सांगली — चार-पाच वर्षानंतर प्रथमच सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त बाजार भाव मिळत आहेत.गेल्या १५ दिवसांपासून सोयाबीन दर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शनिवारी प्रतिक्विंटल ५५०० ते ५९०० रुपये दर मिळाला.
राज्यात खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले होते. तसेच सोयाबीनला अपेक्षित दरही मिळत नव्हता.यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीकडे दुर्लक्ष केले होते. तसेच उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणावर घट आली आहे सध्याच्या काळात सोयाबीनचे उत्पादन कमी असूनही डिसेंबर २०२५ मध्ये सोयाबीनला अपेक्षित बाजारभाव मिळत नव्हता.
डिसेंबर महिन्यापासून जिल्ह्यात ‘नाफेड’च्या केंद्रांवर सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरू झाली. दरम्यान, मागील १५ दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात तेजी आहे.
मागील चार दिवसांत तर हमीभावापेक्षाही (५३२८ रुपये) अधिक दर सोयाबीनला बाजार समित्यांमध्ये मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे धाव घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.मंगळवारी सांगली मार्केट यार्डात सोयाबीनला प्रतिक्विंटल ५५०० ते पाच हजार ९०० रुपये दर मिळाला आहे. सोयाबीन दर येणाऱ्या काळामध्ये 6 हजार रुपयांपेक्षा अधिक चा टप्पा पार करेल असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे

