बीड — जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. अंबाजोगाई येथील संतोष बाबासाहेब मुंडे (रा. वरवटी, ता. अंबाजोगाई) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत तब्बल २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक आरोपींच्या मागावर होते.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दाखल गु.र. नं. 132/2026 कलम 303(2) बी.एन.एस. अन्वये दुचाकी चोरी प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपींची माहिती मिळाली होती. मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
दरम्यान, १५ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, संतोष मुंडे याने बीड तसेच शेजारील जिल्ह्यांमधून अनेक दुचाकी चोरी करून त्या घराच्या पाठीमागे लपवून ठेवल्या आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरवटी येथे जाऊन संतोष मुंडेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीच्या दुचाकी घराच्या पाठीमागे लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्या ठिकाणाहून सहा मोटारसायकली जप्त केल्या.
चोरीचे उघड झालेले गुन्हे
अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे
गु.र. नं. 132/2026 कलम 303(2) बी.एन.एस.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे
गु.र. नं. 324/2025 कलम 303(2) बी.एन.एस.
गंगाखेड पोलीस ठाणे, जि. परभणी
गु.र. नं. 29/2026 कलम 303(2) बी.एन.एस.
जप्त केलेल्या दुचाकींमध्ये अंबाजोगाई, पुणे, लातूर आणि परभणी येथून चोरी केलेल्या वाहनांचा समावेश आहे. उर्वरित तीन दुचाकींच्या चोरीबाबत पोलीस अभिलेख तपासण्याचे काम सुरू आहे.
आरोपी संतोष मुंडे व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णू सानप, गोविंद भताने, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, विकी सुरवसे आणि चालक अतुल हराळे यांनी केली.




