Home क्राईम बीडमध्ये ऊसतोड मजुराचे अपहरण; 4 दिवस अमानुष छळ, तोंडात लघुशंका केल्याचा आरोप

बीडमध्ये ऊसतोड मजुराचे अपहरण; 4 दिवस अमानुष छळ, तोंडात लघुशंका केल्याचा आरोप

0
56

बीड — जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर येथील एका ऊसतोड मजुराचे अपहरण करून चार दिवस बेकायदेशीरपणे डांबून ठेवत अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उचल (आगाऊ रक्कम) परत करण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. पीडिताच्या तोंडात लघुशंका करून मानहानी केल्याचाही गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
पीडित देवीदास कापसे हे उमापूर (ता. गेवराई) येथील रहिवासी असून ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, उचल रकमेसंदर्भातील वादातून मुकादम गणेश थोरात व त्याच्या साथीदारांनी त्यांचे जबरदस्तीने अपहरण केले.
अपहरणानंतर देवीदास कापसे यांना अज्ञात ठिकाणी नेऊन सलग चार दिवस डांबून ठेवण्यात आले. या काळात त्यांना अन्न-पाणी न देता लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच त्यांचा मानसिक छळ करत तोंडात लघुशंका केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
देवीदास बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, स्थानिक सरपंचांनी पुढाकार घेत मध्यस्थी केल्यानंतर चार दिवसांनी त्यांची सुटका झाली. गंभीर अवस्थेतील देवीदास यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणात गेवराई पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अपहरणानंतर पीडिताच्या वृद्ध आईने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपांमुळे पोलीस प्रशासनावर टीका होत आहे.
दरम्यान, आरोपी मुकादम गणेश थोरात व त्याच्या साथीदारांवर अपहरण, बेकायदेशीर कैद, मारहाण तसेच लागू असलेल्या इतर गंभीर कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here