बीड — गाय गोठ्याची फाईल करण्यासाठी गेवराई पंचायत समितीतील अभियंत्याने शेतकऱ्याकडे हजार रुपयाची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या अभियंत्यास जाळ्यात पकडले. विनायक राठोड असं या लाचखोर अभियंत्याचं नाव आहे.
अधिकाऱ्यांनी किती खालचा दर्जा गाठला आहे याचं उदाहरण पुढे आला आहे.विनायक राठोड या अभियंत्याने बुधवार दि. 19 नोव्हेंबर रोजी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्याच्या बीड शहरातील अंबिका चौकातील एका प्रायव्हेट कार्यालयात केली होती. संबंधीत तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीडच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची खात्री पटल्यानंतर एसीबीने त्याच्याविरोधात सापळा लावला. परंतु राठोडला संशय आल्यानंतर त्यानं तक्रारदाराला टाळायला सुरूवात केली. मात्र लाचेची मागणी केल्यावरून विनायक राठोड यास एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी सोपान चित्तमपल्ले यांनी शनिवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

