NEET Leak Case : लातूरच्या RCC कोचिंगचा संचालक शिवराज मोटेगावकर CBI कोठडीत

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या RCC कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना दिल्ली न्यायालयाने ९ दिवसांची CBI कोठडी सुनावली. घरातून रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका जप्त झाल्याचा दावा.

NEET Leak Case : ‘त्या’ व्हिडीओमुळे वाढला RCC संचालकांवरील संशय

दिल्ली —  देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील नामांकित ‘RCC’ कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्याविरोधातील तपास अधिक तीव्र झाला आहे. दिल्लीतील राऊज अ‍ॅव्हेन्यू विशेष न्यायालयाने मोटेगावकर यांना ९ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये संशयास्पद चॅट, संपर्क क्रमांक तसेच घरातून रसायनशास्त्र विषयाची नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका जप्त झाल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला.
सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, लातूरमधून अटक करण्यात आलेल्या प्रा. कुलकर्णी यांच्या चौकशीतून मोटेगावकर यांचे नाव समोर आले. दोघांमधील संपर्क आणि कथित पेपरफुटी कनेक्शन उघड झाल्यानंतर सीबीआयने लातूरमधील त्यांच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका मिळाल्याने तपास यंत्रणांचा संशय अधिक बळावला.

न्यायालयात सीबीआयचा दावा

दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडनंतर मोटेगावकर यांना दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयने १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ९ दिवसांची सीबीआय कोठडी मंजूर केली.
यावेळी न्यायालयाने सीबीआयला प्रश्न विचारला की, “मोटेगावकर यांच्याकडे परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका होती, हे तुम्हाला कसे समजले?” त्यावर सीबीआयने प्रा. कुलकर्णी यांच्या चौकशीचा हवाला देत तपासातील पुरावे न्यायालयासमोर मांडले.

व्हिडीओमुळे वाढला संशय

नीट परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकर यांनी एका विद्यार्थिनीबरोबर व्हिडीओ रेकॉर्ड केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये परीक्षेत आलेले प्रश्न आपल्या क्लासमध्ये आधीच शिकवले होते, असा दावा करण्यात आला होता. याच व्हिडीओवरून सीबीआयला प्रथम संशय आल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्यानंतर आरोपींच्या चौकशीत मोटेगावकर यांचे नाव समोर आल्यानंतर सीबीआयने लातूरमध्ये धाड टाकून त्यांना अटक केली. त्यांच्या मोबाईलमधील काही चॅट आणि संपर्क क्रमांक तपासासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.

साध्या शिकवणीतून उभे राहिले मोठे कोचिंग साम्राज्य

नांदेडमध्ये रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षणात अव्वल क्रमांक मिळविल्यानंतर शिवराज मोटेगावकर यांनी सुरुवातीला नोकरीसाठी प्रयत्न केले. मात्र नोकरी न मिळाल्याने त्यांनी घरातून शिकवणी सुरू केली. पुढे विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली आणि त्यातून RCC कोचिंग इन्स्टिट्यूट उभी राहिली.
रसायनशास्त्रापासून सुरुवात झालेल्या या क्लासमध्ये नंतर बायोलॉजी आणि फिजिक्स विषयांचाही समावेश करण्यात आला. ‘पैकीच्या पैकी गुण’ अशा जाहिरातींमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये RCC ची मोठी लोकप्रियता निर्माण झाली होती. प्रवेश, वसतिगृहे, वह्या-पुस्तके आणि खाणावळीपर्यंत मोठे व्यावसायिक जाळे उभे राहिल्याची चर्चा लातूरमध्ये आहे.
पत्रकारांच्या प्रश्नावर संताप

न्यायालयातून बाहेर पडताना पत्रकारांनी

“तुम्हाला पश्चाताप होतोय का?” असा प्रश्न विचारला असता मोटेगावकर यांनी संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी चेहरा लपवत पोलिसांच्या बंदोबस्तात न्यायालय परिसरातून बाहेर पडले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles