कॉकरोच जनता पार्टीची सोशल मीडियावर ‘सुनामी’; एक्स अकाऊंट ब्लॉक, तरीही ‘कॉकरोज इज बॅक’ची तुफान एन्ट्री

अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळत असून इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सचा आकडा १.४ कोटींवर पोहोचला आहे. एक्स अकाऊंट भारतात ब्लॉक झाल्यानंतर ‘कॉकरोज इज बॅक’ नावाने नव्या अकाऊंटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नवी दिल्ली — अभिजीत दीपके यांनी सुरू केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) अवघ्या काही दिवसांत सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, इन्स्टाग्रामवर सीजेपीच्या फॉलोअर्सचा आकडा तब्बल १ कोटी ४० लाखांच्या पुढे गेला आहे. हा आकडा भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत इन्स्टाग्राम फॉलोअर्सपेक्षाही जास्त आहे.भाजपच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या सुमारे ८७ लाख इतकी असून एवढी संख्या असणारा भाजप हा देशात एक नंबरचा पक्ष होता.सीजेपीला युवकांमधून मोठा प्रतिसाद मिळत असतानाच आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. काही तासांपूर्वीच सीजेपीचे एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंट भारतात ब्लॉक करण्यात आल्याची माहिती समोर आली. मात्र, अभिजीत दीपके यांनी तत्काळ ‘Cockroaches Is Back’ नावाने नवीन अकाऊंट सुरू करत पुन्हा सोशल मीडियावर जोरदार पुनरागमन केले आहे. या नव्या अकाऊंटवर अवघ्या काही तासांतच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि फॉलोअर्सचा पूर आला आहे.


विशेष म्हणजे, नवीन अकाऊंट सुरू करताना दीपके यांनी थेट भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. “आम्हाला ब्लॉक का करण्यात आले?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाला खात असलेला कॉकरोच दाखविण्यात आला आहे. त्यासोबत भाजप आणि सीजेपीच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची तुलना करणारा ग्राफिकही पोस्ट करण्यात आला आहे.
या पोस्टमुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला असून, सीजेपीचे अकाऊंट ब्लॉक होण्यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप समर्थकांकडून केला जात आहे. “युवकांच्या शक्तीला कमी लेखू नका,” असा संदेशही दीपके यांनी आपल्या पोस्टमध्ये दिला आहे.
दरम्यान, अभिजीत दीपके यांनी स्वतःचे खासगी अकाऊंट आणि सीजेपीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचाही गंभीर दावा केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सातत्याने हल्ले होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सीजेपी समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, #CockroachesIsBack हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे.
अल्पावधीतच सोशल मीडियावर निर्माण झालेली ही लोकप्रियता आता राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरत आहे. युवकांमधील वाढता डिजिटल प्रभाव आणि सोशल मीडिया राजकारणाची बदलती दिशा यामुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’ हा विषय सध्या इंटरनेटवर प्रचंड चर्चेत आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles