मुंबई — राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महसूल विभागातील तलाठी पदांची भरती आता पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून ही भरती प्रक्रिया आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राबवली जाणार आहे.
गैरप्रकारांना आळा बसणार
यापूर्वी तलाठी परीक्षा खासगी कंपन्यांकडून घेतली जात होती. त्यामुळे परीक्षेत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. अनेक वर्षांपासून ही परीक्षा एमपीएससीमार्फत घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून आणि विविध संघटनांकडून केली जात होती. अखेर शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे.
१७०० पदांची मोठी भरती
राज्यातील सुमारे १७०० तलाठी पदांची भरती एमपीएससीमार्फत होणार असून यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय रिक्त पदांचा तपशील मागवण्यात आला आहे. प्रत्येक विभागाने ८ मे २०२६ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरक्षण व आकृतीबंध तपासणी
ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार आहेत बिंदू नामावली (Reservation Roster) मागासवर्गीय कक्षाकडून तपासली जाणार आहेत पेसा (PESA) व बिगर पेसा क्षेत्रांसाठी स्वतंत्र मागणीपत्र तयार करण्यात येणार आहे
लवकरच जाहिरात
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अहवाल सादर झाल्यानंतर महसूल विभागाकडून अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारीला वेग देणे आवश्यक आहे.




