Home क्राईम पुरुषोत्तमपुरी होडी दुर्घटनेतील महिलांच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

पुरुषोत्तमपुरी होडी दुर्घटनेतील महिलांच्या मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0
10

माजलगाव —  तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीत भाविकांची वाहतूक करणारी होडी पलटून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून निष्काळजीपणे होडी चालवल्याचा ठपका ठेवत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे यात्रा सुरू असून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. भाविकांना नदीपात्रातून दर्शनासाठी ने-आण करण्यासाठी होडी वाहतूक सुरू होती. मात्र संबंधित होडीत निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

१० जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली दुर्घटना

१० जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात भाविकांनी भरलेली होडी अचानक पलटली. होडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने अनेक भाविक पाण्यात पडले. या दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा बुडून मृत्यू झाला, तर काही भाविक जखमी झाले.

मृतांमध्ये प्रमिला शेषराव राठोड (वय ५५, रा. बीबी, ता. लोणार, जि. बुलढाणा) आणि कांता ज्ञानदेव आंधळे (वय ५३, रा. कुंभेफळ, ता. सिंदखेड, जि. बुलढाणा) यांचा समावेश आहे.

सुरक्षा सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या नोटिसा आणि सुरक्षाविषयक सूचनांचे उल्लंघन करून धोकादायक पद्धतीने प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी पुरुषोत्तमपुरी नामदेव राजाराम कोकाटे यांच्या फिर्यादीवरून उद्धव बळीराम गायकवाड आणि दुर्गा उद्धव गायकवाड (रा. चागतपुरी, ता. परतूर, जि. जालना) यांच्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here