बीड — जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाला जागोजागी मोठ्या भेगा पडलेल्या असुन या भेगांमध्ये दुचाकी वाहने अडकुन झालेल्या अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असुन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व आले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून दर्जेदार दुरूस्तीसाठी वांरवार निवेदने,आंदोलनाद्वारे पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएससीआरडी आणि जिल्हा प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसतानाच बीड जिल्हा प्रशासन मात्र जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या नावाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्युंच्या प्रमाणात ३३ टक्क्यांची लक्षणीय घट झाली असुन या प्रभावी कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात बीड जिल्हा रस्ते सुरक्षेच्या बाबतीत दुसरा क्रमांक पटकावला असल्याची माहिती देत स्वत:ची टीर बडवुन घेताना दिसत असल्याची संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबाणेशकर यांनी दिली आहे.

बीड जिल्ह्यातुन जाणारे खामगाव ते पंढरपूर, अहमदपूर ते अहिल्यानगर, पैठण ते पंढरपुर आदी राष्ट्रीय महामार्गांवर मोठमोठ्या भेगा पडलेल्या असुन भेगांमध्ये दुचाकीचे चाक अडकुन मागील ४ वर्षात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी बाभळी आल्याने वाहनधारकांना अडथळा येत आहे तर काही ठिकाणी दुभाजकाच्या आजुबाजुला मोठ्या प्रमाणात माती साचल्याने वाहने घसरून पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते यांनी लेखी तक्रारी केल्यानंतर दर्जेदार सिमेंट ब्लॉक कट करून दुरुस्ती करण्याऐवजी डांबरीकरण करून रस्त्याच्य भेगा थातुरमातुर बुजवण्यात येत असुन जिल्हा प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे बोलले जाते.

