्रिक बदल सुचवले होते.
आता केरळचे नाव केरळम असे केले जाणार आहे. भारतीय संविधानातील 8 व्या अनुसूचिमध्ये केरळ राज्याच्या नावात केरळम असा बदल केला जाणार आहे. दरम्यान, केरळमध्ये विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना केंद्र सरकारने राज्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे.
कायद्याचे धिंडवडे: न्यायालयातच वकिलाला मारहाण, वकील संघाचे उद्या कामकाज बंद
बीड — बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेची लक्तर रोजच वेशीवर टांगली जातात.पण आज तर न्यायालय आवारात देखील वकिलाला मारहाण करून पोलिसांचा धाक नसल्याचं सप्रमाण सिद्ध झालं.जिल्हा न्यायालयात मंगळवारी 11 वा. मोठा राडा पाहायला मिळाला. टेबल समोर गाडी लावू नका असं म्हणताच राधाकिसन करपे याने एॅड. राम डोंगरे यांना शिवीगाळ केली. चार दोन महिलांना सोबत आणून मारहाण केल्याची खळबळ जनक घटना घडली. या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात दररोज मारहाणी, खून, दरोडे चोऱ्या यासारख्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पोलिसांच्या आश्रयांनी सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे गुंड मस्तवाल झाले आहेत. परिणामी सर्वसामान्य जनतेत जीन हराम झालेलं असतानाच न्यायालयात देखील मारहाणीची घटना होणं खाकीच्या प्रामाणिकपणावर कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाऊ लागला आहे.सकाळी न्यायालयाचे कामकाज सुरू होताच वकिलांच्या टेबल समोर राधाकिसन करपे नावाच्या शाहूनगर भागातील इसमाने मोटार सायकल आणून उभा केली. यावेळी एॅड. राम डोंगरे यांनी गाडी थोडी बाजूला लावा जाण्या येण्यासाठी रस्ता ठेवा असं म्हणताच राधाकिसन करपे ने शिवीगळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी बाचाबाची होऊन प्रकरण मिटले देखील. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास राधाकिसन करपे याने काही महिलांना सोबत घेऊन न्यायालय आवारात येत एड. राम डोंगरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये एड. राम डोंगरे जखमी झाले आहेत. याप्रकरणी वकील संघ आक्रमक झाला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी वकिलांनी धाव घेतली. दरम्यान एका महिलेने वकिला विरोधातच तक्रार दिली असल्याची माहिती पोलिसांकडून दिली गेली. तुम्ही तक्रार द्या असं शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांनी वकिलांना सांगताच वकील संघाचे पदाधिकारी संतप्त झाले. आपला मोर्चा त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे वळवला. एस पी ची भेट घेऊन प्रकरणाची शहानिशा करावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी वकील संघाने केली आहे. घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली असून कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिला नसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान उद्या बुधवारी दिवसभर वकील संघ न्यायालयीन कामकाज बंद ठेवून निषेध नोंदवणार आहे.
खुर्चीला चिटकले जळू, मिळून मिसळून जि. प.लागले गिळू; आयुक्तांनाही फाट्यावर मारू लागले वळू
बीड — जिल्हा परिषदेत जवळपास प्रत्येक विभागातच खुर्चीला चिकटलेले जळू दहा-दहा वर्षे झाली तरी निघायला तयार नाहीत. मिळून मिसळून खाण्याचा धंदा जोरात चालावा यासाठी प्रतिनियुक्तीवर आपलाच माणूस जवळ करायचा फंडा सुरू केला. बापाची जहागिरी समजून आयुक्तांचे अधिकार देखील वापरायला सुरुवात केलेल्या मस्तवाल वळूंची बेबंदशाहीला सिईओ जतीन रहमान तरी आळा घालणार का? सामान्यांची होणारी लूट थांबवली जाणार का? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
जिल्हा परिषदेत अतिरिक्त कामकाजाच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी आपला नंगा नाच सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रतिनियुक्तीचा जो अधिकार आपल्याला नाही तो अधिकार बापाची जहागिरी समजून कसा वापर करायचा याच इंगित अधिकाऱ्यांना चांगलंच कळलं आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील प्रतिनियुक्तीचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त विभागीय आयुक्तांनाच आहे ती ही फक्त सहा महिन्यांसाठीच करता येते पुन्हा नव्याने आदेश काढावे लागतात. असं असताना मात्र विभागीय आयुक्तांपेक्षा स्वतःला मोठे समजून अधिकाऱ्यांनी याचा सर्रास वापर सुरू केला आहे. अतिरिक्त कामकाजाच्या गोंडस नावाखाली अधिकाऱ्यांचा हा धांगडधिंगा सुरू आहे. याचाच परिणाम अनेक कर्मचारी एकाच विभागात जळू सारखे चिटकून बसले आहेत तर अनेक कर्मचाऱ्यांची फक्त या विभागातून त्या विभागातच पाठवणी करण्यात येते. हा खेळ फक्त स्वतःची सोय साध्य करण्यासाठी खेळला जात आहे. एक महाभाग कर्मचारी तर इतका लाडका व अधिकाऱ्यांच्या विश्वासातला की, त्याचे लाड पुरवण्यासाठी व त्यानेही आपली सेवा प्रामाणिकपणाने शेपूट हलवित करावी यासाठी गेवराईहून बीडला घेतले असल्याची सुरस चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतं. खुर्चीला चिटकून बसलेले हे जळू खरंच जनहितासाठी आहेत का? खरंच हे इतके कर्तबगार प्रामाणिक आहेत का? आहेत तर खुर्चीला चिटकून बसण्याची गरज काय? यामध्ये कसला स्वार्थ दडला आहे? एकमेकांचे हित जोपासण्यासाठी जनहिताचा खळखंडोबा राजरोस केला जात आहे. तरी देखील “आळीमिळी” गुपचिळी” चा खेळ का सुरू आहे?
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दीडशे कर्मचारी अतिरिक्त कामकाजाच्या नावाखाली दीडशे बोगस प्रतिनियुक्त्या देण्यात आले असल्याचं जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त यासोबतच महाराष्ट्र शासनासोबत देखील तक्रारीच्या माध्यमातून पाठपुरावा केला. डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना यामध्ये यश आले. सर्व प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात येत असल्याचे पत्र काही दिवसांपूर्वी सर्व विभाग प्रमुखांना पाठवले होते . असं असलं तरी अतिरिक्त कामकाज पाहणारा कर्मचारी मूळ पदस्थापनेवर रुजू होत नाही. जो पर्यंत संबंधित कर्मचारी आपल्या मूळ विभागात रुजू होत नाही तोपर्यंत संबधित विभागांनी त्यांचे वेतन भत्ते अदा करू नयेत. अशी मागणी देखील ढवळे यांनी केली होती .











