Sunday, February 1, 2026

बीड: शेळकेंच्या ठाम भूमिकेमुळे सुलतानपूर माळेवाडी सार्वजनिक रस्ता खूला

बीड — तालुक्यातील सुलतानपूर ते माळेवाडी हा सार्वजनिक रस्ता चार वर्षांपासून अतिक्रमण आणि वादात अडकून पडला होता . या रस्त्यामुळे गावातील जनतेचे रोजचे जगणे अवघड झाले होते . शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी लांबचा फेरा मारावा लागत होता . आजारी माणसांना दवाखान्याचा रस्ता बंद झाला होता . विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचताना रोज अडचणी येत होत्या . गावकरी वैतागले होते , पण प्रश्न काही सुटत नव्हता .
या रस्त्याबाबत मामलतदार न्यायालय अधिनियम 1906 च्या कलम 5 अन्वये रस्ता खुला करण्याचे आदेश याआधीच झाले होते . मात्र काही लोकांनी अडथळे घातल्याने प्रत्यक्षात रस्ता खुलाच होत नव्हता . अखेर बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत स्वतः जागेवर जाऊन पाहणी केली आणि अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट आदेश दिले .
छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सार्वजनिक रस्ते आणि शासकीय मालमत्ता याबाबत कोणतीही तडजोड नको , असे स्पष्ट आदेश दिले आहेत . बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करताना कुणालाही पाठीशी घालू नये , अशी ठाम भूमिका घेतली आहे . अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्याकडून नियमित आढावा घेण्यात येतो .
निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले होते . बीड उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी सार्वजनिक रस्ते अडवणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल , असा इशारा दिला आहे .
कारवाईदरम्यान महसूल , पोलीस आणि ग्रामपंचायत यंत्रणा एकत्र आल्या . नेकनूर पोलिस स्टेशनचे बीट अमलदार सचिन मुरुमकर यांच्या पथकाच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवण्यात आले . ग्राम महसूल अधिकारी शिवराम येवले , मंडळ अधिकारी दिनकर जायभाय , महसूल सेवक बाबासाहेब बिरलींगे आणि ललित काकडे यांनी सलग ठाण मांडून रस्ता मोकळा केला . विशेषतः उसाची वाहतूक आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी हा रस्ता खुला झाल्याने महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले .
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही गावकऱ्यांमध्ये समन्वय साधत प्रशासनाला सहकार्य केले .या संपूर्ण प्रकरणात सरपंच अनिल शेंडगे यांनी गावकऱ्यांची बाजू सांभाळत प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले . अखेर महसूल प्रशासन , पोलीस यंत्रणा आणि ग्रामपंचायत यांच्या एकत्र प्रयत्नातून चार वर्षांपासून अडलेला प्रश्न एका दिवसात सुटला .
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले की , सार्वजनिक रस्ते , शासकीय जमिनी किंवा वहिवाटीचे मार्ग अडवणाऱ्यांना अजिबात माफ केले जाणार नाही . अशा प्रकारांची माहिती दिल्यास तात्काळ कारवाई केली जाईल . जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनीही नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि प्रशासनाला साथ द्यावी , असे आवाहन केले आहे .
विशेष म्हणजे गेवराई, गंगापूर , पैठण , घनसावंगी आणि अंबड येथे तहसीलदार म्हणून काम करत असतानाही चंद्रकांत शेळके यांनी रस्त्यांची कामे प्राधान्याने केली होती . बीडमध्ये आल्यानंतरही त्यांनी हीच वाट धरली आहे . मागील एका वर्षात त्यांनी जवळपास शंभर किलोमीटर रस्ते अतिक्रमणमुक्त करून जनतेसाठी खुले केले आहेत . त्यामुळे गावोगाव त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त होत असून , सामान्य माणसातून त्यांचे आभार मानले जात आहेत .

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles