हिंगणी येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, मर्या. अकोला, (महाबीज) कंपनीचे बीज प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न
चौसाळा — बीड तालुक्यातील हिंगणी (बु.) येथे महाबीज जिल्हा कार्यालय बीड यांच्या कडून “महाबीज” तूर वाण “गोदावरी” “या पिकाचे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम मंगळवार दि.17 डिसेंबर रोजी सकाळी हिंगणी ( बु.) येथे चौसाळा – नांदूरघाट रस्त्यावर प्रकाश कुलकर्णी यांच्या शेतात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महाबीज कंपनीचे विभागीय व्यवस्थापक जगदीश खोकड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेती क्षेत्रात सतत होणारे बदल आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा होणारा वापर तसेच वातावरणीय बदल, महाबीज कंपनी कडून घेण्यात येणारे बीजोत्पादन याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा वापर, महाजैविकचा वापर सविस्तर पणे सांगितला. शेतकऱ्यांनी विविध पीक पद्धतींचा वापर करून स्वतः च्या शेतात पिकणाऱ्या पिकांची मार्केटिंग आदी विषयी माहिती दिली. तसेच विविध पीक पद्धती, पिकांत हवामानानुसार होणारे बदल आणि पिकांचे गुणधर्म ओळखून शेतकऱ्यांनी पिकाची लागवड कशी करावी या विषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतीमध्ये होणारे नवनवीन बदल तसेच कृषी विभागाच्या योजना आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर पाणी फौंडेशन चे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे यांनी गट शेती, सेंद्रिय शेती आदी विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच गट शेती व सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले. यावेळी प्रगतशील शेतकरी दत्ता जाधव, श्रीकांत कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, सेवानिवृत्त कृषी अधिकारी पी. जी. कुलकर्णी आदींनी आपले अनुभव शेतकऱ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा व्यवस्थापक महाबीज बीड चे अजय फुलझेले यांनी केले. सूत्रसंचलन सचिन धस यांनी केले तर आभार उपसरपंच अंकुश गोरे यांनी मानले. यावेळी पाणी फौंडेशनचे तालुका समन्वयक शिवलेश्वर मेदने, प्रवीण काठवटे, सागर गोरे, विशाल करंडे, विशाल घोलप, कृषी पत्रकार विठ्ठल घरत, महाबीजचे डीलर योगेश मंत्री व श्री कोटेचा, परिसरातील शेतकरी उपसरपंच अंकुश गोरे, सुधाकर गुंजाळ, रामुकाका, चंदन नाईकवाडे, संजय गुंजाळ, रविंद्र चव्हाण, वामन मुंडे, सौरभ निनाळे, खंडाळा येथील शेतकरी गटाच्या महिला आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन महाबीज कंपनी बीड कृषी क्षेत्र अधिकारी, (विपनन) सचिन धस व कृषी क्षेत्र अधिकारी, (उत्पादन) अविनाश केदार यांनी विशेष परिश्रम घेऊन केले होते.