बोगस शाळांच्या जीवावर संस्कारी राष्ट्र निर्माण कसं होणार?
बीड — सध्या संस्थाचालकांच्या भ्रष्ट “चंद्र“कला आणि शिक्षण विभागात पसरलेली त्यांची पाळे “मुळे” मिंधेपणातून मिळणारी साथ यातून होणारी लूट राज्यात चर्चेचा विषय ठरलेली असतानाच जिल्ह्यात अनेक बोगस शाळा सध्या सुरू असून शिक्षणाधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हा प्रकार सुरू आहे असं नव्हे तर शिक्षणाधिकारी संस्थाचालकांचे पानके झाल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि पालकांची लूट करण्याचा खेळ सध्या सर्रास सुरू आहे.
बीड जिल्ह्यात बोगस शाळांना मोठे पीक आलेले असतानाही त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही. परिणामी मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होऊन पालकांची मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचं पाहायला मिळतं. भ्रष्टाचाराच्या “चंद्र” कलांनी बोगस शाळांच्या माध्यमातून कोवळ्या बालकांचं भविष्य झाकोळून टाकण्याचं काम केलं जात आहे. याला शिक्षणाधिकाऱ्यांसारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती देखील खतपाणी घालत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे संस्कार देशभक्तीच्या देश प्रथम म्हणणारांच्या संस्थांमध्ये देखील असाच कारभार पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्था म्हणून ओळख असलेली भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई मधून असे धंदे केले जात असतील तर देशाचं भवितव्य काय असेल हे सांगणं अवघड होऊन बसला आहे. भाशिप्र संस्था संचलित खोलेश्वर जीनियस इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अंबाजोगाई 2018 पासून बोगस पद्धतीने अजूनही सुरूच आहे. या शाळेला महाराष्ट्र शासनाची परवानगी नाही. सीबीएसई बोर्ड एफिलेशन प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही. शाळेला परवानगी मिळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. तीच स्थिती माजलगावच्या सिद्धेश्वर सीबीएसई प्रायमरी स्कूलची आहे. या शाळेला देखील कुठलीच मान्यता मिळालेली नाही. बीडचे शिक्षणाधिकारीच शिक्षण क्षेत्रासारखं पवित्र काम करायच सोडून संस्थाचालकांचे पाणी भरण्यात धन्यता मानत नाहीत तर इतर जिल्ह्यात देखील तीच परिस्थिती आहे.
भाशिप्र संस्थेने लातूर मधील उदगीर येथे देखील रामकृष्ण इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल अशीच बेकायदेशीर सुरू आहे. याबरोबरच लातूर मधील केशवराज रेनिसन्स इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल 2018 पासून बोगस पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत पालकांच्या खिशावर दरोडे टाकण्याचं काम जोरात सुरूच आहे. 22 मे 2026 रोजी या शाळेला महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाली मात्र अजूनही सीबीएसई ची परवानगी मिळालेली नाही. गेले नऊ वर्ष या शाळेने बोगस पद्धतीने कारभार करत पालकांची लूट केली.
या भाशिप्र च्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा बोगस पद्धतीने चालवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत पालकांच्या खिशावर दरोडे घालताना कसलं राष्ट्र निर्माण करणार आहेत? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जाऊ लागला आहे

