बीड — आठवडी बाजाराला निघालेल्या सराफा व्यापाऱ्याचे साठ लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लुटल्याची घटना माजलगाव मध्ये घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 18 तोळे सोने व एक किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.
सराफा दुकानदार अमोल पंढरीनाथ गायके वय ३१ वर्ष रा. भाट वडगाव ता. माजलगाव) हे त्यांचे माजलगाव येथील अमोल ज्वेलर्स या दुकानातून आठवडी बाजारात खेर्डा येथे सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी २५ जानेवारी रोजी त्यांच्या दुचाकीवर पुतण्यसाह जात होते. यावेळी पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांना बाजूला थांबण्यास भाग पाडले. गायके यांनी गाडी थांबविल्यावर त्यांना तीन आरोपींनी सत्तूरचा धाक दाखवून त्यांचेकडील सोन्या-चांदी दागिन्याची पिशवी बळजबरीने काढून घेऊन पळ काढला. त्यावरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
वरील प्रमाणे गुन्हा घडल्यापासून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला यांना आदेशीत केले की दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील गेला माल सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करावे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तीन वेगवेगळे पथक तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला.तपासात तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर असे निष्पन्न झाले की, यातील फिर्यादी गायके यांचा माजलगाव शहरातून रेकी करून पाठलाग केला असून आरोपींनी दुचाकींची अदला बदली करून पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी बारकाईने तपास करून यातील आरोपीं निष्पन्न केले. यातील आरोपी हे सध्या बीड येथील शांताई हॉटेलच्या पाठीमागील गल्लीत आहेत, अशी माहिती मिळताच पथकांनी आरोपी एकनाथ ऊर्फ नारायण अरुण कपाले वय ३५ वर्ष, रा. पाटोदा ता. परतूर जि.जालना ह.मु. बीड, कृष्णा तुकाराम निरडे वय २२ वर्ष, अभिषेक अशोक शिंदे वय २२, दोघेही रा. माजलगाव यांना ताब्यात घेतले.
आरोपींतांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांना अधिक विचारपूस करता एकनाथ कपाले याने सांगितले की, तो सराफा कारागिर असून त्याने पूर्वी माजलगाव येथे वेगवेगळे ठिकाणी कारागिरीचे काम केले होते व त्याला माजलगाव येथील सोनार दुकानदार यांच्या आठवडी बाजारात जाण्याचे वार व वेळ माहिती होती. तसेच तो सध्या खूप कर्जबाजारी झालेला होता. त्यामुळे नारायण याने माजलगाव येथील सराफा दुकानदार यास आठवडी बाजारास जाताना लुटण्याचे ठरवले. एकनाथ कपाले याने रेकॉर्डवरील गुन्हेगार कृष्णा निरडे व अभिषेक शिंदे यांना त्याचा प्लॅन सांगितला. त्यानुसार त्यांनी त्यांचे इतर दोन साथीदार मित्र संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे वय २८ वर्ष, रा. उमरगा मन्त्रा ता. उदगीर जि.लातूर ह. मु. पुणे), व विशाल सूर्यकांत सुळ(रा. माजलगाव ह.मु. पुणे) यांना कटात सामील केले.
आरोपींचे प्लॅन नुसार २५ जानेवारी रोजी एकनाथ कपाले व संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे यांनी फिर्यादी यांचे रेकी करून ते आठवडी बाजारास निघाल्यानंतर त्यांचा पाच आरोपीतांनी दोन दुचाकीवर पाठलाग करून शस्त्राचा धाक दाखवून गुन्हा केला आहे. आरोपीतांचे ताब्यातून १८ तोळे सोन्याचे दागिने व १ किलो चांदी असा एकूण ३० लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे यासही ताब्यात घेतले असून एकूण चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व एक फरार आरोपीचा शोध सुरु आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गोविंद पांडव हे करीत आहेत.











