Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

चंपावती शिक्षण संस्था दुहेरी वेतन घोटाळा बीडमध्ये समोर आला आहे. चंपावती शिक्षण संस्था दुहेरी वेतन घोटाळा प्रकरणात चार शिक्षकांनी दोन्ही शाळेतून…
बीड – चंपावती शिक्षण संस्थेत उत्तराखंड मधून तब्बल 22 विद्यार्थी खरेदी केल्याचं प्रकरण देशात गाजलेलं असतानाच भ्रष्टाचाराचं नव प्रकरण पुन्हा समोर आलं आहे. बीड शहरात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नामवंत संस्था चालकांनी केलेला आणखी एक मोठा कारनामा उघड झाला आहे.चंपावती इंग्लिश स्कूलमध्ये कार्यरत असलेल्या चार शिक्षकांनी चंपावती प्राथमिक शाळेत देखील तब्बल दहा-बारा वर्षाचा पगार उचलला असल्याचा म्हणजेच पगाराचा दुहेरी लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
बीड शहरात प्रतिष्ठित समजले जाणारे डॉ. दिलीप देशमुख, डाॅ.अनुराग पांगरीकर, डाॅ. शरद रायते,डाॅ. साहेबराव भोपळे, एॅड. कालिदास थिगळे, एड. बाळासाहेब बाहेगव्हाणकर, याबरोबरच विलास बडगे, प्रा. जगदीश काळे या माणसांनी त्यांच्या क्षेत्रात प्रचंड नाव कमावले. सन्माननीय व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते. हे जरी खरं असलं तरी आयुष्याच्या शेवटच्या काळात मात्र भ्रष्टाचाराच्या डागाचा कलंक लावून घेत इभ्रतीची लक्तर वेशीवर टांगायची याचा जणू त्यांनी चंगच बांधला आहे. या सगळ्या व्यक्ती चंपावती शिक्षण संस्थेत संचालक पदावर विराजमान आहेत. त्यांनी संस्थेचा अख्खा कारभारच सडवून ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. याच शिक्षण संस्थेत भाशिप्र मध्ये पूर्णवेळ प्राध्यापक असलेल “चंद्रकांत मुळे” हे व्यक्तिमत्व देखील संचालक मंडळावर आहे. ही व्यक्ती दुहेरी लाभाच्या पदावर कशी बसली हा मोठा प्रश्न आहे.

चंपावती शिक्षण संस्थेने उत्तराखंड मधील विद्यार्थी खरेदी केल्याचा प्रकरण राज्यातच नव्हे तर देशात गाजलं या प्रकरणात मुख्याध्यापक सारंग जोशीवर गुन्हा देखील दाखल झाला. मात्र या प्रकरणात शिक्षण विभागाने संस्थाचालका विरोधात कुठलीही कारवाई केली नाही त्यांना पाठीशी घालण्याचं काम अधिकाऱ्यांनी केलं हे अख्ख्या बीड जिल्ह्याने अनुभवलं. यावेळी प्रतिष्ठित समजली जाणारी ही मंडळी देखील भ्रष्टाचारात लिप्त आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यालाच छेद देण्याचं काम करणार नव प्रकरण समोर आला आहे.
बोगस शिक्षक भरती करून सरकारच्या तिजोरीवर करोडोचा कसा दरोडा टाकला गेला याचे पुरावे “सह्याद्री माझा” च्या हाती आले आहेत. चंपावती इंग्लिश स्कूलमध्ये कार्यरत असलेल्या चार शिक्षकांनी चंपावती प्राथमिक शाळेत देखील अध्यापनाच काम करून दोन्हीकडचा पगार उचलला.
या शिक्षकांमध्ये अभय बाळासाहेब देशमुख हे शिक्षक महाशय चंपावती इंग्लिश स्कूलमध्ये 16 सप्टेंबर 2013 मध्ये 3 हजार रुपये मानधनावर रुजू झाले.मात्र 15 जून 2012 मध्ये ते चंपावती प्राथमिक शाळेमध्ये रुजू झाले ते ही शिक्षक भरती बंद झाल्यानंतर हे विशेष! डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी 1लाख 49 हजार 74 पगार उचलला. याबरोबरच शितल तात्यासाहेब बडगे यांनी 27 जून 2014 पासून ते 2024 पर्यंत 9 हजार 500 रुपये मानधनावर चंपावती इंग्लिश स्कूलमध्ये प्राथमिक विभागात सहशिक्षिका म्हणून काम केले. याच शितल बडगे चंपावती शिक्षण संस्थेच्या कागदोपत्री 15 जून 2012 रोजी नियुक्त झाल्याचं दाखवण्यात आला आहे. डिसेंबर 2025 पर्यंत यांनी देखील 1 लाख 49 हजार 74 रुपये सरकारी पगारातून उचलल्याचं दिसत आहे.

अश्विनी प्रभाकर नाईक या शिक्षिका 15 जून 2010 मध्ये 13 हजार रुपये मानधनावर चंपावती इंग्लिश स्कूलमध्ये रुजू झाल्या. 2024 पर्यंत त्या या ठिकाणी कार्यरत होत्या. मात्र यांच्याबाबतीत देखील चंपावती शिक्षण संस्थेत 15 जून 2012 रोजी यांची नियुक्ती दाखवण्यात आली डिसेंबर 2025 मध्ये त्यांनी एक लाख 49 हजार 74 रुपये सरकारी वेतन उचलले. सासर आणि माहेरच्या नावाचा घोळ घालून भ्रष्टाचार लपवण्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे यावर शिक्षण विभागाने तसेच संस्थेने प्रकाश टाकण्याची गरज आहे. वृषाली महारुद्र कुलकर्णी या 14 सप्टेंबर 2009 रोजी चंपावती इंग्लिश स्कूलमध्ये रुजू झाल्याचं व 2024 पर्यंत कार्यरत असल्याच समोर आलेल्या कागद पत्रावरून उघड होत आहे. त्यांना 20 हजार पाचशे रुपये मानधन या ठिकाणी दिलं जात होतं. मात्र चंपावती शिक्षण संस्थेत नावाचा बदल केला गेला.

या ठिकाणी वृषाली हेमंत देशमुख हे नाव नोंदवण्यात आलं. चंपावती शिक्षण संस्थेत यांची नियुक्ती देखील 15 जून 2012 मध्ये दाखवण्यात आली यांनी देखील दोन्हीकडे कार्यरत असताना डिसेंबर 2025 पर्यंत एक लाख 49 हजार 74 रुपयांच्या सरकारी पगारावर काम केलं या नावाच्या बाबतीमध्ये साशंकता असली तरी देखील ही नियुक्ती शासनाने शिक्षक भरती बंद केल्यानंतर झालेली आहे.
हे देखील वाचा: चंपावती शाळेतील विद्यार्थी घोटाळा! मुख्याध्यापकांवर गुन्हा; संचालक मंडळावर कारवाई कधी?
चंपावती शाळेत आणखी बोगस शिक्षकांचा भरणा झालेला आहे. मात्र या चार शिक्षकांनी दुहेरी वेतनाचा लाभ घेऊन शासनासह सगळ्यांच्याच धुळफेक केली आहे. हा उचललेला पगार शिक्षकांनी घेतला की शिक्षकांचे नाव पुढे करून संस्थाचालकांनी हडप केला. याचा तपास होणं गरजेचं आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात शिक्षण विभागाने 10 – 11 वर्षाचा थकित पगार (एरियर्स ) काढून वेतन घोटाळ्यात सहभाग नोंदवला आहे. थकीत पगार एकदम दिला असेल तर त्यावर इन्कम टॅक्स भरला होता का? जर हा पगार शिक्षकांनी संस्थाचालकांना दिला असेल तर ज्या शिक्षण संस्था चालकाच्या त्याच्या नातेवाईकाच्या खात्यावर ट्रांजेक्शन झाले त्यांनी इन्कम टॅक्स भरलं होता का? हा मोठा घोटाळा सखोल तपास केला तर उघडकीस येणार आहे.
दरम्यान भ्रष्टाचाराची पाळे “मुळे”इतकी खोलवर रुजली आहेत की संस्थेतील पूर्णवेळ प्राध्यापक व संस्थेचे संचालक महोदय ” पैसे फेकले की माडीवरची खाली येते”असं म्हणतात त्यांच्या म्हणण्याची प्रचिती पुन्हा शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी झालेल्या या भ्रष्टाचारावर पांघरून घालून देणार का? शिक्षण विभागातील अधिकारी धुतल्या तांदळासारखे असले तर कारवाई करणार का? माध्यमांनी छापलेले शब्द जिव्हारी लागत असतील तर शिक्षण विभागातील अधिकारी स्वतःच्या खुर्चीची व इज्जतीची बुज राखणार का? या शिक्षकांनी उचललेले वेतन वसूल केले जाणार का? संस्थाचालकावर संबंधित शिक्षकावर शिक्षण विभागातील अधिकारी गुन्हे दाखल करणार का? यासारखे अनेक प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत.
चंपावती शिक्षण संस्था दुहेरी वेतन घोटाळा प्रकरणाची चौकशी शिक्षण विभागाने करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
शिक्षण विभागाची अधिकृत माहिती वाचण्यासाठी: येथे क्लिक करा
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवायच्या आहेत का?
बीड सह राज्यातील ताज्या बातम्या, थेट तुमच्या WhatsApp वर - अगदी फ्री
WhatsApp चॅनल Follow करा →✓ 100% फ्री • ✓ रोज अपडेट • ✓ कधीही Unfollow करू शकता