पैठण – जायकवाडी धरण परिसरातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उन्हाळी हंगामासाठी चार पाणी पाळ्या मंजूर करण्यात आल्या आहेत.
या बैठकीत विजयसिंह पंडित यांनी पैठण उजव्या कालव्यासाठी महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या होत्या. त्यानुसार मार्च ते जून या कालावधीत दर 20 दिवसांनी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे सिंचनासोबतच पिण्याच्या पाण्याचीही समस्या कमी होणार असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बैठकीत कालव्याच्या अस्तरीकरणामुळे पाणी बचत होत असल्याने अतिरिक्त पाणी पाळ्यांची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच कालव्याच्या दुरुस्ती, बॅरेज पुनर्भरण, वितरण प्रणाली सुधारणा यांसारख्या अनेक मागण्या मांडण्यात आल्या.
याशिवाय सिंदफणा नदीवरील बॅरेज, कालव्यावरील पूल, तसेच विविध ठिकाणी एस्केप (नियामक छेद) बांधण्यासंदर्भातही प्रस्ताव ठेवण्यात आले. मंत्री विखे पाटील यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली.

