वडवणी — कुंडलिका नदीच्या पुरात कुप्पा येथील वाहून गेलेल्या अक्षय बाबासाहेब जाधव या 24 वर्षीय तरुणाचा मृतदेह तब्बल 36 तासानंतर सापडला.
अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यात पुराने थैमान घातले होते. अनेक ठिकाणी नद्यांनी आपले पात्र बदलले. गेल्या 35 वर्षाच्या काळात पहिल्यांदाच कुंडलिका नदीला महापूर आल्या गेला.या पुरात कुप्पा येथील अक्षय जाधव हा वाहून गेला होता. मंगळवारी रात्रभर आणि बुधवारी दिवसभर शोध मोहिम सुरू होती. मात्र बेपत्ता झालेल्या अक्षयचा ठावठिकाणा लागत नव्हता.गुरुवारी सकाळी पुराचे पाणी ओसरले अन् तब्बल 36 तासानंतर कुंडलिका नदीत असलेल्या दुकडेगाव येथील बंधार्याच्या पिल्लरला अडकलेला अक्षयचा मृतदेह सापडला. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला.

