कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याने संभ्रमाचा भरणा; अग्रीम मदत की नमो योजनेचा हप्ता?

Spread the love

नमो योजना हप्ता की अग्रीम मदत, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नांदेड — राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेली ५ हजार रुपयांची दुष्काळी अग्रीम मदत आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा प्रलंबित हप्ता याबाबत नवा संभ्रम निर्माण झाला आहे. या दोन्ही रकमा एकच असल्याचे विधान कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केले. मात्र, त्यानंतर अग्रीम मदत वेगळी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळालेले ५ हजार रुपये नेमके कोणत्या योजनेतून देण्यात आले आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता स्वतंत्रपणे मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कृषिमंत्री दत्ता भरणे नांदेड विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी शेतकऱ्यांना मिळालेली ५ हजार रुपयांची अग्रीम मदत आणि नमो शेतकरी सन्मान योजनेच्या प्रलंबित हप्त्याबाबत विचारणा केली.

नमो योजना हप्ता कधी मिळणार?

त्यावर बोलताना भरणे म्हणाले की, शेतकऱ्यांना प्रति शेतकरी ५ हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. शेवटी रक्कम तीच असून ती काही वेगळी नाही. मात्र, नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यासंदर्भातील प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

त्यांच्या या उत्तरानंतर पत्रकारांनी ही ५ हजार रुपयांची रक्कम नमो शेतकरी योजनेतूनच देण्यात आली आहे का, असा थेट प्रश्न विचारला. त्यावर भरणे यांनी, तसे म्हणता येणार नाही. अग्रीम रक्कम वेगळीच आहे. त्यासंदर्भातील फाईलही अर्थ विभागाकडे पाठवली असल्याचे सांगितले.

त्यामुळे दोन्ही योजनांच्या रकमेबाबत संभ्रम अधिकच वाढला आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेचा प्रलंबित हप्ता आणि दुष्काळी अग्रीम मदत या दोन स्वतंत्र बाबी असल्याचे त्यांच्या पुढील स्पष्टीकरणातून स्पष्ट झाले. मात्र, या दोन्ही रकमा शेतकऱ्यांच्या खात्यात नेमक्या कधी जमा होणार, याबाबत अद्याप निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

९७ लाख शेतकऱ्यांना अग्रीम मदत; वंचितांनाही मिळणार

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ५ हजार रुपयांची अग्रीम मदत दिली आहे. आतापर्यंत साधारण ९७ लाख शेतकऱ्यांपर्यंत ही रक्कम पोहोचल्याचे भरणे यांनी सांगितले.

मात्र, ई-केवायसी अपूर्ण असणे, सामायिक क्षेत्राची नोंद किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. अशा शेतकऱ्यांनाही अग्रीम मदत देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्राच्या मदतीसाठी सुधारित प्रस्ताव पाठवणार

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, केंद्राकडून मदत मिळण्यास विलंब होत असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकारने नुकतेच एनडीआरएफच्या मदतीचे निकष बदलले आहेत. त्यामुळे नव्या निकषांनुसार सुधारित प्रस्ताव पुन्हा पाठवावा लागणार आहे.

या बदलामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. यापूर्वी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये मिळणारी मदत आता ११ हजार रुपये करण्यात आली आहे. तर हेक्टरी २२ हजार रुपये मिळणारी मदत वाढवून ३० हजार रुपये करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पहिल्या प्रस्तावात राज्य सरकारकडून कोणत्याही त्रुटी राहिलेल्या नसल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने मदतीचे निकष बदलल्यामुळे सुधारित प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया करावी लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही

दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध विभागांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभाग, जलसंधारण विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शक्य ती मदत केली जात आहे. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडूनही उपाययोजना केल्या जात असल्याचे भरणे यांनी सांगितले.

भविष्यात पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी दीर्घकालीन नियोजन केले जात आहे. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीच्या योजनाही राबवल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात सरकार मदत करणार आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांचे दुःख आणि त्यांच्या अडचणी आम्हाला माहीत आहेत. हे दिवस कठीण असले तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे,’ असेही भरणे म्हणाले.

नमो योजना हप्ता की अग्रीम मदत

नमोचा हप्ता आणि अग्रीम मदत कधी मिळणार?

कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष अर्थ विभागाकडे पाठवण्यात आलेल्या दोन्ही प्रस्तावांच्या मंजुरीकडे लागले आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेचा प्रलंबित हप्ता आणि दुष्काळी अग्रीम मदतीसंदर्भातील फाईल अर्थ विभागाकडे पाठवण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले आहे.

मात्र, आधीच मिळालेली ५ हजार रुपयांची अग्रीम मदत आणि नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित हप्ता यांचा नेमका आर्थिक संबंध काय, तसेच नमो योजनेची रक्कम स्वतंत्रपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का, याबाबत सरकारकडून स्पष्टता येणे आवश्यक आहे. त्यामुळे या दोन्ही रकमा कधी मिळणार, याकडे राज्यातील शेतकरी लक्ष ठेवून आहेत.

नमो योजना हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारने याबाबत लवकरच स्पष्ट निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. नमो योजना हप्ता आणि अग्रीम मदत या दोन्ही बाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अग्रीम मदत 5000 रुपये कोणाला मिळणार?

📲

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवायच्या आहेत का?

बीड सह राज्यातील ताज्या बातम्या, थेट तुमच्या WhatsApp वर - अगदी फ्री

WhatsApp चॅनल Follow करा →

✓ 100% फ्री   •   ✓ रोज अपडेट   •   ✓ कधीही Unfollow करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *