पोलीस आपल्या बांधावर मोहिमेचा फुसका बार; घोसापुरीत रक्तरंजित थरार, जखमींनी गाठले एस पी ऑफीस चे दार

बीड — पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी “पोलीस आपल्या बांधावर” तसेच तात्काळ गुन्हे दाखल होण्यासाठी “संवाद क्यू आर कोड” मोहिमांचा वाजवलेला ढोल आज फुटला. नांगरट करताना बांधावर पडलेल्या मातीच्या कारणावरून बीड पासून जवळच असलेल्या घोसापुरीत रक्त रंजीत थरार घडला. काठ्या, कुऱ्हाडी, तलवारी सारख्या शस्त्रांचा वापर केला गेला. भयभीत झालेले रक्तबंबाळ जखमी उपचार घ्यायचे सोडून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यावर गुन्हे दाखल व्हावेत तसेच जीवाची भीती यामुळे बसून अथवा झोपून राहिल्याचं चित्र पाहायला मिळाल. या मारहाणीच्या घटनेत जवळपास १५-२० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता.


बीड तालुक्यातील घोसापुरी येथे शनिवारी रात्री किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारीची घटना घडली होती. यामध्ये काही जखमी झालेल्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री झालेल्या याच वादाचा वचपा काढण्यासाठी रविवारी

(दि.१७) सकाळी ७.३० च्या सुमारास दुसऱ्या गटाने जोरदार हल्ला चढवला.दोन्ही गट हातात तलवारी आणि कुन्हाडी घेऊन समोरा समोर भिडल्याने घोसापुरी गावाला रणमैदानाचे स्वरूप आले होते. हल्लेखोरांनी महिला आणि लहान मुलांवरही दया दाखवली नाही. समोर दिसेल त्याला दोन्ही गटातील एकमेकांनी लाठ्या काठ्यांनी आणि तलवार, कुन्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही गटातील १५ ते २० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये आप्पासाहेब माळी (वय २२), नायबराव दौला माळी (वय ७०), चंद्रकला माळी (वय ५०), बन्सी नायबा माळी (वय ४०), शहाजी नायबा माळी (वय ४८), अजय माळी (वय ३३), कमलबाई गायकवाड (वय ५०), राजेंद्र उत्तम माळी (वय ३९), छायाबाई अजय माळी (वय २०), सारिका शहाजी माळी (वय ३५), विजय बन्सी माळी (वय १७), भगवान उत्तम माळी (वय ५०), सुरज भगवान माळी (वय २३), द्वारका राजेंद्र माळी (वय ३०) व अन्य काही जण जखमी आहेत.या घटनेने घोसापुरी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

एसपींच्या मोहिमेचा ढोल फुटला

पोलीस प्रशासन प्रचंड ऍक्टिव्ह असल्याचं चित्र निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी आहे त्या जागेवरून गुन्हे दाखल व्हावेत यासाठी “संवाद क्यूआर कोड” जारी केला. पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला जात नाही तर क्यू आर कोड ची अवस्था काय असणार? शेतकऱ्यांमध्ये बांधावरून वाद-विवाद होऊ नयेत यासाठी “पोलीस आपल्या बांधावर”ही मोहीम राबवली गेली. यातही किती जणांना न्याय मिळाला याची आकडेवारी उघडकीस आली नाही.

दरम्यान अशा मोहिमांचा वाजवलेला ढोल आज फुटलेला पाहायला मिळाला.घोसापुरी येथे रविवारी सकाळी दोन गटात झालेल्या रक्तरंजित थरारानंतर काठ्या, तलवारी अन् कु-हाडीचे घाव अंगावर झालेले कपडे रक्ताने माखलेले गंभीर परिस्थितीतील जखमींनी उपचार घ्यायचे सोडून थेट पोलीस अधिक्षक यांचे कार्यालय गाठले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्यावर काहीजण झोपलेले दिसले तर उन्हाच्या काहिलीत देखील बसून राहिलेले दिसले. रक्त वाहत असताना देखील जीवाच्या भीतीने भयभीत झालेल्या जखमींना उपचारापेक्षा अधीक्षक कार्यालयात बसून राहणे सुरक्षेचे वाटले. एवढं होऊनही यंत्रणेला घाम फुटला नाही. दरम्यान या प्रकरणात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालाच नाही. बीड मध्ये पाहायला मिळालेल्या या चित्राने अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles