
बीड — अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव शिवारातील गायरान जमिनीत सापडलेल्या अनोळखी प्रेताचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेला दोन दिवसात यश आले.कौटुंबिक वाद आणि मृताच्या त्रासाला कंटाळून त्याच्याच वडिलांच्या सख्ख्या साडूने भाडोत्री मारेकऱ्यांच्या मदतीने हा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
बर्दापूर पोलीस ठाण्यांतर्गत जवळगाव शिवारात 18 डिसेंबर रोजी अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता या व्यक्तीचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्ट वरून समोर आले. त्यानंतर अज्ञात लोकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली. एलसीबीने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख स्वप्निल ऊर्फ चिंगू अशोक ओव्हाळ वय 30 वर्ष,रा.रेणापूर, जि. लातूर अशी पटवली. तपासादरम्यान पोलिसांना संशय आल्याने त्यांनी स्वप्निलचा नातेवाईक गोरोबा मधुकर डावरे याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, खुनाचे धक्कादायक कारण समोर आले.स्वप्निल हा गोरोबा डावरे याच्या साडूचा मुलगा होता. साडू आणि साळपिण्याचे निधन झाल्यामुळे गोरोबाच स्वप्निलचा पालक म्हणून सांभाळ करत होता. स्वप्निलचे लग्नही गोरोबानेच लावून दिले होते. मात्र, स्वप्निलला दारूचे व्यसन होते. तो दारू पिऊन पत्नीला आणि गोरोबाला सतत त्रास द्यायचा. एकदा तर त्याने गोरोबाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला होता.याच रागातून गोरोबाने स्वप्निलचा काटा काढण्याचे ठरवले.गोरोबाने लातूर आणि नांदेड येथील तीन साथीदारांच्या मदतीने स्वप्निलला रेणापूरहून जवळगाव येथे आणले. तिथे त्याला बेदम मारहाण करून गळा आवळून त्याची हत्या केली आणि मृतदेह शेतात फेकून दिला. या प्रकरणात पोलिसांनी गोरोबा मधुकर डावरे वय 45 वर्ष, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई, संतोष लिंबाजी मांदळे वय 34 वर्ष, रा. लातूर, किशोर गोरोबा सोनवणे वय 29 वर्ष, रा. लातूर, अमोल विनायक चव्हाण वय 26 वर्ष, रा. नांदेड या आरोपींना अटक केली आहे. दरम्यान ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांचे मार्गदर्शना खाली स पो नि ज्ञानेश्वर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, गोविंद भताने पोलीस अंमलदार सचिन आंढळे, विकी सुरवसे, चालक अतुल हराळे यांनी केली.

