बीड — भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचीच असलेली लातूरची रेनीसन्स सीबीएसई इंग्लिश स्कूल चा अध्यक्ष असलेला बालरोग तज्ञ डाॅ. मनोज शिरुरे याला नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर फुटलेली नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दरम्यान शिक्षण संस्थेचा पदाधिकारी जाळ्यात अडकल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली असून संस्थेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली जात आहे.

नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी या मास्टर माईंड ला पकडल्यानंतर आरसीसी क्लासेस चा शिवराज मोटेगावकर हा देखील एका व्हिडिओ जाहिरात मुळे सीबीआयच्या जाळ्यात अडकला. या प्रकरणाचे धागेदोरे लातूर बीड सह राज्यामध्ये कोठे कोठे आहे याचा कसून तपास सीबीआय करत आहे. या तपासात फूटलेला पेपर खरेदी केल्याप्रकरणी पालक देखील तपास यंत्रणांच्या रडार वर आले आहेत.
सीबीआय ने बुधवारी रात्री
लातूरच्या औसा रोडजवळील सिद्धिविनायक रुग्णालयात छापा मारला. यावेळी सिद्धिविनायक रुग्णालयातील बालरोगतज्ञ डॉ. मनोज शिरुरे याची कसून तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर डॉ. शिरुरेला नोटीस देऊन सोडण्यात आले. मात्र सीबीआय ने पुन्हा शिरूरेला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी दिल्ली येथे रवाना करण्यात आले.डाॅ. शिरुरे याने मोटेगावकर कडून आपल्या मुलासाठी प्रश्नपत्रिका विकत घेतली होती.
दरम्यान डॉ. मनोज शिरूरे हा भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचाच एक भाग असलेल्या रेनीसन्स सीबीएसई इंग्लिश स्कूलचा अध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक वर्षापासून शाळेने शासनाची कोणतीही परवानगी नसताना आणि दिल्ली बोर्ड सीबीएसई चे अफिलेशन प्रमाणपत्र नसताना शाळा बेकायदेशीर सूरूच ठेवली. संगनमत करून करोडो रुपयांचा चुना विद्यार्थी आणि पालकांना लावला आहे. मनसेने या विरोधात खंबीर भूमिका घेतल्यानंतर माध्यमिक शाळा बंद करण्यात आली. अशी माहिती मिळत आहे. याच संस्थेच्या अंबाजोगाई माजलगाव आणि उदगीर येथे इंग्रजी माध्यमांच्या बोगस शाळा असल्याचं देखील सांगितलं जात आहे. शाळेसाठी लावण्यात आलेल्या अटी शर्ती पाळल्या जात नसून मैदान ग्रंथालय प्रयोगशाळा यासारख्या मूलभूत सुविधा देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात नसल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ ज्या उद्देशाने चालू करण्यात आले होते त्या संस्थेच्या उद्देशाला हरताळ फासण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे भारतीय शिक्षण प्रसारक मंडळापर्यंत येऊन पोहोचल्यामुळे या संस्थेचे देखील सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे.





