मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, कृषिमंत्र्यांना दिले पत्र
बीड — अतिवृष्टीमुळे पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
बीड विधानसभा क्षेत्रासह (बीड व शिरूर का. तालुका) जिल्हा व महाराष्ट्रामध्ये गत तीन महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. गत ऑगस्ट महिन्यात व दि.१३ सप्टेंबर २०२५ पासून सातत्याने अतिवृष्टी पाऊस होत आहे. या पावसामुळे सर्वच पिके व फळबागांचे शतप्रतिशत नुकसान झाले आहे. महसुल, कृषी विभाग तथा तत्सम विभागाला सरसकट शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करून पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार, महसूलमंत्री
ना.चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री ना.दत्तामामा भरणे, राज्याचे मा.मुख्य सचिव, मा.विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर आणि बीड चे जिल्हाधिकारी यांच्याकडे आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्राद्वारे केली आहे.
यामध्ये बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर का. तालुक्यात सर्वच महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. मुख्य नदी व उप नद्यांना पुर येवून शेतकरी बांधवांच्या जमिनी खरडुन गेल्या आहेत. शेतामध्ये पुराचे पाणी शिरून पिक व फळबागाचे नुकसान झाले आहे. दीर्घकाळ पाणी जमिनीवर राहिल्याने पिकांचे नुकसान होऊन घरांची पडझड झाली आहे. सार्वजनिक मालमत्ता रस्ते व पुल खरडुन जाणे, शाळा व शासकीय इमारतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, पशुधन मृत्युमुखी पडणे, विजेच्या तारा तुटणे, खांब मोडणे, रोहित्र खराब होणे व त्यामध्ये जिवीतहानी होणे, बंधारे फुटल्यामुळे शेती वाहुन जाणे, तलाव फुटण्याची शक्यता असणे व कपिलधार ता.बीड, भानकवाडी (वरची) ता.शिरूर का. याठिकाणी भुस्खलन होणे या सर्व बाबींची सकारात्मक दृष्टीकोनातून नुकसानीचे सर्वेक्षण व वस्तुनिष्ठ पंचनामा करावा. शेतकरी बांधव,नागरिक यांना सरसकट नुकसान भरपाई देवून मदत करावी. तसेच मागील तीन महिन्यापासून होत असलेल्या पावसामुळे सर्वत्र जमीन, नदी, नाले, बंधारे, तलाव पाणीमय झालेले आहेत. त्यामध्ये सर्व पिकांचे व फळ बागांचे शतप्रतिशत नुकसान झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यासर्व बाबींचे निकष पाहता तथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार शेतकरी बांधव, ग्रामस्थ व नागरिकांना सर्वरित्या सक्षम साथ व सहकार्य होणेसाठी ओला दुष्काळ जाहिर करून सर्वोतोपरी मदतीची गरज आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्राद्वारे केली आहे.

