बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे चे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचे नाव पुढे आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.या
प्रकरणात भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडेंची बाजू घेतल्यामुळे त्यांच्यावरही सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. दरम्यान संतोष देशमुखांच्या कुटुंबाने आज भगवान गडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि त्यांना या प्रकरणातील सर्व पुरावे दाखवले. यावेळी वैभवी देशमुखने शास्त्रींना थेट सुनावले.
संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय आणि मुलगी वैभवीने भगवान गडावर महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संतोष देशमुखांच्या खूनामागील खरे कारण, आरोपींचा इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, त्यांच्यावरील गुन्ह्यांचा कच्चा चिठ्ठाच महाराजांपुढे मांडला. यावेळी ‘आपण माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, तमाम भक्तांचे गुरू आहात पण आपण केलेले विधान हे आम्हाला पटले नसल्याचं, संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुख हिने भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना ऐकवले. नामदेव शास्त्रींना बोलताना वैभवी म्हणाली, ‘आम्ही बातम्यांमध्ये ऐकले, माझ्या वडिलांच्या अंगावर इतके वार झाले, त्यांचा एकही अवयव शाबूत ठेवला नाही. त्यांच्या अस्थी मध्येही फक्त तीन हाडं निघाली. आमची मानसिकता काय असेल? आज आमच्या वडिलांचे फोटो बघावे वाटत नाहीत. मला फक्त एवढे वाटते की, माझ्या वडिलांची हत्या कशी झाली, त्यामागचे कारण काय, तेवढे वक्तव्य करण्यापूर्वी समजून घ्यायला हवे होते, आमची बाजू ऐकायला पाहिजे होती आणि मगच वक्तव्य करायला पाहिजे होते.’
‘गुन्हेगारी वृत्तीमुळे माझ्या वडिलांची हत्या झाली. ज्यांना आरोपींचे समर्थन करायचे आहे, त्यांनी ते करावे, आम्ही त्यांच्याबाबत बोलत नाही. हे लोक जातीयवाद वाढवत आहेत. माझ्या वडिलांनी कधीच जातीवाद केला नाही. जो माणूस दलित व्यक्तीला वाचवण्यासाठी गेला, त्याला न्याय मिळण्यात फाटे फुटत आहेत. आम्ही अजूनही दुखातून सावरू शकलो नाही. त्यांच्या न्यायासाठी आजही झुंझावे लागत आहे. ही घटना घडली, अशी पुढे घडू नये, त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे,’ असं वैभवी यावेळी म्हणाली.
दरम्यान नामदेव शास्त्रींनी
‘मी तुमच्या पाठिशी आहे. हा प्रकार समाजातील वाईट लोकांनी केलेला आहे. तुम्ही भगवान गडाचे शिष्य आहात. मस्साजोग-केज तालुका बाबांना मानणारा आहे. माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल. मी कधीही गुन्हेगाराच्या पाठिशी नाही. भगवान गड आपल्या सदैव पाठिशी आहे. मी भगवान बाबाला प्रार्थना करतो, लवकर न्याय मिळावा. आरोपीचे कधीही समर्थन करत नाही. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ निघाला. महाराष्ट्राला विनंती आहे. या प्रकरणाला जातीय रंग न देता न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न करावे,’ असे स्पष्टीकरण नामदेव शास्त्रींनी दिले.