बीड –पतसंस्थे विरुद्धच्या तक्रारी मिटवण्यासाठी 50 हजारांची लाच मागणारा सहकार अधिकारी संतोष भंडारी 25 हजारांचा पहिला हप्ता घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जाळ्यात पकडले आहे.
अंबाजोगाई येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी संतोष भंडारी यास 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी रंगेहात पकडून मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई येथील एका पतसंस्थेविरुद्ध विरोधात निबंधक कार्यालयात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या चौकशीत मदत करण्यासाठी आणि अहवाल अनुकूल देण्यासाठी संतोष भंडारी याने संस्थेच्या सचिवाकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 25हजार रूपये देण्याचे निश्चित झाले होते.या प्रकरणी पतसंस्थेच्या सचिवांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार नोंदवली होती.या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने आज दुपारी अंबाजोगाई येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात सापळा रचला. लाचेच्या एकूण 50 हजार रुपयांपैकी 25 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. ही रक्कम स्वीकारताना पथकाने संतोष भंडारी यांना पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संतोष भंडारी याच्यावर अंबाजोगाई येथील शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

