टीईटी (TET) पेपरफुटी प्रकरणात दोषींवर थेट मकोका लावणार; भुसेंची विधानसभेत मोठी घोषणा

मुंबई — महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणामुळे पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर थेट संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिली.
२८ जून २०२६ रोजी होणाऱ्या TET परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच परीक्षेच्या एक दिवस आधीच फुटल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणातील दोषींवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे.

पोलिसांच्या कारवाईत तीन आरोपी ताब्यात

पोलिसांना २७ जून रोजी TET परीक्षेची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सापळा रचला आणि तीन संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींकडे २८ जूनच्या परीक्षेची मूळ प्रश्नपत्रिका आढळून आली. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर ती प्रश्नपत्रिका खरी असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी मुख्य आरोपी राजू श्री प्रयाग शाव याच्यासह अन्य दोन आरोपींवर भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियम २०२४ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

SIT कडून देशभर तपास

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस महासंचालकांच्या आदेशाने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची पथके बिहार, हरियाणा आणि दिल्ली येथे रवाना करण्यात आली आहेत.
पेपरफुटीचे जाळे किती मोठे आहे, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहे.

उमेदवारांना दिलासा; फेरपरीक्षा शुल्काशिवाय

पेपरफुटीमुळे प्रभावित झालेल्या उमेदवारांसाठी फेरपरीक्षा घेतली जाणार असून त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचे दादा भुसे यांनी स्पष्ट केले.
तसेच भविष्यात TETसह इतर स्पर्धा परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी पुढील वर्षापासून परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.

विरोधकांचा सरकारवर निशाणा

TET पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत विरोधकांनी निषेध नोंदवला.
दरम्यान, भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्नपत्रिका महाराष्ट्राबाहेर छापण्याची पद्धत बंद करून त्या राज्यातच छापण्यात याव्यात, अशी मागणी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles